Saturday 9 January 2016

शब्दांमधे पेरलेल्या माझ्या कवितेविषयी-

‘स्त्री-लिखित मराठी कविता’ (१९५० ते २०१०) - संपादन : अरूणा ढेरे या खंडात प्रकाशित-



स्वतःच्या कवितेविषयीचं हे मनोगत लिहिताना सारखं मनात येतं आहे की
मी माझ्या कवितेविषयी कितीही प्रामाणिकपणे काही लिहिलं
तरी ते माझ्या शब्दांत पेरलेल्या कवितेविषयीच होणार.
त्यातून वाचकाच्या मनात उगवलेल्या, उगवू शकणार्‍या कवितेविषयी
मला काही म्हणता येणार नाहीए...

लहानपणापासून वेगवेगळ्या कारणांनी स्वतःत मिटलेली राहिल्यानंतर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी मी पहिल्यांदा कोर्‍या पाटीवर कवितेचा लिहिला. तेव्हापासून आजपर्यंत कवितेच्या सोबतीनं लेखन-प्रवास चालू आहे. या काळात घडत गेलेल्या माझ्या कवितेविषयी मीच लिहायचं आहे..! त्यासाठी बरेच प्रश्न दिलेले आहेत. त्यातल्या काही प्रश्नांच्या अनुषंगानं सुरुवातीला या प्रवासाविषयी-

घरचं वातावरण काहीसं बंदिस्त आणि गंभीर होतं. बुद्धी, रूप, ऐश्वर्य सगळं असून केवळ विक्षिप्त स्वभावापायी घरचं स्वास्थ्य बिघडवून स्वतः वाताहतीच्या दिशेनं चाललेलं व्यक्तित्व वडिलांच्या रूपात सतत आमच्या समोर असायचं. ते असं का वागतात?, त्यावर काही उपाय नाही का? असा विचार घरात कुणीच करत नव्हतं. थोडं कळू लागल्यावर माझ्याही मनात या दिशेनं कधी विचार आला नाही. उलट त्या लहान वयात मला, हे सर्व काय आहे?, कशाला जन्माला आलोय आपण? आलोच आहे तर त्याचं काय करायचं आहे?... ‘ईश्वर’ हेच जर सगळ्याचं उत्तर असेल तर मग त्याचं स्वरूप आहे तरी कसं?.. अशा प्रकारचे त्या वयाला न शोभणारे आणि न पेलणारे मूलभूत प्रश्न पडू लागले. ते सतत व्याकुळ करत राहायचे. पण नुसता विचार करण्याखेरीज या अवस्थेतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग समोर नव्हता... अभ्यासाखेरीज इतर काही वाचनाची सोय घरात नव्हती. संवादाचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळं स्वगत विचार आतल्याआत घुसमटत राहायचे. मग असे स्वगत विचार डायरीत लिहून ठेवण्याची सवय लागली. आता विचार करताना जाणवतंय की शब्दातून व्यक्त होण्याची ती सुरुवात होती...

      सतत अस्वस्थ ठेवणार्‍या प्रश्नांचा गुंता सोडवणारं थोडं जरी काही वाचनात आलं तरी बरं वाटायचं. खूप पुढं हळूहळू अशा वाचनात गोडी वाटू लागली. जे काही वाचायची त्यावर समांतर विचार चालू राहायचा. ते सर्व डायरीत उतरवलं की बरं वाटायचं. माझं वाचन, त्यावर काही लिहिल्याशिवाय पूर्णच व्हायचं नाही. हे लेखन म्हणजे वाचताना मनात उमटलेल्या प्रतिक्रिया नोंदवून ठेवणं, किंवा लेखकाला पत्र लिहिणं, पुस्तकातला आवडलेला भाग डायरीत लिहून घेणं, पुस्तक हिन्दी किंवा इंग्रजी भाषेत असेल तर आपल्यापुरता त्यातल्या आवडलेल्या मजकुराचा अनुवाद करणं.. अशा स्वरूपाचं होतं. सुरवातीला, म्हणजे मी कविता लिहू शकते हे उमगण्यापूर्वी बरीच वर्षं अशाच प्रकारचं लेखन चालू होतं. कवितेच्या जोडीनं नंतरही ते चालू राहिलं... आता असं वाटतं की नकळत झालेला वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाचा रियाजच होता तो...

      एकेक करत अशा लेखनानं भरत गेलेल्या कितीतरी डायर्‍या, स्वतःपुरते स्वांतसुखाय केलेले अनुवाद.. रूपांतरं, आवड म्हणून किंवा नंतर उशीरा केलेल्या अभ्यासाच्या निमित्तानं वाचलेल्या अध्यात्म- तत्त्वज्ञान यासारख्या विषयावरच्या ग्रंथांतील आशयाची ढीगभर टिपणं.. हे सर्व माझं पड्द्यामागचं लेखन. अर्थातच ते अप्रकाशित राहिलेलं आहे. पण मला ते माझ्या प्रकाशित पुस्तकांइतकच महत्त्वाचं वाटतं. कारण यथावकाश प्रकाशित होत राहिलेले कवितासंग्रह, गद्य लेखन यांचं भरणपोषण या लेखनातून होत रहिलं... बहरलेल्या वृक्षाचा जमिनीच्या वरचा पसारा खंबीरपणे तोलत जमिनीच्या खाली मुळं पसरलेली असावीत तसं वाटतं मला हे लेखन..!

या स्वांतसुखाय लेखनात, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे खूप उशीरा, म्हणजे १९८४-८५ च्या सुमारास कवितेचा प्रवेश झाला. कविता या माध्यमाची ओळख झाल्यावर मग सतत कविता लिहित राहिले. डायर्‍यांमधे स्वगतांच्या जागी कविता लिहिल्या जाऊ लागल्या.. कवितेनं मला नादावून टाकलं. आवेग इतका होता की थांबताच येत नाही अशी अवस्था झाली.. दोन डायर्‍या भरल्या आणि आवेग ओसरला. बर्‍याच दिवसात कविता लिहिली गेली नाही. वाटलं संपलं आत साठलेलं सगळं. त्या थांबलेल्या काळात योग जुळून आला आणि काहीसा संकोचत ‘आरसा’ हा पहिला कवितासंग्रह १९९० साली प्रकाशित झाला.. थांबलेपण प्रवाही झाल्यासारखं वाटलं. तेव्हा मनात उमटलेल्या चार ओळी या संग्रहाच्या मलपृष्ठावर टाकल्या. त्या अशा- ‘सारी आवराआवर करून / परततच होते मी / कुंपणापर्यंतची आपली धाव सरली म्हणून / पण मृगजळासारखं  / माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय..!

कल्पनाही केली नव्हती एवढं या संग्रहाचं सर्वप्रकारे स्वागत झालं. मग कुंपण खरोखरच मृगजळासारखं दूर जात राहिलं... माझा बायोडाटा वाढत राहिला.

लिहिण्यावर माझं जिवापाड प्रेम असलं, सुरुवात काहिशी दमदार झाली असली तरी कविता हा माझ्या महत्त्वाकांक्षेचा विषय कधी झाला नाही.. कारण घरच्या वातावरणामुळं माझा प्राधान्यक्रम वेगळा बनला होता. माझे वडील सतत काहीतरी लिहीत किंवा जाड जाड अध्यात्मिक ग्रंथ वाचत असायचे. पण जरा काही मनाविरुद्ध झालं की राग अनावर होऊन त्यांचा आरडा ओरडा सुरू व्हायचा. मग घरचं वातावरण एकदम तंग होऊन जायचं. हळूहळू हे वाढतच गेलं... आपलं चुकतंय हे त्यांना जाणवायचं. पण कितीही ठरवलं तरी ते स्वतःच्या मर्यादांमधून बाहेर पडू शकायचे नाहीत. स्वतःचे असे पराभव अनुभवताना त्यांना रडू आलेलं मी पाहिलं आहे. चांगलं वागावं असं त्यांना खूप वाटायचं पण जमायचं नाही... वडिलांचा माझ्या भावविश्वावर वेगवेगळ्या प्रकारे खूप प्रभाव होता. इतकंच नाही तर ‘अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेऊन जन्माला आलीय..’ असं माझ्याबाबतीत बोललेलं मी अगदी लहानपणापासून ऐकत आले होते. त्यामुळं न कळताच त्यांचा आंतरिक संघर्ष माझा झाला होता. त्यांचीच सूप्त इच्छा अनुवंशिकतेनं माझ्यात उतरलेली असल्यासारखी एक चांगलं माणूस होणं ही माझी निकड बनली होती. त्यामुळं आंतरिक परिवर्तनाचा मुद्दा कायम अग्रक्रमावर होता. तो माझा ध्यासविषय बनला होता...

हा ध्यास बाकी सगळं गौण ठरवणारा होता. मला सतत अस्वस्थ ठेवत विचार करायला लावणारे प्रश्न या ध्यासापोटी पडणारे होते. प्राधान्य त्यांना होतं. त्यामुळं त्यांच्या उत्तरांच्या दिशेनंच वाचन..अभ्यास..विचार होत राहिला. त्यातून प्रश्न-प्रक्रिया आणि अस्वस्थ होणं अधिक गडद होत गेलं. नवी अस्वस्थता, त्यातून डायरीलेखन किंवा कविता- असं घडत राहिलं. लेखन हे माझ्यासाठी मोकळं होण्याचं विश्वसनीय ठिकाण बनलं. अस्वस्थता शब्दबद्ध होते तेव्हा ते केवळ तिचं शब्दांकन नसतं तर ती कशामुळं आहे, कोणत्या स्तरावरची आहे हे स्वतःला कळणं असतं... लिहिता लिहिता लेखन-प्रक्रिया उमगत गेली. तिचं सामर्थ्य जाणवू लागलं. लेखनाकडे मी स्व-शोधाचं, स्व-विकासाचं साधन म्हणून पाहू लागले.

जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी या लेखन-प्रक्रियेमुळं आपणही घडत असतो. हे जाणवू लागलं. वाचनातून त्याला दुजोरा मिळू लागला... आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कवितान्तरणया अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी- ‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

लक्षात येत गेलं की सर्व प्रकारच्या लेखनातूनच फक्त नाही तर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. त्यामुळं अधिक चांगल्या लेखनाची पूर्वअट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा बनत गेली. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. तरीही काही बाकी राहीलया नावानं तो प्रकाशित झालाय. त्यात हा मुद्दा अधोरेखित करणारी एक कविता आहे-

अधिक चांगली कविता / लिहील तोच / जो अधिक चांगला कवी असेल / जेव्हा तो लिहीत असेल / सर्वात चांगली कविता / नक्कीच तो त्यावेळी  / सर्वात चांगला माणूस असेल / ज्या जगात लिहिल्या जातील / अधिक चांगल्या कविता / तेच असेल अधिक चांगलं जग / शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही / सर्वात सुंदर स्वप्न आहे / सर्वात चांगल्या माणसाचं..!

लेखन-प्रक्रियेत मनाला संदिग्धपणे जाणवलेलं अधिक स्पष्ट होतं, आपण आपल्याला समोर दिसतो. कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात..! ती आपली नवी ओळख असते. स्वतःची ओळख, त्यातून स्व-समीक्षा, त्यातून परिवर्तनाला दिशा मिळणं... या सर्व गोष्टी आपल्याला उन्नत करणार्‍या ठरतात.. लिहिता लिहिता मी हे सर्व अनुभवत होते.

कवितेकडे, एकूण लेखनाकडेच मी साधन म्हणून पाहात असले तरी या साधनाबाबत मी सजग होते. मिळणार्‍या प्रतिसादानं सुखावत होते. त्यातून अधिक लिहिण्याला ऊर्जा मिळत होती. पहिल्या कवितासंग्रहातून मिळालेल्या ऊर्जेनं कविता-लेखनाला गती दिली. नव्या वाटा फुटत गेल्या... शाळा-कॉलेजात शिकत असल्यापासून मला हिंदी भाषा आवडत होती. डायरी लिहितानाही सहज कधी कधी हिंदीत लिहिलं जायचं. घरात फारसं काही वाचायला मिळत नसल्यामुळं बहुधा रेडिओवर गाणी ऐकली जायची. त्यातही हिंदी गाणी विशेष आवडायची. गाणी ऐकतांना त्यातल्या शब्दांकडं लक्ष दिलं जायचं... पुढं कविता लिहायला लागल्यावर हिंदी कविता वाचायची आवड निर्माण झाली. कवितेची ओळख नवी होती त्या दरम्यान दीप्ती नवल यांचा ‘लम्हा लम्हा’ हा कवितासंग्रह वाचनात आला. त्या कवितांनी मला नादावून टाकलं. मग नेहमीच्या सवयीनं त्यातल्या विशेष आवडलेल्या कवितांचा अनुवाद करत गेले. हळूहळू पूर्ण संग्रहच माझ्या डायरीत मराठी रूपात अवतरला... सहज म्हणून केलेल्या या कवितासंग्रहाच्या अनुवादाच्या अनुभवानं सर्जकतेला आवाहन देणार्‍या दोन वाटांची ओळख करून दिली. एक- स्वतंत्र हिन्दी कवितालेखन आणि दुसरी- कवितांचा अनुवाद करणं. पुढं या दोन्ही प्रकारे कवितालेखन होत राहिलं...

एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझ्याच एका कवितेतला आशय घेऊन लहान मुलांसाठी एक कविता लिहिली. या निर्मितीनं एक वेगळा आनंद दिला. त्या अनुभवातून बालकविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बर्‍याच बालकविता लिहिल्या. हे लेखनही चालू राहिलं. वेगवेगळ्या निमित्तानं नियतकालिकांसाठी लेख लिहिण्यातून गद्य लेखनाला सुरवात झाली..

पहिल्या टप्प्यावर घातल्या गेलेल्या या पायावर पुढचा लेखन-प्रवास आणि वाचन-प्रवासही सातत्यानं चालू राहिला. या प्रवासाला गती आणि अर्थपूर्णता देणारी वळणं भेटत गेली. संत तुकारामांच्या गाथेचं वाचन...आणि त्या अनुषंगानं वाचनात आलेले इतर महत्त्वाचे ग्रंथ, त्यातून मनावर झालेले संस्कार हे मला भेटलेलं पहिलं प्रभावी वळण आहे. कारण इथं माझ्या आंतरिक संघर्षाला अर्थपूर्ण आधार मिळाला. मी गाथा वाचत होते. पण त्यातल्या अभंगांमधून जागोजाग व्यक्त होणारा तुकोबांचा ईश्वरभेटीचा आकांत मला समजू शकत नव्हता. ईश्वराची- निर्गुण निराकाराची भेट म्हणजे नक्की काय साधायचं?... स्वतःला धारेवर धरत, स्वतःशी वाद घालत, स्वतःची कसोटी पाहत अखंड आत्मपरिक्षण करणारा तुकोबांचा ईश्वरभेटीचा ध्यास म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास असेल काय? असा विचार मनात लकाकून गेला आणि महत्त्वाचं काही उमगतंय असं वाटू लागलं. याला पुष्टी देणारं काही वाचायला मिळावं अशी ओढ वाटू लागली. तशी पुस्तकं मिळतही गेली.

अशा वाचनातून बौद्धिक आकलनात भर पडत होती. त्यातून समजूत वाढत होती तशा स्वतःकडून अपेक्षाही वाढत होत्या. त्या तुलनेत ती समज जगण्यात उतरत नव्हती. विचार आणि कृती यातली ही तफावत व्याकुळ करणारी होती. त्याचे पडसाद कवितेत उमटत होते. पण तेवढ्यानं मनातलं भांडण शमत नव्हतं. कवितेत न मावलेले छोटे-मोठे स्व-संघर्ष मग डायरीत नोंदवले जाऊ लागले. सुरुवातीच्या स्वगतांहून हे लेखन वेगळं होतं... १९९५ सालापासून नियमित वाचन आणि असं डायरी-लेखन हा माझ्या दिनचर्येचा भाग झाला.. वाचन, विचार, विविध साहित्य-संस्थांनी आयोजित केलेली चर्चासत्रे... यातून उमगत गेलं की लेखनातून घडण्यासाठी केवळ अंतर्मुख विचार पुरेसा नाही. बाह्य जगाच्या सजग भानात असणं तितकंच आवश्यक आहे...! भोवतीचं वातावरण, असंख्य सामाजिक प्रश्न संवेदनशील मनाला अस्वस्थ करतच असतात. अशा अस्वस्थतेपलिकडे जाऊन त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन तयार होत गेला.. त्यातून विचारांचा परीघ विस्तारत राहिला.

 वाणिज्य शाखेचं पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यामुळं साहित्यिक पार्श्वभूमी तयार नव्हती. लेखनाच्या जोडीनं होणार्‍या वाचनातूनच हळूहळू माझी साहित्यविषयक समजूत घडत होती. लहानपणापासून मनात दबा धरून बसलेल्या जगण्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांच्या जोडीनं आता साहित्याच्या संदर्भातले प्रश्नही अस्वस्थ करू लागले. मनातला वाढता वैचारिक संघर्ष अधिक वाचन आणि अभ्यासाकडे लक्ष वेधत राहिला... कवितेतील सांकेतिकता म्हणजे काय? समीक्षेचं स्वरूप काय आहे?... अशा काही साहित्यविषयक प्रश्नांमधून मराठी विषय घेऊन एम.ए. करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानिमित्तानं झालेल्या अभ्यासामुळं वाचनाला आणि विचारांना शिस्त लागली. त्यातून व्यासंगाची गोडी निर्माण झाली. या अभ्यासात समीक्षेबरोबर भाषा, संस्कृती, लोकसाहित्य.. अशा विषयांचाही परिचय झाला. या विषयांच्या अभ्यासानं माझा दृष्टिकोन बदलवला. अधिक व्यापक केला. माझ्या लेखन-प्रवासातलं आणि स्वतःच्या घडणीतलंही हे दुसरं महत्त्वाचं वळण.

      संत-साहित्य आणि तत्त्वज्ञानाची आवड आधीपासून होतीच. रीतसर अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यामुळे स्वेच्छा-निवृत्तीनंतर २००४ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. केलं. या अभ्यासातून विचारांना चालना मिळाली. कुवतीनुसार या विषयाच्या अधिकाधिक खोलात जात राहिले.. त्यातून एका बाजूला प्रश्न पडणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचा पाठपुरावा कसा केला जातो ते उमगण्यातून कमालीचं अस्वस्थ व्हायला झालं. अंतर्मुख व्हायला झालं. आणि दुसर्‍या बाजूला भाषेच्या स्वरूपाची अधिक ओळख झाली. त्यातून कविता या साहित्यप्रकाराचं मूलभूत सामर्थ्य जाणवत गेलं. या तिसर्‍या वळणानं एका टप्प्यावर काहिशा स्थिरावलेल्या मला पुन्हा अस्वस्थ करून नवी जाग आणली.

कवितालेखनाच्या जोडीनं लेखरूपात कवितेविषयक गद्य लेखनही होत होतं. या अभ्यासानंतर अशा प्रकारचं लेखन अधिक होऊ लागलं. लहानपणापासून मला सतत अस्वस्थ ठेवत माझं लक्ष वेधून घेणार्‍या, ‘आपण जन्माला का अलोय? त्याचं सार्थक कशात आहे?... या पासून ते ईश्वराचं स्वरूप आहे तरी कसं?.. यापर्यंतच्या प्रश्नांनी बरीच वळणं घेत चालवत चालवत मला ईशावास्य उपनिषदाचा मुळातून अभ्यास करण्याच्या टप्प्यावर आणून सोडलं. हे उपनिषद, त्यावरच्या विविध भाष्यांवरच केवळ अवलंबून न राहता मूळ संस्कृतमधून शिकायला हवं हे लक्षात आलं आणि तशी संधीही मिळाली. ते शिकत असताना त्याच्या आकलन-प्रक्रियेचाच भाग म्हणून माझ्या मूळ सवयीनुसार त्याचं सविस्तर पद्य-रूपांतर होत गेलं. पाच-सहा वर्षांच्या अभ्यासानंतर या पद्यरूपांतराच्या जोडीला त्याला पूरक असं गद्य लेखनही झालं. इथंपर्यंतच्या लेखनप्रवासात अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचं मार्गदर्शन मिळालं, वेगवेगळ्या साहित्यप्रेमी मंडळांच्या सभासदांकडून उमेद वाढवणारी दाद मिळाली. तशी टीकाही झाली. पण या टीकेतून मी स्वतःला तपासून पाहायची संधी मिळवली. अधिक शिकण्यासाठी टिकेचा सकारात्मक उपयोग करून घ्यायची भूमिका ठेवत राहिले. या सगळ्याचा माझ्या घडणीत मोठा वाटा आहे.

‘क’ कवितेचा ते ‘ईशावास्यम्‍...’ या आकलन-प्रवासात, कविता या माध्यमाची अंतर्बाह्य ओळख होत राहणं ही मला गवसलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.. कवितेचं स्वरूप समजण्यातून काव्यात्म दृष्टिकोन स्वीकारण्यातला प्रगल्भ आनंद अनुभवता येऊ शकतो. चमत्कार, जन्म-मरणाचे फेरे चुकणं, मोक्ष अशा आध्यात्मिक संकल्पना नीट समजून न घेताच भाबडेपणानं शब्दशः स्वीकारणं किंवा तर्कबुद्धीच्या निकषावर उतरत नाहीत म्हणून नाकारणं या दोन टोकांच्या मधला ‘काव्यात्म दृष्टिकोन’ हा एक अधिक प्रगल्भ मार्ग आहे. त्यामुळं अशा गोष्टींकडे शब्दशः न पाहता त्यातली प्रतिकात्मकता समजून घेता येते. ईशावास्य उपनिषदासारखा विषय समजून घेताना तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांइतकाच काव्यात्म दृष्टिकोनही मला उपयोगी ठरला. सगुण, मूर्त रूपातला ईश्वर ही एक प्रकारे भाषेचीच निर्मिती आहे.. त्यातलं काव्य समजून घेता आलं !...

कविता-लेखनासाठी मला मिळालेली कौटुंबिक पार्श्वभूमी, माझा ध्यासविषय, लेखनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, शब्दांसोबत जाणीवपूर्वक झालेला माझा प्रवास, त्यात भेटलेली वळणं... याविषयी थोडक्यात सांगून झाल्यावर आता यात न आलेल्या इतर काही मुद्द्यांसंदर्भात माझ्या कवितेविषयी-

१) तुमच्या कवितेचा चेहरा स्त्रीचा आहे असे तुम्हाला वाटते का?...

१९८४-८५ म्हणजे मला माझ्यातली कविता सापडण्याचा काळ. त्या सुमारासच विद्या बाळ आणि त्यांच्या प्रेरणेतून चालू झालेल्या स्त्री सखी मंडळाची (आत्ताचं नाव ‘सखी सार्‍याजणी’) ओळख झाली. तिथं जायला लागल्यापासून मी स्वतःच्या वैचारिक कोषातून, घर आणि नोकरी या मर्यादित विश्वातून बाहेर पडायला लागले. ‘साधना साप्ताहिक’ आणि ‘स्त्री मासिक’ अशा वाचनानं ‘इतर’ वाचनाचीही सुरुवात झाली... इथं मला भोवतालाचं भान आलं आणि ‘माझे प्रश्न’ एका अर्थी भूतलावर आले. सामाजिक समस्यांची, विशेषतः स्त्रीविषयक प्रश्नांची ओळख झाली. ‘स्वगतां’मधून बाहेर पडून संवाद साधता येऊ लागला. या संवादामुळे मला आपले विचार तपासून घेता आले. थोडी मोकळी होत गेले. कविता-लेखनाला गती मिळाली. माझं ‘पूर्वसंचित’ आणि ही नवी ओळख यांनी माझ्या सुरुवातीच्या कवितेला आशय पुरवला. स्त्रीवादी विचारांच्या प्रभावात राहिले, स्त्री-प्रश्नांचं गांभिर्य समजून अस्वस्थ होत राहिले. त्यातून काही स्त्रीविषयक कविता लिहिल्या गेल्या.

 पुढं बर्‍याच वर्षांनी ‘बोलो माधवी’ हा ज्येष्ठ राजस्थानी कवी चंद्रप्रकाश देवल यांचा कवितासंग्रह वाचनात आला. ययाती-कन्या माधवीची कथा पार्श्वभूमीवर ठेवून त्या निमित्तानं स्त्री असण्याच्या वास्तवावर प्रखर भाष्य करणारा हा संग्रह वाचून मी प्रभावित झाले. त्याचा विषय आणि कवीचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला म्हणून पूर्ण पुस्तकाचा अनुवाद केला. तो ‘बोल माधवी’ या नावानं प्रकाशित झाला. या संग्रहात परोपरीनं माधवीला बोलतं करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दोन प्रश्न विचारलेत. एक- ‘माधवी, स्त्री कधी बोलणारच नाही काय?’ आणि दुसरा- ‘तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पुरुषांचा वंशज मी एक पुरुष या नात्यानं काय प्रायश्चित्त घेऊ?’...

कवी-मनाला अत्यंत खरेपणानं पडलेले हे प्रश्न वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. त्यातल्या प्रामाणिक भावनेनं मी अस्वस्थ झाले होते. अनुवाद हातावेगळा झाल्यावरही ते प्रश्न मनात सलत राहिले. बरेच दिवस मनात असलेल्या एका विषयाला त्यामुळं जाग आली. त्यातून सलग काही कविता लिहिल्या गेल्या. दोन वर्षांनंतर ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या नावानं या कविता संग्रहरूपात प्रकाशित झाल्या. या संग्रहात सामान्य पण विपरित परिस्थितीतही जिद्दीनं उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या ‘कहाण्या’ आहेत. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यातल्या कविता त्रयस्थपणे वाचताना जाणवलं की यातील स्त्रियांची ‘बदललेली’ आयुष्यं, ‘स्त्री कधी बोलणारच नाही काय? या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देणारी आहेत तर या संग्रहाच्या शीर्षक कवितेच्या शेवटच्या दोन ओळी - ‘पुरूषही पेलू शकतो असं स्त्रीपण / जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण’ हे ‘काय प्रायश्चित्त घेऊ?’ या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे..! अनुवाद आणि स्वतंत्र कविता या दोन प्रकारच्या निर्मितींमधला हा अनुबंध निर्मिती-प्रक्रियेच्या संदर्भात विचार करण्यासारखा आहे.

या कवितासंग्रहाच्या मनोगतामधे माझ्या ‘घडत’ गेलेल्या विचारांशी सुसंगत अशी माझी स्त्रीविषयक भूमिका मी मांडलेली आहे. ती थोडक्यात अशी-

स्त्री-प्रश्नासंदर्भात स्त्रीवर होणारे अन्याय-अत्याचार, त्यामागची कारणपरंपरा, त्यांचे सर्वगामी परिणाम आणि त्यावरचे उपाय... अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर लेखन करता येणं शक्य आहे. स्त्री-पुरूष समानता हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हे करतांना स्त्री असणं म्हणजे काय? हे समजून घेतलं पाहिजे. स्त्रीचं स्त्री म्हणून महत्व नेमकं कशात आहे? स्त्री असण्यामुळे तिला कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि तरीही ती सगळ्याला तोंड देत उमेदीनं कशी जगते ते समजून घेतलं पाहिजे. सर्व क्षेत्रात आज स्त्री नाव कमावते आहे. मोठमोठी उदाहरणं देऊन स्त्री पुरूषापेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं जातं. पण मला सतत जाणवत आलं आहे की स्त्रीचं मोठेपण केवळ यात नाही. ते एक व्यक्ती म्हणून तिच्या अंगच्या गुणांनी तिनं मिळवलेलं मोठेपण आहे. स्त्रीचं स्त्री म्हणून असलेलं खरं सामर्थ्य ती ज्या धैर्यानं विपरीत स्थितीतही उभी राहाते, उद्ध्वस्त न होता आपला संसार, परिसर सांभाळते त्यात आहे. चिवटपणे तग धरून, धैर्यानं कृतिशील राहात, सर्जक आनंदाचा शोध घेत जगता येणं हे स्त्रीचं खरं सामर्थ्य आहे. अगदी सामान्यातली सामान्य स्त्रीही प्रसंगी असं धैर्य दाखवते याची असंख्य उदाहरणं देता येतील.

स्त्रीचं सामर्थ्य कशात आहे हे समजून घेतल्यावर स्त्री-पुरूष समानता या संकल्पनेतली सूक्ष्मता लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. स्त्री-पुरूष समानता म्हणजे दोघांना माणूस म्हणून चांगलं आयुष्य जगण्याची समान संधी मिळणं, दोघांना समान दर्जा मिळणं एवढंच नाही. या संदर्भातला  मूलभूत विचार Fritjof Capra  यांच्या ‘The Tao of Physics या पुस्तकात नेमकेपणानं मांडलेला वाचनात आला. तो मला फार अर्थपूर्ण वाटला. त्याचा भावार्थ असा विश्वाच्या व्दंव्दात्मक स्वरूपातलं एक महत्त्वाचं व्दंव्द म्हणजे माणसातलं पुरूषत्व आणि स्त्रीत्व. सुख-दु:, जीवन-मृत्यू यासारखी व्दंव्दं आपण समजू शकतो. पण आपल्यातलंच स्त्री-पुरूष व्दंव्द समजून घेताना आपण गोंधळतो. प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक पुरूषाचं व्यक्तिमत्व हे स्त्री आणि पुरूष तत्वाचं एक विशिष्ट मिश्रण आहे हे समजून घेण्याऐवजी अशी प्रथा प्रस्थापित होत राहिली की सगळ्या पुरूषांनी मर्दानी असावं आणि स्त्रियांनी बायकी. त्यातून पुरूषांच्या हाती समाजाचं नेतृत्व आलं. त्यांना सर्व अधिकार मिळाले. परिणामतः पुरुषप्रधान समाजात माणसातल्या पुरुषीपणावर- बुद्धिमत्ता, स्पर्धा, आक्रमकता... अवाजवी भर दिला गेला. आणि त्यांच्यातलं स्त्रीत्व उत्स्फुर्तता, धार्मिकता, संवेदनशीलता... सतत दडपलं गेलं ! या स्त्रीत्वाचा विकास होऊन माणसातल्या दोन्ही प्रवृत्तींमध्ये समतोल निर्माण व्हायला हवा. चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्सू यांनी म्हटलं आहे A fully realized human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine- ” स्व-रुपाची पूर्ण समज आलेली व्यक्ती पुरुषत्व जाणते आणि तरी स्त्रीत्वही जतन करते.

पुरुषी आणि बायकी म्हणवले जाणारे दोन्ही प्रकारचे गुण एकूण समाज-स्वास्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. एकूण परिस्थितीचा रेटा म्हणून स्त्रिया बर्‍याच प्रमाणात पुरुषांची भूमिका घ्यायला लागल्या. पण त्या प्रमाणात पुरूष स्त्रियांची भूमिका निभावतायत असं दिसत नाहीत. त्यामुळं दोन्ही गुणांतला समतोल ढळतो आहे. परिणामत: कुटुंबजीवनात अशांती आणि समाजात अराजकता माजत चालली आहे. हा समतोल टिकवायचा असेल तर स्त्री-गुणांचा, स्त्री असण्याचा आदर करणारी मानसिकता वाढायला हवी. एक चांगलं, प्रगल्भ माणूस होण्यासाठी या पातळीवर स्त्री-पुरूष समानतेचा, स्त्री असण्याचा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. ही गरज लक्षात येईल तेव्हाच अपेक्षित परिवर्तन घडून येईल.
 या भूमिकेसह माझे हे दोन्ही कवितासंग्रह माझ्या एकूण कवितेचा एक महत्त्वाचा भाग आहेत... असं असलं तरी माझ्या एकूण कवितेचा चेहरा स्त्रीचा आहे असं मला वाटत नाही. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रामाणे मी सतत ज्या प्रश्नांचा विचार करत आले त्याला मी स्त्री असण्याचा संदर्भ नव्हता. भोवतालाचं भान देणारी नवी ओळख महत्त्वाची वाटत असली तरी माझं लेखन आणि वाचन प्रामुख्यानं त्या मूळ जिज्ञासेचं बोट धरूनच होत राहिलं. त्याच्या सोबतीनं मी, माझा दृष्टिकोन घडत गेला तशी माझी कविताही घडत, बदलत राहिली...

२) दडपणाशिवाय कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य नेहमी अनुभवता का?

 कविता लिहिताना मला कोणतंही बाह्य दडपण जाणवत नाही..! याचा अर्थ मी बंडखोर किंवा बिनधास्त आहे असं मुळीच नाही. सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावी १९५० साली माझा जन्म झाला आणि बी. कॉम.पर्यंतचं शिक्षण होईपर्यंत कोल्हापूरात राहाणं झालं. त्या काळातल्या, त्या गावातल्या आणि आमच्या घरातल्या अधिकच्या दडपणातच आयुष्यातला संस्कारक्षम काळ गेल्यामुळं दडपण अंगी इतकं बाणलं गेलंय की आक्षेप घेतला जाईल असं काही लिहावं असं आतून येतच नाही... कुलूप आतच लागलेलं आहे. इतकंच काय तसं काही वाचायचंही धाडस पूर्वी नव्हतं. आता वाचण्याइतपत धैर्य आलेलं आहे.

३) समकालीन कविताविश्वात तुमच्या कवितेची मुद्रा कशी आहे असे तुम्हाला वाटते?-

समकालीन कवितेचा विचार होतो तेव्हा माझ्या कवितेची वेगवेगळ्या पातळ्यांवर थोडीफार दखल घेतली जाते. पण स्त्रीवादी, महानगरीय जाणिवांची, वास्तववादी... असं कुठलं एक विशेषण तिला लावता येण्यासारखं नाही. खरंतर कुणाचीच कविता असं एकच एक विशेषण लावता येईल अशी असत नाही. पण बाह्यतः वेगवेगळ्या विषयांच्या वाटणार्‍या कवितांचं अंतःसूत्र एक असू शकतं. माझी कविता स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं. भोवतीचं बदलतं वास्तव आणि त्याला प्रतिक्रिया देणारा माणूस समजून घेताना उमगलेलं काही ती सांगू पाहाते. वास्तवाच्या तपशिलात न जाता त्यामागच्या कारणांचा वेध घेणं पसंत करते...

४) कवितेच्या घाटांचा विचार कसा करता?... कवितेचे कवितापण कशात आहे?-
 
माझे वडील आणि आजी कविता करायचे. अधिकतर त्या प्रासंगिक, घरगुती स्वरूपाच्या असायच्या. पण त्यांची वृत्तांवर चांगली पकड होती. माझी आजी मला वृत्तात लिहिण्याबद्दल आग्रह करायची. तसा थोडा प्रयत्न मी केला. वृत्तात लिहिणं फारसं जमलं नाही. पण छंदोबद्ध रचना बर्‍यापैकी जमली. त्यातल्या काही कविता संगितबद्धही झालेल्या आहेत. कवितेचा आकृतीबंध कवितेच्या आशयासोबतच येतो. कवितेची लय कवितेच्या आशयाला एक वेगळी मिती आणि सौंदर्य बहाल करते. कविता फक्त शब्दांतून व्यक्त होत नाही. त्यांची विशिष्ठ रचना, त्यातून निर्माण होणारी गेयता, कवितेतली विरामचिन्हं, ओळींमधे सोडलेली जागा... अशा पूर्ण देहबोलीतून कविता व्यक्त होत असते. कवितांचा अनुवाद करताना या गोष्टी विशेषत्वानं जाणवतात. Poetry is not the thing said but way of saying it. - आशय म्हणजे कविता नाही तर तो कथन करण्याची शैली म्हणजे कविता. कवितेची ही व्याख्या मला महत्त्वाची वाटते.

पण कवितेचा आस्वाद ही एक समांतर प्रक्रिया आहे. ‘आरसा’ या माझ्या पहिल्या कवितासंग्रहात अर्पणपत्रिकेच्या जागी मी लिहिलंय- ‘मी तुला / माझा, / अगदी माझाच असलेला / आरसा दिला / तरी त्यात तुला  / तुझंच रूप दिसेल..!’

कविता लिहिताना आपण आपलं स्वत्व आपल्या शब्दांत पेरतो पण तिचा आस्वाद घेताना रसिकमनात त्यातून त्याचं असं वेगळंच काही उगवतं. कवितेचं असणं या पेरण्याच्या आणि उगवण्याच्या प्रक्रियेत आहे.

‘मौन क्षणों का अनुवाद’ या माझ्या पहिल्या हिन्दी कवितासंग्रहातही सुरवातीला वाचकांसाठी एक कविता आहे-

“मेरी कविता / केवल / चार बिंदूओं की ओर संकेत करेगी / आप उन्हें / अपने हिसाब से / कहीं भी रखकर जोड़ दें  / और अपना आकाश बना लें! / रंग / चांदनी / अंधेरा / खुशबू.. / सारी चीजें / बिंदूओं के आसपास / खामोश होंगी / किसी को भी उठाकर / आप अपना आकाश सजा लें.”...  
आस्वाद-प्रक्रियेची स्वायत्तता इथं गृहीत धरलीय.

स्वतःच्या कवितेविषयीचं हे मनोगत लिहिताना सारखं मनात येतं आहे की मी माझ्या कवितेविषयी कितीही प्रामाणिकपणे काही लिहिलं तरी ते माझ्या शब्दांत पेरलेल्या कवितेविषयीच होणार. त्यातून वाचकाच्या मनात उगवलेल्या, उगवू शकणार्‍या कवितेविषयी मला काही म्हणता येणार नाहीए.  

५) तुमच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत का? त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का?

माझ्या काही कवितांचे हिन्दी, इंग्रजी खेरीज इतर भारतीय भाषांमधेही अनुवाद झालेले आहेत. काही नियतकालिकांमधून ते प्रकाशित झाले आहेत. मात्र ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या कवितासंग्रहाचा गोव्यातील ज्येष्ठ लेखिका हेमा नायक यांनी केलेला ‘बायल आसपाचो अर्थ’ हा कोंकणी अनुवाद, माझ्या निवडक कवितांचा मुंबईच्या नलिनी माडगावकर यांनी केलेला गुजराती अनुवाद आणि ‘मेरे हिस्से की यात्रा’ या माझ्या निवडक कवितांच्या मी केलेल्या हिंदी अनुवादाचा ‘कविथायी पायनम’ हा के. राजेश्वरी, राजापाळयम, (तामिळनाडू) यांनी केलेला तामिळ अनुवाद हे तीन संग्रहरूपातले अनुवाद प्रकाशनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यातले बरेचसे अनुवाद मी पहिलेले नाहीत. कोकणी अनुवाद पाहिला. तो छान वाटला.

पण कवितेचा अनुवाद मूळ कवी किंवा अनुवादक, वाचक कुणालाच कधी पूर्ण समाधान देऊ शकत नाही. कवितेचं स्वरूपच तसं आहे. कवितेचं कवितापण ज्यात असतं अशा प्रतिमा, शैली, मौन, भावसौंदर्य, लय... यांचा अनुवाद कसा करणार? त्यामुळं कवितेचं एक वैशिष्ट्यच असं सांगितलं जातं की तिचा अनुवाद होऊ शकत नाही..! तरीही कवितांचे अनुवाद होतात. व्हायला हवेत..

मी काही हिंदी कवितासंग्रहांचे अनुवाद केले आहेत. या प्रक्रियेत कवितेच्या अनुवादाच्या मर्यादांचं स्वरूप लक्षात येत गेलं.. कवितांचा अनुवाद करताना एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि कितीही शिकस्त केली तरी त्यातल्या एक-दोन गोष्टी तरी हातून निसटतातच. एक चूक टाळताना दुसरी चूक होऊन बसते... कवितेचं ‘आकलन’ ही पहिली अवघड पायरी चढून झाल्यावर मग प्रत्यक्ष अनुवाद करताना योग्य शब्दांची निवड करणं हे एक मोठं आव्हान असतं. शब्दाला शब्द ठेवायचा तर शब्दशः अर्थ काही वेळा हास्यास्पद ठरतो. पण सूचितार्थ, भावार्थ दर्शवणारे शब्द घ्यायचे तर कवितेचा अनुवाद म्हणजे कविता समजून सांगण्यासारखं होतं. अनुवादातही आशय सुचकतेनं, मूळ अर्थच्छटेसह यायला हवा... या प्रयत्नात एखाद्या शब्दासाठी नेमका पर्यायी शब्द मिळेपर्यंत चांगलाच धीर धरावा लागतो. आणि कोणताही शब्द निवडला तरी आधिक चांगल्या शब्दाच्या पर्यायाची शक्यता नेहमी असतेच..!

कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप आणि सामर्थ्य उमगत जातं तसंच अनुवादाचंही आहे. प्रत्येक संग्रहाच्या अनुवादातून मला एक नवा अनुभव मिळत गेला. लक्षात येत गेलं की कवितेचा अनुवाद म्हणजे मूळ कवितेचा व्युह भेदत आत शिरायचं आणि कमावलेल्या आकलनातून रचायचा आपल्याअनुवादित कवितेचा नवा व्युह.. किंवा कवितेचा अनुवाद म्हणजे तारेवरची कसरत. तोल सावरण्यासाठी क्षीण आधार देणारी आणि तोल जाण्यासाठी भरपूर अवकाश असलेली!.. किंवा कवितेचा अनुवाद म्हणजे आंतरिक मशागत करून नवनिर्मितीच्या शक्यता पेरणारा रियाज!... पण एवढंच नाही. अनुवादाचं पुन्हा पुन्हा परिष्करण करताना भाषा, आशय आणि रचना या तिन्ही स्तरांवर कवितेशी जवळीक साधता येते. ही आंतरिक प्रक्रिया अनुवादकाची स्वतःची, स्वतंत्र असते. अशा खोल जाण्यातून उमगणारा आशय केवळ त्या कवितेपुरता मर्यादित राहात नाही. ही उमज कवितेच्या सीमा ओलांडून जाते आणि अनुवादकाला समृद्ध करते...

कवितांचा अनुवाद हे सृजनाचा पैस वाढवणारं अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम आहे असा माझा अनुभव आहे. वेगवेगळ्या कवींच्या कवितांचे अनुवाद करता करता वर म्हटल्याप्रमाणे हिंदी कवितेशी, हिंदी भाषेशी अधिक सलगी झाली. नकळत होत राहणार्‍या आंतरिकीकरणाच्या प्रक्रियेत हे सर्व सामिल होत राहिलं. त्यातून उगवत असल्यासारखं अधुन मधून माझं हिंदी कविता लेखनही चालू राहिलं.. हिंदी भाषेत कविता सुचते तेव्हा एक वेगळं ताजेपण जाणवतं. काहिशी मोकळीक जाणवते. हिंदीतून लिहिताना नवं काहीतरी नव्या तर्‍हेनं व्यक्त होतंय असं वाटतं..! कवितेतून व्यक्त होण्यासाठी एक नवं आकाश देणार्‍या हिंदी भाषेलाच मी माझा पहिला हिंदी कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. अभिव्यतीचा वेगळा आनंद आणि समाधान देणार्‍या हिंदी कवितांनी माझ्या लौकिक यशातही महत्त्वाची भर घातलेली आहे. एक हिंदी कविता उदाहरण म्हणून इथं द्यायला हवी असं वाटतं-

‘पूरब दिशा से बहता हुआ
एक हवा का झोंका आया
और
बहुत सारे पीले पत्ते
झर गए !
हवा पत्ते गिराने
नहीं आई थी !

आंतर संगीत
सुनती हुई
शाखाएँ
झूलने लगीं
तो बहुत सारे पीले पत्ते
झर गए
शाखाएँ पत्ते गिराने
नहीं झूली थी !

न जाने
किस यातना से
या हर्षोल्लास से
वृक्ष
काँपने लगा
तो बहुत सारे पीले पत्ते
झर गए
वृक्ष पत्ते गिराने
नहीं काँपा था..!!

(‘इसीलिए शायद’ डिसेंबर २००९- या कवितासंग्रहामधून)

६) समकालीन वास्तवाचा एखादा घटक सातत्याने अस्वस्थ करतो आणि लेखनप्रवृत्त करतो असे घडते का?...

आजचं सतत अंगावर येऊन आदळणारं समकालीन वास्तव अंतर्मुख विचाराला फुरसत आणि महत्त्व देणारं वाटत नाही. सर्व स्तरांवरची गर्दी, सगळ्या गोष्टींचं बघता बघता जुनं होणं, सगळ्याला आलेला अनावर वेग, डोळे दीपवून ‘दृष्टी’ अधू करणारी समृद्धी, दारिद्र्याची निर्दय झाकापाक, बदलत चाललेल्या मूल्यकल्पना, चळवळी.. विचारधारांचं निष्प्रभ होत जाणं, रोग.. अन्याय.. अत्याचार.. भ्रष्टाचार.. कचर्‍यांचे ढीग.. यांचं थैमान.. अशा बर्‍याच गोष्टी सतत अस्वस्थ करत असतात. या समकालीन वास्तवात काही जमेच्या गोष्टीही आहेत.. पण त्यांच्याशी जमवून घेताना दमछाक होते. आपण स्वतः, आपले विचार, आपल्या जगण्याच्या, लिहिण्याच्या प्रेरणा.. सर्वच कालबाह्य आणि निरर्थक होतंय की काय ही जाणीव घाबरवणारी आहे.. या सगळ्यातून येणारी अस्वस्थता अलिकडल्या काही कवितांमधे व्यक्त झालेली आहे.

) स्वतःच्या संदर्भात कविता म्हणजे काय आहे असे तुम्हाला वाटते? तुमच्या जगण्यात कविता कुठे आहे? कशी आहे?

सुरुवातीच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणं कविता हा माझा ध्यास-विषय नव्हता. कवितेसाठी म्हणून कवितेचा व्यासंग मी केला नाही. अधिक चांगली कविता लिहिता यावी यासाठी केवळ साहित्यिक अंगानं प्रयत्नशील राहिले नाही. मी मानत असलेली त्यासाठीची पूर्वअट- एक चांगलं माणूस होणं ही माझी आंतरिक निकड होती. आहे. माझे सर्व प्रयत्न त्यासाठी होते. लक्ष तिकडं होतं... मात्र स्वतःत मिटलेल्या मला कवितेनंच प्रथम माणसात आणलं. पुढं पुढं चालवत ठेवलं. सतत चाललेल्या स्व-संघर्षात कविता माझ्या सोबत राहिली. माझ्या घडण्यावर तिनं पाहारा ठेवला. माझी समजूत वाढवली आणि कठोर समीक्षाही केली.. मला स्वतःची ओळख करून देत तिनं बाहेरच्या जगात माझी छोटीशी ओळख निर्माण केली. माझ्या आतल्या आणि बाहेरच्या यशासह आज मी जी काही आहे ती कवितेमुळं आहे..!

आसावरी काकडे  
9762209028   

1 comment: