Thursday 2 May 2019

‘ती’ची स्पंदने टिपणार्‍या कविता –



     कविता हा अल्पाक्षरी आणि आत्मनिष्ठ असा साहित्यप्रकार आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची ऊर्मी प्रथम कवितेतून प्रकटते. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप उमगत जातं. आणि कवितेची इतर बलस्थानं जाणवू लागतात. कविता आत्मनिष्ठ असली तरी वैयक्तिक असत नाही. ती घटना-प्रसंगांच्या पलिकडचं पाहू शकते. तसंच परकाया प्रवेशही करू शकते. त्यामुळेच ज्ञानेश्वरांसारखे संत-कवी आजच्या काळालाही मार्गदर्शक असं तात्त्विक काव्य लिहू शकतात आणि स्त्रीच्या भूमिकेतून भक्तीची आर्तता व्यक्त करणार्‍या विराण्याही लिहू शकतात...

     समकालीन कवितेतही आता कवी आपल्या कवितांमधून स्त्रीला समजून घेत असल्याचे सुचिन्ह दिसते आहे. उदाहरण म्हणून कितीतरी कविता सांगता येतील. ‘बाईच्या कविता’सारखे हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले काही पूर्ण कवितासंग्रहही आहेत. आता या सुरात आपला सूर मिसळत संदीप वाघोले यांचा ‘तिची स्पंदने’ हा कवितासंग्रह येत आहे. ‘संकटांच्या छाताडावर पाय देऊन जगण्याची जिद्द बाळगणार्‍या तमाम महिलांना’ त्यांनी हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. ‘रंग’ ही या संग्रहातील पहिलीच कविता पुढील कवितांच्या आशयाची झलक दाखवणारी आहे. कविता आपल्या भोवतीचे वास्तव निरखत असते. त्याचा भावनिक अन्वयार्थ लावत असते. वाघोले यांनी त्यांच्या भोवतीच्या वास्तवातील त्यांना अस्वस्थ करणारी स्त्री-मनाची स्पंदने आपल्या कवितेत टिपलेली आहेत. शारिरीक, मानसिक, आर्थिक कुचंबणा, मंदीर-प्रवेशबंदी सारखी माणूसपण नाकारणारी अनेक बंधनं, घरादारासाठी झिजत राहाणं, दुय्यमत्व सहन करणं, स्वातंत्र्याची गळचेपी, घरात.. बाहेर सतत असुरक्षिततेची दहशत... हे स्त्रीच्या वाट्याला येणारं वास्तव या कवितांमधून मांडलेलं आहे. त्या दृष्टीने ‘बहिष्कार’, ‘सूर्य’, ‘दोष’, ‘फास’, ‘बाया’, ‘सौदा’ अशा अनेक कविता पाहण्यासारख्या आहेत.

     मात्र या कविता स्त्री वास्तवाचा हिशोब मांडत केवळ अस्वस्थता पसरवत नाहीत. ‘झिजणं’सारख्या कवितेत या अस्वस्थतेचा परिणाम म्हणून परिवर्तन झालेल्या, तिचं झिजणं हलकं करण्यासाठी सरसावणार्‍या त्याचं वर्णनही येतं. ते वाचल्यावर जाणवतं की ‘तिची स्पंदनं’ टिपणारी सहवेदना वरवरची नाही. आतून आलेली आहे. क्लेषकारक वास्तवात बदल व्हावा अशी तळमळ त्यात आहे. या संग्रहातील बहुतांश कविता आशयानुकुल अशा मुक्तछंदात आहेत. त्या प्रतिमांच्या मेण्यात बसून पडदानशीन बनून वाचकांच्या भेटीला येत नाहीत. मनातील आशयाचे बोट धरून त्या थेट पायी चालत येतात. त्यामुळे आशय वाचकांपर्यंत लगेच पोचतो. मात्र काही ठिकाणी त्या गद्य वाटतात.

     स्त्री-मनाची स्पंदनं टिपताना वाघोले यांनी अगतिकतेतून आलेलं स्त्रीचं पतीत रूपही ‘शोध’सारख्या कवितेत चितारलंय. स्त्री-रूपाचं दाहक वास्तव सांगून कवितेत शेवटी आर्तपणे विचारलं आहे,
‘हे बये, या युगात तूच उरली होतीस आशेचा किरण / आता मातृत्व आणि ममत्व कुठे शोधायचं आम्ही?’

स्त्रीला समजून घ्यायचं तर तिनं धीटपणे बोलायला हवं. ‘मूकबाई’ या कवितेत मूकपणे सारं सहन करणार्‍या मानसिकतेला कवी विचारतो आहे, ‘कितीकाळ जिवंत ठेवणार आहेस तू तुझ्यातली मूक बाई?

या संग्रहात ‘बाकी काही नाही’, ‘आस’ अशा काही प्रेमकविता आहेत. तसंच ‘लेक’, ‘वाडा’ ‘ती’ अशा काही गेय कविताही आहेत. ‘ती’ या कवितेची साधी लय सुरेख आहे. त्यामुळे ती भावपूर्ण झाली आहे. या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘ती गीत होते / ती सूर होते / आयुष्यभर / कापूर होते..!’

संग्रहातली शेवटची ‘पदर’ ही कविताही अतिशय भावपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी आहे. या कवितेत वाघोले यांनी पदराचे बोट धरून स्त्रीपणाचा पूर्ण आलेखच मांडला आहे. ही कविता या संग्रहातील स्त्रीची अनेक रूपं उलगडत स्त्रीपण समजून घेणार्‍या कवितांचा एकप्रकारे आढावा घेते.

या कवितासंग्रहाच्या मनोगतात संदीप वाघोले यांनी या कविता लिहिण्यामागची भूमिका थोडक्यात मांडलेली आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा स्वाभिमान सांभाळून तिला समानतेने वागवले पाहिजे. त्यासाठी प्रथम स्त्री समजून घेतली पाहिजे..’ अशा ठोस भूमिकेसह स्त्री समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या कविता लिहिणं ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आश्वासक गोष्ट आहे. अशा प्रयत्नांमधून स्त्री-पुरुष नातं अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत जाईल.

संदीप वाघोले यांना पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा

आसावरी काकडे
२७.४.२०१९

Saturday 13 April 2019

‘स्व’च्या शोधात र


जगणं म्हणजे एक न संपणारी शोधयात्रा असते. प्रत्येकाचा शोध-विषय वेगवेगळा असतो. तसे शोधाचे माध्यमही वेगवेगळे असते. एखाद्या उत्कट अंतर्मुख क्षणी बाकी सगळं बाजूला सारून आपल्या असण्याचाच अर्थ काय? हा मूलभूत प्रश्न उसळून वर येतो आणि त्याचं बोट धरून चालू लागलं की तो आपल्याला ‘स्व’शोधाच्या वाटेवर नेऊन सोडतो. ‘स्व’शोध हा मूलतः तत्त्वज्ञानाचा विषय असला तरी संवेदनशील विचारी माणसाला त्याचे आकर्षण स्वस्थ राहू देत नाही. तो वेगवेगळ्या माध्यमातून या शोधाच्या मागे जात राहतो.

निष्ठावान यशस्वी उद्योजक आणि संवेदनशील सतारवादक म्हणून ओळख असलेल्या विदुर महाजन यांची काव्यक्षेत्रातली मुशाफिरी या जातकुळीची आहे. सतार-साधनेत ‘स्व’शोधाचं माध्यम म्हणून आधाराला घेतलेला ‘स्वर’च आता त्यांच्या शोधयात्रेत सामिल झाला आहे. कारण ‘र’ला ‘स्व’चा शोध लागल्याशिवाय स्वरांचं स्वत्व प्रकटत नाही..! ‘गांधार-पंचम’ या कवितासंग्रहानंतर आता प्रकाशित होत असलेल्या त्यांच्या कवितासंग्रहाचे शीर्षकच ‘स्व’च्या शोधात र’ असं आहे. यातल्या एका कवितेत म्हटलं आहे,

‘‘स्वतःला गोळा करतोय
शब्द इतस्ततः टाकून कागदावर
नाहीच जमलं तर सोडून देणार
तेही प्रयत्न
तरी
काहीतरी करावंच लागेल
मग वाजवीन सतार
सहसा दगा न देणारी माझी सखी
बोटात एकदा घातली नखी
अन् लावल्या सुरात तारा
तरी
तेवढ्यानं नाही भागत
सोसते तीही आघात
स्वतःला सावरते
इतस्ततः पसरलेल्या
मला, आवरते..!”
**

शब्द आणि स्वर यांच्या माध्यमातून जगण्याला अर्थ देण्याच्या प्रयत्नात हा मनस्वी माणूस सतत कशाचा तरी वेध घेतो आहे. कागदावर विखुरून टाकलेले हे शब्दसमूह म्हणजे त्याने एकांतात स्वतःशी केलेला मुक्त संवाद आहे. तो एका पातळीवर स्वतःला प्रश्न विचारतोय, स्वतःची निर्मिती तपासतोय आणि त्याच वेळी या सार्‍यात गुरफटलेलं स्वतःचं असणं अनुभवतोय. भोवतीचा निसर्ग, नात्यांचा वावर अनुभवतोय. शब्द.. स्वरांचे देणे.. घेणे अनुभवतोय. आणि या अनुभवातून आयुष्याचा.. जन्म- मृत्युचा अर्थ लावतोय... गवसलेलं परत वाटून टाकतोय शब्दांनाच..!

डिसेंबर २०१६ ला लिहिलेली ‘मृत्यु’ ही कविता म्हणजे एक स्वैर चिंतन आहे. या कवितेतली, ‘कागदाची जाणीव जायला शब्द बरे पडतात’ अशी काही विधानं जागीच थांबून विचार करायला लावणारी आहेत. या संग्रहात इतरत्रही अशा थांबायला लावणार्‍या जागा आहेत. उदा. १- ‘कविता असो नाहीतर सतार, ऐकवावी वाटण्याच्या प्रेरणेचं करायचं काय?’, २- ‘यमनातून मी व्यक्त होतो / की माझ्यातून यमन? / पण या दोन्हीत ‘मी’ आहे / त्यातून जर झालो मी मुक्त / तरच उरेल, यमन फक्त..!

अलंकार, प्रतिमा, आकृतीबंध या कशातच ही अभिव्यक्ती अडकलेली नाही. कागदांवर छापून वाचकांच्या समोर सादर केलेल्या या कविता नाहीत. हे केवळ व्यक्त होणं आहे. व्यक्त होऊन स्वतःला शब्दांत दिसत राहाणं आहे. शब्द आणि स्वरांच्या सोबतीनं सतत काहीतरी शोधण्याचा ध्यास या अभिव्यक्तीला आहे. एके ठिकाणी म्हटलं आहे,

‘‘अस्तित्व माझे जणू
मातीची एक पणती
ह्या पणतीत इंधन
मी सदा घालत राही
त्यात शरीर माझे
जणू एक वात,
अभिव्यक्तीची ज्योत
पेटलेली राही..’’

श्री विदुर महाजन यांच्या अभिव्यक्तीची ज्योत अखंड तेवती राहो, ‘स्व’च्या शोधात निघालेल्या ‘र’ला स्वत्वाचा शोध लागो आणि विखुरलेल्या शब्दांना कवितेच्या आकृतीबंधाचे मंदिर सापडो ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
१७.१.२०१९

गात्र गात्र रात्र झाली..



‘गात्र गात्र रात्र’ हा नीतीन मोरे यांचा कवितासंग्रह सुखायन, पुणे या प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. संग्रहाचं वेगळं शीर्षक उत्सुकता वाढवून विचार करायला लावणारं आहे. अजित चितळे यांनी तयार केलेलं मुखपृष्ठ आणि शशांक श्रीवास्तव यांची ‘ओघळचित्रे’ असलेली आतली मांडणीही वेगळेपणानं लक्ष वेधून घेते. हे नेपथ्य काय सुचवतेय हे कळण्यासाठी संग्रहातील कवितांच्या भोवतीच्या आणि मधल्यामधल्या जागांमधून डोळसपणे डोळे मिटून आशयाचा जोगवा मागत फिरायला हवं. कारण इथे कवीला ‘दिसलेल्या’ रात्रीच्या कवितांशी संवाद साधायचा आहे. कवितासंग्रहाचं मनोगत हेही एक कविताच वाटावी इतकं काव्यात्म झालं आहे. त्यातील ‘रात्री रातकिड्यांचा तानपुरा झंकारत राहतो. पाली चुकताल वाजवत राहतात. पानांची खर्ज सळसळ दरवळत राहते...’ अशा ओळींतून कवी रात्रीशी किती आणि कसा समरस झाला आहे ते उमगतं. या मनोगतातून कवितासंग्रहाचं आशयसूत्र समजतं. त्याचं बोट धरून कवितांच्या प्रदेशात फिरताना ‘तमतीर्थ’, ‘आत्मशुभ्र’, ‘क्षितिजाचा मायामृग’, ‘डंखसज्ज’, ‘जहरजोर’, ‘तेजटिंब’... अशा जागा थांबवून ठेवतात. त्यावर मनन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

माणसाला दृश्य विश्वाचीच एवढी सवय झालेली असते की न दिसणारं काही त्याच्या जाणिवेच्या परिघातही येईनासं होतं. त्यामुळे तमस्वामिनी असलेली रात्र त्याला गूढ, अनाकलनीय वाटते. सामान्य माणूस तर रात्र जाणून घ्यायच्या वाटेलाच जात नाही. नीतीन मोरे यांनी मात्र रात्रीला जाणिवेच्या कॅलिडोस्कोपमधे घालून निरखलंय. त्यातून त्यांना दिसलेल्या रात्रीची वेगवेगळी रूपं म्हणजे या संग्रहातील कविता..! या कवितांमधून रात्र समजून घेण्यासाठी झालेली कवीची अंतस्थ झटापट प्रत्ययाला येते. पण या कविता सहज, एका दमात वाचता येत नाहीत.  ‘काळोख’, ‘वाढदिवस’, ‘मी-तू पण’, ‘रात्रप्रज्ञा’, ‘व्रत’ अशा कितीतरी कविता वाचताना खोलातलं काहीतरी उमगतंय असं जाणवत राहातं. रात्रीविषयी असं लिहिता येण्यासाठी कवीनं तम-प्रकाशाच्या सीमेवर दीर्घकाळ मनस्वीपणानं गस्त घातली असणार..!

म्हणूनच ‘अंधार उजेडाचे शिलालेख डोक्यावर’ वाहणार्‍या या कवीला ‘रात्रीच्या डोळ्यांतलं काळंभोर आमंत्रण’ सतत व्याकुळ करत राहातं. रात्र समजून घेण्याची मनस्वी ओढ लागते... या ओढीतून रात्रीविषयी लिहिताना कवीने आपले सारे शब्दलाघव पणाला लावले आहे. तमोत्सव साजरा करणार्‍या या कविता खोलात शिरून आस्वादण्यासारख्या आहेत.

आसावरी काकडे

गात्र गात्र रात्र- कवितासंग्रह
कवी- नीतीन मोरे
सुखायन प्रकाशन, पुणे
पृष्ठे ९४, किंमत २०० रु.

लोकमतसाठी


कवितेच्या शोधात - रॉबर्ट फ्रॉस्ट : जीवन आणि काव्य



The woods are lovely dark and deep
But I have promises to keep....” पं. नेहरूंमुळे सुपरिचित झालेल्या या ओळींचा कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे ‘कवितेच्या शोधात’ हे विजय पाडळकर यांनी लिहिलेले चरित्र राजहंस प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. अतिशय मनस्वी आणि कलंदर वृत्तीचा हा कवी स्वतःतील क्षमतांचा शोध घेत कवी म्हणून कसा घडत गेला त्याचे तपशीलवार वर्णन पाडळकर यांनी अगदी ओघवत्या शैलीत केले आहे. त्यासाठी केलेल्या अभ्यासाविषयी त्यांनी या पुस्तकाच्या मनोगतात सविस्तर लिहिलेय. हे चरित्र-लेखन करताना त्यांनी फ्रॉस्ट यांचे जीवन आणि कविता याविषयी मिळालेल्या मुबलक परंतू परस्पर विरोधी असलेल्या सगळ्या माहितीचा प्रगल्भ जाणकारीने उपयोग करून घेतलेला आहे.

हे चरित्र तीन भागात असून काव्यात्म शीर्षके असलेल्या २९ प्रकरणांमधून ते वाचकांच्या मनात भिनत जाते. वयाच्या चाळीशीपर्यंत धरसोड वृत्तीमुळे फ्रॉस्ट यांना संसार आणि कविता दोन्ही आघाड्यांवर स्थैर्य लाभले नाही. त्यांनी काहीशा अस्थिर मनःस्थितीत अर्थार्जनाचे कोणतेही साधन नसताना, कोणी ओळखीचे नसताना आणि कोणतीही नेमकी योजना मनात नसताना पत्नी व चार मुलांना घेऊन इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी एलिनोर हिचा त्यांच्यातील सूप्त क्षमतांवर विश्वास होता आणि या धाडसी निर्णयाला तिचा पूर्ण पाठिंबा होता. इंग्लंडमधे कवितेला पोषक वातावरण होते. तिथेच त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याचे चांगले स्वागत झाले. कवी म्हणून प्रस्थापित होण्याला वेग आला. पाडळकर यांनी या वाटचालीचे वर्णन अगदी बारकाईने केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यावेळच्या घडामोडींचा तपशील वाचताना आपण त्या काळात जातो.

या चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात ‘Stopping by woods on a snowy evening’, Mending Wall’, Desigh’, Home Burrial’, The road not taken’... अशा काही महत्त्वाच्या कविता समरसून केलेल्या रसग्रहणासह पूर्ण रूपात वाचायला मिळतात. ‘खर्‍या वाचकाला चांगली कविता वाचताक्षणीच एक साक्षात्कारी जखम होते’ याचा प्रत्यय ही रसग्रहणे वाचताना येतो. या संदर्भात ‘रानातल्या कविता’, ‘आशेची किरणे’ ही प्रकरणे महत्त्वाची आहेत. निर्मितीप्रक्रियेविषयी फ्रॉस्ट यांचे स्वतःचे स्वतंत्र चिंतन होते. ते त्यांच्या कवितेतूनही व्यक्त होत असे. कवितांसाठी बोलीभाषा आणि संभाषण यांचा वापर हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते. काव्यालंकार आणि काव्यात्म शब्द यापासून त्या मुक्त होत्या. पण त्यामुळे त्या गद्य होतात अशी टीकाही त्यांच्या कवितांवर झाली. त्यांच्या कवितांचे समर्थक हे ‘गद्य’ काव्याच्या पातळीवर कसे जाते हे दाखवून देत. साऊंड ऑफ सेन्स ही फ्रॉस्ट यांची कवितेसंदर्भातली आवडती संकल्पना होती. कवीला वेगळी ‘दृष्टी’ असते तसे वेगळे ‘श्रवण’ही असते. शब्दांच्या नाद-सौंदर्याचा अर्थपूर्ण वापर हे श्रेष्ठ कवितेचे लक्षण आहे असे त्यांचे मत होते.

‘नॉर्थ ऑफ बॉस्टन’ या कवितासंग्रहामुळे वेगळी आणि सशक्त कविता लिहिणारा कवी म्हणून फ्रॉस्ट यांचे कौतुक होऊ लागले. मोठ्या मान्यवर कवींबरोबर त्यांची तुलना होऊ लागली. एकामागून एक कवितासंग्रह प्रकाशित होऊ लागले, अनेक दर्जेदार अंकांमधून त्यावर भरभरून समीक्षा येऊ लागली. त्यांच्या कवितासंग्रहांची विक्रमी विक्री हे त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे चिन्ह होते. त्यांना चार वेळा पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि वेगवेगळ्या सव्वीस विद्यापीठांकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली... मात्र कौटुंबिक पातळीवर पत्नीचा कॅन्सरने मृत्यु, मुलाची आत्महत्या, मुलींचे घटस्फोट... अशा प्रचंड मनस्ताप देणार्‍या अनेक घटना घडत होत्या. त्या काळात के मॉरिसन या त्यांच्या सेक्रेटरीने त्यांना सर्व प्रकारचा आधार दिला.

‘‘Forgive O Lord, my little jokes on thee
And I will forgive thy great big one on me’’ असं म्हणत गरीबीचे, खडतर कष्टांचे आयुष्य अनुभवलेला हा कवी सर्व प्रसंगांना धैर्यानं तोंड देत सतत एका वैभवशाली अनिश्चिततेला सामोरं जात राहिला. फ्रॉस्ट यांच्या मृत्युनंतर जगभरातल्या साहित्यप्रेमींनी त्याना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी याप्रसंगी केलेले गौरवपर भाषण अत्यंत भावोत्कट आणि अविस्मरणीय असे होते. रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्त करणारी त्याच्याच कवितेची ‘I had a lover’s quarrel with the world’ ही ओळ त्यांच्या थडग्यावर लिहिलेली आहे.

इतकी समृद्ध सांगता लाभलेल्या अनेक चढ-उतारांच्या संघर्षमय आयुष्याचा संपूर्ण आलेख असलेलं हे चरित्र कविताप्रेमींनी आवर्जून वाचावं असं झालेलं आहे.

आसावरी काकडे

कवितेच्या शोधात - रॉबर्ट फ्रॉस्ट : जीवन आणि काव्य
विजय पाडळकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे- ३४४, किंमत- ४०० रु.

साप्ताहिक सकाळ 13.4.2019