Saturday 7 October 2023

शांत गहिर्‍या तळाशी...

सानुल्या बीजापासून ते माणसापर्यंत प्रत्येकाला सतत व्यक्त व्हायचं असतं. व्यक्त होण्याच्या तर्‍हा वेगवेगळ्या असतात. पण व्यक्त होण्याची आंतरिक ओढ समान असते. माणूस केवळ लिहिण्या-बोलण्यातूनच नाही तर प्रत्येक कृतीतून सतत व्यक्त होत असतो. तरी असं काही उरतंच आत जे कवितेशिवाय इतर कशातूनही व्यक्त होऊ शकत नाही. केव्हा तरी पडलेलं बी जमिनीत रुजतं. रुजणं पूर्णत्वाला गेलं की बीज मातीचं कवच फोडून बाहेर पडतं. तशीच व्यक्त होण्यासाठीची अस्वस्थता परिपक्व होते तेव्हा खरी कविता लिहिली जाते. या संदर्भात संत तुकारामांच्या अभंगातली एक ओळ आठवते- ‘फाकूं नका रुजू जालिया वांचून’

निरुपमा महाजन यांचा ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्तानं यातल्या कविता वाचताना जाणवलं की त्यांनी ‘रुजू’ झाल्यावरच या कविता लिहिलेल्या आहेत. ‘रुजू’ होण्यासाठी बीजाप्रमाणे खोलातल्या शांत गहिर्‍या तळाशी वाट पाहात बसावं लागतं याची जाण कवयित्रीला आहे हे कवितासंग्रहाचं शीर्षक आणि आतल्या कवितांवरून लक्षात येतं.

आशय आणि अभिव्यक्ती ही कवितेची दोन अविभाज्य अंगं आहेत. अभिव्यक्तीच्या शैलीनुसार आशयाचा पोत बदलतो आणि आशयाच्या प्रगल्भतेनुसार अभिव्यक्तीचा दर्जा ठरतो. दृश्य कवितेच्या रोमरोमांतून आशय डोकावत असतो. कविता कधी मूर्त चित्रासारखी आशयप्रधान असते तर कधी अमूर्त चित्रासारखी शैलीप्रधान असते. निरुपमा महाजन यांच्या कवितांना शैलीप्रधान हे लेबल लावता येण्यासारखं नसलं तरी त्यांचा कल शैलीप्रधानतेकडेच आहे असं म्हणता येतं.

या संग्रहातील अधिकतर कविता लयबद्ध तर आहेतच पण त्यात वैविध्यही आहे. एकच एक छंद किंवा वृत्त वापरलेलं नाही. शेवटची ‘मीरा : एक आशय अनेक वृत्ते’ ही एकच कविता उदाहरण म्हणून पुरेशी आहे. यात वेगवेगळ्या सात वृत्तांचा वापर केलेला आहे. एकच आशय असा अभिव्यक्तीच्या अंगानं वळवणं सोपं नाही. निरुपमा यांचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे.

विशेष म्हणजे ही वृत्त-लयबद्धता निर्दोष आहे. लयबद्ध कविता लिहिणं कौशल्याचं काम आहे. अभिप्रेत आशय वृत्त-लयीच्या तंत्रात बसवताना बरेचदा आशय तरी फसतो नाहीतर लय तरी चुकते. लिखित / छापील कवितेत आणखी एक धोका असतो. मनातल्या लयीनुसार अक्षर र्‍हस्व हवे असते पण व्याकरणानुसार ते दीर्घ लिहिले / छापले जाते. तसे झाले तर रसिक वाचकाच्या दृष्टिने लय बिनचूक राहात नाही. निरुपमा यांच्या ‘वारस’ या गझलेत वृत्त-लय, काफिया, रदीफ अशी तंत्रं सांभाळताना कशी कसरत केली जाते त्याचं मार्मिक चित्रण आहे. त्यातला एक शेर असा आहे- ‘धड कळला नाही त्यांना शब्दांचा लगाव ओला / पण ‘लगावली’ का चुकली हा जाब विचारत होते..!’

निसर्ग, मानवी नाती, गावाकडचे वर्णन.. असे या कवितांचे विषय आहेत. इथे निसर्ग कधी वर्णन म्हणून येतो तर कधी प्रतिमा बनून येतो. ‘झाडाची प्रेमकविता’, या कवितेत जमिनीच्या वर उभे दिसणारे झाड आणि खाली खोलवर पसरत राहणारी मुळं यांच्यातील विलक्षण प्रेमाचे नाते चितारले आहे. ‘चक्र’ या कवितेत निसर्गवर्णन प्रतिमा म्हणून येते. जीवन-मृत्यूचं चक्र कसं अविरत फिरत असतं याचं सुंदर वर्णन यात आहे. ‘बहर’ ही कविता वाचताना निसर्गाशी कवयित्रीचं नातं किती उत्कट, आतून उगवलेलं आहे याचा प्रत्यय येतो. ‘हिरव्या हिरव्या हजार फांद्या या हातांतुन उगवुन याव्या / कंचपोपटी पानझालरी बोटांमधुनी उमलत जाव्या’ अशी सुरुवात असलेल्या या कवितेत पुढे, पायांना मुळं फुटावीत.. मन खोडासारखं टणक बनावं.. असं म्हणत शेवटी ‘या देहाने गाणारा हा वृक्ष बनावे बहरुन यावे / वठून गेले तरी नव्याने बी इवलेसे पुन्हा रुजावे..!’ अशी इच्छा व्यक्त केलीय.

या संग्रहातील कविता वाचताना, मेधवंती.. फांदोफांदी.. तृष्णित.. कांचनवाटा.. असे काही नवीन शब्द भेटतात. वृत्त-लयीसाठी असे शब्द कवी निर्माण करत असतो. विशेष म्हणजे निरुपमा यांच्या कवितांमधली ही शब्दयोजना कृत्रिम वाटत नाही.

‘आजी’, ‘कंठा’, ‘आईनंतर’ अशा काही कवितांमधे मानवी नात्यांचे भावपूर्ण चित्रण आहे तर ‘जत्रा’, ‘धनी’, ‘कपिला’ अशा काही कवितांमधे गावाकडलं चित्र उभं केलंय. या प्रत्येक कवितेची लय तिच्या आशयाला साजेशी आहे.

‘ती’, ‘भूमिती’, ‘समुद्र’, ‘आयुष्य’, ‘सूज्ञ’, ‘त्राता’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. देहविक्रय करणार्‍या ‘ती’विषयीच्या ‘ती’ या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘ती भक्ष्य कोडगे बनते / पचवून वेदना सारी / अन इथे सुखाने जगती / कुलवंत घरांच्या पोरी’. वेगळ्या प्रतिमा असलेल्या ‘भूमिती’ या कवितेत म्हटलंय, ‘मीच माझ्या आकृत्यांचे / जोडले नाहीत बिंदू / जीवनाच्या भूमितीची / क्लिष्टता कोणास सांगू?’

अशा कितीतरी ओळी उद्‍धृत करता येण्यासारख्या आहेत. पण तेवढ्यावर भागण्यासारखं नाही. ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पूर्ण कवितासंग्रहच निवांतपणे समरसून आस्वादायला हवा..!

आसावरी काकडे

 

 

सावल्यांच्या अंतरंगात डोकावणार्‍या कविता-

‘अनुबंध क्षितिजाचे’, ‘बिन काचेचा बर्फ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता डॉ मिलिंद शेंडे यांचा ‘अंतरंग सावल्यांचे’ हा तिसरा कवितासंग्रह येतो आहे. लिहिलेल्या, संग्रहरूपात प्रकाशित झालेल्या ‘दृश्य’ कविता एका अर्थाने उत्तरार्ध असतात. त्यांचा पूर्वार्ध जमिनीखालच्या मुळांसारखा कवीच्या व्यक्तित्वात पसरलेला असतो. या पूर्वसंचितातूनच उगवलेल्या असतात प्रकाशित झालेल्या कविता..! मिलिंद शेंडे यांनी चार विषयात एम. ए. केल्यावर समाजशास्त्र विषयात पीएच डी पदवी संपादन केलेली आहे. कवी ग्रेस आणि सुरेश भट यांचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असण्याचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे....’ त्यांच्या कवितांना इतका समृद्ध ‘पूर्वार्ध’ लाभलेला आहे.

आता प्रकाशित होत असलेल्या कवितासंग्रहाचे ‘अंतरंग सावल्यांचे’ हे शीर्षक मिलिंद शेंडे यांच्या आधीच्या कवितासंग्रहांच्या शीर्षकांसारखेच वेगळे, विचार करायला लावणारे आहे. त्यावरून आतील कवितांचा पोत काय असेल ते लक्षात येण्यासारखे आहे. ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण शंभर कविता आहेत. त्या सलग वाचताना प्रथम वाचनात मनापर्यंत पोचत नाहीत. तरी त्यावर घाईनं काही शेरा मारता येत नाही. कारण या कवितांमधल्या कितीतरी जागा कविता परत वाचायला हव्यात हे सांगत असतात. ‘अंतरंग सावल्यांचे’ या संग्रहातील कवितेत आलेल्या प्रतिमा आणि लयबद्धता या दोन्हीवर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो.

कवितेची लय आशयानुरूप असली की तिचं सौंदर्य व्दिगुणीत होतं. पण हे सहजसाध्य असत नाही. कवितेची लय पकडण्यासाठी ठराविक अक्षरसंख्या, त्यांचा ठराविक अनुक्रम आणि ठराविक मात्रा यांचे नियम पाळावे लागतात. दीर्घ रियाजाखेरीज हे जमण्यासारखे नसते. लयीची उपजत जाण असेल तर कवितेत सहजता येते. अन्यथा बरीच कसरत करावी लागते. ती करताना कधी आशय निसटतो तर कधी लय चुकते. मिलिंद शेंडे यांनी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

कवितेतील प्रतिमांमुळे कवितेची शैली तयार होते. ही शैली म्हणजेच कविता अशा अर्थाची कवितेची एक व्याख्या आहे- Poetry is not the thing said, but the way of saying it.’ कवितेची प्रत, पोत या प्रतिमांमुळे ठरतो. मिलिंद शेंडे यांच्या कवितांमधे नदीचा काठ, भय व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा... अशा प्रतिमा सहज येतात. त्यांचे बोट धरून कवितांमधे शिरता येते. काही उदाहरणं सलग पाहिली की या कवितांची जातकुळी लक्षात येईल.

‘झुल्यावरी थोड्यातरी आठवणी बांधू

देता देता एक झोका पारंबीला सांगू’ (‘आठवण’)

सांग पावलांना कसा लागे दिवसाचा शोध

तसा पणतीच्या उजेडाला अंधाराचा बोध’ (‘भय’)

‘किती सलावा किती रुतावा किती खुपावा काटा

कुठून येती फूलपाखरे उडून जाती वाटा (‘वाटा’)

‘सांगू कसे दुःख तुला सवतीच्या पोरा

भिल्लिणीचे भाग्य लाभो रामाच्याही बोरा’ (भाग्य)

‘माझा कापराचा देह

तुला जळायची भीती (भयभार)



‘सोडूनिया गेली दूर काठावरी नाव

ओळखीच्या सावलीचे आठवते गाव (ओंजळ)

कशी दाटते सांग ना मनी आंधळीच माया

कोण घालते उखाणा पुन्हा कातडी सोलाया (आधार)

या ओळी असलेल्या कविता मला अमूर्त चित्रासारख्या वाटल्या. अमूर्त चित्रं फक्त अनुभवायची असतात. त्यावर भाष्य करता येत नाही. त्यांचा अर्थ लावता येत नाही. या कविता वाचताना प्रत्येकाला त्याचा त्याचा आशय गवसेल, गवसावा. त्यावर काही भाष्य करून दिग्दर्शन करू नये असे वाटले.

या संग्रहात काही मुक्तछंद कविताही आहेत. त्यातील काही उदाहरणं

नेटाने पुढे पाऊल टाकणारे आपण

आतल्या आत किती जखमी होत असतो (अंधार)

‘कोणती अनामिक भीती प्रत्येकाला ग्रासत आहे

श्वासामधले श्वासही आता एक विषाचा प्याला आहे. (भीती)

‘जखमा’ या कवितेत वाड्याची भव्य ओनरशीप इमारत होते तेव्हा अंतर्बाह्य काय काय परिवर्तन होते याचे वास्तव चित्रण केलेले आहे. ‘प्रवाह’ ही एक छान जमून गेलेली कविता आहे. यात मनातल्या अस्थिरतेचं हृदयस्पर्शी चित्रण आहे. या शिवाय ‘दिवेलागण’, ‘सारीपाट’, ‘माझा धर्म’, ‘क्षितिज’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत.

ही उदाहरणं ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचायची उत्सुकता वाढवणारी आहेत. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. मिलिंद शेंडे यांच्या कवितांना रसिकांची भरभरून दाद मिळावी, त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिक सकस कवितालेखन होत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

 

कविता : ‘स्व’-शोधाचे माध्यम

कवितेविषयी असंख्य लोकांनी असंख्य प्रकारे लिहिलेले आहे. कवितेची परंपरा, कवितेचं स्वरूप, विशिष्ठ कालखंडातील कवींच्या कविता, ग्रामिण.. स्त्रीवादी.. दलीत.. निसर्ग.. महानगरीय... कवितांविषयी, मुक्तछंद.. वृत्तबद्ध.. गझल.. दीर्घकाव्य.. अनुवादित... अशा विविध काव्यप्रकारांविषयी... कवितेची अस्तित्व रूपे, कवितेतील आदिबंध, अशा विविध प्रकारे केलेली कवितेची समीक्षा... अभिजात – रोमँटिक - वास्तववादी कविता.. अशा नानाविध प्रकारे कवितेवर लिहिले गेले आहे. लिहिले जात आहे. जोवर माणूस आहे तोवर कविता आहे आणि तोवर कवितेविषयी लिहिलं जणार. पण हे सर्व वाचून कविता लिहिता तर येत नाहीच पण कविता लिहिता लिहिता ती जशी उमगत जाते तशी उमगतही नाही. कविता माझ्यासाठी काय आहे, मी कवितेकडे कसं पाहाते हे तर स्वतःच्या अनुभवातूनच सांगता येते.

गेल्या पस्तीस वर्षांपासून मी कविता लिहिते आहे. कवितेविषयी लिहिलेलं वाचते आहे. कविता लिहिता लिहिता कवितेविषयी मला उमगत गेलं ते लिहिते आहे. माणदेशातील लेखक व अभ्यासक डॉ. सयाजीराजे मोकशी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ‘कविता : रूपबंध आणि आशयद्रव्य’ हा गौरवग्रंथ निघतो आहे. यात विविध अंगाने कविता या साहित्यप्रकाराची सैद्धांतिक चर्चा करणारे लेख समाविष्ट केले जाणार आहेत. ‘कविता : ‘स्व’शोधाचे माध्यम’ या विषयावर मला लिहायचे आहे. हा विषय समोर आल्यावर मला माझी एक कविता आठवली.-

‘केवळ असण्याचा

जगण्यात अनुवाद करायचा

तर कळायला हवी भाषा

असण्याची, जगण्याची

 

जशी चित्रकाराला

कळावी लागते

रंगांची, आकारांची भाषा

 

आणि भाषा कळणं म्हणजे

अनुभूतीत

स्वतःचा सारांश प्रतीत होणं

असण्याचं उद्‍घाटन करणारी

कविता लिहिता येणं !

***

(‘उत्तरार्ध’ संग्रहातून)

कोवळं, नाजूक बीज उगवण्याच्या ऊर्मीतून जमिनीचे कठीण आवरण निकराने बाजूला सारत उगवते... अंतस्थ आशय कवितारूप घेऊन बाहेर पडताना अशीच अनेक आवरणं बाजूला सारत स्वतःचे उद्‍घाटन करत असतो. त्यामुळे ‘कविता असण्याचं उद्‍घाटन कसं करते?’ हे समजून घेणं म्हणजेच कवितेच्या माध्यमातून ‘स्व’चा शोध कसा घेता येतो हे समजून घेणं आहे.

रोजचं आयुष्य जगताना असंख्य प्रश्न भेडसावत असतात. ते बहुतेक सर्व व्यवहाराच्या पातळीवरचे अत्यावश्यक आणि तातडीचे असतात. ते सोडवण्यातच बहुतेक शक्ती पणाला लागते... पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही तात्त्विक पातळीवरचे प्रश्न असतात. ते असे- आपण इथं का आहोत? आणि आपल्या असण्याचं स्वरूप काय आहे? या पैकी पहिल्या प्रश्नाला तत्त्वज्ञानात उत्तरं आहेत. पण त्यात एकवाक्यता नाही. आणि ती सर्व तार्किक म्हणता येतील अशी आहेत.

दुसरा प्रश्न- आपल्या असण्याचं स्वरूप काय आहे? याचाही तत्त्वज्ञानात विस्ताराने शोध घेतला आहे. ते आपण आत्मनिरीक्षण करून बौद्धिक पातळीवर समजून घेऊ शकतो. कवितेची निर्मितीप्रक्रिया (खरं तर कोणत्याही कलात्मक अभिव्यक्तीची निर्मितीप्रक्रिया) म्हणजे ‘स्व’चे अनावरण असते. हे विस्ताराने समजून घ्यायचे तर सुरुवातीला ‘स्व’ म्हणजे काय? त्याचे स्वरूप काय? आणि कवितेची निर्मितीप्रक्रिया काय? ती ‘स्व’चे अनावरण कसे करते? हे समजून घ्यायला हवे.

स्वशोध, आत्मशोध असे शब्द बरेचदा सहज वापरले जातात. त्याविषयीची आपली समजूत काहीशी मोघम स्वरूपाची असते. पण ‘स्व’ म्हणजे नक्की काय? त्याचा शोध कसा घ्यायचा? मुख्य म्हणजे कुणी घ्यायचा? हरवलेल्या वस्तूचा शोध, फरार गुन्हेगाराचा शोध, किंवा वेगवेगळे वैज्ञानिक शोध या सगळ्याहून स्व-शोधाचं स्वरूप पूर्णतः वेगळं आहे. ‘स्व-शोध’मधे हा शोध स्वतःच घेणं अभिप्रेत आहे. ‘स्व’चा शोध ‘स्व’नेच घ्यायचा हे गोंधळवणारं आहे. पण सूक्ष्मपणानं काही समजून घ्यायचं असेल तर असे सूक्ष्मात नेणारे प्रश्न पडणं, गोंधळून जाणं, त्या प्रश्नांनी अस्वस्थ होणं गरजेचं असतं...

‘स्व’विषयीचे प्रश्न तर सुटलेले नाहीत पण स्व-शोधाची असोशी अधीर करतेय अशा काहिशा गोंधळलेल्या मनःस्थितीतली माझी एक कविता आहे-

“मी स्वतः साक्षी आहे / पण कळत नाहीय / ही तडफड कसली!/ काही उगवते आहे नव्याने / जमिनीचे निबर कवच फोडून / की विस्कटते आहे सारे आतून? / कळत नाही / धुवांधार कोसळणारा हा पाऊस / हलवून, जागी करून / शांतविणार आहे तृष्णा?/ की वाहून नेणार आहे जमविलेले सारे?/ कळत नाहीय / व्हावे सन्मुख वेदनेला / अपार करूणेचे बाहू पसरून / की मौनच बरे?”

ही कविता लिहिली त्या दरम्यान मी संत तुकारामांची गाथा वाचत होते. त्यातील ईश्वरभेटीचा आकांत केवळ बुद्धीला पटत नाही म्हणून नाकारता येत नव्हता. मग मनाला प्रश्न पडू लागले. ईश्वरभेटीची म्हणजे नेमकी कशाची तहान व्यक्त होत होती अभंगांमधून? या व्याकुळ भक्तीला नेमकं काय हवं होतं? ही जिज्ञासा मला अस्वस्थ करत राहिली... त्यातून झालेल्या पाठपुराव्यातून हे लक्षात आलं की आंतरिक परिवर्तनासाठीचा अत्यंतिक सच्चा ध्यास- लाहो (गाथेतला शब्द) असं त्या तहानेचं स्वरूप होतं. ‘स्व-शोध’ ही त्याची स्वाभाविक सुरुवात होती. ईश्वरप्राप्तीची प्रचीती ही सांगता आणि अभंग-लेखन हे त्याचं साधन होतं..! माझ्या जिज्ञासेला मिळालेलं हे उत्तर मला मार्गदर्शक ठरलं. पण स्व-शोधातली उत्कटता आणि आवश्यकता जाणवणं पुरेसं नव्हतं. ‘स्व’ म्हणजे नेमकं काय? हा महत्त्वाचा प्रश्न अधिक अभ्यासाची मागणी करणारा होता...

‘स्व’ म्हणजे काय?

या प्रश्नाच्या अस्वस्थ करणार्‍या तगाद्यातून यथाशक्ती होत राहिलेल्या अभ्यासातून हे लक्षात आलं की अनेकांनी अनेक तर्‍हांनी या प्रश्नाचा छडा लावायचा प्रयत्न केला आहे. सर्वमान्य एकच एक अशी ‘स्व’ची व्याख्या नाही. स्व म्हणजे साध्या भाषेत मी. आपल्याला हे सहज समजू शकतं की माझं नाव म्हणजे ‘मी’ नव्हे. हात-पाय ही कर्मेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे. किंवा कान नाक.. ही ज्ञानेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे... आपलं पूर्ण शरीर, आपलं दिसणं म्हणजेही ‘मी’ नव्हे... फुलाची एकेक पाकळी बाजूला करत फूल शोधत गेलं तर फूल म्हणून हातात काहीच उरत नाही. ‘स्व’च्या बाबतीत अभ्यासकांचं तसंच झालं...

मग ‘स्व’ असं काही नाहीच अशी काहींनी भूमिका घेतली तर दृश्य अशा आपल्या रूपापलीकडे काहीतरी असलं पाहिजे त्याशिवाय आपल्या अस्तित्वाची पुरेशी संगती लावता येणार नाही अशी काहींनी भूमिका घेतली. ते काहीतरी म्हणजे आत्मा. आपल्याला हा शब्द ऐकून परिचयाचा झालेला आहे. पण आत्मा म्हणून दाखवता येईल असं काही नाही. खरं तर काही नसण्याला दिलेलं ते एक नाव आहे. ती एक संकल्पना आहे. ती सूक्ष्मात जाऊन समजून घेणं महत्त्वाचं आणि रंजक / interesting आहे. विनोबा भावे यांनी त्यांच्या ‘ईशावास्य-वृत्ति’ या पुस्तकात आत्मा शब्दाची निर्मिती कशी झाली ते लिहिलं आहे. त्याचा सारांश असा- अस्तित्वाच्या तीन पातळ्या आहेत. एक- केवल असणं- (to be., Being.) दोन- घडणं, होणं- (to become., becoming)  आणि तीन- घडलेलं असणं- दृश्य विश्व. (आपल्याला दुसर्‍या दोन पातळ्या समजून घेता येतात. पण केवल असणे ही पातळी समजून घेणं अवघड आहे. हे पुस्तक आहे, ते इथे आहे, ते निळं आहे, त्याला कोरा वास आहे.. असण्याच्या अशा कोणत्याही मितींखेरीजचं नुसतं असणं आपल्याला कळत नाही. ज्ञानेंद्रियांच्या आधारे जाणून घेण्याच्या त्या मर्यादा आहेत.) आत्मा म्हणजे केवल असणं आणि होणं- (Being आणि Becoming) या पहिल्या दोन पातळ्यांचं मिश्रण..! होऊ शकणारं ‘असणं’, घडण्याची क्षमता असलेलं ‘असणं’... आणि तिसरी पातळी म्हणजे अस्तित्व.

अस्तित्ववादी विचारवंतांनी माणसाच्या स्वरूपाच्या अभ्यासाला प्राधान्य दिलं. Authentic- खरंखुरं जगण्याचा आग्रह धरला. सार्त्र हे त्यापैकी एक महत्त्वाचं नाव. ‘Being and Nothingness’ या आपल्या जाडजूड ग्रंथात त्यानी माणसाच्या स्वरूपाचा सांगोपांग विचार केला आहे. त्यात म्हटलंय त्यानुसार संपूर्ण अस्तित्वाचे दोन स्तर आहेत- एक जाणीव (consciousness) असलेल्या माणसांचा आणि दुसरा जाणीव नसलेल्यांचा. जाणीव नसलेल्या वस्तूंसारखं माणसाचं साररूप ठरलेलं नाही. Instead of essential core they have Nothing’. माणसाचं ‘स्व’रूप ठरलेलं नाही. माणूस ही एक अखंड प्रक्रिया आहे. ‘Making of a self’ आहे. माणसाला शरीर असतं आणि जाणीवही असते. शारीर पातळीवर तो Being-रूपात- म्हणजे भौतिक स्वरूपाचा असतो आणि जाणीवेच्या पातळीवर Nothingness-रूपात असतो. माणसाला जाणीव असल्यामुळे तो वेगळेपणानं भोवताल जाणू शकतो. वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. विशेष म्हणजे आपण अनुभवतोय हेही जाणू शकतो. अनुभव घेताना होणारी आपल्या असण्याची जाणीव म्हणजे ego - मी. प्रत्येक अनुभव ‘मी आहे’ याचं भान देत असतो. हे अस्तित्वभान म्हणजे ego - मी. माणसाची जाणीव भोवतीच्या जगाप्रमाणे या ‘मी’वरही लक्ष ठेवून असते. भोवताल अनुभवणारा हा मी अस्थिर असतो. सतत बदलत असतो. तो भोवतीच्या घटनांचा अर्थ लावू शकतो. स्वतःला हवं तसं घडवू शकतो...

सार्त्र यांनी म्हटलं आहे- माणसाला स्वतःला घडवण्याचं, हवं ते करण्याचं, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण माणसाची गोची अशी की त्याला हे स्वातंत्र्य नाकारण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही. ते त्याला वापरावंच लागतं. या संदर्भातलं त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे- Man is condemned to be free ! हे स्वातंत्र्य नाकारणं म्हणजे माणूसपण नाकारणं. सार्त्र यांनी अशा पलायनाला बॅड फेथ असं म्हटलं आहे.

तत्त्वज्ञानाच्या संकल्पनाकोशात (Oxford Dictionary of Philosophy) self’ विषयीची एक टीप आहे. ती अशी- ‘self is the elusive Ithat shows an alarming tendency to disappear when we try to introspect it.’ ‘स्व’ म्हणजे फसवा ‘मी’. अंतर्मुख होऊन त्याविषयी विचार करायला लागावं तर तो नाहीसाच होतो... जसा दृश्य टिपणारा कॅमेरा दृश्यात कधीच येत नाही. त्याला दृश्यात घ्यायचं तर आणखी एक कॅमेरा लागेल. तो या कॅमेर्‍याला दृश्यात पकडेल पण स्वतः दृश्याबाहेरच राहील... ‘स्व’ला जाणू पाहणारा स्व असाच समजुतीतून निसटत असतो.

मग स्व-शोध म्हणजे काय?

जेव्हा ‘स्व-शोध’ असं आपण म्हणतो तेव्हा ‘स्व’चा शोध घेणारा ‘स्व’च असतो ही गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी… शोधणारा ‘स्व’ कोण? आणि ज्याला शोधायचं तो कोण? रोजच्या जगण्यात बरेचदा ‘कोणा होते ज्ञान? विस्मरे ते कोण? शंका घेते कोण आत माझ्या?..’ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करत असतात. आपण खूपदा स्वतःला दोष देतो किंवा स्वतःवर खूष होतो. या प्रक्रियेत दोन मी असतात. एक दोषी किंवा बरोबर मी आणि दुसरा दोषी ठरवणारा किंवा खुष होणारा मी... हे दोन ‘मी’ कोण? आपल्या तत्त्वज्ञानात साक्षी मी आणि भोक्ता मी अशी ‘मी’ची दोन रूपं किंवा दोन स्तर सांगितले आहेत. एक जगणं अनुभवणारा, इथे वावरणारा, सतत बदलत असलेला मी आणि दुसरा हे सर्व नुसतं पाहात असलेला जाणीवस्वरूप साक्षी मी. तत्त्वज्ञान या ‘साक्षी मी’चा शोध घेतं आणि अध्यात्म याच ‘मी’च्या प्रचितीची आस धरतं.

आपल्याला माणसातील इथे वावरणार्‍या, प्रक्रियास्वरूप असलेल्या ‘मी’च्या शोधाविषयी म्हणजे पहिल्या, व्यावहारिक टप्प्याविषयी जाणून घ्यायचे आहे.

आपण पाहिलं की या ‘मी’चं स्व-रूप ठरलेलं नाही, स्व-शोध ही एक अखंड प्रक्रिया आहे. स्व-शोध म्हणजे साध्या व्यवहारी भाषेत स्वतःला ओळखणं. माझी बलस्थानं कोणती? मर्यादा कोणत्या? मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? काय साधायचं आहे?... स्व-शोध म्हणजे हे सर्व प्रत्यक्ष जगण्यातून जाणून घेत घेत आपण काय होऊ शकतो याचा शोध घेत राहाणं, आपल्यातील वाव न मिळालेल्या सूक्ष्म क्षमतांचा शोध घेणं. या प्रक्रियेत सतत सजग असणं, स्वतःला तपासत राहणं, आत्मपरीक्षण करणं, आपण कुठे चुकलो, का चुकलो, काय काय करता आलं असतं याचा विचार करणं... हे सर्व येतं.

कवितालेखन याचं माध्यम कशी होते?

स्व-शोधासाठी वेगळं कविता-लेखन करावं लागत नाही. पण लेखनामागची भूमिका नक्कीच वेगळी असावी लगते. आपण नेमकं का लिहितो आहे? याविषयी सजगता, लेखनकृतीमधे जाणीवनिष्ठा आणि माणूसपणाशी बांधिलकी हवी. मुळात वाट्याला आलेल्या आयुष्याचं काय करायचं आहे या विषयीची गंभीर आणि ठोस भूमिका घेतलेली असायला हवी. वर्तमानातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक अशा सर्व आयामांनी बनलेल्या समग्र अस्तित्वाचं भान ठेवत स्वतःशी प्रामाणिक राहून कवितालेखन व्हायला हवं. केवळ हौस, वेळ घालवायचं साधन किंवा इतर कुठल्याही सवंग कारणानं कविता लिहिली जात असेल तर असं कवितालेखन स्व-शोधाचं माध्यम होणं अवघड आहे.

कोणत्याही कवितेचा विषय, मांडणीची तर्‍हा- शैली, शब्दांची निवड... अशा प्रत्येक अभिव्यक्तीतून ‘स्व’च व्यक्त होत असतो. म्हणून तर प्रत्येकाचं कवितालेखन वेगळं असतं. एकाच साहित्यकृतीचा अनुवाद अनेकांनी केला तरी प्रत्येक अनुवादाचा पोत अनुवादकाच्या ‘स्व’शी नातं सांगणारा असतो. कथा-कादंबर्‍यांमधल्या पात्रांमधूनही कोणत्या ना कोणत्या प्रकारे लेखकाचा स्व डोकावत असतो. इतकंच काय संशोधनपर लेखनातही लेखकाच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहात नाही. या दृष्टीनं विचार करता कोणतंही लेखन एक प्रकारे लेखकाचं आत्मचरित्रच असतं...

कवितेशिवाय अगदी स्वतःपुरतं केलेलं खाजगी स्वरूपाचं डायरीलेखन थेटपणे स्व-संवाद साधू शकतं. स्वतःची उलट तपासणी घेऊ शकतं. आत्मपरिक्षण करू शकतं. असं लेखन म्हणजे स्व-शोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग..! अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा तळमळीतून झालेलं लेखन मेडिटेशनचा परिणाम साधणारं असतं. ते स्व-समुपदेशन- सेल्फ काउन्सीलींग करणारंही होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं लेखन कुणीही करू शकतं ! या लेखन-प्रक्रियेत कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकुळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळे आतल्या आत होत राहणार्‍या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं... ही प्रत्यक्ष अनुभवून बघण्यासारखी गोष्ट आहे..! डायरीलेखन मला कवितेइतकं महत्त्वाचं वाटतं. एका पातळीवर ते कवितेशी सममूल्य आहे.

कवितानिर्मिती-प्रक्रिया काय आहे? या प्रक्रियेत काय घडतं?

जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं कवितालेखन घडत असतं. त्याच वेळी या लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं कवितालेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ‘कवितान्तरण’ या अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी- ‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

हा मुद्दा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक समृद्ध, प्रगल्भ, चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- ‘बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि कवितालेखनाचा रियाज या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी कवितेची निर्मिती-प्रक्रिया समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण कविता लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी ‘मी’पासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... ही प्रक्रिया अशी समजून घेता येईल- आपण जे लिहितो ते संदिग्ध आशयाच्या रूपात आधी मनात रेंगाळत असतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, काही अंशी स्वतःची ओळख होणं..! उदा. एखादा उत्कट अनुभव तुम्ही कविताबद्ध करताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या दृष्टिकोनातून अनुभवलेलं तुम्ही कवितेतून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही लिहीत असता तुमच्या अनुभवाविषयी. हे लिहिणं म्हणजे त्या अनुभवाविषयीचं तुमचं आकलन असतं. त्याचवेळी त्या अनुभवाकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन तुम्हाला होत असतं. तुम्ही एखादा अनुभव घेता तेव्हा तुम्हाला त्यातलं नेमकं काय भावलं, का भावलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. माणूस म्हणून विकसित होण्याची ती सुरुवात असते. एखादी कविता लिहिताना किंवा एखाद्या घटनेविषयी लिहितानाही असं सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही...! कुसुमावती देशपांडे यांनी ‘पासंग’ या आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- ‘काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’... आपण लिहित असताना त्या लेखन-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेत केवळ मनाला संदिग्धपणे जाणवलेलंच अधिक स्पष्ट होतं असं नाही तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात..! ती आपली नवी ओळख असते. कविता लिहिण्याच्या प्रक्रियेत कवीचं बोट सोडून अंतस्थ काही स्वतःच शब्दात उतरतं... अशा गोष्टी कवीला स्वतःची नवी ओळख करून देत उन्नत करणार्‍या ठरतात. कविता अशाप्रकारे स्व-आकलनाचं, स्व-शोधाचं माध्यम बनून लिहिणार्‍याचा विकास घडवत असते.

गांभिर्यानं, तादात्म्यानं केलेलं कविता-वाचनही स्व-विकासाचं साधन बनू शकतं. कारण ‘वाचन’ ही प्रक्रिया नाण्याच्या दुसर्‍या बाजूसारखी लेखन-प्रक्रियेशी अविभाज्यपणे जोडलेली असते. कवितालेखन म्हणजे encoding  तर तिचं वाचन म्हणजे decoding! आणि असं म्हटलं गेलंय की every decoding is another encoding!  चांगल्या,  प्रामाणिक कविता-लेखनातून किंवा वाचनातून आनंद मिळतो तो त्या प्रक्रियेत कणभर का होईना विकसित झाल्याचा आनंद असतो. म्हणून कवितेच्या लेखन-वाचनाकडे केवळ छंद, हौस यापेक्षा अधिक गांभिर्यानं पाहायला हवं..

त्यासाठी भाषेचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आणि रंजकही..

लेखन-वाचन या दोन महत्त्वाच्या कृतींचं माध्यम असलेली आपली भाषा ही मुळात केवळ एक चिन्ह-व्यवस्था आहे... बोलीभाषेचं द्रव्य ध्वनी तर लिखित भाषेचं द्रव्य आकार हे असतं. आपल्याला माहिती आहे की ध्वनी घर्षणातून निर्माण होतो. ओठ आणि जीभ यांच्या हालचालींमुळे श्वासाबरोबर आत-बाहेर होणारी हवा घासली जाते आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. या ध्वनी-रचनेतून शब्द तयार होतो. विशिष्ट ध्वनी-रचनेचा अमुक एक अर्थ असं काही संकेतांनी ठरत गेलं. पण हा अर्थ एका समूहापुरता मर्यादित राहिला. दुसर्‍या समूहाने तशाच ध्वनी-रचनेचा वेगळा अर्थ ठरवला. त्यामुळे प्रत्येक समूहाची भाषा वेगळी झाली. म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं नातं केवळ सांकेतिक आहे. काळ आणि भौगोलिक सीमांनुसार बदलणारं... शब्दांना स्वतःचा स्वयंभू अर्थ नसतो. ते रिकामे असतात. ध्वनी-रचना हे केवळ एक चिन्ह आहे. म्हणूनच बहुधा मर्ढेकरांनी म्हटलं आहे- ‘शब्द बापुडे केवळ वारा..’ आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे जे पाच विषय आहेत त्यातला एक विषय शब्द- ध्वनी हा आहे आणि त्याची सांगड आकाशतत्त्वाशी म्हणजे एकप्रकारे निराकाराशी घातलेली आहे. भाषेचं हे मूळ सूक्ष्म स्वरूप समजून घेतलं तर कुठल्याही भाषावादातील पोकळपणा लक्षात येऊ शकेल...

लिखित भाषेत प्रत्येक ध्वनीरचनेला एकेक आकार ठरवला गेला. अमुक आकार म्हणजे अमुक ध्वनी हेही संकेतांनी ठरलं. त्यामुळे प्रत्येक समूहाची लिपीही वेगळी झाली. ध्वनी-रचना या एका स्तरावरील चिन्हांसाठी ठरलेले आकार ही लिखित भाषेतली चिन्ह-व्यवस्था. लिपी. लेखन म्हणजे encoding आणि वाचन म्हणजे decoding असं वर म्हटलंय त्याचा अर्थ भाषेचं हे मूळ स्वरूप समजून घेतल्यावर अधिक चांगला कळू शकेल...

भाषेच्या वापराविषयीचं आकलन लेखन-वाचनासाठी आवश्यक आहे. शब्दांचा वापर तीन स्तरांवर केला जातो- १) अभिधा- म्हणजे ठरलेला, कोशातला अर्थ, वाच्यार्थ. २) लक्षणा- म्हणजे वाच्यार्थ पुसला जाऊन संदर्भावरून ठरणारा अर्थ आणि ३) व्यंजना- म्हणजे सूचित होणारा, किंवा सूचित केलेला अर्थ. कवितेतली शब्दयोजना बर्‍याचदा या स्तरावरील अर्थाने होते. तिथे शब्दाचा वाच्यार्थ लक्षात घेतला तर तो हास्यास्पद ठरतो. वाचताना लिखित संहितेचा खोल सूक्ष्म अर्थ समजण्यासाठी आणि लिहिताना नेमकी, संपृक्त शब्दयोजना करता यावी यासाठी शब्दांच्या या त्रिविध सामर्थ्याची आणि भाषेच्या स्वरूपाची जाण असावी लागते.

इतर साहित्य-प्रकारांच्या मानानं कवितेसाठी शब्दयोजना करताना भाषेच्या या स्वरूपाचं भान असणं विशेष गरजेचं आहे. चांगली, उत्स्फूर्त कविता स्वतःचे शब्द घेऊनच व्यक्त होते. हे खरं असलं तरी व्यक्तिच्या कमावलेल्या पूर्वसंचितातूनच ते उगवत असतात. हे संचित आपण करत असलेल्या साधनेमुळे समृद्ध होत असतं. अभ्यास, साधना, किंवा जन्मजात प्रतिभेचं देणं नसेल तर उत्स्फूर्ततेच्या नावाखाली सहज हाताशी असलेले शब्द वापरून टाकले जतात. कविता लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना वापरलेल्या शब्दांवर त्रयस्थपणे विचार केला तर ते तितकेसे समर्पक नाहीत असं लक्षात येऊ शकेल. कवितेतील शब्दयोजना कशी असावी?... अंतस्थ आशय व्यक्त करणारे शब्द वेचण्यासाठी तहानेनं व्याकुळ होऊन जगण्याच्या तळ्यात बुडी मारायला हवी, जिवाच्या आकांतानं अस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं उत्खनन करायला हवं किंवा तपश्चर्या करून जिंकून घ्यायला हवेत हवे ते शब्द आकाशतत्त्वाकडून.

कवितेसाठी आयते, स्वतः न कमावलेले पिढ्यानढ्यांचे उष्टे शब्द न स्वीकारता इतक्या परोपरीनं, स्वतःला अभिप्रेत आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा शब्द शोधणं ही स्वतःच्या अनावरणाचीच प्रक्रिया असते. कारण असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःला नेमकं काय अभिप्रेत आहे ते शोधणं असतं..! उदा. समजा कावितेतून अस्वस्थता व्यक्त करायची आहे.. त्यासाठी शब्दयोजना करतांना त्या अस्वस्थतेची प्रत काय आहे, तिची तीव्रता किती आहे, तिच्या मागे कोणती कारणपरंपरा आहे या सगळ्याचा नकळत विचार होतो आणि तिचं नेमकं स्वरूप व्यक्त करणारा शब्द योजला जातो. शब्द-निवडीची ही प्रक्रिया आपल्याला आपली ओळख करून देते... कवितेत बर्‍याचदा व्याकरणाची, शब्दांची मोडतोड केली जाते किंवा भाषेत नसलेले नवेच शब्द योजले जातात, नवी शैली निर्माण केली जाते ते आपलं स्वतःचं वेगळं वाटणं वेगळेपणानं व्यक्त करण्यासाठीच..! अर्थात हे खर्‍या, जाणीवनिष्ठ निर्मितीतच फक्त शक्य आहे. निर्मिती-प्रक्रियेतली ही निस्सिम जाणीवपूर्वकता ‘स्व’च्या अधिकाधिक जवळ नेणारी असते...!

थोडा स्वानुभव, थोडं निरीक्षण आणि अभ्यास याच्या आधारे ‘स्व’ म्हणजे काय? स्व-शोध म्हणजे काय? हे स्पष्ट करत अस्तित्वभान देत कविता स्व-शोधाचं माध्यम कशी होऊ शकते हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...

आसावरी काकडे

१४.३.२०२३

 श्यामसुंदर मिरजकर यांनी संपादित केलेल्या ‘कविता रूपबंध आणि आशयद्रव्य’ या ग्रंथात समाविष्ट.

 

 

 

 

 

 

 

 

 

Wednesday 15 February 2023

‘नादब्रह्म’ चे स्वागत-

शब्दांतून व्यक्त होता येणार्‍या प्रत्येकाचं कविता हे पहिलं प्रेम असतं. कारण कविता थोडक्यात बरंच काही सांगते. ती एकाच वेळी आत्मनिष्ठ असते आणि सार्वत्रिकही असते. कवितेत सहसा नावं येत नाहीत. सर्वनामं येतात. त्यामुळे आशय विशिष्ठतेची मर्यादा ओलांडून सार्वत्रिक होतो. कविता संग्रहरूपात प्रकाशित झाल्यावर तर त्या कवीचं बोट सोडून वाचणार्‍या सर्वांच्या होतात. दाद मिळते. ही सर्व प्रक्रिया लिहिण्याची ऊर्जा वाढवणारी असते.

‘उन्मुक्त’ या पहिल्या कवितासंग्रहानंतर विद्याधर फडणवीस यांचा ‘नादब्रह्म’ हा दुसरा कवितासंग्रह अशाच उर्जेतून प्रकाशित होतो आहे. संग्रहाचं शीर्षक आणि त्याला साजेसं सुंदर मुखपृष्ठ कवितांविषयीची उत्सुकता वाढवणारं आहे. श्री फडणवीस यांनी विविध विषयांवर लिहिले आहे. विशेष म्हणजे या सर्व कविता छंदोबद्ध आहेत. छंदोबद्ध कविता लिहिताना कवितेची लय साभाळणं ही मोठी जबाबदारी असते. छंदोबद्धतेचे नियम पाळताना मनातील नेमका आशय शब्दात उतरवणं हे कौशल्याचं काम आहे. ही कसरत करताना कधी आशय निसटतो तर कधी लय बिघडते. श्री फडणवीस यांनी आशय आणि लय दोन्ही सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यांना चांगल्या कवितेचं मर्म माहिती झालेलं आहे. ‘नवोदित’ या कवितेत ते म्हणतात-    

वल्मिकीचे दुःख मोठे वेदनेतुन काव्य येते

कोठुनी येणार उर्मी दुःख माझे तोकडे..!

दुःख, वेदना माणसाला पोखरत असतात. या पोखरण्यामुळे आतला पैस विस्तारत जातो. दुःख अनुभवत असताना अंतर्मुख होता आलं तर त्यातून उत्तम काव्य जन्माला येते. दुःख.. करूणेतून जन्माला आलेल्या वाल्मिकींच्या काव्योद्गाराचा दाखला देत श्री फडणवीस यांनी म्हटले आहे दुःखाच्या त्या प्रगल्भतेपुढे माझे दुःख तोकडे आहे. मग तसे काव्य लिहिण्याची उर्मी कुठून येणार? आदर्श डोळ्यासमोर असणं आणि आपल्या मर्यादांची जाण असणं ही प्रगल्भ समज प्रगतीपथावर पुढे पुढे नेणारी असते.

‘उत्तर’ या कवितेत ‘रे आकाशा आयुष्याचे उत्तर शोधू..’ असं म्हणत फडणवीस सामान्य जीवन जगताना कोणत्या, कशा समस्या येतात ते सांगतात. संसारातले हे प्रश्न न संपणारे. एकाचं उत्तर मिळतंय असं वाटतं तोवर नवा प्रश्न समोर येतो... मनू या मानवाच्या मूळ पुरुषाचा संदर्भ देत कवितेत पुढे म्हटलं आहे-

‘अजून फिरतो मनू घेउनी प्रश्नांचे तारू

बुद्ध धाडले किती किनारी प्रश्न नव्याने सुरू’

मानवाच्या प्रश्नांना उत्तरं देणारे कितीतरी बुद्ध माणसाने बेदखल केले. तो पुन्हा पुन्हा नव्या प्रश्नांमधे अडकतच राहिला.. असं सूचित करणार्‍या या आशयघन ओळी वाचकाला थांबवून विचार करायला लावतात. ‘नादब्रह्म’ या संग्रहात वाचकांचं लक्ष वेधणार्‍या अशा आणखीही काही जागा आहेत. उदा. ‘गुंतलो नाही कुठे मी, मी जगाने वगळलेला / शोधितो मी तीर दुसरे, या तिरी ओशाळलेला..!’ (‘उपेक्षित’) ज्याची त्याची आस्वाद-प्रक्रिया वेगळी असते. त्यानुसार हा संग्रह वाचताना प्रत्येकाला वेगवेगळी सौंदर्यस्थळं भेटतील.

या संग्रहातील कवितांमधे मनू, वाल्मिकी, अहिल्या, द्रौपदी शकुंतला, अभिमन्यु, राधा कृष्ण.... असे बरेच पौराणिक संदर्भ आलेले आहेत. त्यावरून फडणवीस यांचा व्यासंग जाणवतो. सामाजिक वास्तवाचं चित्रण, बाबा, आजोबा, आई... अशा नात्यांमधील हार्दिकता, मानातली अस्वस्थता, कवितेविषयीची समज, प्रेमभावना.. अशा विविध विषयावरील त्यांचे चिंतन त्यांच्या कवितांमधे शब्दबद्ध झाले आहे. ‘छकुली’सारख्या काही कवितांमधे लहान मुलीचे भाव व्यक्त झाले आहेत.

श्री फडणवीस यांना ‘उन्मुक्त’ या पहिल्या संग्रहाप्रमाणे ‘नादब्रह्म’ या संग्रहालाही भरभरून दाद मिळो.. त्यातून आणखी सकस कविता लिहिण्याची प्रेरणा मिळो. ही हार्दिक शुभेच्छा..!

 

आसावरी काकडे

१३.२.२०२३