Monday 18 January 2016

इंदिरा संतांची गर्भरेशमी कविता


      “पुस्तकातली खूण कराया /  दिले एकदा पीस, पांढरे / पिसाहुनी सुकुमार काहिसे / देता-घेता त्यात थरारे !”,... “अजून नाही जागी राधा / अजून नाही जागे गोकुळ / अशा अवेळी पैलतीरावर / आज घुमे का पावा मंजुळ..”... अशा एकापेक्षा एक सुबक गर्भरेशमी कविता लिहिणार्‍या इंदिराबाई (१९१४–२०००) आपल्यातून गेल्या त्याला एक तप उलटलं. पण नदीचा प्रवाह अखंड वाहता राहावा तशी त्यांची कविता अखंडपणे मराठी कवितेच्या इतिहाच्या प्रवाहात आपल्या वैशिष्ट्यांसह सामिल होऊन वाहाते आहे. कवितेविषयक चर्चा असो, संपादन.. संकलन असो की मराठी कवितेचा नव्यानं आढावा घेणं असो इंदिराबाईंची कविता ओलांडून कुणालाच पुढं जाता येत नाही. त्यांचं योगदानच तेवढ्या मोलाचं आहे. १९४१ साली प्रकाशित झालेल्या ‘सहवास’ या कवितासंग्रहापासून त्यांची कविता पुस्तकरूपात वाचकांसमोर यायला सुरुवात झाली. त्यानंतर यथाकाल प्रकाशित होत गेलेल्या ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘मृण्मयी’, ‘गर्भरेशीम’ ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’, या संग्रहांतून त्यांची कविता नित्यनूतन रूपात वाचकांना भेटत राहिली. सन २००० साली ‘निराकार’ हा त्यांचा शेवटचा कवितासंग्रह वाचकांच्या हाती आला. साठ वर्षांच्या दीर्घ कालावधीत कवितेसाठी आवश्यक अशी सजग संवेदनशीलता जतन करणं सोपं नाही... परंपरा आणि नाविन्य यांची सांगड घालत, उत्कटता उणावू न देता लिहिलेल्या अशा घसघशीत अकरा कवितासंग्रहाची भर त्यांनी मराठी कवितेत घातली आहे. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कविता संग्रहाला साहित्य अकादेमीचा महत्त्वाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसंच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारानेही त्याना सन्मानित केलं होतं...

      त्यामुळे त्यांच्या कवितेविषयी वेळोवेळी अनेकजणांनी भरभरून लिहिलेलं आहे. त्यांच्या कवितेविषयी सविस्तर लिहिलेलं वाचताना, त्यांचा जन्म इंडी (जि. विजापूर) इथला, पुण्या – मुंबईत शिक्षण, पुढील वास्तव्य बेळगाव इथे, ना. मा. संत यांच्याशी प्रेमविवाह, दहा-अकरा वर्षातच पतिवियोग, त्यांचं वास्तव्य असलेल्या बेळगावच्या निसर्गाचा त्यांच्या कवितेवरील प्रभाव, त्यांची शब्दांविषयीची सूक्ष्म जाण, त्यांना लाभलेली प्रतिभेची देणगी... हे सर्व तपशीलही वाचायला मिळतात. त्यांची कविता समजून घेण्यासाठी अशा प्रकारचं लेखन उपयोगी पडू शकतं. मात्र स्वतः स्वतंत्र आस्वाद घेतांना या दिग्दर्शनानं दाखवलेल्या वाटांवरूनच जायला हवं असं मात्र नाही. ‘‘प्रेम, पतिवियोगाचे दुःख, त्यामुळे आलेलं एकाकीपण.. हे त्यांच्या काव्याचे विषय होते’’ असं त्यांच्या कवितेविषयी सतत म्हटलं जातं. पण त्यांची कविता त्यांच्या आयुष्यातील काही घटनांशी बांधून न ठेवता तिथून सोडवून घेऊन आस्वादली तर? नव्या परिघात या कवितेतील आशयाला नक्कीच वेगळं परिमाण मिळू शकेल... ट्रीपमधे प्रवाशांना गाइडने ठरलेले पिकनिक पॉइंटस्‍ दाखवावेत तशी कवितेची साचेबद्ध पठडीतली समीक्षा वाचकाला कवितेच्या प्रदेशातली ठराविक आस्वादस्थळं दाखवत असते. त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवत असते. पण गाइडचं बोट सोडून एखाद्या कलंदर प्रवाशानं स्वैर भ्रमंती करत परिसर न्याहाळला तर त्याला वेगळं सौंदर्यही अनुभवता येऊ शकतं... इंदिराबाईंसारख्या श्रेष्ठ कवयित्रीची बहुआयामी कविता अशी पारंपरिक आस्वादशैलीचं बोट सोडून अनुभवायला हवी.. प्रयोग म्हणून सहसा उद्‍धृत न होणार्‍या ‘गर्भरेशीम’मधल्या त्यांच्या दोन तीन छोट्या कविता पाहू-

      “देह भन्नाट सैरावैरा / उठे तुफान काळजीचे 
      मन पिंजून तूस तूस / बोंड फुटे सावरीचे
      गेले वाहून तन मन / स्थिर येथे मी एकचित्त 
      प्रळयाच्या पैल तेथे / हिरवा अंकुर पालवत” (पृष्ठ १५)

      या कवितेत म्हटलंय - तुफानासारख्या काळजीनं देह सैरावैरा भन्नाट वेगात गरगरतोय. बोंड फुटून कापसाचं तूस तूस मोकळं व्हावं तसं मन पिंजलं गेलंय. या अनावरतेत तन मन वाहून गेलंय. पण इथे मी स्थिर..एकचित्त आहे.. प्रलय झालाय पण त्याला न जुमानता त्याच्या पल्याड एक हिरवा अंकुर उगवतोय... कवितेतले शब्द फक्त एवढंच सांगतायत. हे फक्त काही बिंदू आहेत. ते घेऊन आपल्या मनात उमटलेल्या कवितेच्या आशयाची रांगोळी रेखायची तर ते कुठे कसे ठेवायचे ते आपण ठरवायचं. या कवितेतली तुफान उठवणारी काळजी कशाची आहे? आजच्या जेवणाची? की भवितव्याची? भवितव्य कोणाचे स्वतःचे, कुटुंबाचे, देशाचे.. की मानवजातीचे?.. कविता बाकी काही सांगत नाहिए. कवितेत फक्त तिची तीव्रता सूचित केलीय.. कविता आस्वादताना ज्याला जे जाणवेल त्यानुसार त्याच्या मनातल्या आशयाचा पैस ठरणार.. काही पूर्वग्रह मनात ठेवून, कवयित्रीचे ऐकीव एकाकीपण सोबत घेऊन कविता आस्वादण्याचा प्रयत्न केला तर कवितेचे शब्द तिथल्या तिथे फिरवत ठेवतील...!

      वरील कविता इंदिराबाईंविषयीच्या माहितीतून झालेले संस्कार बाजूला ठेऊन, कवितेखालचं त्यांचं नावही नजरेआड करून समजून घेता आली तर?.. प्रत्येक रसिकाच्या मनात एक वेगळी कविता उमटेल. कवितेचं हेच तर सामर्थ्य आहे. इंदिरा संतांची कविता अशी मोकळ्या मनानं समजून घेतली तरच तिचं सामर्थ्य, मराठी कवितेतलं तिचं वेगळेपण खर्‍या अर्थानं जाणता येईल. ‘गर्भरेशीम’मधल्या आणखी दोन कविता इथे उद्‍धृत करते-

      “ दाराच्या भरक्कम चौकटीला टेकून मी / उभी असते बघत / एक एक जीवनाचे पान ओघळताना.. / अगदी तटस्थ / स्मरणे चाळवत नाहीत. डोळे चुरचुरत नाहीत / कुठे काही पोचतच नाही / संपूर्ण सुखाने सुस्तावले असेन / सतत दुभंगत जाणार्‍या दुःखाने निर्ढावले असेन / संवेदनाच लुळ्या पडल्या असतील / की पाऊसपाण्याचे ओहळ जावेत तसेच हे / वाटत असेल?  / काहीच कळत नसल्यासारखी मी एक एक / ओघळते पान बघत उभी आहे / अगदी तटस्थ ” (पृष्ठ ६६)

      ‘कुठे काही पोचतच नाही’ असं म्हणणारी ही कविता संवेदनशीलता सुकत चालल्याची खंत व्यक्त करते आहे काय? की अलिप्ततेचा माग घेत स्व-शोध घेण्याचा प्रयत्न करतेय? की हे केवळ एका मनोवस्थेचं वर्णन आहे?... आधीच्या कवितेत ‘काळजी’ तर या कवितेत ‘तटस्थता’ या कळीच्या जागा आहेत. त्यांच्या भोवतीचा पैस आपल्या क्षमतेनुसार आपल्याला वाढवता येईल...

      दुसरी कविता आहे ‘रानवाटा’.-  

      “काजव्यांचे चाळ पायांत घालून / दुडूदुडू धावणारी. फुलपाखरासारखी  
      विजेचा कमरपट्टा घालून / सैरावैरा धावणारी. रानवार्‍यासारखी  
      कपाळावर चंद्रबिंदी रेखून / ठुमकत पावले टाकणारी. मोरासारखी. 
      केव्हापासून पाहते आहे / या रानवाटा कुठे निघाल्या आहेत? 
      की माझी नजरच अशी तशी धावते आहे? (पृष्ठ ८३)

या कवितेत कविमन आत-बाहेरच्या मध्यसीमेवर आहे. ते पाहातंय बाहेर धावणार्‍या रानवाटा. त्यांचं वर्णन करतंय अर्थांची वलयं निर्माण करणार्‍या शब्दात. आणि अंतर्मुख होत तपासतंय नजरेची धाव कुठे कशी पोचतेय ते... ही चित्रदर्शी कविता प्रत्येकाला वेगळं दर्शन घडवू शकेल..!

      इंदिराबाईंची आणखी एक सर्वश्रुत कविता-

“वर्षेतिल संध्येपरि / आले मी आवरीत / रक्ताचा जाळ लाल / दुःखाची गडद लाट / वर्षेतिल रात्रीपरि / आले मी सावरीत / नयनातिल अश्रु निळे / हृदयातिल वीज रक्त / धगधगते जीवन हे / धरुन असे ओंजळीत / आले मी कुठुन कशी.. / आले मी हेच फक्त” (‘कविता:विसाव्या शतकाची’मधून- पृष्ठ १८७)
      या कवितेवर काही बोलायचं नाही..! फक्त अनुभवायची मनातल्या मनात..! जाणवणार्‍या आशयाचं आकाश आपलं आपण न्याहाळायचं आणि आपल्या परीनं सजवायचं..!!

      इंदिराबाईंच्या कवितांची आणखी सविस्तर ओळख करून घ्यायची तर सुरुवातीला नमूद केलेले त्यांचे संग्रह मिळवून ते वाचता येणं सहज शक्य आहे. मात्र कुणाच्याही दिग्दर्शनाशिवाय कविता वाचता येण्यासाठी कवितेविषयक समजूत कमावणं महत्त्वाचं आहे... त्या दृष्टीनं अलिकडे वाचनात आलेली Archibald MacLeish यांची Ars Poetica ही इंग्रजी कविता मला महत्त्वाची वाटते. “A poem should not mean but be  ही या कवितेची शेवटची ओळ एखाद्या व्याख्येसारखी बर्‍याचदा उद्‍धृत केली जाते. या कवितेचा संक्षिप्त भावार्थ इथं विचारार्थ देत आहे-

“कविता रसरशीत फळासारखी
स्पर्शगोचर.. स्तब्ध असावी
नीरव असावी डोकावणार्‍या दगडासारखी
पक्षाच्या भरारीसारखी निःशब्द असावी
निश्चल असावी कालातीत
वास्तवाच्या पार...
....
कवितेला अभिप्रेत नसावं काही
तिनं फक्त असावं..!”

(मूळ पूर्ण कविता त्यावरील भाष्यासह गूगलवर वाचायला मिळेल. जिज्ञासूंनी अवश्य पाहावी.)

आसावरी काकडे

‘काव्यशिल्प’ स्मरणिकेत प्रकाशित २०१२



2 comments: