Wednesday 17 January 2024

एकांतरेघेवरून चालताना..

सुनीती लिमये माझी धाकटी मैत्रीण. आयुष्याच्या एकांतरेघेवरून चालण्याचा  संघर्षमय प्रयत्न करत असताना भेटलेली. ‘एकांतरेघेवरून’ हा तिचा तिसरा कवितासंग्रह स्वयम्‍ प्रकाशनातर्फे प्रकाशित होतो आहे. त्या निमित्ताने त्यातील कवितांविषयी लिहिताना तेव्हाची सुनीती मला आठवली. तेव्हा तिच्याशी झालेला संवाद आठवला. एकाकीपणाच्या वेदनांनी सैरभैर झालेल्या अवस्थेतही विचार करू शकणारी सुनीती मला वेगळी वाटली. तिच्याशी बोलताना, तिला समजावताना मीही अंतर्मुख होत होते. ती शब्दांतून माझ्याशी संवाद करत होती. पण तो खरा तिचा स्वतःशीच संवाद होता. तेव्हा तिनं लिहिलं होतं, ‘पूर्ण स्वतंत्र झालो तर पाचोळ्याप्रमाणे उडून जाऊ आणि बंधनात राहिलो तर दगडासारखे पडून राहू (परमेश्वराची इच्छा म्हणत).. असे हे व्दंव्द...’, ‘मी निराश नाही, अडलेपण आलं आहे’, ‘अहंकार आणि सेल्फ एस्टीम यात खूप सूक्ष्म लाईन आहे. स्लीपरी वे आहे. अहंकार नसावा पण सेल्फ एस्टीम टिकवायचा.. जरा कसरत वाटते मला...’ २०१२ सालच्या आमच्या संवादातली तिची ही काही स्वगतं...

एकाकीपणाला शहाण्या एकांतवासात बदलवणारा हा तिचा स्वसंवाद आणि स्वसंघर्ष अंतरंग खोदणारा होता. तिच्या आजच्या आत्मविश्वासपूर्ण जगण्यामागे या संघर्षमय तपाचे संचित आहे. त्यातून तावूनसुलाखून निघालेली सुनीती आज कवयित्री, चित्रकार, छायाचित्रकार, गायिका, योग-प्रशिक्षक असे जगण्याचे वेगवेगळे आयाम आपलेसे करत कलात्मक आनंद घेत समृद्ध आयुष्य जगते आहे. ‘एकांतरेघेवरून’ या तिच्या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना मला तिची ही पार्श्वभूमी आठवत राहिली...

कवितासंग्रहाचं ‘एकांतरेघेवरून’ हे शीर्षक तिचा हा पूर्वार्ध अधोरेखित करणारं आहे असं वाटलं. विशेष म्हणजे या संग्रहाचं सुंदर आणि समर्पक मुखपृष्ठ सुनीतीनं स्वतः केलेलं आहे. या मुखपृष्ठ-चित्राची रंगसंगती आणि त्यातलं गहिरेपण लक्षवेधक आहे.

या संग्रहात नव्वदएक कविता आहेत. काही मुक्तछंदात आहेत. काही लयबद्ध आहेत. मुक्तछंद कवितांमधे वास्तव-दर्शन आहे. वास्तव चित्रणासाठी हा आकृतीबंध स्वाभाविक वाटतो. यातील आशयाच्या भावावेगामुळे या कविता काही ठिकाणी पसरट झाल्या आहेत. त्या काहीशा एकसुरीही वाटल्या

लयबद्ध कविता मला विशेष आवडल्या. या कवितांची लय पक्की आहे हे एक कारण आणि दुसरं, यातील आशय अमूर्त चित्रासारखा आहे. नेमेकं काही न सांगता बरंच काही सांगणारा... या दृष्टीने ‘पैल’ ही या संग्रहातली कविता मला विशेष आवडली. या कवितेच्या पहिल्या दोन ओळी मुखपृष्ठाचं नेमकेपणानं सुंदर वर्णन करणार्‍या आहेत.-

‘मी म्हणाले पैल नाही, तो म्हणाला ऐल नाही

नाव मध्याशी बुडाली या नदीला धीर नाही’

 

लक्ष वेधून घेणारी, आस्वादासाठी शब्दांपाशी रेंगाळायला लावणारी आणखी काही उदाहरणं...

‘अहंपणाच्या खांद्यावरचा हात काढुनी घ्यावा

ओंकाराच्या गाभार्‍यातुन सूर स्वच्छ लागावा’ (साक्षी)

‘रक्त प्रवाही देह प्रवाही / आपुल्यामधले मोह प्रवाही’ (प्रवाही)

‘अर्थाचे काठ शोधत शोधत आपण किती लांब आलो नं प्रिय..!’ (काठ)

‘वेडी वर्दळ’, ‘देहामधले एक कलेवर’, ‘मर्म’, ‘कधी झोका वर’, ‘मी त्याच उन्हाचे झाड’, ‘काही निःशब्द प्रार्थना’ ‘सूर्य पश्चिमी बुडेल’ या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. अर्थात प्रत्येक वाचक याच कवितांपाशी रेंगाळेल असं नाही. आस्वादक्षणी कुणाला कोणती कविता थांबवून ठेवेल हे सांगता येत नाही. प्रत्येक कवितेचं आवाहन वेगळं असतं.

कविता काहिशी आत्मकथनात्मक असते. पण ती जगण्याचा तपशील सांगत नाही. शब्दांशिवाय कुठेच व्यक्त होऊ न शकलेलं असं ‘काहीतरी’ कवितेत उतरतं. व्यक्त होऊनही अव्यक्त राहातं. लिहिणार्‍या एका ‘स्व’चं असूनही आत्मीयतेनं वाचणार्‍या प्रत्येकाला आपलं वाटतं. सुनीतीच्या कवितांमधे वाचकांना आपलं ‘काहीतरी’ गवसेल. आपापल्या एकांतरेघेवरून चालताना या कवितांची सोबत वाटेल. चित्र, छायाचित्रांच्या सोबतीनं तिची कविताही बहरत राहो ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१६ जानेवारी २०२४