Sunday 10 January 2016

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘हत्ती इलो’


परीक्षक या भूमिकेतून मांडलेले विचार-

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावानं दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘कल्लोळातला एकांत’ आणि अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ या कवितासंग्राहांची निवड झाली याबद्दल दोन्ही कवींचं आणि या संग्रहांची सुरेख निर्मिती करणारे अक्षर मानव प्रकाशन आणि शब्द प्रकाशन यांचे सुरुवातीला हार्दिक अभिनंदन करते.

या पुरस्कारासाठी एकूण 28 संग्रह विचारार्थ आले. विषय, अभिव्यक्ती आणि गुणवत्ता या तीन्ही स्तरांवर त्यात वैविध्य आढळलं. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक, ग्रामिण, शहरी.. असे सर्व स्तरावरचे दर्शन या कवितांमधून झाले. अभिव्यक्तीच्या स्तरावर काही गजल रचना आणि आधिक प्रमाणात मुक्तछंद रचना आहेत. या शिवाय एक दोन संग्रहांमधे सूत्रसंचालन करत कविता सादर कराव्यात तशी मांडणी आहे. तर काही संग्रहात एक सूत्र घेऊन लिहिलेल्या कविता आहेत.  
  
कुसुमाग्रज पुरस्कारासाठी निवडलेल्या दोन संग्रहांखेरीज श्री विजय बोरूडे यांचा ‘पर्णसूक्त’, भगवंत क्षीरसागर यांचा ‘बीजमंत्राची कविता’, प्रा. नीलिमा गुंडी यांचा ‘जगण्याच्या कोलाहलात’, सुरेश सावंत यांचा ‘धुनी’ असे काही संग्रह उल्लेखनीय आहेत. या संग्रहांमधल्या विशेष आवडलेल्या एक दोन गोष्टींचा उल्लेख इथे करणं आवश्यक वाटतं. नीलिमा गुंडी यांनी ‘जगण्याच्या कोलाहलात’ हा आपला संग्रह ‘कोलाहलातही अखंडपणे अनुरणत राहणार्‍या जगण्याच्या आदिम स्वराला’ अर्पण केला आहे. ही अर्पणपत्रिका अर्थपूर्ण वाटली. ‘रियाझ’ संग्रह लिहिणार्‍या कवयित्री उषाकुमारी जगण्याला रियाझ मानतात आणि स्वतःच्या प्रकट होण्याला मैफल मानतात. जगण्याकडे रियाझ म्हणून बघण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘पर्णसूक्त’ या संग्रहात पानाचं प्रतिक घेऊन त्या आधारे जीवनदर्शन घडवण्याचा संजय बोरुडे यांचा प्रयत्न दाद देण्यासारखा वाटला. त्यांनी एका कवितेत म्हटलं आहे- “ आता पानांनीच झाड उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलाय / काही उपर्‍या पाखरांच्या नादी लागून../ काष्ठधारेची प्रत्येक वाट आडवून / विस्फोटके पेरली आहेत... / स्वतंत्र्याच्या विपर्यस्त कल्पना मनात घेऊन / आणि आता मेघही त्यांना फितूर / काळा पाऊस पाडण्यासाठी..! / अजून कसे लक्षात येत नाही पानांच्या / की हे विषारी पाणी / आपल्याच मुळांवाटे येईल आपल्यापर्यंत / आपलाच घास घेण्यासाठी..!!

पुरस्कारासाठी कवितासंग्रहाची निवड करण्यामागची भूमिका - कविता कालानुरूप बदलत असते. बदलायला हवी. आता हळवी, भावूक, गूढ गुंजन करणारी, कल्पनारम्य कविता कालाबाह्य ठरते आहे. फार काय आजच्या कवितेला ‘तत्त्वचिंतन’ही बिनकामाचं वाटतं आहे. कवितेच्या या ‘जुन्या’ वृत्तीबरोबरच वृत्त, छंद, लय.. या गोष्टीही बाजूला पडताहेत. क्वचित कुणी त्यांचा वापर करतं पण तो बिनचूक आणि अर्थाला सघन करणारा त्याहूनही दुर्मिळ होतो आहे...

गतिमानता हा आजच्या काळाचा अविभाज्य पैलू आहे. बदलाचा हा वेग इतका झपाट्यानं वाढतो आहे की आपण सतत कालबाह्य होत असल्याची जाणीव संवेदनशील मनाला होत राहते. अंगावर कोसळणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नाना कसं सामोरं जायचं ते कळेनासं होऊन जातं. अशावेळी समकालिन वास्तवाला आपल्या काव्यकृतीतून सामोरं जाणं हा एकच पर्याय खर्‍या कवीसमोर उरतो. इतर गोष्टी कितीही महत्त्वाच्या आणि सुंदर असल्या तरी आग लागलेली असताना आग विझवण्याच्या प्रयत्नांखेरीज काहीच करणं शक्य आणि उचित असत नाही. आजचा काळ असा, इतका स्फोटक आहे की आजची खरी कविता समकालिन वास्तवाचा विचार डावलून पुढे जाऊ शकत नाही. पुरस्कारासाठी संग्रहाची निवड करताना ‘आजच्या’ कवितेचं हे रूप आम्ही महत्त्वाचं मानलं. त्या दृष्टीनं विचार करता अजीम नवाज राही यांचा ‘कल्लोळातील एकांत’ आणि अजय कांडर यांचा ‘हत्ती इलो’ हे दोन कवितासंग्रह महत्त्वाचे वाटले. दोन्हींमधे समकालिन वास्तवाचा वेगवेगळ्याप्रकारे वेध घेतलेला आहे. बराच विचार करूनही या दोन्हीतून एकाची निवड करणं आम्हाला शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या कुसुमाग्रज पुरस्कारासाठी आम्ही या दोन्ही संग्रहांची निवड करण्याचा निर्णय घेतला.
पुरस्कृत संग्रहांविषयी-

१) ‘कल्लोळातील एकांत’- अजीम नवाज राही हे आजच्या महत्त्वाच्या कवींपैकी एक आहेत. ‘व्यवहारांचा काळा घोडा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिन्दी अनुवाद झाले असून त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. ‘कल्लोळातील एकांत’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह. या २९४ पानी कवितासंग्रहाचा परिचय याच संग्रहाच्या मलपृष्ठावर सात आठ ओळीत अगदी अचूकपणे करून दिलेला आहे. त्या ओळी अशा- “ हे म्हटलं तर एका माणसाचं मानसिक चरित्र आहे. हे म्हटलं तर एका माणसाचं व्यावहारिक चरित्र आहे. हे म्हटलं तर संपूर्ण समाजाचं चरित्र आहे. हे म्हटलं तर एका काळाचं चरित्र आहे. आयुष्याचे सगळेच्या सगळे संदर्भ आणि आशय निखळ शब्दात टिपत जन्माला आलेली ही कविता आहे. एक व्यक्ती आणि एक काळ यांच्या जगण्याचा विविधरंगी अवकाश शब्दांत घेऊन एखाद्या भव्य कादंबरीसारखा हा कवितासंग्रह वाचता येतो” खरोखरच या कवितासंग्रहाचा आवाका एखाद्या कादंबरीएवढा आहे... या संग्रहात वेगवेगळ्या शीर्षकांच्या कविता असल्या तरी त्या एकाच आशयसूत्रानं बांधलेल्या आहेत. विस्तारत जाणार्‍या परीघातलं रोजचं जगणं विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमांमधून चित्रित करणं, जगण्यातले असंख्य ताण, विरोधाभास आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरची हाताशता व्यक्त करणं हे या कवितांचं सूत्र आहे असं जाणवलं.

अक्षरमानव प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या संग्राहातील एखादी कविता उदाहरणादाखल पाहिली तरी या कवितांचा पोत लक्षात येऊ शकेल. ‘घाटमाथा’ याकवितेत म्हटलं आहे – “बदलला नाही अद्याप / मार्ग तडजोडीचा धोपट / तर्जनी अनिश्चिततेची / आयुष्याकडे ताणलेली / डोळ्यांत पेंग्विन परेड स्वप्नांची / उजाडल्यावर किनारा वास्तवाचा उदास /  उडू नये शिंतोडे बदनामीचे म्हणून / जपला सदरा निकराने चारित्र्याचा / लपेटली चादर सोशिकतेची काळीजभर / परतलो कोरडा दर्यावरुन उधाणलेल्या / जडला जीव नीतिमूल्यांच्या वाळूवर /  झाला नाही दर्याही कधी उदार / केली नाही माझ्या नावे / भरती चुकून ओंजळभर / हुडकत राहिलो सदानकदा / घाटमाथा सुरक्षित व्यवहाराचा / चाहूल वादळाची लागताच / अंडी पाठीवर घेऊन पळणार्‍या मुंग्यांसारखा !”(पृ.२५३)

२) ‘हत्ती इलो’ - अजय कांडर यांचा हा दुसरा कवितासंग्रह. या आधीचा कवितासंग्रह आहे ‘आवान ओल’. खेड्यातील भेदक वास्तव चित्रित करणार्‍या या पहिल्याच संग्रहाला आपटे वाचन मंदिराचा इंदिरा संत काव्य पुरस्कार मिळालेला आहे. या संग्रहानं एक महत्त्वाचा कवी म्हणून कांडर यांचा परिचय प्रस्थापित व्हायला लागला. त्यानंतर सात वर्षांनी प्रकाशित झालेल्या ‘हत्ती इलो’ या संग्रहाचंही चांगलं स्वागत होत आहे. लोकमत पुरस्कारासाठी या संग्रहाचं नामांकन झालेलं होतं.

या संग्राहात हत्तीचं रूपक घेऊन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणातील अनावर पडझडीचा वेध घेणारी एक दीर्घ कविता आहे. प्रभावी कथनशैली हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. या कवितेबद्दल ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी म्हटलं आहे- 

'हत्ती इलो' ही दीर्घकविता खऱ्या अर्थाने ' आजची ',' आताची ' कविता आहे. ही कविता कसलेही  वर्णन करीत नाही, तर प्रश्न उपस्थित करते. या कवितेला अनेक आयाम आहेत. अनेक अर्थवलयेआहेत. विध्वंसक राजकारण, जागतिकीकरण ,शोषणाधारित अर्थव्यवस्था या सर्वांचे संदर्भ या रूपकात एकवटले आहेत. हत्तीचे हे रूपक अप्रतिम आहे. सामान्य माणूस कसा हतबुद्ध झालाय हे, ही कविता अधोरेखित करते..

डोक्यात विधायक विचार येण्यासाठी आपली डोकी आपण आपल्या ताब्यात ठेवली पाहिजेत. आपली डोकी कुणाच्याही ताब्यात, विशेषतः उन्मादी ,उच्छादी प्रवृत्तींच्या ताब्यात द्यायची नाहीत, हा त्यंत महत्त्वाचा संदेश ही कविता देते.

ज्येष्ठ लेखक श्री अनंत मनोहर यांनीही ‘अस्वस्थ उद्‍ध्वस्ताचे वर्तमान’ या शीर्षकाखाली बेळगाव तरूण भारत’मधे लिहिलेल्या लेखात या संग्रहाचं वेगळेपण विषद केलेलं आहे. नामवंतांनी नावाजलेली ही कविता मुळातून पूर्ण वाचायला हवी. पण एक उदाहरण म्हणून या कवितेचा अस्वस्थ करणारा शेवट पाहता येईल.-

आता / भूमी निर्वंश झाल्याचे दुःख मनात असतानाच / हत्तीने माणसांनाच निर्वंश करायला प्रारंभ केला / हत्तीच्या गर्जनेने / ओल्या बाळंतिणीचाही पान्हा सुकू लागला / उदरातील गर्भ गुदमरू लागला / आता माणसं / मंदबुद्धी झाल्याची खात्री पटल्यावर / हत्ती एवढा बोकाळला / एवढा बोकाळला / की, त्याने आधी माणसांना गृहीत धरले होतेच / आता माणसंही त्याला गृहीत धरू लागली !  हत्ती आणि माणसांचा असा खेळ / हल्ली रोज नव्याने खेळला जातोय सर्वत्र !

आजच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्तानं दोन्ही संग्रहांची तोंडओळख थोडक्यात करून दिली आहे. विशेष म्हणजे ‘कल्लोळातला एकांत’ या कवितासंग्रहाविषयी म्हटल्याप्रमाणे ‘हत्ती इलो’विषयीही अनंत मनोहर यानी लिहिलेल्या लेखात शेवटी म्हटलं आहे की या संग्रहामधील आशय पैस असलेल्या कादंबरी या आकृतीबंधाची मागणी करणारा आहे. यावरून दोन्ही संग्रहातील आशयाच्या आवाक्याची कल्पना करता येईल. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे हे दोन्ही संग्रह वाचकांनी मिळवून अवश्य वाचावेत. शेवटी दोन्ही कवींचे पुन्हा अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.


आसावरी काकडे / सुजाता शेणई 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -   कुसुमाग्रज पुरस्कार- २७ फेब्रुवारी २०१३           

No comments:

Post a Comment