Monday 4 January 2016

माझी नक्षत्रांची वीण

कवितासंग्रह प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केलेले विचार -
‘माझी नक्षत्रांची वीण’ हे आकर्षक शीर्षक असलेला चंचल काळे यांचा कवितासंग्रह आज प्रकाशित होतो आहे. संग्रहरूपात कविता वाचकांसमोर येणं हा कवितेसोबतच्या प्रवासातला महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा असतो. इथवरच्या प्रवासाबद्दल चंचल काळे यांचं मनःपूर्वक अभिनंदन.! अक्षर मानव प्रकाशनानं हा संग्रह चांगल्या तर्‍हेनं प्रकाशित केला आहे. संग्रहाचं शीर्षक, मुखपृष्ठ, मांडणी.. या पूर्ण निर्मितीमागे प्रकाशकांची मनःपूर्वकता जाणवते. कवितासंग्रह इतक्या प्रेमानं प्रकाशित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत.
व्यक्त व्हावंसं वाटणं ही प्रत्येकाची स्वाभाविक गरज आहे. आपला एखादा वेगळा अनुभव, मनाला उमगलेलं शहाणपण, जिव्हारी लागलेला सल किंवा उत्तेजित करणारा आनंद आपल्याला कुणालातरी त्यातील ताजेपणासह सांगावासा वाटतो. पण सगळंच काही सगळ्यांजवळ सांगता येत नाही. व्यक्त होण्यासंदर्भात चंचल काळे यांनी एका कवितेत म्हटलं आहे- ‘व्यक्त होता शब्द सारे / वेदना सलते कुठे / ह्या उरीची भावना गे / दुसर्‍यासही कळते कुठे?’ (७४)
व्यक्त होण्याच्या मानसिकतेत आणखी एक गंमत असते. काही वेळा भरभरून सांगावंसं तर वाटतं पण सगळं उघडंही करायचं नसतं. तर काही वेळा काही गोष्टीतलं मर्म एखाद्यालाच नेमेकेपणानं समजू शकतं हेही लक्षात आलेलं असतं. व्यक्त व्हावसं वाटलं तरी मर्मग्राही श्रोता लगेच मिळेल असं होत नाही.. अशा वेळी कवितेसारखं साधन हाताशी असलं तर मनातलं सारं शब्दांजवळ व्यक्त करता येतं.. तेही असं की व्यक्त होऊनही ते झाकलेलंही राहावं. कारण कवितेत वैयक्तिकाला सार्वत्रिक करण्याचं सामर्थ्य असतं. आपण जितकं खरेपणानं अगदी जिवालगतचं लिहू तितकं ते प्रत्येकाला आपलं स्वतःचं वाटू शकतं. मग ती कविता आणि तिचा आशय फक्त कवीचा राहत नाही. तो सर्वांचा होतो... इथे चंचल काळे यांची एक कविता सांगाविशी वाटते- ‘मनात माझ्या’ या कवितेत त्यांनी म्हटलं आहे- ‘अंधाराचे गूढस गुंजन, मनात माझ्या / निरांजनाची प्रकाशवेळा मनात माझ्या / ... किरणांमधला सूर्य शोधता थकून गेले / त्या तेजाची एक शलाका मनात माझ्या..! (६६). इथे या ओळी लिहिणार्‍या मनाला व्यक्त झाल्याचा आनंद मिळालाच असेल. पण ‘अंधाराचे गुंजन’, ‘निरांजनाची प्रकाशवेळ’, ‘तेजाची शलाका’.. माझ्या मनात आहे म्हणजे नेमकं काय मनात आहे ते इथं उघड झालेलं नाही. वाचक ही कविता आस्वादेल तेव्हा तो या प्रतिमांचा आपल्या मनोवृत्तीनुसार अर्थ लावेल. त्यानं लावलेला अर्थ ही त्याची कविता होऊन जाईल. लिहिणार्‍या मनाची राहणार नाही...
कविता म्हणजे काय? तिचं स्वरूप काय? चांगल्या कवितेचे निकष कोणते?.. असे प्रश्न पडणं, या प्रश्नांची उत्तरं शोधत चांगल्या कवितेचा ध्यास धरणं हे टप्पे प्रत्येक कवीच्या वाटचालीत येत राहतात. यायला हवेत. पण उत्स्फूर्तपणे शब्दात व्यक्त होणं उत्स्फूर्तपणेच सुरु होऊन जातं. या पहिल्या टप्प्यावरही कविता आणि कवी यांच्यात बरच काही घडतं... व्यक्त होण्याच्या निमित्तानं कवी स्वतःपासून अलग होतो आणि मनातळातलं सांगून झाल्यावर सुटकेचा निःश्वास टाकतो. पण हे केवळ मनमोकळं करणं नसतं... अलग झालेलं कवीमन रोजच्या धबडग्यात जगणार्‍या ‘मी’ला धीर देतं, जगण्याची उमेद देतं, कधी दोष दाखवून देत त्याची निर्भत्सनाही करतं. नात्यांचे, भोवतीच्या घटनांचे अर्थ शोधत त्याच्या ओंजळीत शहाणपण टाकत राहतं ! चंचल काळे यांची ‘आयुष्य’ ही कविता उदाहरण म्हणून पाहता येईल. या कवितेत त्यांची स्वतःची अशी आयुष्याविषयीची समजूत व्यक्त झालीय. कविता अशी आहे- ‘आयुष्य म्हणजे शिंपला / जर उघडला तर आत मोती / आयुष्य म्हणजे गारुडी / जर पुंगी असेल तर काळ हाती / आयुष्य म्हणजे गायकी  / गवसला जर सूर तर गीत ओठी / आयुष्य म्हणजे बाणही / अचूक जर वेध तर लक्ष गाठी / आयुष्य म्हणजे त्यागही, भोगही / आयुष्य म्हणजे स्वप्नही, वास्तवही / आयुष्य म्हणजे काय नाही / अखेरच्या टप्प्यावर कळेल सारंकाही ! (२६). इथे सगळं समजलंय असा दावा नाही. उलट अखेरच्या टप्प्यापर्यंत ही समजूत घडत राहणार याचं भान आहे. हे भान असणं ही पण एक शहाणी समजच आहे. कवितेच्या सोबतीनं कवीमन आपल्या प्रगल्भतेची इयत्ता वाढवत राहातं..!
आपण नवोदितांच्या कविता वाचतो, ऐकतो. तेव्हा लक्षात येतं की उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याच्या पहिल्या टप्प्यावर बर्‍याचदा कविता म्हणून काहीही लिहिलं जातंय. पण मला वाटतं हे ‘काहीही’ कधी वाया जात नाही. पक्षी कुठली कुठली फळं खात सहज बिया टाकत राहतात.. त्या कुठे पडतील, त्यातल्या किती रुजतील, किती तग धरतील, किती फोफावतील, आणि कोणती बी वटवृक्ष बनून पिढ्यान्‍ पिढ्या सावली देत राहील.. काही सांगता येत नाही. वटवृक्ष होण्याच्या टप्प्यापर्यंत न पोचलेल्या बिया खत बनून त्याच्या मुळांना पोसत राहतात.. त्याच्या बहरण्याच्या उत्कटतेत मिसळून टाकतात आपला क्षीण जीव.. न जमलेल्या कविता अशाच एखाद्या अस्सल कवितेची वाट प्रशस्त करत राहतात. व्यक्त होण्याचा खराखुरा आनंद देणारी अस्सल कविता लेखणीतून कागदावर उतरेपर्यंतचं मौन किंवा लिहिल्या गेलेल्या कमअस्सल कविता म्हणजे एकप्रकारे कवितेसाठी चालू ठेवलेला रियाजच असतो. मात्र याचं भान कवीमनाला असायला हवं. चंचल काळे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. त्यामुळे त्यात अस्सल कवितेची वाट प्रशस्त करणार्‍या काही कमअस्सल कविताही आहेत. पण मला विश्वास आहे त्या त्याकडे मनःपूर्वक केलेला रियाज म्हणूनच बघतील.
समीक्षेच्या भाषेत श्रेष्ठ, विशुद्ध कवितेचे काही निकष असतील.. उत्सुकता म्हणून ते समजून घ्यायला हरकत नाही. पण निकष समजून घेतले म्हणून तशी कविता लिहिता येईल असं मात्र नाही. सजगपणे जाणीवनिष्ठा ठेवत लिहित राहाणं एवढं आपण करू शकतो. सामान्य कवितेपासून ते श्रेष्ठ कवितेपर्यंत कवितांच्या अनेक परी असतात.. कवितेचे अभ्यासक अभ्यासाचा भाग म्हणून प्रेमकविता, सामाजिक, स्त्रीवादी, महानगरी संवेदनांची, निसर्गकविता.. अशी कवितांची वर्गवारी करत असतात. चंचल काळे यांची कविता यापैकी कोणत्या गटात घालता येईल? असा विचार केल्यावर मनात आलं की या सगळ्या प्रकारांना सामावणाराकविताहा एकच गट मानून कवितेचा आस्वाद का घेऊ नये? एखादा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर त्यावर काहीतरी शिक्का मारायलाच हवा असं नाही.
कविता कालानुरूप बदलत असते. बदलायला हवी. आता हळवी, भावूक, गूढ गुंजन करणारी, कल्पनारम्य कविता कालाबाह्य ठरते आहे. फार काय आजच्या कवितेला तत्त्वचिंतनही बिनकामाचं वाटतं आहे. कवितेच्या या जुन्या वृत्तीबरोबरच वृत्त, छंद, लय.. या गोष्टीही बाजूला पडताहेत. क्वचित कुणी त्यांचा वापर करतं पण तो बिनचूक आणि अर्थाला सघन करणारा त्याहूनही दुर्मिळ होतो आहे... चंचलच्या कवितासंग्रहात काही गेय कविता आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.
गतिमानता हा आजच्या काळाचा अविभाज्य पैलू आहे. बदलाचा हा वेग इतका झपाट्यानं वाढतो आहे की आपण सतत कालबाह्य होत असल्याची जाणीव संवेदनशील मनाला होत राहते. अंगावर कोसळणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नाना कसं सामोरं जायचं ते कळेनासं होऊन जातं. अशावेळी समकालिन वास्तवाला आपल्या काव्यकृतीतून सामोरं जाणं हा एक मार्ग कवीसमोर असतो.. आजचा काळ असा, इतका स्फोटक आहे की आजची कविता समकालिन वास्तवाचा विचार डावलून पुढे जाऊ शकत नाही. पण वास्तववादी कविता म्हणजे वृत्तपत्रातलं रिपोर्टिंग नाही. कोणत्याही कवितेसाठी तिच्यात काव्यात्मता असणं ही पहिली महत्त्वाची अट आहे. शिवाय सामाजिक समस्या मांडणं म्ह्णजेच फक्त वास्तव असंही म्हणता येणार नाही. नातेसंबंधांमधले ताण किंवा आंतरिक घुसमट हेही एका पातळीवरचं वास्तवच असतं. कुणाही सजग, संवेदनशील कवीच्या कवितेत या विविध पातळ्यांवरच्या वास्तवाला वेगवेगळ्या प्रकारे उद्‍गार मिळत असतो. या संदर्भात चंचल काळे यांच्या कवितासंग्रहातल्या ‘नकोच’, ‘माणूस’, ‘पालखी’ अशा काही कवितांमधली अभिव्यक्ती पाहण्यासारखी आहे.- ‘नकोच’ कवितेत म्हटलं आहे- ‘नकोच मजला सहानुभूतीच्या नजरा / नकोच मजला शब्दांचेही दंश / मज नकोच वाटे आता काही काही / असणे माझे मला वाटते पाश..!..(६९). जगण्यावर समाजाचं असं दडपण असतं की आपलं अस्तित्वच आपल्याला आवळणारा पाश वाटावा.. हा अस्वस्थ करणारा आशय इथे सहज साधेपणानं व्यक्त झाला आहे.
‘पालखी’ या कवितेत एका आंतरिक जाणिवेचं वास्तव प्रभावी रीतीनं व्यक्त झालं आहे. कवितेत म्हटलंय- ‘अहंपणाच्या किती पालख्या / मिरवित मी खांद्यावर नेल्या / तुटले तेव्हा किती सोयरे / किती सावल्या सोडुन गेल्या..! (६७). हे आत्मपरीक्षण महत्त्वाचं आहे.
याशिवाय ‘संवाद’, ‘पाऊस पहिला’, ‘स्व’, ‘स्वागत’... अशा आणखी काही कविता उल्लेखनीय आहेत. आजच्या कार्यक्रमात त्या त्यांनी सादर केल्या तर रसिकांकडूनही याची पावती मिळू शकेल.. चंचल काळे यांनी आपलं कवितालेखन एक रियाज समजून सतत्यानं चालू ठेवावं. त्यांच्या हातून उत्तमोत्तम कविता लिहिल्या जावोत हीच हार्दिक शुभेच्छा-
९ मार्च २०१३ 
                                                       


No comments:

Post a Comment