Thursday 28 January 2016

ग्रीष्म...

श्री विदुर महाजन
यांना स.न.

तुमच्या ‘ग्रीष्म’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आम्हाला अगत्यानं बोलावलंत याचा आनंद वाटला. या निमित्तानं तुम्ही उभयता घरी आलात आणि तुमची दोन पुस्तकं भेट दिलीत याचंही अप्रुप वाटलं. प्रत्यक्ष भेटीमुळं आपला दृश्य परिचय झाला. पुस्तकांमुळं तुमच्या व्यक्तित्वाचा परिचय होतो आहे. आणि मैत्रबनात तुमच्या परीघासह तुमचा परिचय होईल...

तळेगावला यायचं ठरल्यावर तुमच्या कविता पुन्हा वाचल्या. अवघड काळात कोसळू लागलेल्या स्वतःला सावरताना शब्द कसं आणि किती बळ देतात याचा प्रत्यय कविता वाचताना येत राहिला. ‘गूढ तू... अचानक सोपी होतेस / अक्षर तू... मला कागद करतेस’ असं म्हणत कवितेशी संवाद साधून तिच्या आधारानं सुरू झालेला स्व-संवाद पुस्तकरूपात आल्यामुळं आता तो प्रकट चिंतनासारखा सर्वांपर्यंत पोचेल असा झाला आहे.

या प्रक्रियेला एका कवितेत तुम्ही पाचोळा गोळा करणं असं म्हटलं आहे. ही प्रतिमा एखाद्या लोलकासारखी अर्थाच्या अनेक छटा दाखवणारी वाटली. आंतरिक वादळात अस्ताव्यस्त होऊन नामरूप गमावून बसलेल्या भावनांचा पाचोळा गोळा करून त्यातून एक समजुतीचं कोलाज तयार केलंय तुम्ही... या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘त्याला कुणी काव्य म्हणतं / तर म्हणू देत बापडे..’ निर्मितीचा आनंददायी दिलासा मिळवून असं अलिप्त होणं सोपं नाही. आणखी एका कवितेत म्हटलंय, ‘बसलो आखलेल्या ओळींवर शब्द टांगायला / वही भरण्यासाठी नाही, रिक्त होण्यासाठी’.. लिहितानाच त्याविषयी अशी लख्ख समज असणं हेही अवघडच.

तुमच्या कवितांमधली खालील अभिव्यक्ती मला विशेष आवडली.-

‘नक्की आधार कुणाचा कुणाला?..

‘असण्या-नसण्याचं प्रयोजन..   

‘तू गेलास हे तरी खरं का / अन मी राहिलो हे तरी खरं का?..   

‘उफराटं दु:ख..    

‘मी मात्र पुन्हा त्याच शरीरात जन्मलो..

‘काहीच घडत नसतं तेव्हाही काहीतरी घडतच असतं..          

‘सापडत नाही काही ही एकच जाणीव उरते..

‘मिळत असतो वेदनेला अन्वयार्थ..

‘ठरवणारा, न ठरवणारा मी कोण..

या प्रत्येक ओळीवर बरंच भाष्य करता येण्यासारखं आहे. सारांशानं म्हणायचं तर या ओळींतून तुम्ही कमावलेली जगण्याविषयीची समजूत व्यक्त झालीय. पुरेसं अंतर्मुख झाल्याशिवाय असं शहाणपण हाती लागत नाही आणि नुसतं ठरवून अंतर्मुख होता येत नाही. बाहेरून एखादा जोरदार धक्का बसतो तेव्हाच दृष्टी खोल आत वळते..! आत वळलेल्या नजरेला दिसलेलं, समजलेलं, जाणवलेलं.. व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं हाताशी असणं हे निर्मितीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. या माध्यमांचा आंतरिक मेळ कसा साधला जातो ते बहुतेक वेळा कलाकारालाही उमगत नाही. तुमची ‘मारवा’ ही कविता याचं उत्तम उदाहरण आहे असं मला वाटलं. एका बाजूला आर्त, अनाकलनीय मनोवस्था.. दुसरीकडं सूर्य अस्ताला जाणं आणि तिसर्‍या पातळीवर कोमल रिषभ षड्जावर उतरणं..  ही सांगड तुम्हाला घालता आली तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मुक्तीनं कसं शांत केलं हे दुसर्‍या कुणाला समजणार नाही. मला वाटतं अनामिकाला नाव देता येणं, निराकाराला शब्दात साकार करता येणं या सारखा आनंद नाही.. कारण अनाकलनीयेतेच्या वेदनेतून निर्मिती-क्षणापुरती का होईना, मिळालेली मुक्ती असते ती..!

या कवितांच्या आजुबाजूला मिलिंद मुळिक यांची चित्रं आहेत. कवितांतल्या रिकाम्या जागांमधल्या आशयाला त्यामुळं दृश्यरूप मिळालं आहे. रंगांमधून व्यक्त होऊनही कवितेत जे अनुच्चारित राहिलंय/ठेवलंय ते चित्रांनीही तसंच अनुच्चरित राहू दिलंय. कवितेचं कवितापण त्यामुळं जपलं गेलंय. बाजूला राहून या चित्रांनी स्वतःला सामोरं जाण्यातली आर्तता अधोरेखित केलीय.. पण एवढंच नाही. या चित्रांना स्वतंत्र व्यक्तीमत्वही आहे. कवितेला ती पूरक आहेत पण कवितेशिवाय अपूर्ण वाटत नाहीत... त्यामुळं ‘ग्रीष्म’ ही एक सुंदर सहनिर्मिती झाली आहे.

या निर्मितीबद्दल दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.



आसावरी काकडे
२५ ऑक्टोबर २०१५.
९७६२२०९०२८


No comments:

Post a Comment