Saturday 30 January 2016

किनारा होऊन आपणच

प्रिय कादंबिनी,
‘किनारा होऊन आपणच’ हा तुझा पहिला कवितासंग्रह. या संग्रहातल्या तुझ्या सगळ्या कविता सलग वाचल्या. त्यातल्या एक-दोन फार पूर्वी, तू लहान असताना लिहिलेल्या.... तेव्हा वाचून तुझं कौतुक केल्याचं आठवतंय. आता इतक्या वर्षांनी इतक्या कविता एकत्र वाचतांना पुन्हा कौतुक वाटतं आहे... तू चांगलं लिहिलंयस. तुझ्या कवितांमधला एकूण आशय, त्यामागचा तुझा विचार चांगला आणि भारदस्त आहे. त्यातून तुझं व्यक्तित्व आणि तो घडवणारा तुझ्या आई बाबांचा समृद्ध वैचारिक वारसा डोकावतोय. तू जगण्याचा, स्वत:च्या अस्तित्वाचा, नात्यांचा आणि भोवतीच्या वास्तवाचाही सतत विचार करतेस, तुला प्रश्न पडतात, विसंगती जाणवतात.... हे सर्व सजग आणि संवेदनशील असण्याचं सुचिन्ह आहे! अमेरिकेसारख्या दूरदेशात राहूनही लौकिक स्तरावर आजच्या काळाचं आणि बिथरवू शकणार्‍या सुबत्तेचं बोट धरून धावताना असा अंतर्मुख विचार करणं ही सहज गोष्ट नाही. पण त्याहून विशेष म्हणजे या विचारांनी तू अस्वस्थ होतेयस.... मनातला कोलाहल कवितांमधून व्यक्त करावासा वाटण्याइतकी! लिहिण्यातली ही उत्कटता कधीही कोमेजू देऊ नकोस. कविता हे घडत राहण्याचं जिवलग साधन आहे. तिची साथ सोडू नकोस !

हे झालं तुझ्या बद्द्ल, तुझ्या विचाराबद्दल, तुझ्या कवितांमधल्या आशयाबद्दल.... आता कविता या साहित्य-प्रकाराबद्दल थोडं सांगते. कविता मितभाषी असते. ती शब्दांपेक्षा मौनातूनच अधिक बोलते. ती घटना-अनुभवांतील तपशील गाळून टाकते आणि भावपातळीवर त्यांचे उमटलेले ठसे शब्दात अनुवादित करते. या प्रक्रियेत वैयक्तिक अनुभवाचं सामान्यीकरण होतं..... विशिष्ठ ’मी’  चा परिघ विस्तारून तो सामान्य ’मी’ होतो. त्यामुळेच कोणतीही चांगली कविता वाचकाला आपली वाटते....

कवितेची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगणार्‍या खूप व्याख्या आहेत. त्यातली एक माझ्या विशेष लक्षात राहिलीय. कारण ती प्रथम समजली तेव्हा कवितेच्या स्वरुपाविषयीचा माझा दृष्टिकोन बदलवण्याइतकं तिनं मला अंतर्मुख केलं होतं. ती व्याख्या अशी – A poetry is not the thing said but the way of saying it. !’

ही व्याख्या माहीत होईपर्यंत मी कवितेतील आशयालाच खूप महत्त्व देत होते. पण या व्याख्येनं लक्षात आणून दिलं की कवितेचं कवितापण कवितेच्या आशयात नाही तर तो व्यक्त होण्याच्या तर्‍हेत आह! विशिष्ठ रीतीनं सांगण्याची कवीची शैली कवितेच्या आशयाला कवीच्या नावाची एक मिती देत असते. कोणत्याही चांगल्या, जमून गेलेल्या कवितेत आशय स्वत:ची शैली घेऊनच व्यक्त होतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन वेगळ्या गोष्टी राहात नाहीत. दोन्ही मिळून एक सौंदर्यानुभूती देणारी आशयगर्भ कविता झालेली असते !

चांगल्या कवितेची वैशिष्ट्यं समजून घेऊन, अभ्यास करून चांगली कविता लिहिता येणार नाही. कविता लिहिता लिहिता, तिच्या सोबतीनं चालता चालताच कधीतरी ती प्रकटेल ! खरं तर चांगल्या कवितेचं स्वरूपही तेव्हाच नीट कळतं.....  तुझ्या कविता वाचताना जाणवलं की त्या अभ्यास-व्यासंगातून नाही तर आंतरिक निकडीतून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यात नीट-नेटकेपणापेक्षा उत्स्फूर्तता आहे. आशयाच्या पातळीवर त्या पुरेशा समंजस आहेत पण अभिव्यक्तीच्या पातळीवर काहीशा अनघड ! मात्र काही कविता दोन्ही स्तरांवर छान जमून गेल्यायत. उदा. पहिलीच कविता –

“साधावा कधीकधी
एक संवाद
स्वत:चा
स्वत:शीच
अन
निरखून पाहावं
त्रयस्थपणे
स्वत:लाच कधीकधी
उगाच वाहात राहू नये नुसतंच
वेडावलेल्या नदीसारखं
किनारा होऊन आपणच
तिलाही
द्यावा आधार कधीकधी !”

ही कविता म्हणजे प्रौढ मनानं स्वत:तल्या खट्याळ प्रवाहांना समजावणं आहे. किंवा आत्मसंवाद साधू शकणार्‍या कवितेच्या कवितेचं स्वरूप जाणवणं आहे, किंवा... आणखी काही तरी! यातल्या शेवटच्या ओळींमधे वेगवेगळे अर्थ वाचकांपर्यंत पोचवण्याच्या शक्यता आहेत. मला त्या आवडल्या.

‘अतितात मी’ ही पण छोटीशी, मला खूप आवडलेली कविता. यात तू प्रत्यक्षात न लिहीलेलं बरंच काही वाचकांना जाणवू शकतं. तू लिहिलंयस-

“ अतीतात मी
माझ्याही अलिकडे, माझ्याही अलिकडे
वर्तमानात मी
माझी माझ्यातच, माझी माझ्यातच
भविष्यात मी
माझ्याही पलीकडे, माझ्याही पलीकडे”

तुझ्या बर्‍याच कवितांमधे स्वत:च्या असण्याचा, आस्तित्वाचा विचार आलाय. मला तो विशेष महत्वाचा वाटतो. काही कविता जिवलग नात्यांवर आहेत. तर ‘एक दणदणीत धमाका...’ सारख्या काही कविता वास्तवाचं भयंकर दर्शन घडवणार्‍या आहेत. तुझ्या कवितांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे तुझ्या बर्‍याच कवितांचे शेवट चमकदार, लक्ष वेधून घेणारे आहेत. उदा.-

‘.... सारा प्रवास
एका आस्तित्वाचा
शुन्याकडून शून्याकडे
हा प्रवास माझाच
माझ्याकडून माझ्याकडे ’
**
‘आपणही त्यात रुजून
कुठे कुठे उगवत असतो ’
**
‘आता मी वणवा होऊन
तुला जाळत जाणार
अन्‍
जंगल होऊन
स्वत:ही जळत जाणार !’
**

याशिवाय ‘बाप’,  ‘आणि मी ?’,  ‘कधी कधी’, काळाच्या प्रवाहातून’ ....अशा काही कविता मला अधिक आवडल्या. ‘आपली नजर थांबली म्हणून / आभाळ कधी संपत नसतं’.. अशा काही ओळीतलं शहाणपण, ‘अनपेक्षित अनुभवांसारखी / कविता जगणं शिकवत येते’ अशा ओळींतून व्यक्त होणारी समजूत... असं आणखी काय काय लक्ष वेधणारं आहे तुझ्या कवितेत.

लिहिलंयस ते छान आहे. आणखी सतत लिहित राहा. कारण कविता हे अतिशय समर्थ माध्यम आहे. अंतर्मुख विचारांतून व्यक्त होऊ पाहणारा आशय व्यक्त होताहोता स्पष्ट आणि समृद्ध होत असतो. या प्रक्रियेत उत्स्फूर्ततेच्या जोडीला व्यासंग आणि उत्कटतेतलं सातत्य आवश्यक आहे. आपल्या पावलांना न मागताही मिळालेल्या, कधीकधी अनावर वाटणार्‍या गतीबरोबर संवेदनशीलता वाहून जाऊ नये यासाठी सावध असणं गरजेचं आहे. त्यासाठी संवेदनशीलता जागी ठेवू शकणारी चांगली कविता- मराठी, इतर भाषांमधली – मिळवून वाचत राहा. सततच्या अशा व्यासंगातून कविता या माध्यमाची आणि कवितेचं माध्यम असलेल्या भाषेची अंतर्बाह्य ओळख होत जाते...

कवितेच येणं कधी थोपवू नकोस. सुचेल ते सुचेल तेव्हा लिहीत जा. कवितेतून व्यक्त होतांना आपल्याला काय म्हणायचंय त्यासाठी शब्द योजले जातात तेव्हा आपण आपल्याला काय वाटतंय त्याच्या जवळ पोचलेलं असतो. मात्र कधीकधी घाईघाईत आपण आपल्याला व्यक्त करून टाकतो. घाईघाईत हाताला येतील ते ऐकीव शब्द वापरून टाकतो. तुझ्या काही कविता अशा आहेत का ते शोधून काढ. बरेचदा आपण आपलं म्हणणं नीट ऐकूनच घेत नाही. आपला सच्चा अंत:स्वर ओळखणं आणि तो व्यक्त करण्यासाठी स्वत:चा गंध असलेला शब्द शोधणं ही एक प्रकारची साधना आहे. स्वत:चं अनावरण करत स्व-शोध घेण्याचीच प्रक्रिया असते ती !...

तुला एवढं सगळं सविस्तर सांगितलं कारण तू कवितेकडे गांभिर्यानं पाहणारी मुलगी आहेस. तुझ्या भोवती सर्वार्थानं पोषक वातावरण असूनही तू संग्रह प्रकाशीत करण्याची घाई केली नाहीस. अजूनपर्यंत विचार करतच होतीस. पण आता मनावर घेऊन संग्रह काढतेयस ते चांगलं आहे. कवितेची पूर्तता ती वाचून कुणाची तरी दाद मिळाल्यावर होते. कविता लिहीतांना वाचक आपल्या मनात नसतो. बरेचदा ती स्वांतःसुखाय, आंतरिक निकडीतून उत्स्फूर्तपणे लिहीली जाते. पण लिहून मनावेगळी झाल्यावर, तिला स्वतंत्र आस्तित्व लाभल्यावर मात्र ती कुणाला तरी दाखवाविशी वाटते. संग्रहरूपात कविता प्रकाशित होणं म्हणजे दाद मिळण्याच्या शक्यतांचा परिघ वाढणं!.... तुझ्या कवितांना जाणकार रसिकांची भरभरून दाद मिळू दे आणि तुझी कविता-लेखनावरची निष्ठा वाढत राहू दे ही हार्दिक शुभेच्छा !

आसावरी काकडे
२३ मार्च २०११
9762209028     

  

1 comment:

  1. कविता म्हणजे आपणच आपल्याला व्यक्त करण. पण ते व्यक्त होणं सामान्य माणसापर्यंत पोहचायला हवं. केवळ कवींना अथवा समीक्षकांना कविता समजून काय उपयोग. कवितेतला अर्थ आणि आशय शोधावा लागणार असेल तर काय उपयोग. माफ करा आसावरीजी कोणाला ना उमेद करण्याचा माझा हेतू नाही. अथवा मी स्वतःला अति शहाणा वैगेरे समजतो असेही नाही. परंतु -
    “ अतीतात मी
    माझ्याही अलिकडे, माझ्याही अलिकडे
    वर्तमानात मी
    माझी माझ्यातच, माझी माझ्यातच
    भविष्यात मी
    माझ्याही पलीकडे, माझ्याही पलीकडे”
    सामान्य रसिकान यात काय आणि कसं शोधायचं. कि आपण सामान्य माणसासाठी कविता लिहीतच नाही.

    ReplyDelete