Sunday 31 January 2016

बोली आरूषाची


‘बोली आरूषाची’ हा रेखा मिरजकर यांचा पहिलाच कवितासंग्रह. पण साहित्यक्षेत्रातलं हे पहिलंच पाऊल नाही. या आधी त्यांनी ललित लेख, कथा या प्रकारचं लेखन केलं आहे. त्यांची तीन-चार पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत.

‘बोली आरुषाची’ हे शीर्षक म्हणजे कवयित्रीची प्रामाणिक भूमिकाच आहे. याबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात खुलासाही केलेला आहे. रांगता रांगता दिसेल तो आधार घेऊन उठत पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या बाळासारखे ‘अजून शब्द रांगत आहेत’ अशी त्यांची आपल्या कवितेबद्दलची नम्र समजूत आहे. पण या कविता वाचताना असं आर्षपण जाणवलं ते अभिव्यक्तीबाबत. आशयाच्या बाबत नाही. कवितांमधील आशय पुरेसा पक्व आहे. आणि ही पक्वता वाचकांपर्यंत पोचेल अशी शब्दकळाही आहे. स्वत:कडे थोडं ‘अभ्यास’पूर्वक लक्ष दिलं तर हीच कविता अधिक प्रभावी होईल.

कविता अल्पाक्षरी असते. ती सलणार्‍या घटना-प्रसंगातील तपशील पुसून टाकते आणि आत खोलवर पोचलेल्या पडसादापैकी काहीना शब्दरूप देते. त्यामुळे व्यक्त झालेली कविता वैयक्तिक राहात नाही. कवितेत असं सामान्यिकरण केलं जाण्याची जी क्षमता असते त्यामुळे ती प्रभावी होते. सर्वांची होते. व्यक्त होऊनही अव्यक्त राहाता येण्याच्या अशा शक्यतेमुळे कवितेचं अनेकांना आकर्षण वाटतं. कवितेच्या छोटेखानी रूपामुळेही कविता लिहिण्याचा मोह होतो. पण कविताच लिहावी असं तीव्रतेनं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे, कवयित्रीनं आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे ती ‘अस्वस्थ मनाची कोंडी फोडण्याचं’ एक जिवलग साधन असते. रेखा मिरजकर यांच्या कवितेत व्यक्त झालेली अस्वस्थता मनाची घुसमट मोकळी करणारी आहे. त्यांना कवितेचं आकर्षण वाटलं ते मन मोकळं  करता येईल अशी सखी या तिच्या रूपाचं. ‘वसा’, ‘अबोली’, ‘आठवणी’, ‘आकाश’.... अशा काही कविता या दृष्टीनं वाचण्यासारख्या आहेत.

जगण्याची संथ लय हरवून गेलेल्या सध्याच्या गतिमान आणि घाबरवणार्‍या वास्तवाचं प्रतिबिंब असलेली सध्याची कविता अधिकतर मुक्त छंदात लिहीली जाते. मुक्तछंद कविता लिहीणंही वाटतं तितकं सोपं नसतं. मुळात आतून अनावरपणे काही तरी उगवून यावं लागतंच. पण मुक्त छंदाला यमक, मात्रा, अक्षरसंख्या.... अशा प्रकारचं बंधन नसतं. त्यामुळं उत्स्फूर्तपणे आतून येईल ते थेटपणानं लिहीता येतं. स्वत:च्या वाटण्याशी तडजोड करावी लागत नाही.

छंदोबद्ध कवितेला यमक, मात्रा, अक्षरसंख्येचं बंधन असतं. आणि आतला उमाळा या बंधनातूनही व्यक्त होईल इतका प्राणवान असावा लागतो. अशा कवितेची लय विशिष्ठ शब्दांची मागणी करणारी असते. आतला उमाळा थोपवून धरत ती शब्दांचा, त्यांच्या वजनाचा विचार करायला लावते. आशय तितकाच समर्थ असेल तेव्हा तो असे ‘विशिष्ठ’ शब्द सोबतच घेऊन येतो. यमक, मात्रांचा ‘वेगळा’ विचार करावा लागत नाही. अंगभूत लय केवळ शब्दांनाच नाही अशा आशयाला सुद्धा असते. छंदोबद्ध कवितेचं वैशिष्ट्य असं की ती कविच्याही नकळत कविच्या मनातला आशय व्यक्त करते. कारण कवितेची लय कवी-मनातील अबोध आशयाला आवाहन करते. सूप्त आशयाला जाग आणते. आणि कविला स्वत:लाच स्वत:ची नवी ओळख करून देते.

लयबद्ध कविता काहीशी संदिग्ध होते. अनेकार्थाच्या शक्यता या संदिग्धपणात लुकलुकत राहतात. लय, मात्रा, ठराविक वजनांचे शब्द आणि यमक यामुळे कविता गेय होते. स्वरबद्ध करता येते. आशयाला स्वरांची मिती मिळाल्यावर अशी कविता शब्दात न कळताही रसिकमनाला भावते. मनामनात गुणगुणत राहते.

कवितेचा आशय फक्त शब्दांतून नाही तर विराम-चिन्हांमधून, सोडलेल्या रिकाम्या जागांमधूनही व्यक्त होत असतो. छंदोबद्ध कवितेला व्यक्त होण्यासाठी लय ही एक अधिकची मिती प्राप्त झालेली असते. त्यामुळे अशा कवितेत कवितापण ठासून भरलेलं असतं. मात्र दुर्बोध होण्याचा धोकाही अशा कवितेला असतो.

अक्षर, मात्रा, यमक यांचं बंधन सांभाळणं अवघड तर असतंच पण त्यात दुहेरी धोका असतो. हे बंधन काटेकोरपणे पाळण्याचा दुराग्रह धरला, सर्व नियम पाळलेले असणं म्हणजे चांगली कविता असं मानलं तर अशी कविता म्हणजे केवळ शब्दकौशल्य ठरू शकते. नियमांसाठी आशयाशी तडजोड केलेली कविता कृत्रिम होऊ शकते. आणि नियमांकडे लक्ष न देता लिहीलेली कविता गेयता हरवून बसते. लय गमावते. ती एक फसलेली कलाकृती होते.

कविला अक्षर, मात्रा इत्यादींचं बंधन झुगारण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र ‘नियम’ मोडताना मुळात नियम काय आहेत, ते तसे का आहेत, त्यांचं महत्त्व काय..... हे पूर्णपणे माहीत असावं लागतं. एखादी मात्रा कमी, जास्त करण्यासाठी सोयीनुसार शब्द र्‍हस्व, दीर्घ लिहिले जातात. किंवा एखादी मात्रा कमी, जास्त राहू दिली जाते. यमक व्यंजनात जमलं नाही तरी स्वरात जमवून भागवून घेतलं जातं. मात्र अशी कोणतीही तडजोड पर्यायांचा पुरेसा विचार करून झाल्यावर, समजून उमजून केलेली असावी. छंद, लय... यावर हुकमत असलेला कवी सर्व नियमांचे सहज पालन करतो. त्याचे शब्द छंदोबद्ध होऊनच प्रकटतात. तडजोड केलेली कविता केव्हाही कमअस्सलच राहणार.

रेखा मिरजकर यांनी छंदोबद्ध कविता लिहिण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या संग्रहात मुक्त छंदाच्या बरोबरीनं अशा लयबद्ध कविता आहेत. रेखाताईंनी प्रस्तावना लिहिण्यासाठी म्हणून ‘बोली आरूषाची’ चं हस्तलिखित दिलं तेव्हा या कविता वाचताना जाणवलं की यातली छंदोबद्ध रचना अजाणतेपणी झालेली आहे. कविता वाचण्याच्या, ऐकण्याच्या संस्कारातून लयीची ओळख होते. ती लय मनात ठेवून कविता लिहीली जाते. बर्‍याच प्रमाणात लय साधली जाते. मात्र कवितेला अशी लय येण्यासाठी किती मात्रा, अक्षरं.... यांची आवश्यकता आहे याचा अभ्यास नसल्यामुळे कमी, जास्त वजनाचे शब्द वापरले जातात.... .या गोष्टी लक्षात आणून दिल्यावर रेखाताईनी त्यावर मन:पूर्वक काम केलं आणि नकळत झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. त्यामुळे या संग्रहातल्या छंदोबद्ध रचना बर्‍याच अंशी निर्दोष झाल्या आहेत.
उदा.-

“पाऊस घालतो गहन आगळी कोडी
जळि तरंग उठता झुलते कागद होडी” -(सृजन)

“अशा पेटत्या पाण्यात
उभे वेदनेचे गाव
दिशा दिशाहीन झाल्या
चुके काळजाचा ठाव” -(युगांत)

अशा काही ओळी अभिव्यक्तीच्या बाबतीतही आर्षपणाला ओलांडून जाणार्‍या आहेत. आशय तर हृदयस्पर्शी आहेच. या संग्रहातील एकूणच कविता अंतर्मुख होऊन स्वसंवाद साधणार्‍या आहेत. एक प्रकारे हा स्व-शोधच आहे. हा शोध कधी नात्यांचं स्वरूप उलगडण्यातून तर कधी निसर्गातील विभ्रमांशी नातं जोडण्यातूनही घेतलेला आहे.

गोव्यात राहणार्‍या व्यक्तीला गोव्याचा सार्थ अभिमान असतो. अनेक वर्षे गोव्यातच वास्तव्य असलेल्या रेखाताईंनीही ‘तेजोगाथा’ ही गोव्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणारी कविता लिहीली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोव्याच्या भूमीत रेखाताईंची कविता अधिकाधिक संपन्न होत राहू दे हीच सदिच्छा.-

आसावरी काकडे

(२००८) 

1 comment: