Friday 5 May 2017

एकांतवेल

      कविता येते कुठून? लिहिता लिहिता नेमके शब्द कसे येतात अचानक समोर? आशय आधीच स्पष्ट असतो मनात की लिहिताना उलगडत जातो स्वतःलाही? लय कशी सापडते शब्दांना? कोणती वेळ असते कवितेची? एकांताची की अस्वस्थ गुंत्याची? कोणतं ठिकाण असतं प्रिय तिला?... कवितेच्या निर्मितीसंदर्भात असे अनेक प्रश्न रसिक वाचकालाच नाही तर खुद्द कविलाही पडत असतात...!    
‘एकांतवेल’ हा सुनीती लिमये यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. संग्रहाचं शीर्षक कवितानिर्मिती विषयक असे प्रश्न मनात निर्माण करणारं, कवितेच्या मुळारंभाशी नेणारं आहे. सुनीती बरेच दिवस कविता लिहिते आहे. ती कवितानिर्मितीच्या बाबतीत पुरेशी सजग आणि गंभीर आहे, कृतीशील आणि उत्साही आहे. पण पुस्तकरूपात सर्वांसमोर येण्याची तिला घाई नाही. कवितेत मुरलेलं असण्याच्या दृष्टीनं हे योग्यच आहे. पण कुठला तरी क्षण मुरलेला ठरवावा लागतो...
सुनीती जगण्याशी आणि स्वतःच्या भावनांशी अतिशय प्रामाणिक आहे. जे जसं वाटतं ते तसं व्यक्त करण्याइतकी धीटही आहे. उत्कटता हा तिच्या कवितेचा स्थायीभाव आहे. आयुष्यानं शिकवलेलं टिपता टिपता ते तिच्या कवितेच्याही वाट्यालाही येत गेलं.. ती सतत शिकण्याच्या भूमिकेत असते. जगणं आणि कविता दोन्हीच्या परिष्करणावर तिची श्रद्धा आहे. अधिक खरेपणानं अधिक चांगल्याकडे तिचा प्रवास चालू आहे. मला आवडलेल्या तिच्या एक दोन कविता-


“झाड पसरते आहे आत...
मी बाहेरून पहाते...
त्याचे माझ्या शरीरातून नि:शंकपणे वाढणे...
हद्दपार होते आहे मीच माझ्या देहातून...

एकाच वेळी हवेसे आणि नकोसे असणारे झाड...
करते आहे मला निर्मळ, शुद्ध.... पारदर्शक काच...

झाडाचे गारूड.. आता अंत:स्थित...
मला वेगळे करून...माझ्या आतून..”


******


“आर्त काही आता। येऊ नये ओठी
पीळ त्याच्यासाठी। पडू नये

नको नको वाटे। चक्रात चालणे
केव्हा, कसे होणे?। स्थलांतर?

देह झगमगे। केवळ बाहेर
आत दूरवर। काळोखच

मौनाचा दगड। बसला वरती
काहिली आत ती। शमेचना

कानात चौघडा। अस्वस्थाचा वाजे
आणि बेचैनीचे। पडघम

तिथे उजाडेना । इथे अंधारले
कुंपणावरले । देह आम्ही”
******
कविता लिहिणं म्हणजे स्वतःला शोधत स्वतःच्या आत शिरायचं आणि हाती आलेलं शब्दांना देऊन टाकून स्वतःपासून मोकळं व्हायचं..! एका अदृश्य स्तरावरच्या लपाछपीचाच हा खेळ..! या खेळात धावताना अंतर्बाह्य थकवणारी ही प्रक्रिया कवीला घडवणारी असते. माणूस म्हणून अधिक उन्नत करणारी असते. कवितेसोबतचा हा प्रवास सुनीतीला मनोवांछितापर्यंत घेऊन जावो हीच सदिच्छा.
आसावरी काकडे

३ मे २०१७ 

अंतःस्वर

कविता स्वतःला शोधत स्वतःतून मोकळं होण्याचं एक जिवलग साधन असते. कवितेसाठी हवा तोच अंतःस्थ शब्द मिळवण्यासाठी सतत स्वतःचं अनावरण करत राहावं लागतं... ‘अंतःस्वर’ या नावानं कविता क्षीरसागर यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. हे शीर्षकच कवयित्रीची कवितेविषयीची ही खोल समज सूचित करणारं आहे.
कवितेच्या अशा जाणीवनिष्ठ निर्मिती-प्रक्रियेतील देवाण-घेवाण ऐलपैल समृद्ध करणारी असते. इथे ऐल असतो आपण आणि पैल उभी असते कविता..! मधला अथांग पैस एकसारखा धुमसत असतो. अनाकलनीय रूपात साद घालत असतो. पण गंमत अशी की ती केव्हा कशी ऐकू येईल सांगता येत नाही. कविता वाट पाहायला लावते. सतत असमाधान देते. तडफडत ठेवते. म्हणूनच ती अवतरण्याचा शकुनक्षण मनस्वी आनंद देणारा असतो. पण शब्दात उतरलेली कविता बर्‍याचदा मृगजळासारखी निराश करते. तिला अंतःस्वर सापडलेलाच नसतो. पैल उभ्या कवितेपर्यंत पोचवणारी दीर्घ आंतरिक यात्रा खडतर असते. तिला आदि असतो. पण अंत नाही...
याची पुरेशी जाण असलेली कविता क्षीरसागर गेली अनेक वर्षे कविता लिहिते आहे. मधली काही वर्षे तशीच सुनी गेली. ऐल सुटत नव्हता... जखडलेपण संपलं आणि मोकळ्या झालेल्या मनाला कवितेची साद ऐकू येऊ लागली. नव्या दमानं कवितेचा अंतःस्वर शोधत आता ती निघाली आहे. तिला घाई नाही प्रकाशात येण्याची.

‘फक्त एका ठिणगीची वाट पहात...’ धुमसतं आयुष्य जगताना ती आतून अनुभवतेय आयुष्याचा गुंता झालेला. जगण्याला लगडलेली सुख-दुःखं संयतपणे मांडतेय शब्दांतून. आधुनिक जीवनाच्या भाषेत व्हायरसने पोखरलेलं आयुष्य शब्दबद्ध करतेय...

मला आवडलेली तिची एक कविता-

“एखाद्या सुंदर, हव्याहव्याशा
स्वप्नातून अचानक जाग येते...

तेव्हा सामोऱ्या येणाऱ्या
वास्तवाचा हात हातात घ्यायला
आपण बिलकुल तयार नसतो

मग अंगावर येणारे हे सत्य नाकारुन
आपण ओढून घेतो पुन्हा
त्या हव्याहव्याशा स्वप्नांची
उबदार चादर...

या अशाच
स्वप्नं आणि वास्तवाच्या मध्यसीमेवर
अडकून पडलेय आयुष्य...

मी कवटाळू पहातेय स्वप्नांना
आणि वास्तव मला...!!”

‘अंतःस्वर’ या कवितासंग्रहात कविता क्षीरसागरने कवितेचे वेगवेगळे फॉर्मस् सफाईदारपणे हाताळले आहेत. कोणत्याही आकृतीबंधात कवितेचं कवितापण तिनं जपलेलं आहे हे जाणवतं. कवितेविषयीची ही निष्ठाच तिला अंतःस्वर सापडायला मदत करेल..! आयुष्यातील अनुभवांसोबत सजगपणे जगताना कवितेच्या साथीनं तिचा ऐलपैल समृद्ध होत राहावा ही हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे
२९.४.२०१७

दूर दूर श्वासापल्याड..

प्रिय दया,

तुझ्या कविता वाचल्या. ‘मी कोण?’ ही पहिलीच कविता वाचताना तुझं कवितेशी असलेलं मनस्वी नातंजाणवलं. स्वगत बोलावं, स्मृतीत रमावं तशा तुझ्या कविता आत वळलेल्या आहेत.. ‘मनातल्या काळोखाचे थेंब’ कागदावर कविता कोरत जातात आणि मनातून कागदावर उतरलेल्या कवितासखी बनून जगण्याला सोबत करत राहतात. जगण्यातले सगळे भावगर्भ क्षण कवितेत फुलतात आणि आयुष्य सुगंधी करतात... हे नितांत तुझं वाटणं तुझ्या कवितांमधून माझ्यापर्यंत पोचलं.
एकदा का कवितेची अशी जिवलग सोबत मिळाली की मग व्याकुळ प्रतीक्षा असो की गतस्मृतींना ओंजळीत घेऊन कुरवाळणं असो, ‘हो नाही’चे संभ्रम असोत की ‘ऊन-पाऊस-वारा... चंद्र-चांदणं-तारा..’ यातून भुलवणारे भास असोत सगळं सुसह्य होतं. केवळ सुसह्य होतं असं नाही तर सृजनाच्या मुशीतून बाहेर पडल्यावर ते सारं सुंदर होऊन जातं..!
तुझ्या अंतर्मुख कवितांमधे जगण्याच्या परीघावरचे वेगवेगळे जीवनाशय आपापल्या उत्कटतेनिशी सामिल झाले आहेत. ‘पदराखालची पोर’ सारख्या कवितांमधून नात्यांचे बंध उलगडत गेलेत आणि पावसाची विविध रूपं चितारण्याच्या निमित्तानं माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं शब्दबद्ध झालंय.पुस्तकांचा सहवास हा तुझ्या नोकरीतील जगण्याचा अविभाज्य भाग. त्यांच्याशी तुझी अशी सलगी की बाहेरच्या कोलाहलातही तुझ्या कवितेला पुस्तकांच्या हृदयाची धडधड ऐकू येते, त्यांच्या श्वासातलं संगीत कळतं..!
कणिका स्वरूप छोट्या कविता हा तुझ्या कवितांमधला एक महत्त्वाचा भाग.व्यक्त व्हावं की नको अशा संभ्रमात असल्यासारख्या काही भावनाशब्दात उतरताना स्वतःला आक्रसून घेतात. मग शब्दही संयम ठेवतात आणि कणिकांचा जन्म होतो. किंवा बर्‍याचदा स्वतःलाही न उमगलेली वेदना अवघडून अल्पाक्षरांतून डोकावते. मलाआवडलेली तुझी छोटी कविता-
“फुलपाखरांच्या पंखावरचे
रंगीत ठिपके
अश्रूसारखे ओघळत गेले
फुलांनी माझी कहाणी
त्यांनाही सांगितली का?”
संग्रहरूपात तुझ्या या कविता सर्वांपर्यंत पोचतील तेव्हा त्या फक्त तुझ्या राहणार नाहीत. रसिकांच्या होऊन जातील आणि तू नव्यानं नव्या कवितांच्या शोधात स्वतःत परतशील..‘मी कोण?’ हा प्रश्न घेऊन, ‘स्वतःला शोधावं, शोधत जावं / दूर दूर श्वासापल्याड..’ हा भाव मनात जागता ठेवून..!
शब्दांसोबतच्या तुझ्या या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे

१६ जानेवारी २०१६

नि:शब्द शब्द

नि:शब्द शब्दांसाठी चार शब्द-
कवितेसाठी हवा तो शब्द शोधणं म्हणजे सतत स्वतःचं अनावरण करत राहाणं... याची काहीशी जाण असलेली पुष्पांजली कर्वे माझी फेसबुक फ्रेंड आहे. अशा मैत्रीत वयाचं किंवा भौगोलिक अंतर आड येत नाही. कविता हा आम्हाला जोडणारा दुवा. कवितेतूनच आम्ही भेटत राहिलो. तिच्या प्रतिसादात नेहमी एक अंत्यंतिक भारलेपण असतं. कवीमनाचंच हे एक लक्षण. तिच्या कवितेतही ते जाणवतं...
फेसबुक ही लगेच दाद देण्याची जागा आहे. विश्लेषण, समीक्षा.. या गोष्टी तिथं सहज शक्य होत नाहीत. छान छान अशी दाद मिळत जाते. पण कोणतीही पोस्ट तिथं फार काळ टिकत नाही. लगेच नजरेआड होते. स्मरणात ठरत नाही... पुष्पांजलीच्या कविताही अशा नजरेआड होत राहिल्या..
एकदा अचानक तिचा फोन आला संग्रह करतेय म्हणून. मी शुभेच्छा दिल्या. मग मधे काही दिवस गेले. काही दिवसांनी परत फोन. प्रस्तावना हवीय. म्हटलं, बघते, कविता पाठव... पुन्हा काही दिवस गेले... करता करता एकदम डीटीपी केलेल्या संग्रहपूर्व रूपातच कविता हातात आल्या..! वाचताना लक्षात आलं की यात बर्‍याच ठिकाणी परिष्करणाची गरज आहे. मग लक्षात येतील तशा सूचना करत राहिले....
कवितेवर प्रेम असणार्‍या व्यक्तीला जर विचारलं की आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता तर ती नक्कीच असं सांगेल- ‘मनातली कविता शब्दात उतरते तो क्षण सर्वात आनंदाचा..!’ या नंतरची पायरी म्हणजे वाचकांचा प्रतिसाद मिळणं. तो मिळाला की कविता खर्‍या अर्थानं पूर्ण होते... अशा कविता नजरेआड न होता एकत्रित, सतत वाचकांच्या समोर जाण्याच्या शक्यतेत असाव्यात असं वाटत असेल तर अजूनही पुस्तकाला पर्याय नाही. कविता लिहू लागल्यानंतरचा हा टप्पा कवीच्या आयुष्यातला सार्थकाचा टप्पा असतो. एकाच वेळी समाधान आणि हुरहुर दोन्ही भावना असतात मनात. काही साधलंय पण बरंच साधायचंय हे आत जाणवत असतं प्रामाणिक मनाला...
पुष्पांजलीची ही सुरुवात आहे. तिनं संग्रहाला छान सविस्तर मनोगत लिहिलंय. त्यातून तिची कवितेविषयक भूमिका स्पष्ट होते. मनोगताच्या सुरुवातीलाच तिनं म्हटलंय-
‘खरं प्रेम आपल्या आयुष्यात जाणता अजाणता अगदी नकळत येतं. माझी कविता सुद्धा अशीच नकळत माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्यच होऊन राहिली ! खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात कविता असते ! कारण कविता म्हणजे सारं भोवतालचं सोसणं असतं. कविता म्हणजे आपणच आपल्याला उसवणं असतं, कविता म्हणजे एक टाका असतो आपण आपल्याला घातलेला, कविता म्हणजे प्राण असतो जगण्यामधे ओतलेला !’
संग्रहातील कवितांविषयीच्या अपेक्षा उंचावणारं असं हे मनोगत आहे. एकूण १०१ लहान मोठ्या कविता या संग्रहात आहेत. त्यात बर्‍याच प्रेमकविता आहेत, काही स्त्रीविषयक जाणिवेच्या, सामाजिक आशयाच्या कविता आणि काही कणिका आहेत. या कवितांत उत्कटता आणि प्रांजलपणा जाणवतो. त्या फेसबुकवर वावरत असल्या तरी इतर प्रभावांच्या आहारी गेलेल्या वाटत नाहीत. अनुभव, अभिव्यक्ती दोन्ही पातळ्यांवरील नवखेपणासह त्या तिच्या स्वतःच्या आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
काही कवितांची उदाहरणं पाहिली तरी हे लक्षात येईल-
‘तुझ्या श्वासांची ऊब
मला इथे जगवते
अन्‍...
माझ्या आसवांची गाज
तुला तिथे कळते...’
*

‘उगवावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझ्या सहनशीलतेचा देठ भिडेल..’
*

अपरिहार्यपणे सहज अंगवळणी पडलेली इंटरनेटची भाषा कवितेत कशी डोकावते बघा-
‘हं...
कित्ती कित्ती तुला मी सर्च केलं
पण... कुठे नाही भेटलास...’
*

‘प्रिय...
तुझ्या इनबॉक्सच्या गेटवर
माझे काही शब्द ताटकळत उभे आहेत..’
*

अत्तर-क्षण, सावळमेघ, अंतरगाभार्‍यात असे काही शब्द आणि ‘अगदी निरंतर’, ‘तुला दिलेले शब्द’, ‘ऐक ना..’, या कविता उल्लेखनीय वाटल्या


स्त्रीविषयक जाणिवेच्या कवितांना नकळत धार आलेली आहे. त्यातील काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत-

‘इतकं सोप्पं नसतं गं .....
एकाच मनात
मनाची शकलं करून
जगणं .....
आणि प्रत्येक जगण्यात
स्वत:चा शोध
घेत राहणं......’
*

‘आणि घराचा उंबरठाही तुला पाय घालून
पाडतो
......

तुझा राग भांड्यावर काढतेस....
काय असते ते....
तुझा दबलेला आवाज
तुझा व्यवस्थेविरुद्धचा टाहो
की, समाजपुरूषाविरुद्धच्या
बंदाची नांदी...
की, शरणागती तुझ्यातल्या अस्मितेची....?
*

‘भरजरी नातं’, ‘जिथे घराच्या भिंतीत’, ‘पैंजण’, ‘मनुष्य मनुष्य’ या काही कविताही उल्लेखनीय आहेत. शेवटी आलेल्या काही छोट्या कविताही लक्ष वेधून घेतात.

पुष्पांजलीचं हे पहिलं पाऊल दमदार पडलं आहे. कविता हा उत्स्फूर्त साहित्यप्रकार असला तरी त्यासाठी व्यासंगाचा रियाज आवश्यक असतो. कवितेविषयीच्या प्रेमातून तो सहजपणे घडतो... पुष्पांजलीनं मनोगतात म्हटलंय, ‘कविता माझ्या खर्‍या अस्तित्वाची ओळख करून देते.’ हे अगदी खरं आहे. त्यासाठी स्वतः एक व्यक्ती म्हणून विकसित होत राहाणं हाही आंतरिक ‘व्यासंगा’चाच एक भाग ठरतो. पुष्पांजली असा रियाज करत राहील आणि तिच्या हातून उत्तमोत्तम कविता लिहिल्या जातील अशी आशा करते.

पुष्पांजलीला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com
२६ फेब्रुवारी २०१७


  





गांधार-पंचम


एखाद्या कसलेल्या ज्येष्ठ गायिकेने नृत्याचे पदन्यास टाकले किंवा एखाद्या नर्तिकेने चित्र रेखाटले किंवा चित्रकाराने गझल गायली तर वेगळ्या क्षेत्रातल्या या मुशाफिरीचा त्या कलाकार व्यक्तीला वेगळाच कैफ चढतो.. विशेष म्हणजे रसिकालाही याचं अप्रुप वाटतं..!
निष्ठावान उद्योजक आणि संवेदनशील सतारवादक म्हणून ओळख असलेल्या विदुर महाजन यांची काव्यक्षेत्रातली मुशाफिरी त्यांना स्वतःला आणि त्यांच्या चाहत्यांना अशीच अपूर्वाईची वाटते आहे. ‘गांधार-पंचम’ या त्यांच्या बर्‍याच अंगांनी वेगळ्या असलेल्या कवितासंग्रहाचा परिचय म्हणजे या अपूर्वाईचा परिचय आहे...
या संग्रहाचे वेगळेपण पुस्तकाच्या दृश्यरूपापासूनच जाणवायला सुरुवात होते. हे पुस्तक छोटेखानी अल्बमसारखे आडव्या आकाराचे आहे. आणि त्यात कवितेबरोबर कृष्णधवल छायाचित्रेही आहेत. कुणा मान्यवर कवीच्या प्रस्तावनेऐवजी  यात कवी विदुर महाजन आणि छायाचित्रकार चैतन्य विकास यांची छोटीशी  मनोगतं आहेत. आणखी एक वेगळेपण म्हणजे डायरीत नोंदवलेल्या यातील कवितांच्या ‘बॅक-स्टोरीज’ही कवितेसोबत वाचकांसमोर ठेवल्या आहेत. या छोट्या छोट्या नोंदी, छायाचित्र आणि कविता हे सर्वच एखाद्या खुल्या स्वगतासारखं आहे. या कवितांखाली तारखा आहेत पण कवितेला शीर्षकं नाहीत...
हे सर्व सलगपणे वाचताना प्रकर्षानं जाणवतं ते कवीचं सतत अंतर्मुख होत  जगणं आणि अनुभवत असलेलं उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या माध्यमांमधून इतरांबरोबर शेअर करणं.. ही जिंदादिली त्यांच्या सहज साध्या अभिव्यक्तीतून डोकावत राहाते. काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत...
कोणत्याही कलाकाराच्या कला-प्रवासात कधी कधी मधेच थांबलेपण येतं. या अवस्थेचं वर्णन एका कवितेत अगदी नेमकेपणानं केलेलं आहे-
‘सतत वाहणार्‍या पाण्याचा
मधेच होतो जेव्हा डोह
होत असेल का पुनः त्याला
वाहत राहण्याचा मोह?’
स्वतःत दंग असणार्‍या डोहाची प्रतिमा कला-ओघाच्या थांबलेपणाला अगदी चपखल वाटते.
इथे जगण्याचा, असण्या-नसण्याचा हेतू काय?, अर्थ काय? याचा शोध घेणं हे या कवितांचं आशयसूत्र आहे असं अनेक कवितांमधून जाणवतं. आपण जगत ‘असतो’ ते केवळ मृत्युच्या- ‘नसण्या’च्या भीतीपोटी.! एका कवितेत म्हटलंय,
‘तसं तर कुणाचंच
आपल्यावाचून नसतं अडत
आपण असलो काय, नसलो काय
कुणालाच नसतो फरक पडत
पण आपल्यालाच असायचं असतं
नसण्याच्या भीती पोटी..!

डायरीतल्या नोंदी आणि कविता या स्वगतरूप अभिव्यक्तीतले काही उद्‍गार थांबून विचार करायला लावणारे आहेत. उदा.-
‘भवताल बाहेर असतो की मनात..?’,
‘सतार ऐकायला समोर कुणी नसतं.. या ‘समोर कुणी’ला हाकलायला हवं, स्वतःलाच समोर बसवायला हवं’,
‘खरं तर सतत माध्यमांच्या मर्यादांचंच येत राहातं भान.’,
‘आहेस जिथे, तोही आहेच पैलतीर’

वर म्हटल्याप्रमाणे सतत जीवनाच्या अर्थ शोधायचा प्रयत्न करणार्‍या या कवीनं एका कवितेत जगण्याविषयी म्हटलंय-
‘मी फक्त जिवंत नव्हतो
मी नकळत जगत होतो
आयुष्य नावाच्या अनपेक्षिताला
नकळत प्रतिसाद देत होतो..’

आयुष्य ही अनपेक्षितपणे मिळालेली गोष्ट आहे. असं आयुष्य जगणं म्हणजे फक्त त्याला प्रतिसाद देणं.. हे आकलन महत्त्वाचं आहे.! पण जगताना अनेक अनुभव येतात. सजगपणे जगणार्‍या व्यक्तीला त्यांची संगती लावताना सतत विसंगतींचाच प्रत्यय येतो. या विसंगतींचा मेळ लावण्यासाठीच विदुर महाजन यांनी हा ‘शब्दांचा खेळ’ मांडला आहे..!
संवेदनशीलतेनं जगणार्‍या मनाला रोजचा नवा दिवस एक नवं आव्हान घेऊन येतो असं वाटतं. त्याच्यासाठी ‘एखादा कोरा कागद / असावा समोर / तसा दिवस उगवतो’
वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त होत उमेदीनं जीवनार्थ शोधत राहिलं तरी खर्‍या अर्थानं तो हाती लागतच नाही. श्री महाजन यांनी शेवटच्या कवितेत म्हटलंय,
‘आभासी जगात
निदान आभास तरी असतात
पण इथे
कुणालाच, कुणाचंच, काहीच
कळत नाही.. अन्‍
कुणालाच, कुणाचंच, काहीच
ऐकायचं नसतं..
त्यामुळे
असणार्‍याचं असणं हाही  
असतो निव्वळ भ्रम !

श्री विदुर महाजन यांची ‘माझी कथा, माझ्या वेदना.../ माझे विचार, माझ्या भावना...’ घेऊन केलेली कवितेतील ही मुशाफिरी त्यांच्याबरोबर वाचकांनाही अंतर्मुख होण्यातला आनंद देईल.

 आसावरी काकडे

गांधार-पंचम
विदुर महाजन
प्रकाशक- उन्मेष प्रकाशन, पुणे
पाने: ४८, किंमत: १५० रु.



मनपरिमळ


रोजचं आयुष्य जगत असताना लहान–मोठी सुख-दु:ख वाट्याला येत असतात. भोवतीच वातावरणही कधी सुखावणार असतं तर कधी अस्वस्थ करत असतं. या सगळ्याचे प्रतिध्वनी मनात उमटत असतात. मन भारावून जातं अशा प्रतिध्वनीनी तेव्हा व्यक्त व्हावंसं वाटतं. ही अगदी मूलभूत गरज आहे माणसाची ....अन्न –वस्त्र - निवार्‍या इतकी....!
व्यक्त होण्यासाठी शब्द हे सर्वात जवळचं माध्यम. त्यातून कुणाला कवितेतून व्यक्त होता येत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. कवितेतून व्यक्त होण्यात दुहेरी प्रक्रिया घडत असते. कविता लिहिणार्‍याला स्वतला तर व्यक्त झाल्याचा आनंद मिळतोच पण ती वाचणार्‍यालाही तेवढाच आनंद मिळतो ...!
अनुराधा काळपांडे यांचा मन परिमळ हा पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. त्यातल्या कविता वाचून प्रस्तावना लिहिताना व्यक्त होण्याची गरज किती उत्कट असते हे जाणवलं. मनातल्या वेगवेगळ्या भावना त्यांनी आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या आहेत. ईश्वर-कल्पना, भक्ती, ईशकृपा, अशा विषयांवरील कवितांमधली ईश्वर ही कविता मला विशेष आवडली.
दुष्काळ, भ्रष्टाचार, अत्याचार... हे भोवतीचं वातावरण अनुराधाताईंना अस्वस्थ करतं. त्यासंर्भातले  आपले विचारही त्यांनी कवितेतून मांडले आहेत. शेतकर्‍यास या कवितेत त्यांनी शेतकर्‍याला दिलेला सल्ला अगदी भावपूर्ण आहे. त्या म्हणतात.....
सावता माळ्यापारी धरी विठू दर्शनाची कास
अर्ध्यावरी सोडून डाव का त्रास सार्‍या जीवास?
अंधश्रद्धा निर्मूलन नावाची आणखी एक कविता आहे. त्यातील विचार वाचकाला विचार करायला लावतील. अंबेची आळवणी करणारं, दत्तसेवा’ करणारं भाऊक मन विज्ञानाचा धरा तुम्ही हेका..... असं तळमळून सांगतं आहे. हे विशेष महत्वाचं वाटलं.
या संग्रहात ‘आम्रवृक्षाप्रती’, ‘श्रावणधारा’, ‘वसंताची शान’ अशा काही निसर्ग कविताही आहेत. आम्रवृक्ष त्यांना दोस्त वाटतो तर घराची खिडकी त्यांना जीवनसखी वाटते. ती निसर्गाच दर्शन तर घडवतेच. पण मन विषण्ण असताना, सानुल्यांची वाट पाहताना सोबतही करते.
कविता लिहिताना कविताही सखी होऊन जाते ! या माध्यमाविषयी आतून काही उमगू लागतं आणि तोच कवितेचा विषय होतो. अनुराधाताईंनी याविषयीही लिहिले आहे. ‘कविता’ या कवितेत म्हटलंय-
‘कविता स्फुरते कविता फुलते
कशी कुणाला ठावे’

जर्जर जरा या कवितेत वृद्ध अवस्थे प्रत्येयकारी वर्णन केलेलं आहे. पण त्यात तक्रारीचा सूर नाही. देह जर्जर असला तरी मन तरूण आहे असं शेवटी त्यात म्हटलं आहे.

या संग्रहात हलकीफुलकी विडंबन गीतं आणि बालगीतंही आहेत.
मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा या गीतावरील विडंबन पाहा---
‘हिंडता हिंडता मी सहज पाहिला होता
मज घेऊन दे हा सेट आताच्या आता !
प्रश्न बालमनीचे या कवितेत म्हटलं आहे---
कावळे साळूंकी बुलबुल सारे पक्षी
छप्पर नसलेल्या घरात त्यांना
आई देव कसा रक्षी ?’

ज्ञानप्रकाश’, ध्यास अशा काही कवितांमधून अंतर्मुख विचार व्यक्त झाले आहेत. ध्यास कवितेत म्हटलं आहे.....
जुन्यातुनी नवे जन्मे
नव्यातुनी पुन्हा नवे
नव्याचीही आस जीवा
नवनिर्मितीचा ध्यास हवा !

अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. कविता लिहिता लिहिता लक्षात येतं की अधिक चांगल्या कवितेची वाट सोपी नाही. श्रेष्ठ कवितेपर्यंत पोचणं अवघड आहे. पण प्रवास कितीही अवघड असला तरी सुरवातीचं पाऊल उचलायला तर हवं! अनुराधाताईंना याची जाण आहे. आतापर्यंत स्वांतसुखाय लिहिलेल्या या कविता भावंडांनी आग्रह धरल्यामुळे त्या पुस्तक-रूपात आणत आहेत. या निमित्ताने त्यांच्या काव्यप्रवासाला हार्दिक शुभेच्छा देते- अधिक चांगली कविता त्यांना अधिक चांगला आनंद मिळवून देवो !
आसावरी काकडे
9762209028
asavarikakade@gmail.com

४  सप्टेबर २०१