Wednesday 27 January 2016

आनंदाचा अनुकार


 माझी आई सतत कुठली ना कुठली पोथी वाचत असायची. श्रद्धेनं. वेळ सार्थकी लावण्याचं तिच्यासाठी ते एक छान साधन होतं. चिंतन-मनन, अभ्यास, चिकित्सा, चर्चा.. काही नाही. निखळ श्रद्धा. त्या जोरावर तिनं आयुष्यातले सर्व चढ उतार धीरानं पार पाडले. मनात आलं आपणही अशा निखळ श्रद्धेनं काहीतरी वाचावं. इतर कोणत्याही पोथीपेक्षा ज्ञानेश्वरी वाचणं माझ्या स्वभावात बसणारं म्हणून मग ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. यापूर्वी मी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. तेव्हा ते वाचन उत्सुकता आणि अभ्यास अशा भूमिकेतून झालं. आता बरेच दिवसांनी वेगळ्या विचारानं मी हे वाचन करायला घेतलं. या वाचनातून माझ्या मनात श्रद्धा निर्माण व्हावी अशी इच्छा बाळगली. पण चिकित्सक मन अडथळे निर्माण करत राहिलं... तरी वाचन निष्ठेनं चालू ठेवलंय. मात्र यावेळी एक नवी गोष्ट घडली. अर्थ जाणून घेताना ज्ञानेश्वरीतल्या उपमांनी माझं लक्ष वेधलं. त्याला कारण अलिकडे मला गवसलेला एक मनस्वी छंद...

आधुनिक तंत्रज्ञानानं अनेक गोष्टी सहज सोप्या करून आपल्या हातात दिल्यायत. त्यातली एक गोष्ट म्हणजे छायाचित्र काढणे. आधुनिक मोबाईलच्या सुविधांमधली ही सुविधा मला सर्वात अधिक मोहवून टाकणारी वाटलीय. बाहेर पडलं की लगेच माझी नजर भिरभिरू लागते. काही वेगळं, सुंदर दिसलं की ते आधी नजर टिपते मग मोबाईलमधला कॅमेरा.. स्वतःला आनंद देणारे असे फोटो फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी शेअर करणंही आता अगदी चुटकीसरशी होऊ शकतं. एकदा एका फोटोसाठी अभंग छंदात दोन ओळी सुचल्या. त्या ओळी फोटोखाली लिहिल्या. खूप छान वाटलं. मग फोटोखाली अशा दोन ओळी लिहिणं आणि ते शेअर करणं हा रोजचा कार्यक्रमच झाला. प्रतिसादही चांगला मिळाला. रोज शेअर होणारे असे फोटो पाहून कुणी म्हणालं याचं वेगळं छान पुस्तक होईल... कुणी म्हणालं छान कॅलेंडर होईल...! हा प्रतिसाद खूपच प्रोत्साहित करणारा होता. फोटो आणि त्या संदर्भात दोन ओळींची कविता लिहीणं ही एक अभिव्यक्तीची नवी शैलीच सापडल्यासारखं झालं..!

या छंदात रमलेली असल्यामुळंच बहुधा ज्ञानेश्वरी वाचताना त्यातल्या उपमांकडं माझं लक्ष वेधलं गेलं असणार. तत्त्वविचार परोपरीनं समजावून सांगताना ज्ञानेश्वरांनी जागोजागी खूप उपमा दिलेल्या आहेत. या उपमांमधले बारकावे अनुभवणं हा एक विलक्षण आनंदाचा भाग असतो. लक्षपूर्वक वाचताना जाणवतं की या उपमा आशयाला दृश्याची मिती बहाल करताहेत...

एकदा एका फोटोवर दोन ओळी लिहिताना त्यात ज्ञानेश्वरीतली, मनात रेंगाळलेली ‘आनंदाचा अनुकार’ ही उपमा वापरली गेली. खरंतर तो फोटो काढताना ती उपमाच दृश्य रूपात समोर साकारलीय असं जाणवलं... सकाळचं प्रसन्न निळं आकाश. दाट झाडी असलेलं क्षितिज आणि त्या दोन्हीचं जलाशयात पडलेलं प्रतिबिंब.. नजर न हलवता टिपलं ते दृश्य..! –



अनुपम्य सृष्टी  खेळ निर्मात्याचा
जणू आनंदाचा अनुकार..!

अनुकार म्हणजे प्रतिबिंब- आकाराचा अनुवाद. हा शब्दच किती सुंदर आहे..!

      ज्ञानेश्वरीत या अर्थानं ही उपमा आलेली नाही. त्यातला संदर्भ थोडा वेगळा आहे. ऐक्याचे, अव्दैताचे ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचे वर्णन करणार्‍या ओव्यांमधल्या एका ओवीत ही उपमा आहे. ती ओवी अशी-

‘ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधे विहार । केले जैसे ॥ (१३८/५)’

अव्दैत-ज्ञानाची प्रचिती आलेली माणसं त्या ज्ञानसुखानं ओतप्रोत भारलेली असतात. ती जणू आनंदाचे अनुकार असतात. सुखाचे कोंभ असतात. अव्दैताच्या महाबोधानं त्यांना राहायला मंदिर दिलेलं असतं..! ..फोटो खाली लिहिलेल्या ओळींमधे या ओवीतला ‘आनंदाचा अनुकार’ हा मला भावलेला शब्दप्रयोग वापरला गेला.

मनात आलं, ज्ञानेश्वरीतल्या उपमांना छायाचित्रांच्या माध्यमातून असं दृश्य रूप देता आलं तर? त्या उपमा, त्यांचा संदर्भ आणि तत्त्वविचार सर्वच समजून घ्यायला मदत होईल का? दृश्य माध्यम नेहमीच अधिक प्रभावी असतं... मग मला भावलेल्या, ज्ञानेश्वरीत वरचेवर येणार्‍या उपमा जाणीवपूर्वक दृश्य रुपात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमांना साजेसा फोटो, त्याच्याखाली माझ्या दोन ओळी (या ओळींमध्ये फक्त ओव्यांमधल्या उपमांचा वापर केलेला आहे. मूळ ओवीतला तत्त्वविचार त्यात नाही. किंवा या ओळी म्हणजे ओवीचा अनुवादही नाहीत. एका दृष्टीनं त्या स्वतंत्र आहेत.) आणि त्याखाली ज्ञानेश्वरीतली ती उपमा असलेली ओवी, तिचा अर्थ आणि संदर्भ लिहिणं असा उपक्रम सुरू झाला. माझ्या छंदाला एक नवं अर्थपूर्ण वळण मिळालं...

त्यातली दोन तीन उदाहरणं इथे देते-




विवेकतरूंचे अनोखे उद्यान
करावे जतन ज्याचे त्याने..!

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना आवाहन केलं आहे-

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥ २८/१ ”

कथा म्हणजे ज्यात गीता निर्माण झाली ती महाभारत कथा. ती गहन आहे, सगळ्या चमत्कारांचे जन्मस्थान आहे.. आणि ती ‘विवेकतरू’चे उद्यान आहे. इथं आलेली विवेकतरूचे उद्यान ही उपमा म्हणजे केवळ प्रासादिकता नाही. तर समजून घेण्याचा तो एक दृष्टीकोन आहे असं मला जाणवलं. त्यामुळं ‘विवेकतरूंचे उद्यान’.ही उपमा लक्षवेधी वाटली. तिला दृश्यरूप देण्यासाठी छान फोटोही मिळाला...!

ज्ञानेश्वरीत दिवा, पाणी आणि तरंग, आकाश, पक्षिण अशा काही उपमा वरचेवर येतात. प्रत्येक संदर्भात त्या नव्या वाटतात. उदाहरणार्थ दिव्यांच्या उपमा पाहा- फोटो देवघरातल्या निरांजनांचा.




          दिव्यावर दिवा दुसरा लावला
           कोणता पहिला कोणा कळे?

ज्ञानेश्वरीत दिव्याची उपमा तीन ठिकाणी आलीय. त्या ओव्या अशा-

१) दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥ १२८/९
प्रकृतीचा खेळ चालू असतो. ‘मी’(कृष्ण, ईश्वर) त्या सर्वाचा आधार आहे पण ‘मी’ काही करत नाही. जसा घरात लावलेला दिवा कुणाला काय कर, करू नको ते सांगत नाही. कोण काय करतं आहे हेही तो जाणत नाही. पण तो असतो म्हणून सर्व व्यापार घडतात..

२) जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदिल कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥ ४२८/९
भक्त माझी भक्ती करता करता मीच होऊन जातो. मग भक्त कोण आणि ईश्वर कोण हे ओळखताच येत नाही. जसा दिव्याने दिवा लावला तर हा पहिला आणि हा दुसरा असा भेद राहात नाही. दोन्ही दिवे सारखेच असतात..

३) कां स्नेहसूत्रवन्ही । मेळू एके स्थानी । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४/१३

तूप, वात आणि अग्नी एकत्र येऊन दिवा बनतो तशी अहंकार, बुद्धी, मन, पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये, इच्छा, व्देष, सुख, दुःख, चेतना... इत्यादी छत्तीस तत्त्वे एकत्र येऊन शरीर (ज्ञानेश्वरीत क्षेत्र असं म्हटलं आहे) बनते...

ज्ञानेश्वरीतला- गीतेतला मुख्य उपदेश म्हणजे निष्काम कर्मयोग. तो ज्ञानेश्वरांनी परोपरीनं समजावून सांगितला आहे. हे समजावताना दिलेली उपमा पाहा-




माळी नेतो तसे सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी माळी जाणे..!


‘माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेले । तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥१२०/१२’

माळी नेतो तसे पाणी विनातक्रार जाते.. मुळं ते शोषून घेतात. बीजं अंकुरतात. फळं फुलं येतात.. पण यात पाण्यानं काही केलं असं होतं का? तसं आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत जीवन व्यतीत करत राहावं. माळ्यावर विश्वासून तो नेतो तसं पाणी जात राहातं तसं आपणही ईश्वरावर सर्व सोपवून मुक्त राहावं. कर्म करावं पण त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नये..!

       फोटो आणि दोन ओळी या छंदातून ज्ञानेश्वरीतील तत्त्वविचार समजून घेण्याचा हा नवा मार्ग मला मिळाला. या निमित्तानं मी ज्ञानेश्वरीतल्या उपमांकडे अधिक सजगतेनं बघते आहे. जाणवतं आहे की या उपमा म्हणजे केवळ भाषासौंदर्य, प्रासादिकतेची उदाहरणं नाहीत. त्या तुमच्या समोर आशय दृश्यरूपात उलगडून दाखवतात. आकलनाच्या कक्षेत आणून ठेवतात.

       सध्या तरी हे माझ्यापुरतं आहे. आणि ते करताना मला समजूत वाढल्याचा आनंद होतो आहे. मनात श्रद्धाभाव कधी जागा होईल हे माहीत नाही पण आनंदाचा अनुकार म्हणजे काय याचा अल्पसा प्रत्यय मी या उपक्रमातून घेते आहे..!

आसावरी काकडे
9762209028

‘समाजमन’ दिवाळीअंक २०१६ मधे प्रकाशित



No comments:

Post a Comment