Wednesday 13 January 2016

एक उत्सव : दोन प्रतिक्रिया


      ते गणपती-उत्सवाचे दिवस होते. नेमकं त्याच वेळी आम्हाला मुंबाईला एका कामानिमित्त जावं लागलं. रस्त्यांवर तुडुंब गर्दी. जागोजागी घातलेल्या प्रशस्त मांडवांमुळे गर्दी अंगावर कोसळण्या इतकी गडद झाली होती. भोवतीच्या घणाघाती आवाजाखाली हृदयाची वाढलेली धडधड दडपली जात होती. जागोजागच्या भव्य आराशी, त्यातली कल्पकता, गणेशमूर्तीच्या निवडीतलं नाविन्य, तरूणाईच्या उसळत्या उत्साहाला मिळू शकणारी विधायक कृतीची वाट.. याकडं कौतुकानं लक्ष देण्याची क्षमता आवाजांच्या प्रदूषणानं काळवंडून टाकली होती. प्रचंड थकायला झालं होतं. विश्रांतीची गरज होती. तरी जीव मुठीत धरून आम्ही परतीच्या बसकडे धाव घेतली... हे सर्व कुठून कुठे चाललंय?.. मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. बसमधे डोळे मिटून बसल्या बसल्या उद्वेगाची प्रतिक्रिया शब्दबद्ध होत गेली... घरी आल्यावर लिहून ठेवलेली ती कविता अशी-

“कुठून तरी कुठे तरी एकसारखी / निमूट धावतेय मुंबईतली गर्दी.../ केव्हाही काहीही होईल / अशी मनाची तयारी असलेली स्वस्थता आहे तिच्या गतीला / एक लय आहे आनाकलनीय झिंग असलेली / प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच / वापरून वापरून / जुनं मोडकळीला आल्यासारखं / तरी मेकअप करून चालू पडलेलं... / जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज / राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची / कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता.. / तिनं काय करावं या चेहर्‍यांचं? / त्यांनी काय करावं / या बेढब वाढलेल्या जनतेचं? / प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम! / अशा जगण्याची लाज वाटायलाही / उसंत नाही कोणाला! / माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या / टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून / धावतायत सगळी... / त्याची टिक टिक ऐकू येऊ नये म्हणून / ढोल वाजवतायत जीव खाऊन / फटाक्यांच्या माळा फोडतायत / लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून / बेसूर गाणी आदळवतायत / केविलवाण्या छात्यांवर / कुणाला काही दिसू नये / म्हणून रोषणाई करतायत जागोजाग / बधीर होत चाललेल्या मनांवर / प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..! / क्षितिजाला तडा जाईल / असा आक्रोश करावा म्हणून / बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय / कपाळावर एखादी आठी उमटवून जेमतेम / अशा आठ्यांचे खांब दुभंगून / कधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?”
***
     
दुसरा अनुभव पुण्यातला. तेव्हाही गणपती-उत्सव चालू होता. पुण्याच्या कँम्प भागात आयोजित एक कार्यक्रम आटोपून एकटीच घरी परतत होते. रात्रीचे दहा वाजून गेले होते. तरी रस्त्यांवर गर्दी होती. रोषणाईचा झगमगाट होता. कानठळ्या बसवणार्‍या आवाजातील गाण्यांच्या तालावर दिवे नाचत होते. गजबजाटातून वाट काढत रिक्षा घराच्या दारात केव्हा येऊन पोचली कळालंही नाही. रात्रीचे अकरा वाजायला आले होते तरी फ्रेश वाटत होतं.. मनात आलं, तीच जीव आक्रसून टाकणारी गर्दी, त्राण शोषून घेणारं आवाजाचं प्रदूषण.. आजही होतं. तरी आज थकवा न वाटता फ्रेश कसं वाटतं आहे? उशीरा रात्री एकटं परतताना या गर्दी-गोंगाटाची, रोषणाईची मला सोबत वाटली की काय..? एरव्ही एकटं येताना वाटली असती ती भीती या गर्दीनं शोषून घेतली होती काय? आपलं त्रासणं, बरं वाटणं किती सापेक्ष असतं..! रात्री बराच वेळ असे विचार येत राहिले... अनावश्यक जल्लोषात सण साजरे करणार्‍या, क्रिकेटच्या विजयी टीमच्या स्वागताला धावणार्‍या, नेत्यांच्या भाषणांना गोळा होणार्‍या, यात्रा... जत्रा भरवणार्‍या, भाबड्या श्रद्धा बाळगणार्‍या ‘गर्दी’च्या उत्सवी मानसिकतेला आपण अविचारी, अज्ञानी, बेपर्वा समजत असतो... याकडे वेगळ्या समजुतीच्या दृष्टिकोनातून पाहता येईल का?

सहज कल्पना करून पाहिलं की पूर्ण समाज शहाणाझाला आहे. कुणी कसलीही ‘कालबाह्य कर्मकांडं’ करत नाहीए. कोणतेही सार्वजनिक सण-उत्सव जल्लोषात साजरे होत नाहीएत... असंख्य प्रश्नांच्या व्यामिश्र स्वरूपाच्या आकलनानं सुन्न झालेत सगळे. कोणत्याही प्रकारची संमेलनं त्यांना मूर्खांचा बाजार वाटतोय. ‘लोकप्रियअसं सामान्यकुणी काही लिहित नाहिए. ‘सामान्यसिनेमे नाहीत. ‘सामान्यनाटकं, ‘सामान्यमालीका, ‘सामान्यचित्र-शिल्प प्रदर्शनं, ‘सामान्यगाण्यांचे कार्यक्रम...काही नाहीए... कसं वाटेल अशा प्रगल्भसमाजात राहायला?  सुनं सुनं, निराश वाटेल बहुधा... कारण विचारअस्वस्थच करतात. अशी अस्वस्थता चांगली असते खरंतर. पण या अस्वस्थतेतून सकारात्मक, विधायक कृती किंवा कला-निर्मिती करणं सगळ्यांच्या आवाक्यातलं नाही. मग या अस्वस्थतेचं काय होईल?... अशा मनस्थितीत सर्व मर्यादांसह ‘गर्दी’ला समजून घेणारी एक हिन्दी कविता लिहिली गेली-

“वे सोचते नहीं हैं कुछ / कोई खयाल नहीं आता उनके मन में / खुद का.. समाज का.. भविष्य का../ बेझिझक थूकते हैं सड़कों पर / यातायात के नियम तोड़ते हैं / झगड़ते हैं.. गालियाँ बकते हैं.. / कोई नेता या अभिनेता आया / तो उसे देखने खड़े रहते हैं घंटों तक भीड़ में... / कृष्ण जन्माष्टमी को / गोविंदा बनकर नाचते हैं मस्ती में / पंद्रह अगस्त को / देशभक्ति के गीत बजाते हैं / जोर जोर से / गणेश जी की आरती उतारते हैं / ढोल बजाते हैं / जुलूस निकालते हैं / स्पीकर लगा कर / नाचते हैं.. चिल्लाते हैं.. / हर त्यौहार मनाते हैं / धूमधाम से.. / आतंकी हामला हों / बाढ़ का कहर हों / सूखे का संकट हों / या किसी बीमारी की दहशत फैली हो / वे रुकते नहीं हैं घरों में / कैसी भी हो / उसी जिन्दगी का हाथ थामे / चलते ही रहते हैं / गाते.. नाचते.. चिल्लाते.. / किसी न किसी प्रकार / शोर मचाते रहते हैं / कभी सन्नाटा छाने नहीं देते ! / जिन्दगी को वीरान होने नहीं देते..! / वे सोचते नहीं हैं कुछ / इसीलिए शायद..! 

आसावरी काकडे.
9762209028

No comments:

Post a Comment