Tuesday 5 January 2016

आता मी केवळ अंतस्थ!


पुस्तक परिचय-
कविता हा आत्मनिष्ठ असा साहित्यप्रकार आहे. आणि चांगल्या कवितेत जाणीवनिष्ठा कसोशीनं जपली जावी अशी अपेक्षा असते. मग नुसत्या कविता वाचून कवीचं व्यक्तीत्व जाणता येऊ शकेल का?.. अलिकडेच ‘मुद्रा’ हा लीला दीक्षित यांचा कवितासंग्रह वाचनात आला. तेव्हा हा विचार मनात आला. कारण या कविता वाचताना कवयित्रीविषयी काही जाणवण्यापूर्वी बर्‍याच कवितांमधे मला माझं प्रतिबंब दिसलं... मग Carl R. Rogers  यांचं एक कोटेशन आठवलं- ‘ What is most personal is most universal ’.  आणि लीला दीक्षित यांचा कवितासंग्रह पूर्ण वाचल्यावर जाणवलं की त्यांच्या नितळ कवितेत वाचकाला स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्याची क्षमता आहे कारण त्यांच्या प्रांजळ अभिव्यक्तीत अंतर्मुख अशी त्यांची स्वतःची भावमुद्रा उमटलेली आहे. 
या दृष्टीनं कवितासंग्रहाचं ‘मुद्रा’ हे शीर्षकही अर्थपूर्ण वाटलं. शिल्पा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या संग्रहाची निर्मिती चांगली झाली आहे. यात लहान मोठ्या ७९ कविता आहेत. प्रा. रा. ग. जाधव यांनी या कवितांविषयी लिहिलेलं छोटसं भाष्य मलपृष्ठावर आहे. 
सद्ध्याच्या ‘मोबाइल’ जमान्यात रोजच्या वापरातली भाषा विचित्र सरमिसळ होऊन फोफावतेय. भाषा आपलं स्वत्व हरवून बसेल की काय अशी भीती वाटावी असं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर घरी कढवलेल्या तुपासारखी स्निग्ध आणि शुद्ध अशी लीला दीक्षित यांच्या कवितेची भाषा सुखावणारी वाटली. अंधार दिवली, मायेची साखरसाय, आतुली सोय, देवपाखर, काजळकाठ, स्मरणवीणा, पोपटपालवी, अस्तित्वकोश, व्दिस्थ, दुःखाचा लोलक, नित्सुक, दुःखाची चित्रवेल, नादनदी.. हा त्यांनी केलेला शब्दांचा वापर लक्ष वेधून घेणारा वाटला. मोट, चरवी, घुसळखांब.. असे गतकालाच्या चवीचे शब्द तर विशेष महत्त्वाचे वाटले. आपली संस्कृती जपणारे हे शब्द आताच्या मुलांना आवर्जून समजून सांगावेत असे आहेत. 
कविता वाचताना एक वैशिष्ट्य लगेच जाणवलं ते असं की बर्‍याच कवितांचे शेवट धरून ठेवणारे आहेत. ते पान उलटून पुढे जाऊ देत नाहीत लगेच... कविता पुन्हा वाचायला भाग पाडतात. उदा. ‘...लोकांनी पालखी / रीतीच मिरवत आणली होती...’ (पालखी), ‘एक दिवस तरी मला तो / पक्षी होता यायला हवं..’ (पक्षी), ‘पाऊल न वाजवता / मृत्यु येतो / तशी यावी कविता..’ (सहज), ‘एक छोटा बिंदू / सिंधूच्या ओढीनी धावत असतो..’ (ओढ!), शस्त्रानीच जिंकता येतं असं नव्हे / जिंकण्यासाठी पुष्कळ असतं माणसाजवळ..’ (स्वामिनी)... अशी बरीच उदाहरणं देता येतील. 
या कावितांमधे निसर्ग वर्णनं तर भरभरून आहेत. ती सगळीच मनासमोर चित्रं निर्माण करतात. हा निसर्ग कवितेत कधी प्रतिमा बनून येतो तर कधी त्याची रूपं कवयित्रीनं स्वतःशी जोडून घेतली आहेत... मनानं त्याच्याशी एकरूप झाली आहे..! याची उदाहरणं पाहायला लागले तर निसर्गाचा संदर्भ नाही अशी कविताच दिसली नाही.. अर्थात आपलं असणं, आपलं जगणं निसर्गाशी इतकं बांधलेलं आहे की त्याच्या संदर्भाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पण प्रतिक्षिप्तपणे असं होणं आणि समजून, जाणवून लिहिणं यात गुणात्मक फरक आहे. या संदर्भात लीलाताईंच्या ‘का?’ या कवितेतल्या काही ओळी पहा- 
“मी जाईचा भरलेला वेल पाहाते
मला माझे ओसंडणारे बालपण आठवते
मी निवडुंगाचे रान पाहाते
मला माझे तारुण्य आठवते
गाईचे दूध पिणारे मी वासरू पाहाते
मला माझे आईपण आठवते..”

‘टक्‍ टक्‍’सारख्या काही कविता एखादे सुंदर खरेखुरे स्वगत असावे तशा आहेत. या कवितांना आध्यात्मिक चिंतनाची बैठक आहे असं जाणवलं. सतत स्वतःला ‘घडवत’ राहणं ही आंतरिक प्रक्रिया, चिंतन अस्सल असल्याची निदर्शक आहे. ‘चित्र’, ‘आत्मनेपदी’, ‘अमृतबिंब’, ‘शिल्प’ अशा काही कवितांमधे या प्रक्रियेतली प्रांजल आत्मसमीक्षा आहे. या संदर्भात ‘कृष्णजन्म’ ही अतिशय सुंदर आणि समर्पक कल्पना असलेली कविता मला विशेष आवडली. ‘पाच घोड्यांचा रथ’ ही कल्पक प्रतिमा असलेली ‘अंतस्थ’ ही कविताही मननीय आहे. या कवितेत शेवटी म्हटलंय- 
“किती नाती
कशातच नाही ती ‘माया’
तुझे-माझे, माझे-तुझे
व्दैताचा हा पसारा मांडून
काय शोधलंस?
आता मुळीच चालायचं नाही
न चालता, न पळताही एक गती असतेच
अस्तित्वाला
याचं एक नवीन भान आलंय,
आता मी केवळ अंतस्थ!”

निवृत्तीचे वेध लागलेत हे सूचित करणारा भाव कवितांमधे सर्वत्र विखुरलेला आहे. आणि हे स्वाभाविकच आहे. कारण वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करताना हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. लीला दीक्षित यांचे साहित्यातले योगदान मोठे आहे. कादंबरी, ललितगद्य, कथा, समीक्षा, वैचारिक, संपादित, बालसाहित्य अशा सर्व साहित्यप्रकारात त्यांनी भरपूर लेखन केलेले आहे. मात्र ‘मुद्रा’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. लीलाताईंनी मनोगतात म्हटले आहे की कविता-लेखनापासूनच त्यांचा साहित्य-प्रवास सुरू झाला. गद्यलेखनाच्या सोबतीनं कवितालेखनही चालू होतं. पण कविता त्यांनी स्वतःशीच जपून ठेवल्या. आता मैत्रिणींच्या आग्रही मदतीनं त्यातल्या निवडक कवितांचा संग्रह प्रकाशात आला आहे. इतक्या परिपक्व टप्प्यावर कवितासंग्रह प्रकाशित झाल्यामुळं तोही प्रौढ आणि पक्व असा आहे. आणि स्वाभाविकपणे त्यात निवृत्तीचे वेध सूचित झाले आहेत. या संग्रहातली शेवटची कविता निरोपाची अटळता समंजसपणे स्वीकारणारी आहे. कवितेत म्हटलं आहे-
‘अचानक पिंजर्‍यात अडकलेल्या
पाखरसारखी ही तडफड
का होतेय आतून ?
हे माझे मन
कुठला पिंजरा तोडू पाहतंय,
गेली कित्येक वर्षे
याच पिंजर्‍यात भिरभिरणारे
हे माझे मन
पिंजरा सोन्याचा म्हणून
सुखावतही होते
आता कुठेतरी जमीन उलून आल्येय
नको म्हटलं तरी अंकुरणारच !
हे मना,
तुझी इच्छा असो वा नसो
पिंजर्‍यातून मुक्त होणे
आता अटळच आहे !”

एकूण कविता वाचताना असं जाणवत राहिलं की अतिशय निर्मळ मनानं लिहिलेलं हे एक भावनिक आत्मचरित्र आहे..! त्यात आयुष्याचे सगळे रंग आले आहेत. वाट्याला आलं त्याचा सहज स्वीकार आहे. कृतज्ञता आहे. साध्या साध्या वाटणार्‍या घटनांनी अंतर्मुख होणं आहे. जगताना सोबत असलेल्या हळव्या संवेदनशीलतेत सहवेदना आहे. भोवतालाचं सजग भान आहे. गतकालात डोकावणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं- जगण्याचं सार्थक आहे..!
या कवितासंग्रहामुळं लीला दीक्षित यांच्या ग्रंथसंपदेत एक महत्त्वाची भर पडली आहे. कवितेशिवाय त्यांचा परिचय अपुरा राहिला असता..! या कवितांमुळे वाचकांनाही एका पक्व मनाच्या भावविश्वाचा आतून परिचय होईल. 
आसावरी काकडे 
११ ऑगस्ट २०१५

No comments:

Post a Comment