Friday 29 January 2016

पळसदरी आणि अभयगान


सद्ध्याच्या अतीमुक्तछंद कवितेच्या काळात छंदोबंध दीर्घकाव्ये क्वचितच लिहिली जातात. श्री र. ह. कुलकर्णी यांच्या ‘गूढगुंजन अक्षरे’ या काव्यसंग्रहात दोन लयदार दीर्घकाव्ये वाचायला मिळतात. ही काव्ये म्हणजे स्वतःच्या नादात प्रवासातील सुंदर आणि रौद्र-भीषण असा निसर्ग अनुभवताना गुणगुणलेली स्वगतं आहेत. या स्वगतात स्मरणरंजन आहे. या स्मरणरंजनाचं वैशिष्ट्य असं की संज्ञाप्रवाह नेईल तसं ते व्यक्त झालेलं आहे. कधी छंदोबद्ध काव्यात तर कधी सरळ गद्यातच. या उत्स्फूर्त आविष्काराला आकृतीबंधाचा तगादा ऐकू येत नाही. परिष्करणाची फिकीर करावीशी वाटत नाही. तो सहज आधार घेतो नावानिशी इतर लेखक-कवींच्या अभिव्यक्तीचा जिचा आशय आता स्वगत मांडणार्‍या मनात स्मरणरूपात स्वतःचा बनून गेला आहे...

हा सारा लेखन खटाटोप कशासाठी? ‘पळसदरी’ या पहिल्या दीर्घ काव्यात जी.ए. यांच्या एका वाक्याचा आधार घेत र.ह. म्हणतात- ‘तर आपणाला काय वाटते ते समजून घेण्यासाठी.. To know what one thinks and feels.’...  ‘ही मी अनुभवत असलेली पळसदरी म्हणजे तरी काय? एक व्यामिश्र अनाकलनीय महाप्रचंड जिवंत अस्तित्व आणि त्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया..!’ या प्रक्रियेतून पळसदरीकडून होत असलेली स्वतःची  ओळख महत्त्वाची. त्यासाठी हा सारा लेखन-प्रपंच..! 

सजगपणे जगताना लक्षात येतं की खरंतर आपली प्रत्येकच कृती ही आपल्यातल्या ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. आपण काय वाचतो, कुठे जातो, कुणाशी काय बोलतो, काय खातो, कोणत्या कामाची निवड करतो... या सगळ्यातून ‘स्व’ची मूलभूत निवड व्यक्त होते. तीच ‘स्व’ची ओळख असते. पण इतर कोणत्याही कृतीपेक्षा लेखन-कृती अधिक समर्थपणे आपल्यासमोर आरसा धरत आपली ओळख करून देत असते. कारण या कृतीत अंतर्मुख मन सक्रीय असतं. लिहिता लिहिता स्पष्टपणे न जाणवलेलंही लिहिलं जातं.. ती या अंतर्मुख मनाचीच करामत असते. ते लिहिणाराला खोलवर कुठे कुठे घेऊन जाईल आणि काय काय खेचून वर आणेल ते सांगता येत नाही. या प्रक्रियेत पळसदरी किंवा कर्नाळा अभयारण्य यासारखं एखादं निसर्गाचं अप्रुप सोबत असेल तर मग मनाला पंखच फुटणार..! कधी माशाचे, खालच्या अथांगात नेणारे तर कधी पक्षाचे, वरच्या अथांगात फिरवून आणणारे... ‘पळसदरी’ आणि ‘अभयगान’ या दीर्घकाव्यांमधली काही उदाहरणं पाहिली तर याचा प्रत्यय येऊ शकेल.

‘पळसदरी’ या दीर्घकाव्यात काष्ठशिल्प ही प्रतिमा वारंवार आलेली आहे. ‘पळसदरी’ मधली काही उदाहरणं पाहण्यापूर्वी या प्रतिमेविषयी थोडसं... पुणे-मुंबई असा प्रवास करताना घाटातून जाताना कवीला रोज भेटणारी पळसदरी म्हणजे प्रत्यक्ष जगण्याचं एक प्रतिकच आहे असं वाटत राहातं. पळसदरीची बदलती रूपं, तिच्यात होणारी पडझड, तिच्यावर होणारी आक्रमणं, त्याला पुरून उरत तिचं सृजनोत्सव साजरा करत राहणं... हे सर्व कवी संवेदनशीलतेनं अनुभवत राहातो. या विनाश-सृजनाच्या खेळात वाळून गळून पडणारी आणि नव्यानं उगवून येणारी वृक्षांची विविध रूपं कवीला शिल्पांसारखी वाटतात. ही काष्ठशिल्पं प्रतिकरूपात मानवी जीवनातल्या घटनांची आठवण देत राहतात. त्यातून निर्माण झालेल्या काव्यातील निसर्गवर्णनातूनही जगण्यातल्या भाव-विभ्रमांचं सूचन जाणवतं. उदा.-

“गवसतात सूर नवे  
किती उरांत बोगदेच
काळोखी नवसर्जन
पळसदरी”

प्रवासात बोगद्यातून जाताना अंतर्मुख मनाला लख्ख जाणवतं की अव्यक्ताचा काळोख जतन करणारे कितीतरी बोगदे आतही आहेत... मात्र बाहेरच्या बोगद्यातून बाहेर पडल्यावर नित्यनवी पळसदरी अनुभवताना आतल्या बोगद्यातल्या काळोखात सर्जनाला जाग येते आणि अव्यक्ताला नवे सूर गवसतात... त्यातून अभिव्यक्तीला प्रेरणा मिळते आणि काव्यनिर्मितीला बहर येतो. ‘पळसदरी’मधली काही अर्थवाही कडवी-

“काष्ठशिल्प नवनवीन
जन्माला रोज येत
घेउनिया करिं कुठार
शिल्पकार रोज फिरत

जाळाया जीवनास
जन्माला मरण घाल
पाळणाच सरणावर
समईची ज्योत तरल”

“मरणाची सरणाची
स्पर्धा ही जगण्याची
काष्ठशिल्प झाडावर
नित्यनवा जन्म घेत

झाडाचे शिल्पकाष्ठ
काष्ठाचे शिल्पवृक्ष
तरूणपणी मरण्याचे
जीर्णत्वी जगण्याचे

साक्षत्वी असण्याचे
काष्ठत्वी नसण्याचे
मरण्यातून जगण्याचे
स्वप्न ऊरी.. पळसदरी”

“झाडांच्या खोडातून
चिकट सत्य पाझरते
डिंकाचे जगण्यावर
गोंदवणे साकळते”

“फुटलेल्या धरणासम
दु:खाने फुटलेली
अश्रूंच्या पावसांत
न्हालेली पळसदरी”

पळसदरीमधल्या विविधरंगी दृश्यांच्या आधारानं जीवन-मरणावर भाष्य करणार्‍या या ओळी  वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार्‍या आहेत. प्रत्येकाच्या मानात त्याच्या त्याच्या कल्पनेनुसार, आस्वाद-क्षमतेनुसार ‘झाडांच्या खोडातून पाझरणारं चिकट सत्य’ वेगवेगळ्या रूपात चित्रित होत राहील... पूर्ण काव्य वाचताना प्रत्येकाला त्याची अशी वेगळी पळसदरी उमगत जाईल..

दुसरं दीर्घकाव्य- ‘अभयगान’. याचा पोत थोडा वेगळा आहे. सुरुवातीला अगदी छोटंसं, एका परिच्छेदाचं प्रास्ताविक आणि मग सलग काव्यरचना आहे. या काव्याची लय ‘पळसदरी’हून वेगळी, यातील आशयाला साजेशी आहे. सलग वाचताना ही लय वाचकालाही नादावून टाकते. इतकी की शब्द काय सांगतायत ते पुरतं ऐकून न घेताच पुढं वाचत राहावं... एखादं अमूर्त पेंटिंग पाहताना यावा तसा अनुभव हे काव्य वाचताना येतो. इथे काव्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करायचाच नाही. लयीसोबत अनुभवायचं अभयारण्य.. तरी काही ठिकाणी शब्द पारदर्शी झालेत. त्यातून जो आशय डोकावतो तो कवीमनाचा ठाव घ्यायला मदत करतो. अशी काही मला भावलेली उदाहरणं-

      “शब्दांचे झुंबर झुलते
झुंबरांत पक्षी गातो
परिपक्व फळांचा झूला
एकाकी डुलता रमतो”

“हे जगदाकारीं कोण ?
अभयात निरंकुश आहे
या अरण्यांत लपलेले
प्रतिबिंब स्वतःचे आहे”

“घुबडांची चित्तरगाथा
चित्कारी रचली जाते
पोपटास पोपटपंची
शिकवून कोंडली जाते”

“अभयरान गाते आहे
शांतीचा उरिं कल्लोळ
अन बोटांमधला वेळू
हळू हळू मारतो शीळ”



“अश्रूंची घुंगुर भाषा
वाळल्या फुलांना कळते
वाळली पर्ण-वनराशी
तरूतळी विसावा घेते”

“पर्णांच्या आकाशात
फांद्यानी नक्षी रचली
साकार अक्षरामधूनी
उपनिषदे जन्मा आली”

“वेड्यांचा हिंसक दंगा
रडतात मनाशी झाडे
मातीत मिसळली माती
मोरपंख तटतटा तुटले !”

“या अभयारण्यांमधें
ज्याचा तो राहत नाही
त्याच्यातिल अंतिम कोणी
शब्दांकित होणे नाही”

“कर्नाळा अभयारण्या !
ही कविता तुझिया चरणी
र. ह. आला ! राहुनी गेला !
गुणगुणून गेला गाणी”


या दोन दीर्घ काव्यांखेरीज यात शेवटी ‘स्मरणाक्षरम्‍’ हा भाग येतो. म्हटलं तर हा एक संवाद आहे चिर-विरहात टाकून गेलेल्या आपल्या प्रिय पत्नीशी केलेला. म्हटलं तर हे एक स्वगत आहे. संज्ञाप्रवाहाबरोबर वाहात व्यक्त झालेलं. गद्यात बोलता बोलता मधेच काव्यरूपात जाणारं. इतकं खरं, आतून उन्मळून आलेलं की बघता बघता त्याचं सामान्यीकरण होऊन ते र. ह. कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीचं न राहता कुण्या विरही मनाची अभिव्यक्ती वाटावी..! एकाकी पडलेली सहजीवनाची विहीर आता आटली असं सांगणारी, डोळ्यात पाणी आणणारी शेवटी आलेली कविता या दृष्टीनं वाचण्यासारखी आहे- 

“विहीर ही आटली
गड्यानो विहीर ही आटली
तृषाशमन जे करून गेले
पाणी ओढुन नेण्या जमले
शुष्क भासल्यावरी निघाले
ही... ओलावा हरवली
गड्यानो विहीर ही आटली

होते झुळु झुळु सदैव पाणी
निर्मळ शीतल चविष्ट झरणी
समृद्धीने होती सजली
आता विहीर ही आटली

चिरा चिरा हा खचू लागला
गाळ हळू हळू साठु लागला
दबला मनीचा जणू उमाळा
एकाकी पडलेली
विहीर ही आटली”


आसावरी काकडे
२७ डिसेंबर २०१३
9762209028


No comments:

Post a Comment