Wednesday 15 February 2023

‘नादब्रह्म’ चे स्वागत-

शब्दांतून व्यक्त होता येणार्‍या प्रत्येकाचं कविता हे पहिलं प्रेम असतं. कारण कविता थोडक्यात बरंच काही सांगते. ती एकाच वेळी आत्मनिष्ठ असते आणि सार्वत्रिकही असते. कवितेत सहसा नावं येत नाहीत. सर्वनामं येतात. त्यामुळे आशय विशिष्ठतेची मर्यादा ओलांडून सार्वत्रिक होतो. कविता संग्रहरूपात प्रकाशित झाल्यावर तर त्या कवीचं बोट सोडून वाचणार्‍या सर्वांच्या होतात. दाद मिळते. ही सर्व प्रक्रिया लिहिण्याची ऊर्जा वाढवणारी असते.

‘उन्मुक्त’ या पहिल्या कवितासंग्रहानंतर विद्याधर फडणवीस यांचा ‘नादब्रह्म’ हा दुसरा कवितासंग्रह अशाच उर्जेतून प्रकाशित होतो आहे. संग्रहाचं शीर्षक आणि त्याला साजेसं सुंदर मुखपृष्ठ कवितांविषयीची उत्सुकता वाढवणारं आहे. श्री फडणवीस यांनी विविध विषयांवर लिहिले आहे. विशेष म्हणजे या सर्व कविता छंदोबद्ध आहेत. छंदोबद्ध कविता लिहिताना कवितेची लय साभाळणं ही मोठी जबाबदारी असते. छंदोबद्धतेचे नियम पाळताना मनातील नेमका आशय शब्दात उतरवणं हे कौशल्याचं काम आहे. ही कसरत करताना कधी आशय निसटतो तर कधी लय बिघडते. श्री फडणवीस यांनी आशय आणि लय दोन्ही सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यांना चांगल्या कवितेचं मर्म माहिती झालेलं आहे. ‘नवोदित’ या कवितेत ते म्हणतात-    

वल्मिकीचे दुःख मोठे वेदनेतुन काव्य येते

कोठुनी येणार उर्मी दुःख माझे तोकडे..!

दुःख, वेदना माणसाला पोखरत असतात. या पोखरण्यामुळे आतला पैस विस्तारत जातो. दुःख अनुभवत असताना अंतर्मुख होता आलं तर त्यातून उत्तम काव्य जन्माला येते. दुःख.. करूणेतून जन्माला आलेल्या वाल्मिकींच्या काव्योद्गाराचा दाखला देत श्री फडणवीस यांनी म्हटले आहे दुःखाच्या त्या प्रगल्भतेपुढे माझे दुःख तोकडे आहे. मग तसे काव्य लिहिण्याची उर्मी कुठून येणार? आदर्श डोळ्यासमोर असणं आणि आपल्या मर्यादांची जाण असणं ही प्रगल्भ समज प्रगतीपथावर पुढे पुढे नेणारी असते.

‘उत्तर’ या कवितेत ‘रे आकाशा आयुष्याचे उत्तर शोधू..’ असं म्हणत फडणवीस सामान्य जीवन जगताना कोणत्या, कशा समस्या येतात ते सांगतात. संसारातले हे प्रश्न न संपणारे. एकाचं उत्तर मिळतंय असं वाटतं तोवर नवा प्रश्न समोर येतो... मनू या मानवाच्या मूळ पुरुषाचा संदर्भ देत कवितेत पुढे म्हटलं आहे-

‘अजून फिरतो मनू घेउनी प्रश्नांचे तारू

बुद्ध धाडले किती किनारी प्रश्न नव्याने सुरू’

मानवाच्या प्रश्नांना उत्तरं देणारे कितीतरी बुद्ध माणसाने बेदखल केले. तो पुन्हा पुन्हा नव्या प्रश्नांमधे अडकतच राहिला.. असं सूचित करणार्‍या या आशयघन ओळी वाचकाला थांबवून विचार करायला लावतात. ‘नादब्रह्म’ या संग्रहात वाचकांचं लक्ष वेधणार्‍या अशा आणखीही काही जागा आहेत. उदा. ‘गुंतलो नाही कुठे मी, मी जगाने वगळलेला / शोधितो मी तीर दुसरे, या तिरी ओशाळलेला..!’ (‘उपेक्षित’) ज्याची त्याची आस्वाद-प्रक्रिया वेगळी असते. त्यानुसार हा संग्रह वाचताना प्रत्येकाला वेगवेगळी सौंदर्यस्थळं भेटतील.

या संग्रहातील कवितांमधे मनू, वाल्मिकी, अहिल्या, द्रौपदी शकुंतला, अभिमन्यु, राधा कृष्ण.... असे बरेच पौराणिक संदर्भ आलेले आहेत. त्यावरून फडणवीस यांचा व्यासंग जाणवतो. सामाजिक वास्तवाचं चित्रण, बाबा, आजोबा, आई... अशा नात्यांमधील हार्दिकता, मानातली अस्वस्थता, कवितेविषयीची समज, प्रेमभावना.. अशा विविध विषयावरील त्यांचे चिंतन त्यांच्या कवितांमधे शब्दबद्ध झाले आहे. ‘छकुली’सारख्या काही कवितांमधे लहान मुलीचे भाव व्यक्त झाले आहेत.

श्री फडणवीस यांना ‘उन्मुक्त’ या पहिल्या संग्रहाप्रमाणे ‘नादब्रह्म’ या संग्रहालाही भरभरून दाद मिळो.. त्यातून आणखी सकस कविता लिहिण्याची प्रेरणा मिळो. ही हार्दिक शुभेच्छा..!

 

आसावरी काकडे

१३.२.२०२३