Thursday 13 December 2018

आठवांची ओंजळ


एकेकाचे आयुष्य म्हणजे एकेक कादंबरी असते. संस्कृतीच्या एका टप्प्यावर तिची सुरुवात झालेली असते. पण तिच्या कथानकाचे धागेदोरे त्या आयुष्याच्या पूर्वसंचिताशी जोडलेले असतात. भूत-भविष्यातील संघर्षाशी त्यांचं नातं असतं. भोवतीचा परिसर आणि त्यात घडणार्‍या घडामोडी कथानकाला नवनवे आयाम देत असतात. असंख्य पात्रे त्याना आशय पुरवत असतात... आणि निवेद हे सारं उत्कटतेनं सतत सांगू बघत असतो....

पण प्रत्येक आयुष्याची कादंबरी पुस्तक रूपात प्रकाशित होत नाही. ती काळाच्या डायरीत मिटलेली राहते. मग आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर निवेदक स्वतःच ती मिटलेली पानं उघडून पाहत राहतो. अंतर्मुख होतो. आठवणींची गर्दी जमते भोवती. एकेकीला कुरवाळताना मन भरून येते. अशा भारावलेल्या अवस्थेत शब्दांची कृपा झाली तर अनावर आठवणींना कवितेच्या ओंजळीत घालता येत. कवितेत व्यक्त होऊन मोकळं होता येतं. पण थांबता येत नाही. व्यक्त झाल्याचा आनंद पुन्हा पुन्हा व्यक्त होण्याची ओढ लावणारा असतो. एकामागून एक आठवणी शब्दरूपात प्रकटण्यासाठी आतूर होऊन रांगेत उभ्या राहतात...

निवृत्त शिक्षिका असलेल्या श्रीमती ऊर्मिला शेपाळ यांनी अशा आठवणींना वेळोवेळी दिलेली शब्दरूपं ‘आठवांची ओंजळ’ या कवितासंग्रहात एकत्रित केलेली आहेत. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. ऊर्मिलाताई सायन्सच्या शिक्षिका होत्या. त्यांचे वडील आणि पती दोघेही पोलीस खात्यात कार्यरत होते. मात्र घरचे वातावरण साहित्य आणि संगीत यामधे रस घेणारे असल्यामुळे उर्मिलाताईंची साहित्याची आवड जोपासली गेली. त्या लिहित राहिल्या. संवेदनशीलतेनं जगताना नाती, निसर्ग, समाज.. हे सगळे विषय जिवालगतचे होतात. स्वाभाविकपणे ते त्यांच्या कवितांचे विषय झाले आहेत. त्यांच्या कवितांमधे त्यांची स्वतःची अशी जीवनविषयक जाण आहे. त्यांना शब्दांचा लळा आहे. लिहिता लिहिता तेही जिवलग होऊन जातात. ‘शब्द’ या कवितेत त्यांनी शब्दांच्या अपार सामर्थ्याचं वर्णन केलं आहे. या कवितेत त्यांनी म्हटलंय, ‘शब्दांच्याच कुशीत विसावतात भाषा / त्यांना नसतात सीमांच्या रेषा..’

जीवनाविषयीचा त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन काही कवितांमधून व्यक्त झाला आहे. अशा कवितांची काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत.- ‘जीवनाचा अर्थ’ या कवितेत त्या म्हणतात,  
‘जीवनाचा अर्थ नवा मागायचा नसतो
आयुष्याच्या संध्याकाळी तो जाणायचा असतो’

‘नवजीवन’ या कवितेत म्हटलंय,
‘कन्यादान म्हणू नये त्यासी असे ते नवजीवन
सोहळा असे हा पवित्र दोन जिवांचे होई मिलन’

‘आयुष्याचं गणित’ या कवितेत हे गणित सोडवण्याच्या रीतींविषयी सांगत शेवटी म्हटलं आहे, या पद्धती शिकायला ‘गरज भासते परिपूर्ण शिक्षकाची / गुरूदक्षिणा मात्र ज्याने त्याने वागण्यातून द्यावयाची..’ आपल्या प्रत्यक्ष वागण्यातून गुरूदक्षिणा द्यायची हा विचार महत्त्वाचा आहे.

‘आजीची गोधडी’ या कवितेत तर जीवनाचे सगळे आयाम आलेले आहेत. ऊर्मिलाताईंनी आजीचं जगण्यात रममाण असणं गोधडी विणण्याच्या प्रतिमेतून चित्रित केलंय.

‘दृश्य’, ‘वृक्षमित्र’, ‘ऋण पावसाचे’ या निसर्गकवितांमधूनही उर्मिलाताई निसर्गाच्या विभ्रमांचे वर्णन करता करता त्याचे जगण्याशी असलेले आंतरिक नाते लक्षात आणून देतात.

माणसाचं मन ही एक विलक्षण गोष्ट आहे. आजवर त्याविषयी असंख्य तर्‍हांनी लिहिलं गेलं आहे. तरी कोणत्याच विश्लेषणाच्या चिमटीत मनाला धरता आलेलं नाही. त्याचं गूढ प्रत्येक कवीला सतत आवाहन करत राहिलं आहे. ऊर्मिलाताईंच्या मनाविषयीच्या दोन कविता आहेत. ‘मन’ या कवितेत त्यांनी मनाच्या विचित्र खेळांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याशी असलेलं नातं परोपरीनं सांगून शेवटी म्हटलं आहे,
‘मन धावे सैरभैर त्याचा सारीकडे वावर
धाक नाही त्यास कोणाचा त्याला घाला गं आवर’

कसाही विचार केला तरी मनाचा थांगपत्ता लागत नाही. ‘मी ‘मन’ या दुसर्‍या कवितेत मन स्वतःच आपली ओळख करून देतंय. पण त्यालाही ते जमत नाहीए. या कवितेत म्हटलंय,
‘मी मन, कशी करून देऊ माझी ओळख?
तुमच्या देहात माझी वस्ती पण कुणा नाही माझी पारख’

     ऊर्मिलाताईंचा ‘आठवांची ओंजळ’ हा कवितासंग्रह अशा विविध कवितांनी सजलेला आहे. आतापर्यंत स्वतःच्या डायरीत राहिलेल्या या कविता आता पुस्तक रूपात रसिकांपर्यंत पोचतील. त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल. त्यातून नव्याने लिहिण्याची प्रेरणा मिळत राहिल. कवितेच्या अधिकाधिक व्यासंगातून त्यांचं कवितेशी असलेलं नातं दृढ होत राहिल. या प्रथम प्रकाशनाच्या निमित्तानं ऊर्मिलाताईंना अधिक चांगल्या कवितेतून व्यक्त होण्यातला आनंद सदैव मिळत राहो ही हार्दिक शुभेच्छा..!

     आसावरी काकडे
१३.१२.२०१८

Sunday 25 November 2018

मनाला दार असतंच

‘मनाला दार असतंच’ हा वर्षा पवार-तावडे यांचा कॉन्टिनेन्टल प्रकाशनानं सिद्ध केलेला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. संयत रंग वापरून जागोजागी काढलेली देखणी, अर्थपूर्ण इलस्ट्रेशन्स असलेल्या या संग्रहाची एकूण निर्मिती उत्तम झाली आहे. भरजरी पेहरावातूनही चेहर्‍यावरचं मार्दव डोकवावं तसं संग्रहाचं शीर्षक साधेपणानं मुखपृष्ठावर विराजमान झालेलं आहे. आतल्या कविताही या भारदस्त नेपथ्यात झाकोळून न जाता आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवत राहतात. कवी सौमित्र यांची प्रस्तावना आणि संदीप खरे यांच्या मलपृष्ठावरील शुभेच्छा याही या संग्रहाच्या जमेच्या बाजू. कारण सेलिब्रेटीपणातही खरी कविता जपलेले हे रसिकप्रिय कवी आहेत.

संग्रहातील पहिल्याच शीर्षक कवितेत वर्षाताईंनी अदृश्य राहून सर्वस्व व्यापणार्‍या माणसाच्या मनाविषयी सहज साधेपणानं भाष्य केलेलं आहे. त्या म्हणतात,
“मनाला दार असतंच
म्हणून तर त्याचं सारखं
आत-बाहेर चालू असतं...
ते दार कधी आतून बंद होतं
तर कधी बाहेरून लावलं जातं..
गंमत म्हणजे दोन्हीकडच्या चाव्या
आपल्याच ताब्यात असतात...”

चमकदार शब्दांची आतषबाजी करण्याचा मोह या संग्रहातील कविताना नाही हे या पहिल्या कवितेतूनच लक्षात येतं... वर्षा पवार-तावडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता ही त्यांची पहिली ओळख. पार्श्वभूमी कोणतीही असली तरी माणूस सजगपणे भोवतीच्या वास्तवाचा विचार करत असेल आणि त्याचं मन आर्द्रतेनं भरलेलं असेल तर ते अनावरपणे व्यक्त होऊ पाहातंच. जगताना येणारी अस्वस्थता, मनातली खदखद व्यक्त करताना वर्षाताईना त्यांच्यातली कविता सापडली आणि या माध्यमातून व्यक्त होताना त्यांना त्यांची स्वतःचीही नव्याने ओळख झाली असं त्यांनी संग्रहाच्या मनोगतात म्हटलं आहे. अशी स्व-ओळख होत जाणं हीच खरंतर कविता सापडण्याची खरी खूण आहे. या संग्रहात भोवतीचं सामाजिक वास्तव, त्यात जगणार्‍या स्त्रीचं रूप, नाती, आणि मानवी मनाचा ठाव घेत स्वतःचा शोध घेणार्‍या कविता आहेत.

भोवतीचं वास्तव घाबरवणारं आहे. त्यात जगताना वास्तवाशी दोन हात करत जिद्दीनं उभं राहण्याची, किंवा वास्तवच बदलून टाकण्याची हिम्मत सर्वसामान्य स्त्रीमधे असतेच असं नाही. मग जगणं सुसह्य व्हावं असं समाजपरिवर्तन होण्याची आर्ततेनं वाट पाहणं एवढंच तिच्या हाती उरतं. ‘तो ‘माणूस’ कधी होणार?’ या कवितेत स्त्रीच्या मनातली ही व्याकुळ अवस्था वर्षाताईंनी व्यक्त केली आहे. या कवितेत त्याअंनी म्हटलं आहे,

‘ती सध्या काय करतेय?
रंग-रूप आणि देहाच्या पलिकडे
तो तिला सन्मानाने
कधी पाहणार
याची वाट बघतेय

भर रस्त्यात तिची छेडछाड
तिच्यावरचे बलात्कार
कधी थांबणार?
याची वाट बघतेय

अ‍ॅसिड फेकून
तिच्यावर सूड न घेता
तिचा नकार पचवायला
कधी शिकणार
याची वाट बघतेय

मर्दानगीच्या खोट्या कल्पनांतून
बाहेर पडून
तो ‘माणूस’ कधी होणार?
याची वाट बघतेय” (पृष्ठ २३)

अशी वाट बघत, परंपरा सांभाळत खालमानेनं संसारात गुरफटलेल्या स्त्रीला वर्षाताई ‘वटपौर्णिमा’, ‘‘असत्य’वाना’, ‘अगं, अगं सावित्री’ यासारख्या कवितांमधून भानावर आणण्याचा प्रयत्न करतात. ‘अगं, अगं सावित्री’ या कवितेत त्यांनी वटपौर्णिमेचा उपास करणार्‍या आजच्या सावित्रीला ज्योतिबांच्या सावित्रीची आठवण करून दिलीय. कवितेत त्यांनी म्हटलंय, ‘उपास-तापास करताना / ठेव कणखर मन / तू सुद्धा सावित्रीसारखी / बुद्धीवादी बन /’

‘जमवायला हवंय’ या कवितेतही त्या स्त्रीमनाला समजावतायत, ‘जमवायला हवंय... स्वतःच्या कोषातून बाहेर पडणं / आणि स्वच्छ नजरेनं जगाकडे बघणं../... ‘ह्या कलियुगात.../ जमवायला हवंय / स्वतःतल्या कृष्णाला जाणणं / आणि आपल्या मनोरथाचं सारथ्य / स्वतःच समर्थपणे करणं..!!’ या कवितेतली ‘मनोरथाचं सारथ्य’ ही शब्दयोजना अतिशय मार्मिक आणि कल्पक अशी आहे. अनावर वेग असलेल्या मनाच्या रथाचं सारथ्य करायला स्वतःतल्या कृष्णाला आवाहन करणं जमायला हवंय ही अभिव्यक्ती लक्षात राहील अशी आहे..!

स्त्रीचं समाजातलं दुय्यम स्थान, तिच्या कष्टांची सहज उपेक्षा... या गोष्टी सतत लेखनातून मांडल्या जातात. पण स्त्रीचं गौण असणं समाजाच्या रोमरोमात इतकं भिनलेलं आहे की रोजच्या बोलीभाषेतील शब्दांपासून ते जीवनाशी निगडीत असंख्य गोष्टींमधून ते सतत व्यक्त होत राहातं. अशीच एक ‘चाल’ वर्षाताईंनी ‘बुद्धीबळात राणी अज्ञातवासात’ या त्यांच्या कवितेतून लक्षात आणून दिलीय. स्त्रीच्या उपेक्षित अस्तित्वासंदर्भातलं हे सूक्ष्म निरीक्षण कौतुकास्पद आहे. या कवितेत त्यांनी म्हटलंय,
‘‘चौसष्ट चौकड्यांच्या खेळात
राणी अज्ञातवासात आहे

राणीला पटावर यायला
अजून तरी ‘मज्जाव’ आहे
तिच्या आस्तित्वाची तरी
इथे कोणाला जाण आहे ?

ती असली किंवा नसली तरी
राजाला कुठे भान आहे ?
पटावरचं राज्य जिंकायचं
हेच त्याचं काम आहे

हत्ती, घोडे, उंट, प्यादी
सगळे मोहरे सज्ज आहेत
वजीरसुद्धा राजासाठी
आपली ‘चाल’ चालणार आहे

शह-काटशहाच्या खेळापासून
राणी मात्र अज्ञात आहे
तिला कुठे कळले आहे
कोणाची कोणावर मात आहे

चौसष्ट चौकड्यांच्या खेळात
राणी अज्ञातवासात आहे” (पृष्ठ ४७)

‘मंगळसूत्र’, ‘जोडवी’ ‘स्त्री शक्तीचा अर्थ’ अशा अनेक कवितांमधून स्त्रीविषयक वास्तवाचं चित्रण वर्षाताईंनी केलं आहे. आपल्या कवितांमधून कधी त्या स्त्रीपण समजून घेतात तर कधी स्त्रीला समजावून सांगतात. ‘खरंच, ती ‘कार्यकर्ती’ सध्या काय करते? असा प्रश्न विचारत कधी अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेतात तर कधी ‘मला मंदिरात जायचंच नव्हतं’ सारख्या कवितेतून मंदिर-प्रवेशासारख्या प्रश्नासंदर्भात स्वतःची भूमिका मांडतात. ‘मी’- ‘मीपलं – ‘तू’- ‘तुपलं’ / करता करता / काहीच उरलं नाही आपलं’ असं म्हणत कधी कुटुंबरचनेची चाललेली घसरण अधोरेखित करतात तर कधी ‘डावं – उजवं’ सारख्या कवितेतून समाजातील विचारवंतांच्या भूमिकांची समीक्षा करतात आणि ‘मला भीती वाटते, / डाव्यांमधल्या ‘जहाल’ डाव्यांची / आणि उजव्यांमधल्या ‘कर्मठ’ उजव्यांची..!’ अशी सार्थ भीती व्यक्त करतात.

‘मनाला दार असतंच’ या शीर्षक-कवितेशिवाय मनाच्या स्वरूपावर भाष्य करणार्‍या आणखीही काही कविता या संग्रहात आहेत. ‘देह आणि मन’ या कवितेत दोन्हीची तुलना करताना वर्षाताईंनी म्हटलंय,
‘देह आहे तसा दिसे
मन स्वतःला नोळखे
देह बेधुंद सोहळा
मन उसासे पोरके’ (पृष्ठ ११६)

‘मनात लपलेला नारद’ ही वेगळीच प्रतिमा वापरून मनाचं केलेलं चित्रण  मार्मिक झालं आहे. त्यासाठी तयार केलेल्या इलस्ट्रेशनमुळे या कवितेला दृश्यात्मक आयामही मिळाला आहे. या कवितेत म्हटलंय,
“प्रत्येकाच्या मनात
एक ‘नारद’ असतोच
पण त्याची ओळख पटवायला
आपल्याला वेळ नसतो !

तो ‘कळ’ लावून
नामानिराळा होतो
आणि आपण मात्र
आपली झोप उडवून बसतो !

समज, गैरसमज,
राग आणि भीती
संशयकल्लोळ पसरवणं
हीच तर नारदाची नीती !

अधूनमधून ‘कृष्णाला’
मनात आठवायचं असतं
भावनिक गोंधळातून
सावरायचं असतं !

चूक-बरोबर, खरं-खोटं
तपासायचं असतं
आणि मनातल्या नारदाला
हरवायचं असतं !! (पृष्ठ १०७)

‘खूप बोलायचंय मनाशी...’ या शेवटच्या कवितेत वर्षाताई सतत जवळ असून हुलकावणी देणार्‍या मनाचा शोध घेतायत. कवितेत शेवटी त्या म्हणतात, हा लपंडाव आता पुरे झाला.. आता ‘सोडून नको जाऊस मला / अशी पाठ फिरवून / खूप बोलायचंय तुझ्याशी / मुखवटे बाजूला काढून...’ समाजात वावरताना वेळोवेळी धारण कराव्या लागणार्‍या मुखवट्यांचं ओझं उतरवून आपल्या मनाशी बोलावसं वाटणं हे कवितेशी अंतरंग मैत्र जुळल्याचंच चिन्ह आहे.

या कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका भावपूर्ण तर आहेच पण त्यातून वर्षाताईंची कवितेकडे, एकूण जगण्याकडे पाहण्याची प्रांजळ मनोवृत्ती व्यक्त होते. ‘रोजच्या जगण्याला सामोरं जाताना माझ्यातली ‘मी’ शोधायला मदत करणार्‍या आणि माझ्यातली कार्यकर्ती जिवंत ठेवणार्‍या सर्वांना’ वर्षाताईंनी हा आपला पहिला कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. आपलं कार्यकर्तीपण जिवंत राहावं ही त्यांची आस पूर्ण व्हावी आणि स्वतःतल्या ‘स्व’ची शोधयात्रा चालू राहावी यासाठी वर्षाताईंना कवितेची अखंड सोबत लाभू दे हीच त्यांच्या पुढील काव्यलेखनासाठी हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
9762209028
asavarikakade@gmail.com


२५.११.२०१८ च्या सकाळ सप्तरंग पुरवणीत संपदित स्वरूपात प्रकाशित.


Monday 17 September 2018

उत्तम निर्मितीमूल्यांचा कवितासंग्रह


निसर्गातील सौंदर्यानंदाची अनुभूती शब्दांमधून रसिकांपर्यंत पोचवणार्‍या कवितेचा वारसा दमदारपणे पुढे चालवणारा कवी नलेश पाटील यांचा ‘हिरवं भान’ हा उत्तम निर्मितीमूल्य असलेला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रकाशित झाला आहे. मुखपृष्ठावर गोपी कुकडे यांनी निसर्गाशी एकरूप झालेल्या नलेश यांचं व्यक्तिमत्व पोर्टेटमधून साकारलंय. दारातली रांगोळी पाहून घरातल्या प्रसन्नतेचा अंदाज यावा तसा पुस्तकाच्या या नेपथ्यावरून आतल्या कवितांचा पोत लक्षात येतो.

 ‘कवितेच्या गावा जावे’ या कवितांच्या कार्यक्रमातून कवी नलेश पाटील यांची लयीवर तरंगत येणारी कविता रसिकप्रिय झाली आणि मनामनांत रेंगाळत राहिली. या ऐकलेल्या कविता आता संग्रहरूपात आल्यामुळे रसिकांना वाचायलाही मिळतील. या संग्रहाचं निर्मिती-वैशिष्ट्य हे की यात एका प्रस्तावनेऐवजी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळुसकर, किशोर कदम आणि किरण खलप या समकालीन नामवंत कवींनी या कवितांचं आणि या कवीचं एकेक मर्म उलगडून दाखवलेलं आहे. हे वाचून कवितांकडे वळताना असं जाणवतं की हा संग्रह म्हणजे एक कवी आणि एवढे सारे निवेदक यांची एक रंगलेली मैफलच आहे..!

या संग्रहातल्या कविता वाचताना नलेश पाटील यांची अफाट कल्पनाशक्ती आणि त्यांच्या कवितेतील अनोखे प्रतिमाविश्व ही वैशिष्ट्ये प्रकर्शाने जाणवतात. याची झलक दाखवणारी काही उदाहरणं-

‘‘आभाळाची समुद्रभाषा लाट लाट चल वाचू रे
तुषार बोले खडकांवरती मोरावाणी नाचू रे..’’ पृष्ठ २०

‘‘ही वाट असे संभाव्य नदीची खळखळणारी ओळ
की माती काळी क्षणात ओली निळी व्हायची वेळ..’’ पृष्ठ २१

‘‘चुटकीसरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली गं
रानफुलांना ऊन चोपडीत उन्हात मिसळून गेली गं
...
नाही सावली पाकोळीला ती तर उडता उजेड गं
रूप आपुले उजेडावरी गिरवित गेला उजेड गं’’ पृष्ठ ९७

चित्रकार असलेला हा कवी शब्दांतूनही डोळ्यांसमोर अशी चित्रं उभी करतो. शब्दांच्या नादाबरोबर निसर्गातल्या रंगांचं दर्शन घडवतो. अशा त्रिमितींमधून कविताशय पोचवणार्‍या या ओळींवर गद्य भाष्य करणं म्हणजे जमून गेलेल्या चित्रावर रेघोट्या मारण्यासारखं आहे.

या संग्रहात बहुतांश कविता लयबद्ध आहेत. काही मोजक्या कविता मुक्तछंदात आहेत. त्यातही ही वैशिष्ट्ये जाणवतात. एका छोट्या, अगदी साध्या कवितेत नलेश यांनी कमाल चित्र रेखले आहे- ‘निष्पर्ण वृक्षालाच’ या कवितेत म्हटलं आहे, ‘‘निष्पर्ण वृक्षालाच / आपले घरटे समजून / एक भटके पाखरू / त्यात अंडे घालून निघून गेले / चारा भरल्या चोचीने व वारा भरल्या पंखाने / ते परत आले / तेव्हा त्यास अंड्याच्या जागी / एक चिमणे पान दिसले / आनंदाने बेहोश झालेले ते इवले पाखरू / क्षणाचाही विलंब न लावता / झाडाच्या प्रत्येक फांदीवर / अंडी घालत सुटले / पाहता पाहता झाडाचे घरटे / हिरव्या चिवचिवाटात बुडून गेले...’’ पृष्ठ ३८

निसर्ग-विभ्रमात बुडालेली नलेश यांची कविता डोळसपणे वास्तवाकडे पाहते तेव्हा मात्र मनात उठलेली कळ शब्दांमधे पाझरल्याशिवाय राहात नाही. ‘वाटेचं एक बरं आहे’ (पृष्ठ १०६), ‘इथे एक नदी वाहायची’ (पृष्ठ १२२) यासारख्या कवितांमधे सहजपणे हा सल व्यक्त झालेला दिसतो.

या संग्रहातल्या काही कवितांमधे संत-कवितेतील आर्तता जाणवते. ‘भाग्य आले उदयासी...’ (पृष्ठ १३०) या कवितेत ‘झाल्या ओठांच्या चिपळ्या, तुझ्या कीर्तनात दंग / वाजे हृदय मृदंग, धडधड पांडुरंग..!’ असं म्हणत पूर्ण देहात कसं पंढरपूरच वसलेलं आहे त्याचं भावपूर्ण वर्णन केलेलं आहे. तर ‘माझ्या लेखणीत राही, काळ्या शाईची विठाई’ (पृष्ठ १६२) या कवितेत आपली कविता कशी विठूमय झाली आहे याचं वर्णन आहे... ‘असा रचित मी जातो, जेव्हा ओळीवर ओळ / माझ्या कवितेची उभी, तेवू लागे दीपमाळ.’.. या दोन्ही कविता पूर्णच वाचायला हव्यात.

संग्रहाच्या सुरुवातीलाच कवी नलेश पाटील यांचा ‘अंतःस्वर’ उमटलेला आहे. या छोट्याशा मनोगतात त्यांनी म्हटलं आहे, ‘कविता ही समीक्षातीत आहे असं मला नेहमीच वाटत आलंय.’ म्हणूनच आपल्या आतल्या आवाजाला फुलू देत ते व्रतस्थपणे केवळ निसर्गकविताच लिहित राहिले...! पण कवितेचे गाव वाट पाहात असताना कवितासंग्रहाची तयारी करून, मनोगत व्यक्त करून हिरव्या दिशांच्या शोधात हा मनस्वी कवी मैफल अर्ध्यावरच सोडून अचानक निघून गेला...!

त्यांच्या पश्चात अरुंधती पाटील यांनी नलेश यांच्या सुरेल दमदार आवाजातून रसिकांपर्यंत पोचलेल्या या मैफलीतल्या कवितांचा ‘हिरवा भार’ आता अक्षर-रूपात रसिकांच्या हाती सुपूर्द केलेला आहे.

आसावरी काकडे
9421678480

‘हिरवं भान’ कवितासंग्रह : कवी- नलेश पाटील
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई : पृष्ठे १६४. किंमत- ३२५ रु.   

२२ सप्टे. २०१८ च्या साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित

Monday 3 September 2018

छायाचित्र आणि कविता

आमच्या कुंडीत आपसुक रुजून एक रोप तरारून वर आलं. कितीतरी दिवस झाले त्याची गर्द हिरवी लांबसडक पानं कारंज्यासारखी उसळून उमललेली राहिलियत. आणि त्याच्या ऋतुनुसार त्या रोपाला हळदीसारख्या पिवळ्या रंगाची फुलं येतायत. त्या फुलांचं नाव मला अद्याप समजलेलं नाही. पण रोप अजून टिकून आहे आणि त्याला सातत्यानं फुलं येतायत त्या अर्थी केव्हातरी, कुठूनतरी बीज पडलं असेल. उगवण्याच्या आंतरिक ऊर्मीला कुंडीतल्या तयार मातीनं साथ दिली असेल आणि सुरू झाला असेल सृजन-सोहळा...! माझ्यातल्या कवितेची सुरुवात काहिशी अशीच झाली.. जसं कुंडीतल्या मातीला कळलं नाही बीज कसलं, कुठून आलं.. तसं मलाही उमगलं नाही माझ्यात कवितेची रुजवण केव्हा कशी झाली ते... पण आत सुरू झालेला कवितेचा सृजन-सोहळा अनुभवताना तिचं अंतरंग-स्वरूप मला उमगू लागलं आणि मी तिच्यात गुंतत गेले. परोपरीनं ती बहरत राहिली. तिची अनेकविध रूपं मला मोहवू लागली. तिचे बहर आणि शिशिर या दोन्ही अवस्थांनी माझ्यातली जिजीविषा जागृत ठेवली, मला वास्तवातलं सौंदर्य टिपण्याची नजर दिली आणि अम्लान आनंदाचा जिवंत झरा माझ्यात झुळझुळत ठेवला..! मी फक्त तो आनंद इतरांना वाटून व्दिगुणीत करत राहिले आणि आतली माती सतत ओली राहील याची काळजी घेतली..! 

एकदा रुजलेली कविता व्यक्त होण्यासाठी सतत वेगवेगळे मार्ग शोधत राहिली आणि तिनं स्वतःचं ताजेपण टिकवून ठेवलं. छायाचित्र काढता येण्याची सुविधा असलेला मोबाइल हातात आल्यावर मला निसर्गातल्या कविता टिपण्याचा छंद लागला. एखाद्या कोनातून दिसलेलं दृश्य जागीच थांबवून छायाचित्रं काढायला लावतं. अशा आंतरिक ऊर्मीतून छायाचित्र काढता काढता छायाचित्रांच्या चौकटींचं भान आलं, दृश्य आणि नजर यांच्यातलं नातं उमगत गेलं... एकदा जाणवलं की,

‘छायाचित्र म्हणजे
अनंत काळाच्या प्रवाहातला
एक थेंब
चौकटीत पकडून ठेवणं !
थेंबातल्या
प्रतिबिंबात मावतं
तेवढंच उतरतं छायाचित्रात
पण केवळ
एक चौकट देऊन
पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देतं ते
नजरेला आणि दृश्यालाही !’

     आणि मग या अनुभवांच्या सलग कविता होत गेल्या. ‘आकलनाच्या नव्या तिठ्यावर’ या नावानं ई-पुस्तक रूपात त्या प्रकाशित झाल्यायत. निर्मितीचा दुहेरी आनंद देणार्‍या ‘छायाचित्र-कविता’ या छंदाची मोहिनी अजून उतरलेली नाही. सुरुवातीच्या कविता छायाचित्रांची प्रक्रिया समजून घेणार्‍या होत्या. आता छायाचित्र बोलतं त्याच्या कविता होतायत..!

लिहून झाल्यावर कविता पुन्हा पुन्हा वाचावी त्याप्रमाणे छायाचित्रं काढल्यावर ती परत परत पाहाविशी वाटतात. आपण निवडलेल्या चौकटीत सामावलेला तो दृश्यांश निरखताना काहीतरी जाणवत राहातं. त्यात लपलेली कविता व्यक्त होण्यासाठी शब्द मागू लागते. आतली ओली माती हलते. अस्वस्थ होते. प्रसवण्यासाठी आतूर होते. नकळत काहीतरी देवाणघेवाण होते आणि चौकटीला शब्द फुटतात. त्यातून छायाचित्रानं व्यक्त केलेल्या साररूप आशयाची कविता उमलून येते... ‘छायाचित्र आणि त्याच्या खाली अशी चार ओळींची संपृक्त कविता’ या स्वरूपात आता त्या सादर होतायत. या छायाचित्र-कवितांची काही उदाहरणं रसिकांसमोर ठेवतेय. ही उदाहरणं म्हणजे कवितेत प्रतिमा कशा येतात याचं एक दृश्य प्रात्यक्षिक होऊ शकेल...! 



नवा मुलामा नव बहराचा
खोड खालती तसेच आहे
सुवर्ण झुंबर हृदयामध्ये
नवीन ऊर्जा पेरत आहे..!
***



अंगांगाला फुटले डोळे
आनंदाने भिजले डोळे 
हिरवी सोबत अवतीभवती 
जाणवून लुकलुकले डोळे..! 
***





धाग्यात गुंफले त्यांनी
ते मणीच की आठवणी 
झाकलाय खाली धागा 
की डोळ्यांमधले पाणी? 

***





का उगा सैराट झाले झाड हे
विद्ध की बेधुंद आहे झाड हे 
विसरले की काय गगनाची दिशा 
का असे इमल्यात घुसले झाड हे? 
***





मावळत्या चंद्राला घेउन
परत चाललीय निशा 
रुसून कोणी उजेडावरी 
गिरगटल्या या रेषा..? 
***





किती नमविले तरी
नाही ढळलेला तोल 
एका एका पानासाठी 
मुळे उतरती खोल..! 
***
आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com

अप्रकाशित..

Sunday 2 September 2018

संत मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई-


भारतात अनेक संत होऊन गेले. प्रत्येक राज्यातील भाषा, ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमीनुसार प्रत्येकाच्या संतपणाची जातकुळी भिन्न असली तरी सर्वांमधे एक समान धागा आहे आणि तो म्हणजे ईश्वर-भक्ती..! कुणी ईश्वराचं निर्गूण निराकारत्व जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिलं तर कुणी कर्मयोगाचे पालन करत कुटुंबात राहून, सामाजिक प्रबोधन करत भक्तीमार्गाचा प्रसार केला. राजघराण्यात जन्माला आलेल्या संत मीराबाईंनी पूर्ण समर्पण भावानं एकनिष्ठ भक्ती केली. त्यांचं संतपण मधुरा भक्तीत विलीन झालेलं होतं.

भक्ती या समान धाग्यामुळं इतर भाषेतले संतही सर्वत्र वंदनीय झाले. त्यांच्या संतत्वाचा सहज स्वीकार झाला. त्यांची काव्यमय शिकवण समजून घ्यायचा प्रयत्न होत राहिला. आपल्या भजन-कीर्तनात ती सामावली गेली. संत मीराबाईंची पदं तर विशेषच लोकप्रिय आहेत. कथा, कादंबरी, कविता.. अशा साहित्यामधून, चित्रपटांमधूनही मीराबाईंचा परिचय जनमानसात रुजला. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी मीराबाईंच्या साठ निवडक पदांचा अनुवाद करून त्यांच्या कवितेची ओळख मराठी वाचकांना करून दिलेली आहे. या सगळ्या माध्यमांमधून सतत भेटत राहिल्यामुळे संत मीराबाई मराठी मनाला कधी परक्या वाटल्या नाहीत.

संतसाहित्याला वाहिलेल्या ‘आनंदघन’ या दिवाळीअंकात या वर्षी वेगवेगळ्या अंगानं मीराबाईंचे संतत्व समजून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘संत मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ हा त्यातलाच एक पैलू. खरं तर कवी आणि त्याची कविता एका पातळीवर अभिन्न असतात. कवीचे व्यक्तित्वच त्याने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत डोकावत असते. एकेक कविता म्हणजे एकेका अँगलमधून त्यानं स्वतःच चितारलेलं स्वतःचं पोर्ट्रेट असतं. तरी त्याचं समग्र असणं त्याच्या कवितेत सामावू शकत नाही. संत मीराबाईंसारख्या कवयित्रीच्या मनाचा ठाव तर त्यांच्या पदांमधून पूर्णतः लागणं अशक्यच आहे. तरी त्यांची पदं आणि त्यांचं व्यक्तित्व यांच्यातला अनुबंध तपासण्यातून आपण त्यांच्या भक्तीची जातकुळी जाणून घेऊ शकतो का हे पाहता येऊ शकेल.

त्यासाठी त्यांची पदं समजून घ्यायची तर त्यांचं उपलब्ध चरित्र थोडक्यात जाणून घ्यायला हवं. मीराबाईंचा कार्यकाल अंदाजे १४९८-१५४७ असा मानला जातो. तो मोघल साम्राज्याचा काळ होता. त्यांचा जन्म १४९८ मधे राजघराण्यात झाला आणि १५१६ मधे त्यांचं चितोडच्या राणा संगाच्या ज्येष्ठ मुलाशी- युवराज भोजराजाशी लग्न झालं. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे विष्णुभक्त असलेल्या आजोबांकडे त्या वाढल्या. तिथे त्यांच्यावर भक्तीचे संस्कार झाले. संतसाहित्य, आध्यात्मिक आणि पौराणिक साहित्याशी त्यांचा चांगला परिचय होता... लहानपणी एका साधूकडून त्याना मिळालेली कृष्णाची मूर्ती, तोच आपला पती मानणं, सासरी झालेला छळ... विषप्रयोग... अशी मीराबाईंविषयीची माहिती आख्यायिकांमधून आणि काही प्रमाणात त्यांच्या पदांमधून कळते. पण प्रमाण माहिती फारशी मिळत नाही असे त्यांच्याविषयीच्या लेखनात म्हटलेले दिसते. त्या जन्मापासून लग्नानंतरचा काही काळपर्यंत राजस्थानात होत्या. पतीनिधनानंतर काही वर्षांनी वृंदावनात गेल्या. शेवटी त्यांचे वास्तव्य व्दारकेत होते.. मीराबाईंच्या अशा चरित्रविषयक माहितीवरून लक्षात येतं की ऐहिक स्तरावर वैभवसंपन्न आयुष्य लाभूनही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक स्तरांवर अस्थिरता, सर्वत्र कलहाचे वातावरण, जवळच्या व्यक्तींचे मृत्यु.. अशा गोष्टींमुळे ऐहिक जीवनाविषयी त्यांच्या मनात वैराग्यभाव जागा झाला असेल आणि त्यांच्यावर झालेल्या आध्यात्म-भक्तीच्या संस्कारांमुळे त्यांनी सामान्य जीवनाचा त्याग करून भक्तीमार्ग स्विकारला असेल.
मीराबाईंना काव्य, संगीत, नृत्य.. या कला चांगल्या अवगत होत्या. त्यांनी आपला आर्त उत्कट भक्तीभाव काव्यरूपात शब्दबद्ध केला. इतकंच नाही तर ही पदं स्वतः गाऊन, नाचून, उघडपणे संतांना बरोबर घेऊन त्या आपला भक्तीभाव व्यक्त करत असत. त्यांच्या समूहसाधनेचाच हा भाग होता. त्यांची पदं अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे मौखिक परंपरेतून सर्वदूर पसरली आणि टिकली. त्यातली सुमारे ५०० पदं आजही उपलब्ध आहेत. पण त्यात प्रक्षिप्त भाग बराच आहे. त्यामुळे उपलब्ध पदांमधे अनेक भाषांचे मिश्रण आढळते. मूळ काव्य-रचना १५-१६व्या शतकातली राजस्थानी, ब्रज आणि गुजराती या भाषांमधे आहे. पण त्यात पंजाबी, खडी बोली.. इ. भाषांमधले शब्दही आढळतात. मीराबाईंच्या काव्याचा विषय प्रामुख्यानं कृष्ण-भक्ती.. विरह, मीलन.. हा आहे. पण काही पदांमधे वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भही आढळतात. उत्कटता, भाव-सौंदर्य, शब्दमाधुर्य, नादमयता, गेयता, चित्रात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मप्रचीतीचं सच्चेपण... ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

अशा काही निमित्ताने मीराबाईंविषयी अधिक माहिती मिळवणं, त्यांच्या काव्याची पार्श्वभूमी आणि प्रेरणा समजून घेणं या स्तरावर थोडा अभ्यास आणि विचार होतो. त्यातून मीराबाईंची विविध रूपं समोर येतात... भारतीय समाजाच्या नजरेत- अव्दितीय, श्रेष्ठ संत, मध्ययुगीन भारतीय साहित्यात स्त्री-विद्रोहाची विधायक सुरुवात करणारी क्रांतिकारी कवयित्री, स्त्रीजातीच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी निर्धारानं लढणारी सत्याग्रही... इत्यादी आणि सासरच्या नजरेत कुलनाशिनी... तर पतीच्या नजरेतलं इतिहासाला माहीत नसलेलं प्रश्नार्थक रूप...! मीराबाईंच्या उपलब्ध पदांमधून या सर्व रूपांतील मीराबाईचं समग्र आकलन होणं अवघड आहे. पण त्यांच्या पदांमधून त्यांच्या भक्तीतील उत्कटतेचा प्रवास जाणवतो. तो समजून घेताना संत तुकारामांचे अभंग आठवत राहतात. त्या आधारे मीराबाईंच्या भक्तीचं स्वरूप जाणणं सोपं होतं...
उदाहरण म्हणून काही प्रातिनिधिक पदं पाहता येतील-

पद १-
“म्हांरां री गिरधर गोपाळ, दूसरा णा कूयां ।
दूसरां णां कोयां साधां, सकळ ळोक जूयां ॥
भाया छांड्या बंधां छांड्या, छांड्या संगा सूया ।
साधां संग बैठ बैठ, लोक लांज खूयां ॥
भगत देख्यां राजी ह्ययां, जगत देख्यां रूयां ।
असवां जळ सींच सींच, प्रेम बेळ बूयां ॥
दधी मथ घृत काढ लयां, डार दया छूयां ।
राणा विष रो प्याळा भेज्यां, पीय मगण हूयां ॥
अब त बात फेळ पड्या, जाण्यां सब कूयां ।
मीरां री लगण लग्यां, होणा हो जो हूयां ॥३॥”

भावार्थ- ‘हे जग मी पाहिलंय आणि मला कळून चुकलंय की गिरधर गोपालाखेरीज आता माझं असं कोणी नाही. मी सर्व सोयरेजनांचाच काय तर भक्तीत रमलेल्या साधूंच्या संगतीत राहताना लोकलज्जेचाही त्याग केला आहे. याचा राग येऊन राणाजींनी मला विषाचा पेला पाठवला... पण त्यामुळे माझा भक्तीभाव अधिकच दृढ झाला. हे सर्वांना माहिती झालंय. आता जे व्हायचं असेल ते होऊदे....’  
चरित्रात्मक तपशील असलेल्या या पदात लौकिक जीवनाचा पूर्ण त्याग आणि गिरधर गोपालाखेरीज आता माझं असं कोणी नाही या निर्णयाप्रत पोचणं हा टप्पा मीराबाईंनी गाठलेला आहे असं जाणवतं.  

पद २-
“हेरी म्हां तो दरद दिवाणी, म्हारा दरद णा जाण्यां कोय ॥
घायळ री गत घायळ जाण्या, हिवडो, अगण संजोय ।
जौहर कीमत जोहरां जाण्यां, क्या जाण्यां जिण खोय ॥
दरद री मारयां दर दर डोळला, बैद मिळया णा कोय ।
मीरा री प्रभु पीर मिटांगां, जद बैद सांवरो होय ॥२१॥”

भावार्थ- ‘सर्वस्वाचा त्याग करून मी त्याला आपलं म्हटलं पण त्याचं साधं दर्शनही होत नाहीए. त्याच्या विरहाच्या दुःखानं मी पार वेडी झालीय. या दुःखाची प्रत कोणाला कळण्यासारखी नाही. अशा विरहाच्या आगीत जो होरपळलाय त्यालाच ते समजू शकेल. रत्नाची किंमत रत्नपारखीच करू शकतो. इतर दगड समजून ते फेकून देतील. या दुःखावर औषध मिळावं म्हणून वैद्याच्या शोधात मी दारोदार भटकले पण कोणी वैद्य मिळाला नाही. आता तो प्रियतमच वैद्य बनून येईल तेव्हाच विरहाग्नी शांत होईल.’
इथे संत तुकारामांच्या ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस....’ या अभंगातील ईश्वरभेटीचा आकांत आठवतो. मधुरा भक्तीतला हा अत्यंतिक उत्कट असा विरहाचा टप्पा आहे.

पद ३-
“सांवरो म्हारी प्रीत णिभाज्योजी ॥
थे छो म्हारो गुण रो शागर, औगुण म्हां विशराज्यो जी ।
ळोक णां शीझ्यां मण णा पतीज्यां मुखड़ा सबद शुणाज्यो जी ॥
दासी थारी जणम जणम री, म्हारा आंगण आज्यो जी ।
मीरां रे प्रभु गिरधरनागर, बेडा पार ळगाज्योजी ॥३०॥”

भावार्थ- ‘हे प्रियतम, आपलं प्रेम आता तूच निभावून ने. तू गुणांचा सागर आहेस. माझे अवगुण नजरेआड कर आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. ज्यांना मी सोडून आलेय ते माझ्या प्रेमाविषयी शंका घेताहेत कारण तू अजून मला आपलंसं केलं नाहीएस. आता तू स्वतःच येऊन माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे सांग. मी जन्मोजन्मीची तुझी दासी आहे. मला भवसागरापार घेऊन जा.’
अशा काही पादांमधे जाणवतं की मीराबाई आपल्या प्रेमातलं सच्चेपण तपासून बघतायत. माझं प्रेम खरं असेल तर त्याचा स्वीकार केल्याचे येऊन सांग, आणि तूच ते निभावून ने असं प्रियतमाला आळवतायत.

पद ४-
“पग बांध घुंघरयां णाच्यां री ॥
ळोग कह्यां मीरां बावरी, शाशू कह्या कुळनाशां री ।
विख रो प्याळो राणा भेज्यां, पीवां मीरां हांशां री ॥
तण मण वारयां हरि चरणां मां, दरसण अमरत पाश्यां री ।
मीरां रे प्रभु गिरिधरनागर, थारी शरणं आश्यां री ॥४९॥”

भावार्थ- ‘प्रियतमाला रिझवण्यासाठी मी पायात घुंघरू बांधून नाचते आहे. माझी ही बेभान अवस्था पाहून लोकांना वाटतं मला वेड लागलंय. सासूला तर मी कुलनाशिनी वाटते आहे. शासन म्हणून मला विष दिलं गेलं. पण ते प्यायल्यावर मला दर्शनामृत प्राप्त झालं.. आता मी सदैव तुझ्या चरणांपाशीच राहीन.’
या टप्प्यावर मीराबाईंची ईश्वरभेटीची आस शिगेला पोचलीय. देहभानही उरलं नाही. ही एकप्रकारे माणसातून उठण्याचीच अवस्था...! ही भक्तीमार्गातली फार पुढची अवस्था आहे. संत तुकारामांनी या विषयी म्हटलंय, ‘देवाची ते खूण आली ज्याच्या घरा / त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा..!’

पद ५-
“माई म्हा गोविण्द गुण गाणा ॥
राजा रूठ्यां णगरी त्यागां, हरि रूठ्यां कठ जाणा ।
राणा भेज्यां विख रो प्याळा, चरणामृत पी जाणा ॥
काळा णाग पिटारयां भेज्यां शाळगराम पिछांणा ।
मीरां गिरधर प्रेम बावरी, सावळ्या वर पाणा ॥६३॥”

भावार्थ- ‘राजा पती रागावला म्हणून मी त्याचं नगर सोडून बाहेर पडले. पण ब्रह्मांडनायक असलेला माझा प्रियतम जर माझ्यावर रुष्ट झाला तर मी कुठे जाणार? म्हणून आता गोविंद गुणगान करत त्याला आळवत राहाणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. कारण विषाचा पेला, काळा नाग पेटीतून पाठवून माझा नाश करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या सगळ्यामधे मला हरिचंच दर्शन झालं. आता त्याला सोडून मी कुठेही जाणार नाही...!’
वाट्याला आलेल्या जीवघेण्या संकटांमुळेच मीराबाईंना संसारत्याग करणं सोपं झालं, त्यांची श्रद्धा अविचल झाली आणि ‘माई म्हा गोविण्द गुण गाणा’ हे जीवनाचं लक्ष निश्चित करता आलं. मीराबाईंची ही अवस्था “हाचि नेम आतां न फिरें माघारी / बैसलें शेजारी गोविंदाचे..!” या संत तुकारामांच्या अवस्थेची आठवण करून देणारी आहे.

मीराबाईंच्या कवितेमधून दिसणारा त्यांच्या भक्तीच्या उत्कटतेचा हा चढता आलेख म्हणजे केवळ त्यांच्या कवितेचा ढोबळमानाने लावलेला अन्वयार्थ आहे. आणखी खोलात शिरून, पदांमधील भावाशयाशी एकरूप होऊन, भाषेचे अडसर दूर करून मीराबाईंची ‘कविता’ समजून घेतली तर त्यांच्या भक्तीतल्या उत्कटतेचा प्रवास याहून वेगळा जाणवू शकेल. राजवैभवाचा आणि भोजराजासारख्या पतीचा त्याग करून इतक्या समर्पण भावनेनं एका मूर्तीच्या, खरंतर अमूर्ताच्या मागे लागण्यातली आंतरिक अपरिहार्यता समजून घेता येईल. तटस्थपणे दुरून विचार करताना भक्ती, त्यातही मधुरा भक्ती ही काय चीज असेल?... त्यासाठी आयुष्यच्या आयुष्य कुणी कसं आकांत करू शकतं?... असे प्रश्न पडू शकतात. आणि या संदर्भातल्या रूढ समजूती आणि आपसुक होत राहाणारे संस्कार यातून मिळणारी भाबडी उत्तरं अपुरी वाटतात. पण या असमाधानातून या सगळ्याचंच ‘पुनर्वाचन’ करता आलं तर मनात निर्माण होणार्‍या प्रश्नार्थक जिज्ञासेला सत्याच्या जवळ जाणारी उत्तरं मिळू शकतील. ‘मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ या विषयीचं हे लेखन म्हणजे या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे..!

आसावरी काकडे
२२ जून २०१८


(या लेखात उद्‍धृत केलेली सर्व पदे श्री ब्रजेन्द्रकुमार सिंहल यांच्या भारतीय विद्या मन्दिर या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘मेरे तो गिरधर गोपाल’ या संशोधनपर ग्रंथातून घेतलेली आहेत.)

आनंदघन दिवाळीअंक २०१८