Friday 25 March 2022

हिरव्या सूक्तांच्या प्रदेशातून फिरताना....

 ‘संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात आणि आत वळली की कविता..!’ असं लिहिणारी संजीवनी बोकील अंतर्बाह्य संवेदनशील माणूस आहे. त्यामुळे उत्कटतेनं भरभरून जगताना तिच्या मनाला जखमाही होतात आणि त्यावर फुंकर घालणार्‍या कविताही टपटपतात तिच्या वहीत..! कवितेचं हे ऋण व्यक्त करताना तिनं मागच्या संग्रहातल्या एका कवितेत म्हटलंय, ‘दुःखानेही सुखावण्याची कविते, ही कोणती रीत मला शिकवलीस?’...

‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ या नव्या कवितासंग्रहातही वेगळ्या दर्शनबिंदूमधून हा कृतज्ञ भाव व्यक्त झालाय. सुरुवातीलाच असलेली ती छोटीशी कविता अशी- “गळ्यापर्यंत बुडून / जिवाने आकांत केला / तेव्हा कवितेचा चर खोदला / भळभळ वाहून गेलं / गढूळ पाणी / मागे उरली मऊ माती / पण त्यावरून चालणं / अवघड नाही, / सहज उचलतील पाय / बाप रे! / ज्यांना कविता लिहिता / येत नसेल / त्यांचं काय?” खरंच, व्यक्त होणं ही माणसाची नितांत गरज आहे आणि कवितेइतक्या सूज्ञपणानं ती इतर कशानंही भागत नसावी.

‘अव्यक्ताची वादळे / शिरतील आता / हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ अशा शब्दात संग्रहातील कवितांचा मार्ग प्रशस्त केल्यावर कविता लिहिता येण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी ‘गळ्यापर्यंत बुडून’ ही कविता वाचकांसमोर ठेवणं म्हणजे आस्वादाच्या स्वागताला रांगोळी रेखण्यासारखंच आहे.

या कवितासंग्रहाचं विराज गुपचुप यांनी मन ओतून केलेलं प्रसन्न आणि आल्हाददायक मुखपृष्ठही रसिकमनाला निमंत्रण देणारं आहे. संजीवनीचं मनोगत तर अतिशय हृद्य आणि पारदर्शक झालं आहे. कवितेविषयीची तिची समज आणि अंतस्थ भाव त्यात उत्कटतेनं व्यक्त झालेले आहेत. उत्कर्ष प्रकाशनाने केलेली संग्रहाची एकूण निर्मिती आतील कवितांची श्रीमंती लक्षात आणून देणारी आहे.

कोणतीही अभिव्यक्ती माणसाचं व्यक्तीमत्व परिधान करून येते.. संजीवनी जीवनाचा आस्वाद रसिकतेनं घेत असते. कुठलीही गोष्ट कशीतरी करून टाकलेली तिला चालत नाही. मग ती कवितासंग्रहाची निर्मिती असो, एखादी रेसिपी असो, कार्यक्रमाचं आयोजन असो की पूजा करणं असो... ती त्यात एखादी कलाकृती निर्माण करत असल्यासारखी रमून जाते. तिची सर्जनशीलता अशा प्रत्येक कृतीतून डोकावत असते. कविता तर अशी अभिव्यक्ती आहे ज्यासाठी व्यक्तित्वाचे व्यक्त-अव्यक्त सगळे पैलू सजग असावे लागतात. ते लख्ख जागे होतात तेव्हा संजीवनीला कवितेची चाहूल लागते. मग ती स्व-भावानुसार आशयाच्या स्वागताला प्रतिमांची महिरप घालते. त्यातून हळूवारपणे कवितेचा आशय येऊ लागतो. शब्दांत प्रगट होण्यापूर्वीच संजीवनीला दिसतो तो... एका कवितेत तिनं म्हटलंय, ‘मला दिसतो आता अर्थ / बिनचेहर्‍याचा / शब्दांच्या पावलांपर्यंत सरकत आलेला... / हळव्या उजेडात बुडालेल्या / निश्चल वृक्षाचा अनुनय करणार्‍या / आकुल सावलीसारखा..’ आशयाच्या आगमनाचं इतकं तरल सुंदर वर्णन केलंय की वाचकालाही आशय येताना दिसावा..!

संजीवनीची सौंदर्यासक्त रसिक वृत्ती तिच्या कविता-निर्मितीत स्वाभाविकपणे पाझरलेली आहे. तिच्या बहुतेक कविता चित्रदर्शी आहेत. कारण प्रतिमा तिला दिसतात.. या संदर्भात संग्रहाच्या मनोगतात तिनं म्हटलंय, ‘कविता ही सूक्तच तर आहे. कारण आधी ती दिसावी लागते, मग तिला आवाहन, मग अवगाहन आणि मग अवतरण..!’ कविता कागदावर अवतरण्यापूर्वी आत काय काय घडतं ते किती नेमकेपणानं सांगितलंय..! या दृष्टीनं ‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ हे कवितासंग्रहाचं शीर्षकही अर्थपूर्ण वाटतं.  

हिरव्या सूक्तांच्या प्रदेशातून फिरताना संजीवनीची कविता वेगवेगळ्या रूपात भेटत राहते... ‘ती आणि दुपार’ या कवितेत इमारतीच्या बांधकामावर ‘परिस्थितीला ठेचत’ दगड फोडणार्‍या मळक्या घागर्‍यातील तरुण लमाणी बाईचं वर्णन आहे. ते इतकं भावोत्कट आहे की कविता वाचताना ती बाई नुसती दिसत नाही तर तिचं अंतर्विश्वही अनुभवता येतं. ‘I am a king’ या कवितेत वाळूच्या ढिगार्‍यावर खेळणारं अशाच स्त्रीचं मूल भेटतं. ‘‘I am a king’ असं लिहिलेल्या फाटक्या टी शर्टची झोळी करून भरून आणलंय त्यानं दुनियाभरचं सुख. त्यातल्या शंख-शिंपले-दगडांनी तो सजवतोय आपली दुनिया..’ कवितेतलं या मुलाचं हे शब्दचित्रही त्याच्या अंतर्विश्वात घेऊन जाणारं झालं आहे.

अशीच आणखी काही व्यक्तिचित्रं प्रभावीपणे लक्ष वेधून घेतात. ‘बिझी आणि गुलाब’ या कवितेत बराच वेळ बिझी असलेल्या आईला काही सांगू बघणारी मुलगी साकारलीय. कवितेत शेवटी ती काय सांगायचं ते आईला मेसेज करून कसं कळवते याचं मार्मिक आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे. ‘असते आई तोवर’ ही कविता वाचता वाचता प्रत्येकाला आपली आई आठवेल. ती असते तोवर तिच्याशी कसं वागायला हवं हे या कवितेत परोपरीनं सांगितलं आहे. ‘तिळावरच्या पाकासारख्या’ कवितेत आजीचं चित्र आहे. ते रंगवताना शेवटी म्हटलं आहे, ‘आज जीवनाचा काटेदार हलवा / मायेच्या स्वच्छ रुमालात / भरणार्‍या आजीकडे बघा / तीच कशी होऊन गेलेली असते / तीळ आणि गूळही..!’

काही कवितांमधे सामाजिक वास्तवातील विरोधी दृश्ये टिपली आहेत. ‘अनाम आकांत’ या कवितेत ‘हातातल्या लाकडी चौकटीवर झुलणारे रंगीबेरंगी आशाळभूत फुगे’ घेऊन आलेला फुगेवाला रंगवला आहे. लॉकडाऊनमुळे त्याचा धंदा होत नाहीए. तो निराश झालाय पण ‘जवळून जाणारं कुणीतरी म्हणत असतं, किती छान वाटतं नाही असा शांत- निवांत रस्ता बघायला.’ दुसर्‍या एका कवितेत, ‘आज उपास!’, आज उपासाचे पदार्थ खायला मिळणार म्हणून खूश झालेली मुलं भेटतात तर ‘आज बी उपास?’ या कवितेत आजही काही खायला मिळणार नाही म्हणून रडवेली झालेली मुलं भेटतात..! सामाजिक विसंगतीवर बोट ठेवणारी ही चित्रं अस्वस्थ करणारी आहेत..!

सध्या ‘कोरोना’ नावाच्या संकटामुळे वातावरण पार ढवळून निघालं आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांवर त्याचे वेगवेगळे परिणाम झालेले आहेत. संजीवनीच्या या संग्रहातील दोन कवितांमधे दोन दृश्यं चित्रित झाली आहेत. आई लावत असतात’ या कवितेत तुळशीजवळ सांजवात करणार्‍या सासूबाई आणि ‘अहो आई मोहीम फत्ते..’ असं उत्साही आवाजात बोलत ‘चांदबिबिच्या बेलाग पावलांनी’ घरात शिरणारी डॉक्टर सून यांच्यामधला समंजस संवाद आणि उशीरा घरी आलेल्या सुनेचं हे घर कसं स्वागत करतं त्याचं सुखद वर्णन आहे. तर ‘नकोच वारी नकोच यात्रा’ या कवितेत साक्षात विठूराया मित्र बनून वारकरी भक्ताला समजावतो आहे.- ‘नको करू तू काळिज हळवे / नको काळजी नेम बुडाला / नको पालखी पायी पायी मीच निघालो तुझ्या घराला / पहा काढले हात कटीचे / अश्रु पुसण्या तुझेच मित्रा..’

संजीवनीच्या आधीच्या कवितांहून या संग्रहातील कवितांचं वेगळेपण जाणवलं ते  तरल प्रतिमा घडवण्यासाठी तिनं योजलेल्या स्वतःच्या अर्थगर्भ शब्दांमुळे. हे काही शब्द बघा... मोहवितृष्णा, सर्वनिरीक्षी, तैल-उर्मी, धूम्रबोली, सुशांत मुक्ततृप्ती, वादळघाव, जीवलावणं, कुठारघाती प्राक्तन, सुखमुग्ध, पोरपिपाण्या, मायालाघव, व्यथावाक्य... अशा शब्द-योजनेमुळे कविताशय कसा सुंदर झाला आहे ते कवितांचा समरसून आस्वाद घेताना जाणवतं.

संजीवनीच्या कवितेतील बिनचूक लय हा तिची कविता सुंदर करणारा आणखी एक पैलू. एक दोन उदाहरणं पाहण्यासारखी आहेत-

१- ‘वळून वळणावरुन पाहता / धुक्यातून अस्पष्ट दिसे / कितीक पक्षी धरुन ठेवले / पिंजर्‍यात पण फक्त पिसे...’

२- ‘आज आत एकदा / मी मलाच शोधले / कात टाकुनी जुनी / लख्ख लख्ख जाहले / आत्मतृप्तिच्या खुणा / दूर फेकुनी दिल्या / तीव्र खळबळीत मी / निजखुणेस भिजविले..!’,

तिच्या मुक्तछंद कविताही आशय सहज पुढे नेणार्‍या आहेत. रसिकांसमोर त्या सादर होतात तेव्हा त्यातली लय जाणवते.

कवितांचं हे गुणवैशिष्ट्य गीतरचनेला पोषक आहे. संजीवनीनं बरीच गीतं लिहिली आहेत. अर्थगर्भ विशेषणं, तरल प्रतिमा आणि समर्पक लय यामुळं ही गीतं दृक्‍श्राव्य झाली आहेत. संजीवनीचं तिच्या गीतांवरही कवितेइतकंच प्रेम आहे. या गीतांची गाणी होण्यातला आनंद तिनं भरभरून घेतला आहे. या संग्रहात ‘उद्‍गाराच्या उगमापाशी’ हा गीतांचा स्वतंत्र विभाग आहे. वेगवेगळ्या संगीतकारांनी आणि गायकांनी गायलेली ही गीतं संग्रहात वाचनाही आवडतील अशी उत्कट झाली आहेत. त्यातल्या ‘ठसे’, ‘त्या रातीने’ या गीत-रचना मला विशेष आवडल्या.

हिरव्या सूक्तांच्या प्रदेशातून फिरताना आणखी काही कविता आशयाच्या वेगळेपणानं लक्ष वेधून घेतात. १- ‘आपल्या मुलाचं नाव’ या कवितेत ‘राम असो मानवातील विष्णुरूपाचा अवतार / इथे लक्ष्मणाच्या दैवी कर्माचं मानवी रूपात अवतरण झालं’ अशा शब्दात ‘लक्ष्मण’वृत्तीचं प्रासादिक वर्णन केलेलं आहे. २- ‘कागदाची नाव बनवून’ या कवितेतल्या ‘शेवटी नौका म्हणजे तरी / काय असतं? / पाण्यावर जीवनभर तरंगायचं / अन आतून कोरडंच राहायचं’ या ओळी अंतर्मुख करणार्‍या आहेत. ३- ‘वर्तुळ बनलं आणि’ या कवितेत वर्तुळ म्हणजे पूर्णत्व या रूढ समजुतीला छेद देणारे चिंतन आले आहे. ४- संग्रहात शेवटी शेवटी आलेल्या ‘हे सर्वेश्वरा’ या कवितेत ‘वाढू देत मनाने आता मला... / दिसावीत नश्वरतेच्या चिकणमातीत घुसलेली / अस्तित्वाची तंतुमय मुळे / आणि जगण्याची आसक्तीही / घेता यावी उचलून’ अशी कृतकृत्य भावनेतून केलेली प्रार्थना आहे.

संग्रहाच्या एकूण निर्मितीत कवितांचा अनुक्रमही महत्त्वाचा ठरतो. प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने संजीवनीची ही ‘हिरवी सूक्ते’ मला प्रथम आस्वादता आली. या कवितासंग्रहातील कविता सलग वाचताना एखादी मैफल रंगत जावी तसा अनुभव आला. मुखपृष्ठापासून मलपृष्ठावरील सार्थ मजकुरापर्यंत प्रत्येक बाबतीत लक्षवेधी झालेला ‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ हा कावितासंग्रह संजीवनीच्या प्रत्येक निर्मितीप्रमाणे रसिकांची भरभरून दाद मिळवेल असा विश्वास वाटतो..!

आसावरी काकडे