Saturday 31 December 2022

बीज म्हणे सृजनाला..

 सुरेखा मालवणकर यांचा ‘जीर्णोद्धार’ हा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. या संग्रहाच्या सुरुवातीलाच कवयित्रीच्या संवेदशीलतेचा परिचय होतो. ‘माणूस म्हणून जगताना’ या कवितेत शहराच्या उपनगरांमधून फिरताना कवयित्रीला जागोजागी झालेल्या पडझडीसोबत अवकळा आलेली माणसांची मनंही दिसतायत. तिला जाणवतंय की नशीबापेक्षा, देवापेक्षा माणसानंच माणसाला दुःखी केलंय.. भोवतीच्या परिसराच्या जीर्णोद्धाराआधी माणसांच्या मनांचा जीर्णोद्धार करायला हवा आहे..! ही भावना पुढील कवितांतूनही डोकावत राहाते. पूर्ण संग्रह वाचल्यावर ‘जीर्णोद्धार’ शीर्षकाचं मर्म उलगडतं.

या कविता एखाद्या सोज्वळ गृहिणीने साधेपणाने सजवलेल्या घरासारख्या वाटतात. शब्दांची, प्रतिमांची दिखाऊ आतषबाजी न करता कवयित्रीने  थेट आशय रसिकांच्या हातात ठेवला आहे. निसर्ग, समाज, नाती, प्रेम, भक्ती असे विविध विषय मुक्तछंद, गेय रचना, अभंग छंद, विडंबन अशा विविध अभिव्यक्तीच्या माध्यमातून मांडलेले आहेत.

काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. कवितेचं माहेरपणया कवितेत त्या म्हणतात, दरवळत राहीन जन्मभर तुझ्या आयुष्यात तुझा नवा जन्म होऊन..’ संवेदनशीलतेनं आजुबाजूला बघताना त्यांना जाणवतंय एका बाजूला ‘निसर्गाचं आरोग्य बिघडलंय..’ तर दुसर्‍या बाजूला माणूस ‘नेट’च्या व्यसनात बुडायला लागला आहे. मात्र कवयित्रीच्या मनात विश्वास आहे, ‘वादळाला सांग आता एकली तू आज नाही / सोसण्या हे हेलकावे मी पुरेशी नाव आहे.

या संग्रहातल्या ‘अंतर्श्वास माझे / वारी तुझी’, ‘मायेचा अनलिमिटेड वायफाय हवा / नात्यात निरंतर नेटवर्क असावे / जिव्हाळ्याची रेंज यावी अन्‍ जुने उणे दुणे फॉरमॅट व्हावे...!’... अशा काही ओळी आणि ‘कलावंत’, ‘सात्विक अनुभूती’, ‘नवे घर’.. अशा काही कविता उल्लेखनीय आहेत.

बीजाची उत्कटता जाणून ‘बीज म्हणे सृजनाला..’ अशी भावपूर्ण कविता लिहिणार्‍या या कवयित्रीला सृजनाची सोबत सदैव मिळो ही शुभेच्छा  

आसावरी काकडे

१.५.२०२२