Tuesday 27 December 2016

स्वतःतल्या परस्त्रीच्या शोधात


 ‘स्वतःतल्या परस्त्रीच्या शोधात’ हेवेगळं, विचार करायला लावणारंशीर्षक असलेला सुजाता महाजन यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संग्रहाचं मुखपृष्ठ अंतर्मुखतेला आवाहन करणारं आहे. आणि कवितांच्या आगेमागे असलेली अमूर्त शैलीतली कृष्ण-धवल चित्र कविता-आस्वादाच्या आड न येता निरंकुश सोबत करणारी अशी आहेत..संग्रहाचं हे एकूण नेपथ्य कवितेविषयीच्या अपेक्षा वाढवणारं आहे.

भोवतीचं सजग भान असलेली सुजाता महाजन यांची कविता स्वतःला शोधते आहे. स्वतःचं बाई असणं तपासते आहे. त्याबरोबर पुरुषाचं जगणंही समजून घेते आहे. तिला भोवतीच्या वस्तू, घटना सतत काहीतरी सांगत असतात. त्यांना ओलांडून ती पुढे जाऊ शकत नाही. ती घेते त्यांची एखादी यादी करावी तशी दखल आणि मग करते विधान, व्यक्त होण्याची वाट पाहात आत तिष्ठत असलेलं. उदा. ‘चहाचा रिकामा कप खाली ठेवताना / होणारा रिकामा आवाज..’ अशी सुरुवात आसलेल्या कवितेत अशा आणखी नऊ दहा हालचालींचा चित्रदर्शी उच्चार करून शेवटी म्हटलंय, ‘ छोट्या छोट्या हालचालीत / पुरेपूर भरून राहिलेलं / एकाकीपण!’(पृष्ठ ३५) किंवा ‘झाडाला नसते सोबत’ अशी सुरुवात असलेली (पृष्ठ ५१) ही कविता.

भर गर्दीतही तिला सतत एकटेपण जाणवतंय.. उदा. ‘अशा गर्दीत उभे असतो आपण, की / कुणीच एकटं गाठू शकणार नाही आपल्याला / छातीतली धडधड / ऐकू शकणार नाही कुणीच...’ (पृष्ठ २१), ‘नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या आभाळाबरोबर / आपण वाटून घेतो ताजं दुःख आणि / एकाकीपणा!’ ( पृष्ठ २९)

जगणं आणि कविता एकमेकांना समजून घेत समृद्ध करत असतात. याची पूर्ण जाणीव या कवयित्रीला आहे. एका कवितेत म्हटलंय,
‘या कविता नाहीत / वातावरणाच्या सूक्ष्म नसांतून, / आपली होडी वल्हवताना / एका क्षणात उमटून जाणारे / हे तरंग आहेत..’ (पृष्ठ ४१)..
आणि दुसर्‍या एका कवितेत म्हटलंय,
‘मला ठाऊक नाही शेवट / या यात्रेचा / आणि हेतूही! / मी फक्त होऊ पाहतेय / एक कालातीत रिकामा अवकाश!’ (पृष्ठ ४३)

पित्याची, एका पुरुषाची सद्ध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणात होणारी ससेहोलपट चित्रित करणार्‍या, मन हेलावून टाकणार्‍याकाही कविता या संग्रहात आहेत. एका कवितेतम्हटलंय - ‘सर्व आध्यात्मिक अवतरणं / निरुत्तर होतात / शोकात बुडालेल्या पित्यापुढे..’ (पृष्ठ ४७).हा उद्‍गार जगण्यातली सगळी हतबलता वाचकाच्या मनात उतरवणारा आहे..!

अंतर्मुख आत्मनिरीक्षण नोंदवणं हे या कवितांचं सर्वात अधिक प्रभावी वैशिष्ट्य आहे.  दिवसाचा सतत बदलत राहणारा, गुंतवून ठेवणारा ताण रात्री थकून कलंडतो तेव्हा स्वतःला निरखणार्‍या कवी-मनात येतं-
‘की असतो कुणी / राखणदार / देहाच्या काठावर / आतून बाहेरून न्याहाळणारा / या निजलेल्या माणसांना ?’ (पृष्ठ ४८)

या कवितांमधे आशयाची आर्तता ठासून भरलेली आहे. ती प्रतिमांचा आधार फारसा घेत नाही,नेमक्या शब्दांमधून थेट व्यक्त होते. उदा.-‘उन्हाचे कोवळे कवडसे / चिकटवता येत नाहीत / घराच्या भिंतीवर / शरीराच्या बाहेर थोपवता येत नाही वेदनेला / द्यावी लागतेच तिला / तिच्या हक्काची जागा’ (पृष्ठ६४)

काही कवितांमधे क्वचित तरल प्रतिमा येतातही. त्या लक्ष वेधून घेतात. सहजी पान उलटू देत नाहीत. उदा. ‘अर्थाचे अनर्थ होत असतात कित्येकदा / कुणास ठाऊक, / मावळतीचे किरण / हिरव्या रानात विसर्जित होताना / रडतही असतील मनात! (पृष्ठ ५३)

सुजाता महाजन यांची कविता जगण्याचं आर्त ज्या विचारी संवेदनशीलपणानं समजून घेतेत्याच पातळीवरून मृत्युचाही विचार करते. दोन्हीला समान अंतरावरून निरखणारं एक अध्यात्मिक मनत्यांच्या बर्‍याच कवितांमधून डोकावतं.
उदा.१- ‘मरणाएवढ्या शांततेच्या / बेलगाम निद्रेतून उठल्यानंतर / पिंपळाच्या पानावर तरंगत./ दरम्यान जगबुडी येऊन गेली असावी / आता फक्त आकाश, पाणी आणि मी../ शब्द मात्र पुष्कळ उरलेत अंगाखांद्यावर विचारांसहित / भल्याबुर्‍या आठवणींच्या संस्कारांसहित / पूर्ण विरघळून जायला हवेत ते / या स्वैराचारी पाणीपणात / तरच / पहिली शब्दविरहित जाणीव / जन्माला येऊ शकेल..!’ (पृष्ठ ६७)
२- ‘तो कोण मुकादम, /  कुठल्या कामावरचा / अंगठे घेऊन फसवणारा? / किरणांच्या रिकाम्या थैल्या वाटणारा..’ (पृष्ठ ७३)
३-‘कुठल्या वादळात गडप होऊन जातात / निसटत्या क्षणांवर नावं कोरून ठेवणारे लोक..’ (पृष्ठ ७८)
भोवती खोलवर अस्वस्थ करणारंवास्तव आणि आतला अंतहीन कोलाहाल.. दोन्हीच्या मध्यसीमेवर असलेल्या कवीमनाला भेटत नाही कुणी संवाद करावं असं. तेव्हा त्याला जाणवतं एक तुटलेपण.. बाह्य सगळ्यापासून आणि स्वतःपासूनही. एका कवितेत म्हटलंय-
‘दोन शब्दांनंतर / आपल्यात पसरते / केवढी दाट स्तब्धता / ती नसते दरीसारखी अंतर निर्माण करणारी / नसते आकाशासारखी पोकळ / सापडत नाहीत शब्द / तिचं वर्णन करू शकणारे / डोळ्यांत जिभेवर / फासळ्यात / गच्च बसून राहतो मुकेपणा / सुटत नाहीत / चौकटीत गच्च रुतलेले हात / उधळू देत नाही मी / हिरव्या कुंपणात आरक्षित करून ठेवलेल्या / श्वासांना / हिंदकळू देत नाही मौनाचं तळं / उगीच पकडत नाही सावल्यांना / माझ्यातूनच जन्म घेतो दुजेपणा / मला एकटी करत’ (पृष्ठ ७६)

एकामागून एक या कविता सलग वाचत असताना हळूहळूउलगडा होत जातो सुरुवातीला न उमगलेल्या शीर्षकातील सूचकतेचा.. आणि कवितेबरोबर आपणही अनुभवतो स्वतःतल्या ‘परस्त्रीचा’ शोध घेणारा आत्मीय प्रवास...

आसावरी काकडे
६ मे २०१६


‘स्वतःतल्या परस्त्रीच्या शोधात’
कवितासंग्रह- सुजाता महाजन
मुखपृष्ठ व आतील चित्रे- सुप्रिया वडगावकर
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पृष्ठे ८४
किंमत ७५ रूपये

साप्ताहिक सकाळ १३ ऑगस्ट २०१६