Thursday 2 May 2019

‘ती’ची स्पंदने टिपणार्‍या कविता –



     कविता हा अल्पाक्षरी आणि आत्मनिष्ठ असा साहित्यप्रकार आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची ऊर्मी प्रथम कवितेतून प्रकटते. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप उमगत जातं. आणि कवितेची इतर बलस्थानं जाणवू लागतात. कविता आत्मनिष्ठ असली तरी वैयक्तिक असत नाही. ती घटना-प्रसंगांच्या पलिकडचं पाहू शकते. तसंच परकाया प्रवेशही करू शकते. त्यामुळेच ज्ञानेश्वरांसारखे संत-कवी आजच्या काळालाही मार्गदर्शक असं तात्त्विक काव्य लिहू शकतात आणि स्त्रीच्या भूमिकेतून भक्तीची आर्तता व्यक्त करणार्‍या विराण्याही लिहू शकतात...

     समकालीन कवितेतही आता कवी आपल्या कवितांमधून स्त्रीला समजून घेत असल्याचे सुचिन्ह दिसते आहे. उदाहरण म्हणून कितीतरी कविता सांगता येतील. ‘बाईच्या कविता’सारखे हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले काही पूर्ण कवितासंग्रहही आहेत. आता या सुरात आपला सूर मिसळत संदीप वाघोले यांचा ‘तिची स्पंदने’ हा कवितासंग्रह येत आहे. ‘संकटांच्या छाताडावर पाय देऊन जगण्याची जिद्द बाळगणार्‍या तमाम महिलांना’ त्यांनी हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. ‘रंग’ ही या संग्रहातील पहिलीच कविता पुढील कवितांच्या आशयाची झलक दाखवणारी आहे. कविता आपल्या भोवतीचे वास्तव निरखत असते. त्याचा भावनिक अन्वयार्थ लावत असते. वाघोले यांनी त्यांच्या भोवतीच्या वास्तवातील त्यांना अस्वस्थ करणारी स्त्री-मनाची स्पंदने आपल्या कवितेत टिपलेली आहेत. शारिरीक, मानसिक, आर्थिक कुचंबणा, मंदीर-प्रवेशबंदी सारखी माणूसपण नाकारणारी अनेक बंधनं, घरादारासाठी झिजत राहाणं, दुय्यमत्व सहन करणं, स्वातंत्र्याची गळचेपी, घरात.. बाहेर सतत असुरक्षिततेची दहशत... हे स्त्रीच्या वाट्याला येणारं वास्तव या कवितांमधून मांडलेलं आहे. त्या दृष्टीने ‘बहिष्कार’, ‘सूर्य’, ‘दोष’, ‘फास’, ‘बाया’, ‘सौदा’ अशा अनेक कविता पाहण्यासारख्या आहेत.

     मात्र या कविता स्त्री वास्तवाचा हिशोब मांडत केवळ अस्वस्थता पसरवत नाहीत. ‘झिजणं’सारख्या कवितेत या अस्वस्थतेचा परिणाम म्हणून परिवर्तन झालेल्या, तिचं झिजणं हलकं करण्यासाठी सरसावणार्‍या त्याचं वर्णनही येतं. ते वाचल्यावर जाणवतं की ‘तिची स्पंदनं’ टिपणारी सहवेदना वरवरची नाही. आतून आलेली आहे. क्लेषकारक वास्तवात बदल व्हावा अशी तळमळ त्यात आहे. या संग्रहातील बहुतांश कविता आशयानुकुल अशा मुक्तछंदात आहेत. त्या प्रतिमांच्या मेण्यात बसून पडदानशीन बनून वाचकांच्या भेटीला येत नाहीत. मनातील आशयाचे बोट धरून त्या थेट पायी चालत येतात. त्यामुळे आशय वाचकांपर्यंत लगेच पोचतो. मात्र काही ठिकाणी त्या गद्य वाटतात.

     स्त्री-मनाची स्पंदनं टिपताना वाघोले यांनी अगतिकतेतून आलेलं स्त्रीचं पतीत रूपही ‘शोध’सारख्या कवितेत चितारलंय. स्त्री-रूपाचं दाहक वास्तव सांगून कवितेत शेवटी आर्तपणे विचारलं आहे,
‘हे बये, या युगात तूच उरली होतीस आशेचा किरण / आता मातृत्व आणि ममत्व कुठे शोधायचं आम्ही?’

स्त्रीला समजून घ्यायचं तर तिनं धीटपणे बोलायला हवं. ‘मूकबाई’ या कवितेत मूकपणे सारं सहन करणार्‍या मानसिकतेला कवी विचारतो आहे, ‘कितीकाळ जिवंत ठेवणार आहेस तू तुझ्यातली मूक बाई?

या संग्रहात ‘बाकी काही नाही’, ‘आस’ अशा काही प्रेमकविता आहेत. तसंच ‘लेक’, ‘वाडा’ ‘ती’ अशा काही गेय कविताही आहेत. ‘ती’ या कवितेची साधी लय सुरेख आहे. त्यामुळे ती भावपूर्ण झाली आहे. या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘ती गीत होते / ती सूर होते / आयुष्यभर / कापूर होते..!’

संग्रहातली शेवटची ‘पदर’ ही कविताही अतिशय भावपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी आहे. या कवितेत वाघोले यांनी पदराचे बोट धरून स्त्रीपणाचा पूर्ण आलेखच मांडला आहे. ही कविता या संग्रहातील स्त्रीची अनेक रूपं उलगडत स्त्रीपण समजून घेणार्‍या कवितांचा एकप्रकारे आढावा घेते.

या कवितासंग्रहाच्या मनोगतात संदीप वाघोले यांनी या कविता लिहिण्यामागची भूमिका थोडक्यात मांडलेली आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा स्वाभिमान सांभाळून तिला समानतेने वागवले पाहिजे. त्यासाठी प्रथम स्त्री समजून घेतली पाहिजे..’ अशा ठोस भूमिकेसह स्त्री समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या कविता लिहिणं ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आश्वासक गोष्ट आहे. अशा प्रयत्नांमधून स्त्री-पुरुष नातं अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत जाईल.

संदीप वाघोले यांना पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा

आसावरी काकडे
२७.४.२०१९