Sunday 27 August 2017

कुसुमाग्रजांच्या कवितेतील ईश्वर-शोध

ईश्वर ही एकमेव अशी संकल्पना आहे जी संपूर्ण जगातील प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली आहे..! असंख्य भोळ्या-भाबड्यांसाठी ईश्वर नवसाला पावणारा, चुकल्यावर कोपणारा असतो, श्रद्धाळूंसाठी प्रश्न सोडवणारा.. तर नास्तिकांना प्रश्न पाडणारा असतो. कलाकारांसाठी कलेचा विषय झालेला, ढोंगी बाबांसाठी अर्थार्जनाचं साधन झालेला तर समाजासाठी उत्सवाचं निमित्त झालेला असतो. संतांच्या भक्तीसाठी निर्गुण निराकार ईश्वर सगुण रूपात अवतरलेला असतो तर तत्त्वज्ञानासाठी तो केवळ तर्काच्या कसोटीवर कार्यकारणभावाने सिद्ध होऊ शकणारा कारणरूप असतो...

कोणताही संवेदनशील विचारवंत जनमानसातील अशी विविध ईश्वररूपं पाहून विस्मित होतो.. अस्वस्थ होतो. त्यातून निर्माण झालेली उत्कट जिज्ञासा त्याला खर्‍या ईश्वररूपाच्या शोधार्थ भटकवते.. जो तो आपापल्या परीनं त्याचा शोध घेत राहतो... केव्हापासून ही शोधयात्रा अखंडपणे चालू आहे. तरी ईश्वर-शोधाचं गारूड अजून संपलेलं नाही..! आजपर्यंत अनेक कवींची काव्य-प्रतिभा या शोध-यात्रेत सामील झालेली आहे. कुसुमाग्रजांची कविताही याला अपवाद नाही.

कुसुमाग्रजांच्या कवितेवर आजवर असंख्य वेळा लिहिलं गेलं असेल. तरी पुन्हा पुन्हा त्यांची कविता समजून घ्यावी असं वाटत राहावं असा त्यांच्या कवितेचा आवाका आहे.. ‘ईश्वर-शोध’ हा त्यांच्या कवितेचा एक महत्त्वाचा पैलू. त्यांच्या जीवनलहरी या पहिल्या कवितासंग्रहांपासून ते ‘मारवा’ या शेवटच्या कवितासंग्रहापर्यंत प्रत्येक संग्रहात ते वेगवेगळ्या प्रकारे या विषयाला सामोरे गेलेले आहेत. आपल्या कवितेतून त्यांनी ईश्वर-संकल्पनेचा तर्कनिष्ठ, जाणीवनिष्ठ, अनुभवनिष्ठ आणि भावनिष्ठ अशा सर्व पातळ्यांवरून वेध घेतलेला आहे. या दृष्टीनं त्यांच्या कविता अभ्यासताना उन्नत करणारा आनंद मिळतो.

‘जीवनलहरी’ (१९३३, सुधारित आवृत्ती १९४९) या पहिल्या कविता-संग्रहात छोट्या छोट्या १४३ जीवनलहरी- चिंतनिका आहेत. पुढील सर्व कवितासंग्रहांमध्ये विकसित होत गेलेल्या ईश्वरविषयक विचाराच्या पाऊलखुणा तरूण वयात लिहिलेल्या या चिंतनिकांमध्ये दिसतात. अन्याय आणि विषमता यांनी गांजलेलं सामाजिक वास्तव आणि रूढ ईश्वर-विचार यांची सांगड कुसुमाग्रजांना पटत नव्हती. तशा देवाविषयीच्या एका चिंतनिकेत म्हटलंय,- ‘गुद्‍मरती मरती हे / फोडिती का हे टाहो / लक्ष्मीच्या अंकावर / देव कसा निजला हो ! / दुर्बळ हो बलसागर / निष्ठुर हो करुणाकर / अथवा या दलितांपरि / देवहि दास्यात रुते..!’ त्यांच्या मनातिल ईश्वरकल्पना वेगळी होती.. दुसर्‍या चिंतनिकेत म्हटलंय,- ‘तारे नच- ईशाच्या / दीप्तीचे पुंजच हे / नभ नोहे- कोट्यावधि / देवांचे देउळ हे ! / रात्रीच्या तिमिरातुन / घेतो मी प्रभुदर्शन / अवमानुनि आकुंचित / दगडांची देवघरे..!’.. सामाजिक आणि आंतरिक अशा दोन स्तरांवर कुसुमाग्रजांची ईश्वरविषयक कविता विकसित होत गेली.

 ‘विशाखा’ (१९४२) या कवितासंग्रहातील कवितांमध्ये ‘जीवनलहरी’मधल्या विचारांचा परिपक्व आविष्कार पाहायला मिळतो. उदा. ‘देवाच्या दारी’ या एका शीर्षकाखाली वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या तीन कविता आहेत. त्यातील वैचारिक टप्पे पाहण्यासारखे आहेत. १९३२ साली लिहिलेल्या कवितेत म्हटलंय- ‘तूच पाठविले हाटात या मला । नाही कोणी दिला वाटाड्याही ॥’ १९३७ साली लिहिलेल्या कवितेत म्हटलंय- ‘जळातले जीव तापल्या दुपारी । वाळवंटावरी ओढसी तू ॥ पाहसी तू शांत त्यांची तगमग । कोणाचा हा राग कोणावरी?॥ कोण गुन्हेगार क्षमावंत देवा । क्षमेचा अन ठेवा कोणासाठी?॥ आणि तिसर्‍या १९३९ साली लिहिलेल्या कवितेत म्हटलंय- आणि आज मन शंकित हे होई । आहेस की नाही मूळात तू ॥ परततो आता रणात माघारा । शूरांना निवारा समरात ॥ माझ्या जीवनाचा मीच शिलेदार । व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी ॥ आहेस की नाही आज नसे चिंता । दोहीमधे आता भेद नुरे..॥

या संग्रहातील ‘मूर्तीभंजक’ या कवितेत हाच वैचारिक प्रवास दृश्य रूपात वर्णन केलाय. एका भ्रमिष्टाला आपल्याच नादात चालत असताना एक संगमरवरी मूर्ती सापडते. तो आनंदून जातो, तिच्यासाठी मंदीर तयार करतो. त्यात तिची स्थापना करतो. पूजा करू लागतो. पण किती, काही केले तरी मूर्ती त्याच्याशी बोलत नाही.. मग उपास-तापास करतो.. आक्रंदन करतो.. त्या खुळ्याला कळत नाही की पाषाणाकडून उपेक्षेवाचून कसलीच अपेक्षा करता येणार नाही. वैतागून संतापाच्या भरात तो मूर्ती फोडून टाकतो.. आणि रिकाम्या मंदिराच्या दारात आकाशाकडे पाहात काहीतरी शोधत राहतो..!

 ‘अससी कुठे तू’ ही विशाखामधली आणखी एक ईश्वरविषयक कविता.. या कवितेत म्हटलंय- ‘तू आकाशात.. समुद्रात.. चराचर सृष्टीत वसलेला आहेस का? पण तिथूनही भग्न उसासे ऐकू येतात. तू किसान-गोपांसवे त्यांच्या झोपडीत आहेस का? पण तिथेही धुळीत आसवे झरतात. तू भजनात मग्न झालेल्या भक्तांच्या बरोबर मंदिरात आहेस का? पण तिथेही वैफल्याची चिता जळत असते..’ या सर्व ठिकाणी दुःख आहे.. त्या अर्थी तिथे तू नसणार..! असं समजून कवितेत शेवटी म्हटलंय- ‘अससी कुठे तू- अखण्ड मानवयात्रा तुज शोधते / अथवा अससी मृगजल, परि जें प्रगतिपथीं ओढते..!’

कुसुमाग्रजांची कविता अंतर्मुख, चिंतनशील होती पण ती सतत वास्तवाला  उत्कटतेनं प्रतिसाद देत राहिली. विशाखातील कवितांचा स्वातंत्र्यपूर्व काळ अनेक स्तरांवर भारावून टाकणारा, धगधगता होता. तरूण वयात त्यांच्यावर साम्यवादी,  समाजवादी विचारसरणीचा प्रभाव पडत होता. त्याचे प्रतिबिंब विशाखातील कवितांमध्ये  दिसते.

१९४७ साली समिधा हा मुक्तकाव्याचा संग्रह प्रकाशित झाला. खलील जिब्रान, टागोर यांच्या लेखनशैलीशी साम्य असलेल्या या कविता मानवी जीवनावर भाष्य करणार्‍या आहेत. मानवी जीवनाचे स्वरूप समजून घेत स्व-शोध आणि ईश्वर-शोध घेणे असा त्यांचा चिंतन-प्रवास होता.

शेक्सपियर, शेली, हेमिंग्वे.. आदींच्या साहित्याने त्यांची प्रतिभा समृद्ध होत होती. त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळातील बहुआयामी आव्हाने पेलताना होणारी फरपट त्यांना अस्वस्थ करत होती. १९५२ साली प्रकाशित झालेल्या किनारा या कवितासंग्रहात समाज-वास्तव, अंतर्मुखतेला आकर्षित करणारे विश्वाचे गूढ, परमेश्वराचे अस्तित्व, जीवनाचे उद्दिष्ट.. हे कविता-विषय झाले आहेत. त्यातल्या दूर निनादे या कवितेत, ‘न कळे मजला किमया सारी / कोण करी अज्ञाती राहून..! असं म्हणत निर्मितीच्या कोड्याविषयीचं नवल व्यक्त केलंय, तर मी काय तुला वाहू या कवितेत संपूर्ण सृष्टीच ज्यानं निर्माण केली त्याची पूजा कशानं करणार? असा भाव आहे. या कवितेत शेवटी म्हटलंय- ‘एकच आहे माझी दौलत / नयनी जो हा अश्रु तरंगत / दुबळे माझे ज्यात मनोगत / तोच पदीं वाहू?

कुसुमाग्रज फक्त आपल्याच मनोविश्वात कधी रमले नाहीत. व्यासंग आणि सामाजिक सामिलकी ही त्यांची जीवनशैली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा कृतीशील सहभाग होता. अशा सक्रियतेमुळे, वाढत्या वयातील जीवनानुभवामुळे त्यांच्या चिंतनशीलतेचा परीघ विस्तारत राहिला. १९६० साली त्याचा मराठी माती हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अस्तित्वविषयक चिरंतन प्रश्न कवितांचे विषय होऊ लागले. दूरची, शोधाचा विषय असलेली ईश्वर-संकल्पना हळूहळू स्पष्ट होऊ लागली...

कलंदर या कवितेत त्यांनी म्हटलंय, माझ्या साम्राज्यात आता / मीच भूप मीच प्रजा / माझ्या देवळात झालो / मीच देव मीच राजा... दूरता संपलीय, धरतीची स्वर्गाशी सोयरिक झालीय. मन लौकिकाची देहली ओलांडून गेलंय... कवितेत शेवटी म्हटलंय, ‘माझ्या आत्मतेस नाही / आता अहंतेचा पार / झाले अनंताचे घर / त्याला जीवनाचे दार..!’ ‘स्वशी इमान राखून होणारे असे वैचारिक परिवर्तन पुढे नेणारे असते. ‘कलंदर’ या कवितेत त्यांची प्रज्ञा रूढ आस्तिक-नास्तिक कल्पना ओलांडून पुढे गेलेली दिसते.

मराठी मातीनंतर १९६२ साली स्वगत हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. नावाप्रमाणेच यातिल कवितांमध्ये अंतर्मुखता अधिक दिसते. मी कोण आहे?, कुणासाठी आहे?.. अशा प्रश्नांमधून चाललेला स्वत्वाचा शोध म्हणजे एका अर्थी ईश्वर-शोधाच्या नाण्याचीच दुसरी बाजू आहे. स्वगतमध्ये कुसुमाग्रजांच्या परमेश्वर विचाराने नवे वळण घेतलेल स्पष्ट दिसते. जीवन म्हणजे केवळ एक गती.. बहुधा आंधळी.. निर्दय.. राक्षसी. पांथस्थ कवितेत म्हटले आहे-

गतीने बधीर झालेल्या माझ्या मनाला  
आता स्मरण उरले नाही त्या स्थळाचे  
ज्याच्याकडे मी जात आहे...

कवितांमधून जाणवणारा कुसुमाग्रजांचा वैचारिक प्रवास हा सतत कशाचा तरी वेध घेणारा आहे. १९६४ साली हिमरेषा हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यातील कवितांमध्येही हा शोध-प्रवास दिसतो. अस्तित्वाचा अर्थ लावताना त्यांना एका टप्प्यावर पुन्हा जाणवलं की जीवन म्हणजे केवळ एक हेतूहीन गती.. केवळ जगणे. तोच त्याचा अर्थ आणि तेच त्याचे ध्येय. जो कोणी आहे त्याची माणसाला काही कळावे अशी इच्छाच नाहीए... मार्ग या कवितेत म्हटलंय-

चालतो मी सारखा चालण्याला अंत नाही
चाललो कोठे कशाला हीहि आता खंत नाही
एकदा पूर्वी मलाही वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही लाभ झाला त्यात नाही.!

..... कवितेत शेवटी म्हटलंय-

‘ना कळावे हीच इच्छा जो कुणी आहे तयाची
शोधता त्याच्या कृपेचा शोधका आधार नाही
मी म्हणोनी सोडला तो नाद आता मंझिलाचा
चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही..!’

‘मंझिलाचा नाद सोडला’ असं म्हटलं तरी या वैचारिक प्रवासात अज्ञाताची ओढ आणि परमेश्वरावरील श्रद्धा खोल रुजत होती. या संग्रहातली ‘मार्जिन ही कविता ‘ईश्वर नाही’ हे स्वीकारत त्याच्या असण्याची गरज अधोरेखित करते. या कवितेतल्या काही ओळी पाहण्यासारख्या आहेत-

‘ईश्वर नाही म्हणता? माझे
मतही अगदी तसेच आहे.....
या विश्वाच्या विविध दर्शनी
जड तत्त्वाचा अंध कायदा भरून राहे
.....
मानवमन ना निराकारता कधी साहते
आणि अखेरी आहे-नाही तिथेच असते
अचेतनाला करी सचेतन, शून्याला दे अर्थाचे धन
मन अपुल्या नजरेने जीवन सदा पाहते....’
***

१९६७ साली प्रसिद्ध झालेल्या वादळवेल या कवितासंग्रहातील कविताही ‘मी’चा, जीवनाचा अर्थ शोधतात. हे ‘कळणे’ म्हणजेच जीवन..! संग्रहातल्या पहिल्या कवितेत म्हटलंय, ‘अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे / तिमिरही माझा दिवाहि माझा माझे जळणे..!’ तर शेवटच्या ‘सर्व’ या कवितेत म्हटलंय,

‘मीत्व आहे
एक केवळ ।
सर्व आणिक सर्वथा ॥
तेच देते सर्वतेला ।
पंख आणिक ही व्यथा ॥

 ‘तो प्रवास सुंदर होता या पुस्तकात प्रा. के. रं. शिरवाडकर यांनी म्हटलंय, ‘वादळवेल’मध्ये ‘विशाखा’तील नास्तिकता अथवा संशयवाद संपला आहे.’, ‘लक्षात येणारी गोष्ट ही की आस्तिकतेच्या विरोधी सूर काढणारी कविता पुढील काळात आली नाही., ‘कुसुमाग्रज दोन कारणांवरून आस्तिकतेचे स्वागत करतात. एक आहे सौंदर्यवादी (aesthetic) आणि दुसरं आहे परमेश्वराचे प्रेममय स्वरूप. या दोन्ही कारणांनी जाणवणारे परमेश्वराचे अस्तित्व प्रातिभ आहे. वादाच्या, तर्काच्या पलीकडे आहे अशी त्यांच्या कवितेची धारणा आहे.’ याच पुस्तकात पंढरपूर भेटीची एक आठवण दिलेली आहे.- “मराठी संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या गर्भागाराकडे चाललो आहोत अशा भावनेने आपण पंढरपूरला जात आहोत असे तात्यांना वाटत होते. तात्या लिहितात, ‘नास्तिकतेच्या प्रांतात वारंवार संचार आणि मुक्काम करणारे मन पाण्यात टाकलेल्या स्पंजासारखे भाविकतेने जड झाले होते’ (‘प्रतिसाद’- लेखसंग्रह, ३०).”

 देवदर्शनाचा प्रत्यक्षातला अनुभव मात्र अतिशय घृणास्पद होता. या अनुभवाचा अत्यंतिक विषाद ‘वादळवेल’ संग्रहातल्या ‘पंढरीच्या राया..’ या कवितेत उमटलाय-

‘पंढरीच्या राया । अगा लोकपाळा
काय तुझी कळा । तुझ्या धामी
अनादी अनंत । त्रैलोक्याचा राणा
झालास किराणा । माल येथे..!’

विठ्ठ्ल-भेटीचा क्लेष्कारक अनुभव सविस्तर सांगत कवितेत शेवटी म्हटलंय-
‘परतले मन । शरीराच्या संगे
नास्तिकांचे दंगे । आवरीत ॥’
***

‘कुसुमाग्रजांच्या कवितेतील ईश्वरशोध’ असा विषय समोर ठेवून त्यांच्या कविता अभ्यासताना प्रत्येक विषयातून ते हाच शोध घेताहेत, पार्श्वभूमीसारखा हाच विचार प्रत्येक कवितेमागे आहे असं जाणवू लागलं... मनात आलं, ईश्वरशोध म्हणजे तरी काय? दृश्य वास्तवाच्या आड दडलेल्या वास्तवाचा शोध. तो घेताना काही न कळण्यातून जाणवणार्‍या गूढ अज्ञाताचा शोध. शोध घेऊ पाहणार्‍या ‘स्व’चा शोध. एकूण अस्तित्वाचा शोध. सत्याचा, ‘सत् चा, ‘आहेपणा’चाच शोध. ईश्वरशोधच असा मूलगामी आणि सर्वव्यापी आहे...!

या शोधप्रवासाच्या उत्तरार्धात, जीवनानुभवांनी संपृक्त झालेल्या टप्प्यावर १९८२ आणि १९८४ साली ‘छंदोमयी’ आणि ‘मुक्तायन’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले. या संग्रहांमध्ये सजग आस्तिकता, दांभिकतेचा निषेध आणि नास्तिकतेची, स्वतःची समीक्षा करणार्‍या अनेक कविता आहेत.

‘छंदोमयी’ या कवितासंग्रहातल्या ‘चार्वाक’ या कवितेत चार्वाकाची नास्तिकता समजून घेताना जाणवलेली चार्वाक-विचारातली मर्यादा दाखवून दिलेली आहे. ‘नजर’ या कवितेतही कुसुमाग्रजांनी निरीश्वरवादी विचारसरणीतली त्यांच्या कवीमनाला जाणवणारी उणीव दाखवून दिलेली आहे. ती पूर्ण कविता अशी-

‘मार्क्स रसेलसारखे
सारे निरीश्वरवादी
थांबतात सृष्टीच्या उगमाशी असलेल्या
एका कायद्यापाशी.
उदय नाही, अंत नाही
रूप नाही, रंग नाही
अल्याड नाही पल्याड नाही
अशा पार्थिव कायद्यापाशी
एका स्वयंभू जाणीवहीन आस्तित्वापाशी.
माझ्या तर्काला हे पटते
आणि तरीही वाटते
की या निरीश्वरवाद्यांनी
उत्तर रात्री उठून
पाहिलेले नाही कधीही
चांदण्यांनी खचलेले
अपार धूसराने ओथंबलेले आकाश
माझ्या नजरेने..!
***

कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेमधून नास्तिकतेची समीक्षा केली तशी स्वतःची भूमिकाही तपासली. त्यांना जाणवलं की ईश्वराचं अस्तित्व नाकारणं म्हणजे आपलं कवित्वच नाकारण्यासारखं आहे..! ‘शोध’ या कवितेत ते ईश्वराला म्हणतात-

‘सृष्ट शक्तीच्या
या अंतहीन भांडारात
मी शोधीत होतो
तुझा रत्नजडित राजमुकुट
सर्व चराचर उन्मेषांचे
नियमन करणारा ;
मला तू दिसलास
आणि दिसला नाहीसही;
दिसलास तेव्हा
मी होतो एक संन्यासी
विश्वाच्या व्यवहारातून
हरवलेला,
आणि दिसला नाहीस तेव्हा
मी होतो एक कठोर
सार्‍या धूसरावर कट्यारी मारणारा
मारेकरी
माझ्याच कवित्वाचा..!’
***

‘छंदोमयी’नंतर प्रकाशित झालेला ‘मुक्तायन’ हा कवितासंग्रह या लेखाच्या विषयाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. प्रदक्षिणा घालत मूर्तीचं चहुबाजूंनी दर्शन घ्यावं तशा यातल्या कविता विषयाच्या पूर्ण परीघावर फिरतात. अवलोकन करतात. आणि एकेका बिंदूवरून आलेल्या अनुभूती नोंदवतात...

उदाहरणार्थ ‘तो’ या कवितेत ईश्वराशी संवाद आहे. बुद्धीनं ईश्वराचं अस्तित्व नाकारलं. तर्कशुद्ध मुद्दे मांडत ते पटवूनही दिलं इतरांना. पण तार्‍यांच्या अंधुक प्रकाशात खाली उतरून एकांतात भेटायला आलेला ईश्वर म्हणतो, ‘अभिनंदन / तुझे विवेचन छानच होते / इतके की मलाही शंका आली / माझ्या आस्तित्वाची- / पण तरीही मला माहीत आहे / मला मानणार्‍यांमध्ये / तू अग्रेसर आहेस / फक्त तुझा दिवाणखाना / तुझ्या काळजापासून / फार दूर आहे, इतकेच.’

‘असीम’ कवितेतला दृष्टीकोन वेगळा आहे. इथे ‘नसण्या’ला ‘असीम निरर्थक’ असं म्हटलंय. आकाशगंगेपर्यंत पसरलेलं हे सारं माणसाच्या जाणिवेत परिणत होत राहिलं नसतं तर तोही बैलासारखा शारीर अस्तित्वापुरता संतुष्ट राहिला असता. पण माणसाला जाणीव असल्यामुळं तसं होत नाही... कवितेत शेवटी म्हटलंय, ‘आणि म्हणून / या वैश्विक निरर्थकाच्या / एका अणुमात्र कोपर्‍यामध्ये / अर्थाची वसाहत / उभारण्याची जबाबदारी / माझ्यापुरती / शेवटी माझ्यावरच आहे.!

‘पहाडातील देवी’ या कवितेत श्रद्धेसोबत प्रवास करताना आलेली उत्कट अनुभूती व्यक्त झालीय- ‘माझे रिकामे मन / आस्तिकतेच्या भावनेने / तुडुंब ओथंबून गेले / आणि भोवतालच्या सर्व विश्वाला / उद्देशून / मी निःशंक श्रद्धेने उद्‍गारलो— ‘पावतील, नक्कीच पावतील..’

‘गाभारा सलामत / तो देव पचास...’ असा निष्कर्ष असलेली ‘गाभारा’ ही उपहासगर्भ कविता सामाजिक वास्तवावर भाष्य करते तर ‘धुवांधार’ ही कविता ईश्वराच्या शोधार्थ शिणलेल्या जाणिवांना कधी कधी ‘कोणाच्या शब्दातून / कोणाच्या स्पर्शातून / कोणाच्या नेत्रातून / .... व्यक्तातून / आणि अव्यक्तातून’ त्याचीच करुणा धुवांधार बरसत असल्याचा प्रत्यय कसा येतो त्याचे दर्शन घडवते.

‘तुझी ही मुलखावेगळी क्रीडा / मला समजत नाही..’ अशी सुरुवात असलेल्या ‘अनामंत्रित’ या कवितेत एक मर्मस्पर्शी भाव व्यक्त झालाय. दीपोत्सव करून तुला आवाहान केले तेव्हा तुझा सोनेरी रथ रिकामाच निघून गेला.. उरातील असह्य जखमा घेऊन तुझ्या सहाय्याची याचना करण्यासाठी मी तुझ्या दारी आलो तर माझ्याकडे पाठ फिरवून निर्दयपणे अदृश्य होणारी सावली मला दिसली. आणि आता माझ्या शून्यारलेल्या मनात तुझ्या अस्तित्वाची यादही नसताना माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याबरोबर अनामंत्रित चालत आहेस..!
  
ईश्वरशोधाच्या प्रक्रियेत ईश्वर कसा आहे, कुठे आहे ते कुणालाच निश्चितपणे कळत नाही. पण ईश्वर नक्की कुठे नाही, तो कसा नाही हे उलगडत जातं. काय नाही हे कळण्यातून काय असेल त्यापर्यंत तसूतसूनं पोचता येतं... ‘मुक्तायन’ मधल्या ‘फक्त शब्द’ या कवितेत म्हटलंय-

‘मला गवसलेल्या
त्या चिरनूतन ईश्वराचा
धर्म नावाने ओळखल्या जाणार्‍या
जरठ
दुभंगलेल्या कवचाशी
सुतराम संबंध नाही.
जगातील सर्व धर्मांनी
त्या अनाद्यंत सौंदर्याला,
अगणित आकाशांच्या
उगमस्थानाला,
मातीत खणलेल्या तळ्यात
कर्मकांडाची जाळी टाकून,
धरण्याचा प्रयत्न केला,
पण त्या जाळ्यात
त्यांना गवसले फक्त
विविध भाषांतील
ईश्वरार्थी शब्द..!’
***

काही निश्चित न कळण्यात काव्य आहे. शोधाची प्रेरणा आहे. या शोधयात्रेत शून्याचा, ‘काही नाही’चा शोध लागला, तरी तो माणसाला उन्नत करत असतो. त्या उत्कट अवस्थेत तो ‘काही नसण्याला’च ईश्वर म्हणून जातो. या दृष्टीनं ‘याच मातीतून’ ही कविता पाहण्यासारखी आहे.-

‘इथे पुरला आहे
परमेश्वर
जो होता मध्याधार
सर्व धर्मांचा
विविध नावे विविध रूपे
धारण करणारा,
नवसाला पावणारा
पाप पुण्ये विकणारा
दहा माणसांना संत
पण लाखांना सैतान बनविणारा,
पृथ्वीच्या हिरव्यागार
उन्मेषावर
माणसाचे रक्त ओतणारा,
दुर्बळांचा दावेदार
आणि बलवंतांचा दास असणारा.
पण याच
जागेवरच्या मातीतून
आता उगवतोय
पृथ्वीच्या गर्भातील सत्त्वाची
साक्ष देणारा
एक लखलखीत अंजिरी कोंब
नव्या ईश्वरतेचा,
जिचे पर्यायी नाव
नास्तिकताही असू शकेल’
***

या संग्रहातली ‘अन्यथा’ ही कविता या विषयावरची एक आशयघन कविता आहे. या कवितेच्या सुरुवातीलाच म्हटले आहे, ‘तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील / पण कविता त्याचा शोध लावते.’ ‘कविता शोध लावते’ म्हणजे काय?, कसा? मला वाटतं कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेत याचं उत्तर मिळू शकेल...

नेहमीच्या वापरातली तीच भाषा, तेच शब्द कवी कवितेसाठी वापरत असतो. आणि असंख्य लोक राहतात त्याच जगात, त्याच वातावरणात कवी राहत असतो. पण तो दृश्याच्या पलीकडचं पाहू, अनुभवू शकतो. समजू शकतो. वस्तू-घटनांचं बाह्य रूप ओलांडून आत जाऊ शकतो. त्यामुळे सर्व गोष्टी कवीला इतरांपेक्षा वेगळ्या दिसतात. त्याचं त्याविषयीचं आकलन वेगळं, वेगळ्या स्तरावरचं असतं. ते त्याचं स्वतःचं, स्वतंत्र असतं... पण कवी सुटा नसतो, परंपरेच्या अखंड साखळीतला एक दुवा असतो आणि त्याचं वैचारिक पूर्वसंचित त्याच्या आकलन-प्रक्रियेत सहभागी असतं. नेणिवेचं आदिम अमूर्त टोक आणि वर्तमानासारखी सगुण भाषा यांना जोडणारा पूल असते कविता...

तत्त्वज्ञान जरी सांगत असले की ‘ईश्वर’ असं इंद्रियसंवेद्य काही नाहीए. जे आहे ‘ते’ अनिर्वचनीय आहे... तरी कविता या अभावात भाव भरते. निर्गुणाला सगुण रूप देते. निराकाराला आकार देते... ही कवितेची स्वतःची, त्या क्षणाची प्रचिती असते. कवीसाठी हा प्रचितीचा क्षण म्हणजे शोध लागल्याचा क्षण असतो..! संत तुकारामांचे अभंग हे याचं अस्सल अनुभूती असलेलं सर्वोत्तम उदाहरण आहे. म्हणूनच ‘अन्यथा’ या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘अन्यथा / तुकारामाचा अभंग / संभवलाच नसता..!’ ती कविता पूर्ण वाचण्यासारखी आहे.-

‘तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते.
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा.
आणि म्हणूनच
बेबलच्या* सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति-अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा-
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरूपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात हात घालून
रागदारीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
आस्तित्वाच्या सर्व सरहद्दींपर्यंत.
--अन्यथा
तुकारामाचा अभंग
संभवलाच नसता..!’
***

(*बॅबिलोनियन्सनी स्वर्गात शिखर पोचेल असा मनोरा बांधायचा घाट घातला. त्यांच्या हेतूंविषयी राग येऊन देवांनी असं काही केलं की हे काम करणार्‍यांना एकमेकांची भाषाच समजेनाशी झाली. एकमेकांना समजून न घेता आल्यामुळे ‘बेबल’च्या मनोर्‍याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. काम तसेच अर्धवट सोडून सर्व लोक निघून गेले... काहीच निष्पन्न न होणार्‍या वादंगाचा निर्देश करण्यासाठी कुसुमाग्रजांनी या मिथकाचा वापर केला आहे.)
    
     ‘मुक्तायन’ नंतर कुसुमाग्रजांचे ‘पाथेय’, ‘महावृक्ष’ आणि ‘मारवा’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. १९८९ साली आलेल्या ‘पाथेय’चे सूर ‘मुक्तायनशी जुळणारे आहेत. आतल्या आणि बाहेरच्या स्थित्यंतरांनी घडवलेली त्यांची जीवनदृष्टी या संग्रहातील कवितांमधून डोकावते. स्वातंत्र्योत्तर काळातील अधिकाधिक क्लेषकारक बनत गेलेल्या सामाजिक वास्तवाला दिलेल्या उपहासात्मक प्रतिक्रिया या संग्रहात अधिक धारदार झालेल्या आहेत.

या संग्रहातील ‘खुनशी सुरे’ आणि ‘असले धर्मगुरू’ या दोन कविता धर्माच्या नावाखाली, प्रेषितांच्या नावाने होणार्‍या अनाचारावर जळजळीत भाष्य करणार्‍या आहेत. ‘खुनशी सुरे’ या कवितेत म्हटलंय, ‘प्रेषितांचे संदेश शेवटी / कसायांचे सुरे होतात / तत्त्वे सरतात मूल्ये मरतात / जयघोषांची प्रेते उरतात..’ तर ‘असले धर्मगुरू’ या कवितेत म्हटलंय-  ‘ज्यांच्या पोचट प्रज्ञेला / आकलन ना धर्माचे / ना देवाचे, / ना माणसाचे, माणुसकीचे..’

‘परस्थ’ या अंतर्मुख कवितेत म्हटलंय, की परमेश्वर हा शोधण्याचा वा पाहण्याचा विषय नसून फक्त अनुभवण्याचा आहे. पण ‘माझे पाहणे अनुभवापर्यंत / पोचत नाही / तोपर्यंत तू मला / परस्थच, असून नसल्यासारखा / किंबहुना नसल्यामुळेच नसल्यासारखा..!’

परोपरीनं असा विचार करत कुसुमाग्रजांची आस्तिकता विकसित होत राहिली... १९९४ साली प्रकाशित झालेल्या ‘महावृक्ष’ या कवितासंग्रहातही हा सूर उत्कटतेनं उमटलेला आहे. त्यात व्यक्त झालेला आशावाद अत्युच्च दिलासा देणारा आहे. ‘धुके’ या कवितेत म्हटले आहे, ‘धुके तर घनदाट आहे / पण त्यातूनही’... दूरवर दिसते आहे की ‘पुढे प्रकाशाचा प्रांत आहे’. धुक्यातील हे समाधान कवीला महत्त्वाचे वाटते आहे. ‘गजेंद्र’ या कवितेत तर गळ्याइतक्या कर्दमात रुतलेल्या ‘मी’ला प्रत्यक्ष तो करुणाकर म्हणतो आहे की हा चिखल तूच निर्माण केलेल्या तुझ्या मालकीच्या मानसिक विश्वातला आहे. त्यातून ‘तुझी मुक्तता केवळ तूच करू शकशील. / ही प्राणांतिक लढाई स्वतःशीच, / पण लढशील तर तुझ्या पाठीशी / आहे माझा आशीर्वाद / माझ्या ईश्वरतेचा..!’

या संग्रहातील ‘मॅकबेथ’ ही आशयसंपृक्त कविता वाचकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. या कवितेत म्हटलं आहे की संज्ञेत वस्तीला आलेल्या शेक्सपियरच्या महानायकांमधला एक मॅकबेथ... त्यानं आपल्या प्रभावी स्वगतातून मनावर बिंबवलेली जीवनाची अर्थशून्यता मी मांडलिक वृत्तीनं शब्दशः स्वीकारतो. विश्वाच्या विराट व्यवहारात बनतो एक कःपदार्थ बाजारशील नट टाळ्या पेरून झाल्यावर पडद्यामागच्या काळोखात कीटकाप्रामाणे विलीन होणारा.. सारंच निरर्थक.. क्षुद्र.. क्षुद्र वाटू लागतं... पण त्या निराधार डोहात विसर्जित होत असतानाच –

‘तो सुभग क्षण उगवतो,
तेज:पुंज अश्वांचा एक सोनेरी रथ
प्रकाशाच्या लाटा उधळीत
धडधडत जातो माझ्या समोरून,
आकाश उजवाडून जातं
लखलखत्या किरणांनी
आणि क्षितिजावर उमटतात
ब्राँझची अक्षरं :
...ईशावास्यम् इदं सर्वम्
...नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...
माझ्याच राखेतून गुदमरणारी
माझ्यातील आत्मता
फिनिक्ससारखी पुन्हा सचेतन होते
आणि मला आदेश देते
‘युद्धाय युज्यस्व.’
***

     ‘शून्य’ आणि ‘पूर्ण’ या दोन टोकांना कवेत घेणारी ही कविता कुसुमाग्रजांच्या व्यापक आणि प्रगल्भ जाणिवेची साक्ष देणारी आहे. ईश्वरशोध ही साधीसुधी मोहीम नाही. त्यात पुन्हा पुन्हा हताशता येते. पण कडेलोटाच्या निराश क्षणी मन पुन्हा फिनिक्ससारखं सचेत होतं..!

कुसुमाग्रजांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालेल्या ‘मारवा’ या शेवटच्या कवितासंग्रहातही आशा-निराशेचा हा लंपडाव चालू आहे. या संग्रहातल्या ‘मर्त्य’ या कवितेतलं निराश वास्तवाचं वर्णन अस्वस्थ करणारं आहे. जे शिखर गाठायचंय त्याच्या खडतर वाटेवर हरलेल्या माणसांचीच नाही तर पराभूत मूल्यांचीही प्रेतं पडलेली आहेत... ‘आता ही प्रेतं सांगत आहेत / पृथ्वीवरची सारी निर्मिती / आहे मरणाधीन..’

     ‘अंतहीन’ या कवितेत अस्तित्वाच्या तळाशी सत्य असेल या कल्पनेनं कवीमन जळता पलिता घेऊन खोल उतरत जातं. आलेले अनुभव, हे ‘ते’ सत्य नाही म्हणत आणखी खोल नेतात. पण भोवती विझलेले काजवे, भयप्रद निशाचर, पंख तुटलेले गरुड आणि गिधाडे दिसतात. अखेरी हताश झालेल्या कवीमनाला वाटतं-

     ‘कळले आता वृथा शोध हा
     मृगजळात या फसलो आहे
याच पायरीवरती आता
पलिता विझवुनी बसलो आहे.’

आशावादी राहून थकलेल्या मनाचे हे उद्‍गार असणार..! पण पानगळीला पराभूत करत बहर सरसरून वर यावा तशी अंधार विझवून एक पणती दिलासा देते. ‘पणती’ या कवितेत म्हटलंय-

‘अशा अभावी वहात येते
तव हाकेची पणती
प्रकाशात त्या आहे त्याचे
सूत्र पुन्हा ये हाती..!’
***

आशा-निराशेचे असे चढ-उतार पार करत, चालण्याचे श्रेय सोबत घेऊन कुसुमाग्रजांची शोधयात्रा शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहिली. या अखंड, खडतर प्रवासात त्यांना उमगलं होतं की सत्य, ईश्वर म्हणून दाखवता येईल असं काही नाही. किंवा मग ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍..’.. जे जे म्हणून ‘आहे’ ते सर्वच ईश्वर..! शून्य आणि पूर्ण या दोन टोकांच्या मधे कुठेतरी वणवणत राहिलं त्यांचं शोध घेणारं अधीर मन. कधी प्रातिभ तर कधी भावनिक प्रचिती आली त्याच्या अस्तित्वाची. पण असे क्षण पार्‍यासारखे निसटून जातात. आणि मन पुन्हा सैरभैर होतं... मग पुन्हा वणवण..! जीवनलहरी (१९३३) ते मारवा (१९९९) या दीर्घ कालावधीत कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या असंख्य कवितांपैकी वर उद्‍धृत केलेल्या काही कविता म्हणजे त्यांना वेळोवेळी आलेल्या प्रचितींची ‘क्षणचित्रं’ आहेत. वाचकांना यात एका संवेदनशील, व्यासंगी, प्रगल्भ आणि जीवनानुभवांनी समृद्ध झालेल्या कवीमनाच्या ईश्वरशोधाच्या वाटेवरची मार्गदर्शक पदचिन्हे दिसतील..!

आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com 
२० ऑगस्ट २०१७


( प्रा. के. रं शिरवाडकर यांच्या ‘तो प्रवास सुंदर होता’ या पुस्तकात कुसुमाग्रजांच्या सर्व कवितासंग्रहांची पूर्ण सलग माहिती त्या त्या वेळच्या पार्श्वभूमीसह मिळाली. त्यामुळं कवितासंग्रह मिळवणं सोपं झालं. पुस्तकातील माहितीचा आणि त्यांनी उद्‍धृत केलेल्या कावितांचाही या लेखासाठी उपयोग झाला आहे )   
       संवादसेतू दिवाळीअंक २०१७ मधे प्रकाशित