Sunday 3 January 2016

‘मज स्वयंप्रकाशी दिवा हवा..!’-

प्रस्तावना-
व्यक्त होणं ही माणसाची मूलभूत गरज आहे. मनात भावनांची गर्दी झाली की तिला वाट करून द्यावीशी वाटते. स्त्रिया पूर्वी जात्यावर दळताना ओव्या म्हणायच्या. त्या अशाच कुणी कुणी रचलेल्या, परंपरेनं कानावर येत राहिलेल्या, नकळत लक्षात राहिलेल्या.. या ओव्या गाताना स्त्रिया त्यात आपलं सुख-दुःख शोधायच्या.. गाता गाता आपला एखादा शब्द त्यात ओवून टाकायच्या.. ते त्यांचं व्यक्त होणं असायचं.
आता भौतिक स्थिती खूपच बदललीय. पण व्यक्त होण्याची मानसिक गरज अजून तशीच आहे. स्त्रिया आता प्रतिमा, प्रतिकं वापरून स्वतःचं काव्य निर्माण करू शकतात.. कितीतरी मान्यवर कवयित्रींची नावं सांगता येतील. पण बर्‍याचजणी साहित्य-व्यवहारापासून अलिप्त आपल्या जगात आयुष्य व्यतीत करत असताना कवितेतून व्यक्त होत असतात. त्यांचं हे स्वगत लेखन स्वांतसुखाय चालू असतं. ‘एक मुक्याचे झाड मनात’ बहरत ठेवून त्याचे गाणे होण्याची वाट पाहणार्‍या अशा काहीजणींमधे सुचित्रा रानडे एक आहेत.
या मुक्या झाडाचा बहर घरच्यांपासून लपून राहिला नाही. त्यांनी तो प्रकाशात आणायचा असं ठरवलं... सुचित्राताईंनी वेळोवेळी लिहिलेल्या १८४ कविता माझ्यापर्यंत पोचल्या. यातल्या निवडक कवितांचा संग्रह करून त्यांच्या वाढदिवसाला त्यांना भेट दिला जाणार आहे... या पार्श्वभूमीवर मी कविता वाचायला घेतल्या. प्रस्तावना लिहायची म्हणून आवडलेल्या ओळी लिहून घ्यायला सुरवात केली तर प्रत्येकच कवितेत दखल घेण्याजोगं काही आहे असं जाणवायला लागलं. मनात आलं की या आधीच असा प्रयत्न झाला असता तर आता त्यांचा दुसरा संग्रह काढता आला असता.. पण, ‘लहरणार्‍या सुगंधाला पुसू नये नाव गाव / शब्दांमधे बांधू नये मनामधले अबोध भाव’ अशी मानसिकता असलेल्या सुचित्राताईंनी ‘तुरे शब्दांचे फुलले / गच्च कणिस उकले’ ही अवस्था आल्यावर लिहिलेल्या कविता आपल्यापुरत्याच ठेवल्या यात नवल नाही. प्रकाशात येणं सहज शक्य असलेल्या आजच्या काळात असं अलिप्त, आपलं आपल्यात राहणं ही दुर्मिळ गोष्ट आहे..
सुचित्राताईंच्या कवितांमधे नाती.. निसर्ग.. हे नेहमीचे विषय तर आहेतच पण अधिकतर कविता अंतर्मुख मनाचे चिंतन असलेल्या आहेत. त्या आत्मनिरीक्षण करतात. निजखूण शोधतात. स्वतःला धीर देतात... माफही करतात.. स्वतःशी संघर्ष करतात अर्जून होऊन आणि कृष्ण सख्याची वाट पाहतात..! त्या अल्पाक्षरी आहेत. आणि समुद्र, गुलमोहर, सायली, हळवा गंध, स्वप्नील नजर.. निळी भूल अशा कितीतरी सार्थ प्रतिमांमधून त्या बोलत राहतात.

माझ्यापर्यंत आलेल्या सर्व कवितांमधून मला भावलेल्या कवितांच्या काही ओळी वाचकांसमोर ठेवते आहे. त्यातून सुचित्राताईंच्या एकूण कवितांची अंतरंग ओळख होईल...
काही कावितांमधे ‘तू’शी संवाद आहे. हा ‘तू’ कधी जोडीदार असतो, कधी परमेश्वर असतो, तर कधी ‘तू’च्याजागी स्वतःलाच ठेवलेलं असतं... काही उदाहरणं-

१) ‘तू / असताना आळीमिळी / तू / नसताना नजर ओली...’

२) ‘आशा-निराशेच्या ऊन-पावसात / तुझे आभाळभर इंद्रधनू /
दुःख काळजीच्या वादळात / माझा दीपस्तंभ जणू..!’

३) ‘आता सोसायचा नाही / तुला झुलण्याचा खेळ /
गेला श्रावण झरून / गेली निघूनिया वेळ..!’

‘पक्षीच पक्षी’, ‘फ्लेमिंगो’ ‘उगवतीचा सोहळा’ या सुंदर निसर्ग-चित्र रेखाटणार्‍या कविता आहेत. असं निसर्ग-वर्णन असलेल्या कवितांमधूनही मनातळाचे भाव व्यक्त झालेले आहेत. उदा. ‘रिकामा घट’- या कवितेतली एक ओळ पहा- ‘पाण्यावरी वितळते / एक पेटलेली रेघ..’

‘झोकून दर्यात नाव’ या कवितेतल्या ओळीही अशाच भावगर्भ आहेत-
‘कुठे पाणी कुठे आकाश / कुठे क्षितिज-रेशा /
कोण कुणात मिसळले / फिरून दशदिशा..’

      सुरवातीला म्हटल्याप्रमाणे अंतर्मुख चिंतन हा या कवितांचा स्थायीभाव आहे. काही बोलकी उदाहरणं-
१) ‘खोल उरी हुळहुळणारा / डंख जरी खरा आहे /
मनी तुझिया झुळझुळणारा / कवितेचा झरा आहे..’

२) ‘मौनाची जहाल भाषा / ज्याची त्याला उमगते /
शब्दांच्या जखमेहून / अमिट खुणा उमटवते
 
आत्मनिरीक्षण करत निजखूण शोधणार्‍या काही कविता मला विशेष महत्त्वाच्या वाटल्या. उदा. ‘मला मी भेटले सर्वार्थाने’, ‘माझ्यापासून माझ्याकडे / किती दूरचा प्रवास..’, ‘अदृष्टाचे आर्त हाकारे’... इत्यादि कविता. या मुळातून पूर्ण वाचण्यासारख्या आहेत.
‘खूण’ या कवितेत म्हटलंय-
‘मनी उमलता सोहम्‍ खूण / गवसली बघ तुज निजखूण’


कविता लिहिता लिहिता कवितेची, शब्दांची अंतरंग ओळख होते. लेखन-प्रक्रियेविषयी काही उमगू लागतं... आपण लिहितोय.. पण ही किमया कोण करतंय ते समजून चुकतं. ‘बोलविता धनी’ ‘तू’च आहेस हे जाणवतं...
एक-दोन उदाहरणं-
१) ‘शब्दांच्या कल्लोळात दडवले
अर्थाचे मुक्त पक्षी’

२) ‘शब्द फापट पसारा / सत्व सापडेना व्यर्थ /
एका शब्दामधे फक्त / व्यक्त ‘आयुष्याचा अर्थ’

अशा कवितांमधून कवितेविषयीचं चिंतन व्यक्त झालेलं आहे.

      सुचित्राताईंच्या एकूण कवितांमधे छान सकारात्मक दृष्टिकोन आढळतो. उदा. ‘कृतार्थ’ कवितेत म्हटलंय-
तंबोर्‍याच्या तारा / जुळवून घेऊ / वर्ज्य सुरांना / मोकळेच ठेवू..

‘नवी सुरुवात’ कवितेतल्या ओळी-
शेवटाच्या सुरुवातीला / एकमेकांना देऊ बळ..
 
आणखी काही उदाहरणं-
१) ‘झोडपलेल्या वृक्षावरही / चिवट पाने राहतात काही’,

२) ‘नवनिर्मिच्या सोहळ्यात / असशील तू.. असशिलच तू...’,

३) “उन्हं आली उतरणीला / आता होईल दिवेलागण /
हलक्या हाती मुक्त करू / दंभ भरले ‘मी’पण’’

कवितेतून व्यक्त होणार्‍या या सकारात्मक मनाला ‘तो’ म्हणजे अज्ञातातील स्निग्ध वात आहे असं वाटतं. हे मन मान्य करतं की ‘चुकून पावसात भिजलो तरी / मनात मोर नाचतात / नाचतात ना?’, त्याला ‘फुलांमधून ईश्वराचं दर्शन’ घडतं. त्याच्या दृष्टिनं ‘क्षितिज म्हणजे भावना आणि व्यवहार यांच्या मधली संयत रेषा’ असते आणि ‘वाट, मुक्कामी पोचवून निःसंग राहणारी’ असते. त्याला कळून चुकलेलं असतं की, ‘मी साखरेबरोबर मुंग्याही वागवत होते..’, त्याला वाटत राहातं- ‘तुझ्या चिंतनी, तुझ्या दर्शनी / नकळत संपुन जावे जीवन’...

संयत, अंतर्मुख असलेल्या, आपलं आपल्यात राहून निजखूण शोधणार्‍या या कवयित्रीची ‘स्व’विषयीची धारणा लखलखित आहे. एका कवितेत त्यांनी म्हटलंय-

‘मी न हाती धरे काजवा / मला तळपता किरण हवा
थरथरणारी वात नको / मज स्वयंप्रकाशी दिवा हवा..!’

सुचित्राताईंना स्वयंप्रकाशी कवितेचा दिवा लाभावा आणि कावितालेखनातून अधिकाधिक आत्मिक समाधान मिळावं ही हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे

9762209028


No comments:

Post a Comment