Wednesday 27 April 2016

निळ्या पोटाची काळी मासोळी

जळामध्ये मासा झोप घेई कैसा / जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” असं संत तुकारामांनी म्हटलं आहे ते अगदीच खरं आहे. पण ‘निळ्या पोटाची काळी मासोळी’ या प्रतिमेत शिरून एखाद्या दीर्घ स्वप्नासारखं एक भावविश्व दीर्घकवितेतून कसं निर्माण करता येऊ शकतं याचा प्रत्यय ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ या कविता महाजन यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातून वाचकाला येऊ शकेल...  

पण काही माहिती नसताना तुम्ही हा कवितासंग्रह हातात घ्याल तेव्हा प्रथम तुम्हाला शीर्षक गोंधळात टाकेल. मुखपृष्ठही काही थांग लागू देणार नाही. मग तुम्ही संग्रहाच्या मागे पाहाल की काय आहे बुवा यात? तर तिथे तुम्हाला डॉ. सुधीर रसाळ यांचं या कवितेवरचं भाष्य दिसेल. घाईत त्यावरनं नजर फिरवून उत्सुकतेनं तुम्ही थेट कवितेला भिडायला जाल तर सुरुवातीला आणखी काही कृष्ण-धवल अमूर्त चित्र लागतील. एका चित्रावर ज्ञानेश्वरीतली एक ओवी दिसेल. अनोळखी नजरेनं पाहात हे सारं ओलांडून तुम्ही शीर्षक नसलेल्या कवितेसमोर याल. तिथे ‘आजचा दिवस वेगळा आहे’ ही पहिल्या कवितेची पहिली ओळ भेटेल. ती तुम्हाला स्वतःबरोबर पुढे घेऊन जाईल...

आज मला अन्न नव्हे अमिष हवं आहे... मी गळाची वाट पाहते आहे..’ (पृष्ठ ११-१२).. तुम्हाला वाटेल हे एका मासोळीचं आत्मकथन असावं... कवितेची लय तुम्हाला पुढे पुढे नेत राहील...

‘कोणत्याही रंगांचे असले तरी प्रत्यक्षात ते रंगलेले आहेत अज्ञानानं’ (पृष्ठ ३३)... पुढं असं काही वाचताना वाटेल मत्स्यजीवनाच्या प्रतिमेतून केलेलं सामाजिक भाष्य असेल हे... उत्सुकतेनं तुम्ही वाचत जाल...

‘मला जे सांगायचंय ते हे नाहीये नव्हतं आणि नसेल / जो शब्द मला उच्चारायचा आहे / तो आहे माझ्या आत..’ (पृष्ठ ३५) पुढे वाचण्याची उत्सुकता वाढेल. अधीरपणे सरकत जाईल नजर पुढच्या पानांवर. तिथला, ‘सखोल असण्याची परिसीमा म्हणजे काळा / सगळे रंग विसर्जित होतात तो हा डोह’ (पृष्ठ ३७), ‘मला पिऊन घ्यायचाय त्याच्या त्वचेतला / उजेडाचा अभाव’ (पृष्ठ ४०)... असा आवेगी भावाशय स्तिमित करेल.. मधे मधे पुनः चित्र भेटतील. पण कविता तिकडे पाहू देणार नाही. तुम्ही पुढे जात राहाल...

‘....मी कोण आहे कोण आहे खडकमासा कोण आहे समुद्र कोण आहे पाणी / कोण आहे वाळू कोण आहे जीवन कोण मृत्यू कोण आहे आठवण’ (पृष्ठ ४५) विरामचिन्हविरहित हे स्वगत-चिंतन सलग वाचताना, हे लिहितानाचा आवेग जाणवेल. त्याच आवेगात तुम्ही पुढे सरकाल. तिथे जीवनविषयक आकलन उत्कट करणारे पत्तीमासा, खडकमासा यांच्या बरोबरचे संवाद भेटतील.. त्यातली ‘सत्यअसत्याच्या मिथुनातून जन्मतात स्वप्नं / ज्यात आपण जगतो’ (पृष्ठ ५५) ही ओळ लक्ष वेधून घेईल.

रंगीला माशाची विलक्षण हकिकत, समुद्र पक्ष्याची रसरशीत दंतकथा, माशांची भयंकर स्वप्नं, समुद्रकोळी, समुद्रफुलं आगसाळांचे कळप यांची प्रत्ययकारी वर्णनं.. हे सारं वाचल्यावर या कवितेविषयी तर्क करणं तुम्ही सोडून द्याल आणि भान विसरून चढत जाणारी गाण्याची मैफिल अनुभवावी तशी चढत जाणारी कविता तुम्ही अनुभवू लागाल... ‘कधी कधी वाटतं.. मीच समुद्र आहे / मीच आहे जाळं / मीच काळा खडकमासा / ज्ञानी पत्तीमासाही मीच / मीच माझी सुरुवात / मीच अंत..’ (पृष्ठ ७२) अनेक दर्शनबिंदूंमधून दर्शन घेतल्यावर ‘कळतं की सोपं नाहीए जगणं / जाळ्याचं गळाचं समुद्राचं देखील / माशांप्रमाणेच. (पृष्ठ ७३) ‘मी’चा परीघ विस्तारत नेणारं हे आकलन तुम्हाला भारावून टाकेल..! वाचताना जाणवू लागेल की एक निराकार समज लाटांसारखी आतून उलगडत शब्दबद्ध होत गेलीय सलग लयीत आणि आता ती आपल्या आत पसरतेय..!

‘मी वाट पाहात होते गळाची... पण उमगलं की अवघा समुद्रच असतो एक विशाल जाळं (पृष्ठ ७६), ‘खडकमासा नसतो खोल साकळलेलं दुःख / मी नसते निळं आर्जव / गळ नसतो मृत्यू नेहमीच’ (पृष्ठ ८०), ‘अस्थिर आहे समुद्र... / अस्थिर आहे मीही सगळ्यांसारखीच / मी निळ्या पोटाची काळी मासोळी...’ शेवटच्या या ओळींनंतर तुम्ही स्तब्ध व्हाल... शेवटच्या पत्ररूप प्रस्तावनेसह पुन्हा सगळं सावकाशीनं वाचण्याची ओढ तुम्हाला खुणावत राहील..!  

आसावरी काकडे

‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’
कवितासंग्रह
कविता महाजन
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे ९१
किंमत १०० रूपये

साप्ताहिक सकाळ ३० एप्रिल २०१६ अंकात प्रकाशित