Monday 6 August 2018

‘कतरा’विषयी

एखादा शब्द त्याच्या भोवतीच्या विशेष अर्थ-वलयामुळे आपल्या मनात रुजतो. त्याला आपल्या मनातले संदर्भ बिलगतात आणि तो खास आपला होऊन जातो. मराठीत न रुळलेला, खणखणीत उर्दूच असलेला कतरा (थेंब) हा शब्द सुप्रियाताईंनी असा आपलासा करून घेऊन कवितासंग्रहाचं शीर्षक म्हणून योजलेला आहे. काव्यसागरात आपल्या कवितेची चिमुकली नाव घालताना त्या अथांगातल्या एका इवल्या थेंबासारखी आपली कविता असणार आहे याची त्यांना जाणीव आहे. ‘कतरा’ हे शीर्षक या जाणिवेचा निर्देश करणारं आहे.

पण आकारानं लाहान असला तरी हा कवितेचा थेंब संपृक्त आहे, भोगलेल्या आयुष्याकडे अलिप्तपणे पाहातो आहे. या संग्रहातल्या शीर्षक कवितेत सुप्रियाताईंनी रसिकांकडून अपेक्षा व्यक्त करताना सार्थपणे म्हटले आहे, ‘या थेंबाची वाट पाहात / सागरही थांबावा / क्षण दोन क्षण....’.. थेंब असण्याची नम्र जाणीव आणि तो संपृक्त असण्याचा अलिप्त विश्वास हे सगळं या शीर्षकातून त्यांना सुचवायचं आहे.

या संग्रहातल्या कविता आपल्या भोवतीच्या परिघातले भावकल्लोळ व्यक्त करणार्‍या आहेत. संयत आणि प्रामाणिक आहेत. गंगा यमुना... कृष्णा कावेरी..  सारखे मोठे जलाशय दिमाखात आपल्या जागी असतात. पण छोट्या तहानेसाठी जागोजाग छोट्या पाणपोया असाव्या लागतात. व्यक्त होण्याची तहान भागवणारा हा ‘कतरा’ रसिकांची तहान भागवणारी पाणपोई ठरो ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
२८.६.२०१८