Sunday 20 September 2020

‘स्वया’- प्रकाशन समारंभासाठीचे मनोगत

नमस्कार

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर यांच्या हस्ते मनीषा दीक्षित यांच्या ‘स्वया’ या कवितासंग्रहाचं आज प्रकाशन होतं आहे. संग्रहाची निर्मिती उत्तम झाली आहे. या दर्जेदार नवनिर्मितीबद्दल सुरुवातीला मी तिचं हार्दिक अभिनंदन करते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर यांनी सध्याच्या अनेक गैरसोयींच्या काळातही आगत्यानं देखणी पुस्तक-निर्मिती केलेली आहे. त्यांचंही अभिनंदन करायला हवं. ‘स्वया’ या वेगळ्या शीर्षकाचा संदर्भ अधोरेखित करणारे सागर नेने यांचे मुखपृष्ठ ही एकूण पुस्तक-निर्मितीतली जमेची बाजू. कोत्तापल्ले सरांनी ऑनलाईन प्रकाशनाच्या नव्या तांत्रिक पर्यायाशी जुळवून घेत या प्रकाशनात आपला सहभाग दिला याचा मनीषाइतकाच मलाही आनंद झाला आहे.  

‘स्वया’ हा मनीषाचा चौथा कवितासंग्रह. तिच्या पहिल्या संग्रहापासून मी तिच्या कविता वाचत आले आहे. तिच्या कविता मला आवडतात. त्या कसलाही आव आणत नाहीत. आक्रोश करत नाहीत. पण म्हणून त्या आत्मतृप्त आहेत असं नाही. भोवतीच्या भयकारी होत चाललेल्या वास्तवाचं भान आहे त्याना. ते अस्वस्थ करतं, घाबरवतं तेव्हा उमटणारे त्याचे संयत तरी उत्कट उद्‍गार रसिकमनाला भिडणारे असतात.. मनीषाच्या कवितांचं मला आवडणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यात सहज येणार्‍या रोजच्या जगण्यातल्याच तरी वेगळा आयाम घेऊन येणार्‍या प्रतिमा. त्या आधुनिक काळातल्या जगण्याशी नातं सांगणार्‍या असतात तशा अगदी देशी वाणाच्याही असतात. दोन उदाहरणं देते-

एका कवितेत एका दृश्याचं वर्णन करताना म्हटलंय,

‘इवली इवली

असंख्य उगवून आलेली बाळरोपं

त्यांना

एकाच ताटात भरवतेय माती

एक घास वार्‍याचा

एक दिशांचा

एक किरणांचा...’

**

दृश्य तसं साधंच. पण त्याच्या वर्णनात आलेल्या भव्य प्रतिमांमुळे ते विलोभनीय झालं आहे.

 

दुसरं उदाहरण- ‘भूतकाळ’ या कवितेत म्हटलंय-

 

‘सणावाराच्या गोडधोड जेवणाचं

काही कवतिक नाही राहिलं कुणाला

क्रीमचे लेअरवर लेअर चढवत पेस्ट्री सजावी

तशा रोजच झडताहेत

अनलिमिटेड स्वीटसह पार्ट्या

**

‘स्वया’ संग्रहातल्या कवितांमधे अशा अनेक दृश्य-प्रतिमा आहेत. त्या आपल्या वेगळेपणानं कविताशय उत्कट करून वाचकांपर्यंत पोचवतात. अशा लेखनशैलीमुळे एकूण कवितांच्या गलबल्यात मनीषाच्या कवितेला तिचं असं स्थान मिळालेलं आहे.

आजच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला आवडलेल्या आणखी काही कवितांचा परिचय करून देते. ‘स्पंदन’ या कवितेत म्हटलंय, ‘इतक्या भाषा । इतक्या कविता । इतके लिहिणारे । अजून, अजून लिहिताहेत..। का? ‘का’ हा एकाक्षरी प्रश्न अनेक प्रश्नांची वलंय निर्माण करणारा आहे. खरंच का लिहील्या जातात कविता सतत सतत? कोणत्या प्रेरणा असतात कविता लिहायला भाग पाडणार्‍या? कवीला केवळ शब्दांतून व्यक्त व्हायचं असतं काय? नाही, उतराई व्हायचं असतं कुणाकुणाच्या ऋणातून. ‘स्वया’ या कवितासंग्रहातली ‘सासूबाई’ ही सासूबाईंचं व्यक्तिचित्र असलेली भावपूर्ण कविता वाचल्यावर हे प्रकर्षानं जाणवलं. कशाकशाची कबूली देऊन भावनिक ऋणातून मुक्त करत असते कविता.

‘अळूची भाजी’ या कवितेत जगून झालेल्या आयुष्याचं शब्दचित्र रेखलंय. ‘अळूची देठं सोलता सोलता । काळच सोलू लागते मी’ अशी सुरुवात करून एका थांब्यावर म्हटलंय, ‘अळू खाजरं नाही निघालं’. चार शब्दांची ही साधी ओळ बरंच काही सूचित करणारी आहे. पुढे म्हटलंय, ‘आता या कढीपत्त्याच्या डहाळीला किती बरं पानं । तेवढ्या तरी परदेशवार्‍या झाल्या..’ आयुष्य समृद्ध करण्यात या प्रवासाचाही सहभाग आहे. ‘लंडन रेडींग आय टी सेंटर’, ‘बहारीन- एक झलक’, ‘लंडन आय’, ‘स्ट्रॅटफोर्डच्या वाटेवर’, ‘ऑक्सफर्ड-बोड्लियन लायब्ररी’, ‘डोव्हर-व्हाईट क्लिप्स’, ‘ग्लेनको-जंगल ट्रेक’ या कवितांमधून त्याची झलक दिसते.

 ‘पत्र’ या कवितेच्या आशयाचा दृश्य आवाका छोटासाच. पण पत्रातल्या एका वाक्यानंतर आलेलं उद्‍गार चिन्ह आपल्या कृशकाय रूपातून संवेदनशील मनात काय काय पोचवतं त्याचे कवितेतील बारकावे वाचण्यासारखे आहेत. ‘ब्रह्मानंद’ ही कविता अशीच रोजच्या जगण्यातली उत्कटता शिगेला पोचवणारी. बाळ ब ब प प बोलू लागतं तेव्हा आजीला घरभर ओंकार घुमल्यासारखं वाटतं. बाळ मांडीवर विसावतं तेव्हा विश्वासाची लाख फुलं उमलतात. मग अंगाईला धुपारतीचा वास येऊ लागतो... एवढ्याशा गोष्टीवरून केवढ्यांदा खिदळतं बाळ तेव्हा तर आजीचं मन ब्रह्मानंदात डुंबत राहातं..!

इकेबाना ही एक पुष्परचनेसंदर्भातील जपानी कला आहे. मनीषानं ही कला आत्मीयतेनं जोपासलीय. बर्‍याच पुष्परचना-प्रदर्शनात भाग घेतलाय, पुरस्कार मिळवलेत. या कलेत रस असलेल्यांच्या ‘पुष्करणी’ या ग्रुपची अध्यक्ष म्हणूनही ती दोन वर्षं कार्यरत होती... अशा प्रत्येक कलेतून कलाकार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतो. ती कला त्या कलेपुरती सीमित राहात नाही. त्या कलेतून त्याला निसर्गाकडे, एकूण जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळतो. या कलांच्या आंतरिक अनुबंधातूनही काही निर्मिती होते. त्या दृष्टीने मनीषाची ‘इकेबाना’ ही कविता पाहण्यासारखी आहे.

या कवितेची सुरुवात अशी आहे-

‘पुष्पपात्रात हिरवीगार पाने लावताना

कसे उतरते आकाशतत्त्व तिच्या हातात

आणि बाकदार अशी डहाळी

मागून पुढे डोलताना

प्रकाशवर्षेच तर

तिच्या नेत्रांतून झुलत राहतात’

आणि शेवटी म्हटलंय, 

‘ईश्वर, पृथ्वी आणि माणूस

हे आदिम बिंदू सांधत

कसा साकारते ती परमत्रिकोण

-तिच्या हाताना विचारा..’

**

मनीषाच्या एकूण कवितांचा पोत कळण्यासाठी एवढी उदाहरणं पुरेशी नाहीत... पूर्ण संग्रह सलग वाचताना जाणवलं की गाण्याची मैफल रंगत जावी शेवटी शेवटी तशा या संग्रहातल्या कविता अधिक चढत गेल्या आहेत. ‘शहर-१’, ‘शहर-२’ या कविता ‘वायफाय जगाला जोडलेल्या’ आजच्या महानगरांचे वास्तव दर्शन घडवत अस्वस्थ करतात. झोप हा रोजचा प्रत्येकाचा अनुभव. त्या संदर्भातल्या पाच-सहा कविता त्यातल्या आर्ततेसह पुन्हा पुन्हा अनुभवाव्या आशा आहेत. ‘प्रश्नचिन्ह’ या कवितेतली ‘घरात माणसं नव्हे, प्रश्नचिन्ह राहतात’ ही पहिलीच ओळ डोळ्यासमोर अशा घराचं चित्र उभं करत पोटात कालवाकालव करणारी आहे. ‘वृद्धाश्रम’, ‘नकाशा’, ‘मी निघून जाईन’, ‘त्या वाटेने’ या कविता भैरवीसारख्या. ऐकल्यावर टाळ्या वाजवायचं विसरून स्तब्ध करणार्‍या..! त्या एकदा वाचून समाधान होत नाही. सर्व कविता वाचून झाल्यावर संग्रह परत पहिल्यापासून वाचावा असं वाटत राहातं...

मनीषाकडून अशाच उत्तमोत्तम कविता आणखी लिहिल्या जाव्यात याच हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

आसावरी काकडे

१९.९.२०२०