Wednesday 29 September 2021

कवितेचा रियाज


     कविता हा आद्य साहित्य-प्रकार आहे. अंगाई गीतापासूनच तिची ओळख प्रत्येकाला झालेली असते. जात्यावरच्या ओव्या, म्हणी, वाक्‍प्रचार, उखाणे ही सर्व काव्याचीच रूपं. आजच्या कवितेची पाळंमुळं अशा लोकसाहित्यात सापडतात. कविता अल्पाक्षरी असते, ती प्रतिमांमधून बोलते. व्यक्त होऊनही अव्यक्त राहते. वैयक्तिक असूनही सार्वत्रिक होते. कवितेला दाद मिळते... कवितेच्या अशा काही ‘सोप्या’ वाटणार्‍या वशिष्ट्यांमुळे अनेकांना कावितेचे आकर्षण वाटते. कविता लिहाविशी वाटते. दाखवाविशी वाटते. सध्याच्या इंटरनेटच्या सुविधेमुळे अगदी बोटाशी असलेली अनेक प्रसार माध्यमे कवींची हौस पुरवतात. ‘लाइक्स’ प्रोत्साहन देत राहतात. पण खर्‍या कवितेपासून हा व्यवहार दुरावत राहतो. कवितेसाठी कुठे गुरुकुल असत नाही. तिची साधना ज्याची त्याला स्वतःलाच करावी लागते. ही साधना कशी करता येईल? त्यासाठी कवितेला किती तर्‍हांनी भिडता येईल ते पाहण्यापूर्वी कवितेच्या स्वरूपाविषयी थोडंसं-

कवितेच्या स्वरूपाविषयी अनेकांनी बरंच काही म्हणून ठेवलं आहे. कवितेचे वेगवेगळे आयाम अधोरेखित करणार्‍या काही व्याख्या पाहू-

१) A poetry is not the thing said but the way of saying it.- कवितेचं कवितापण ती काय सांगते यात नाही तर कसं सांगते, कशा तर्‍हेनं सांगते यात आहे. इथे ‘कथना’साठी वापरलेल्या प्रतिमा, अभिव्यक्तीसाठी निवडलेली छंद-लय... कवितेची शैली यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. विशिष्ठ शैलीमुळं कवितेला कवितापण येतं.

२) ‘A poem should not mean but be.’ या व्याख्यारूप झालेल्या ArsPoetica या Archibald MacLeish यांच्या कवितेतील ओळीत तर ढोबळ अर्थाला स्थानच नाही. स्तब्ध, अंतर्मुख करणार्‍या सूक्ष्म आशयाचं महत्त्व इथं अधोरेखित झालंय. कविता फक्त अनुभवायची. तिच्याविषयी बोलायचं नाही...

३) A poetry is a lava of imagination, whose irruption prevents earthquake या व्याख्येत कवितेच्या परिणामाकडे लक्ष वेधले आहे. घुसमटून टाकणार्‍या भावनांना कवितेतून व्यक्त होता आलं तर अतिरिक्त ताणातून सुटका होऊ शकते... हा अनुभव आपण घेतच असतो..!

४) ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ या अल्पाक्षरी व्याख्येत साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या भूमिकेचं सार आहे. इथे कवितेच्या आशयापेक्षा त्याच्या आस्वादप्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे. रसनिष्पत्ती हा चांगल्या साहित्यकृतीचा महत्त्वाचा निकष आहे.

समीक्षेच्या एका पद्धतीनुसार कवितेचं असणं- Being हे शब्दांमधे बांधलेल्या दृश्य कवितेत नसते तर ते आस्वाद-प्रक्रियेत, आस्वादाच्या जिवंत क्षणात असते. एरव्ही शब्द पडून असतात बंद पुस्तकांमधे. उच्चारित शब्द तर बापुडे केवळ वारा असतात’..

कवितेतील प्रतिमा...

चांगल्या कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती आत्मनिष्ठ असली तरी वैयक्तिक असत नाही. त्यात अनुभवाचं सामान्यिकरण झालेलं असतं. ‘मी’ सर्वनाम बनून कवितेत आलेला असतो. एकप्रकारे तो ‘स्व’चा विस्तार असतो. हे सामान्यिकरण करण्याचे कार्य कवितेतल्या प्रतिमा करत असतात. प्रतिमांमुळे कवितेला अनेकार्थ प्राप्त होतात. ज्याची जशी कुवत तशा त्याला त्या प्रतिमा उमगतात. राधा-कृष्णाच्या प्रेमाच्या प्रतिमेत पार्थिव प्रेम ते आत्मा-परमात्मा नातं एवढा मोठा आवाका आहे.

‘अभिधा’, ‘लक्षणा’, आणि ‘व्यंजना’ या शब्दांच्या तीन सामर्थ्यांपैकी व्यंजना हे सामर्थ्य कवितेला पोषक आहे. कधी कधी नेहमीचे शब्दच सूचकतेनं वापरले जातात तेव्हा ते प्रतिमा बनून जातात. रोजच्या जगण्यातल्या साध्या अनुभवांतून कवीला प्रतिमा सुचतात. कवीचे अनुभव-क्षेत्र जेवढे व्यापक तेवढ्या त्याच्या प्रतिमा व्यामिश्र बनतात. आणि त्या सामान्यांसाठी दुर्बोध ठरतात. उदा. कवी ग्रेस, आरती प्रभू, शंकर रामाणी यांच्या कविता. अबोध मनातला आशय दूरस्थ प्रतिमांमधून समोर आला की दुर्बोध होतो.

कवितेचा रियाज म्हणजे काय? तो कसा करायचा? या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा-

अनुभवाचं आंतरिकीकरण-

कविता लिहाविशी वाटण्याचा क्षण हा काहीतरी सांगण्यासाठी आसुसलेला असतो. जे सांगायचं आहे ते मनात पुरेसं रुजलेलं असणं, स्वतःला उमगलेलं असणं ही आतली पूर्वतयारी असते. पुरेसं पिकल्याशवाय फांदी फळाचं बोट सोडत नाही त्याप्रमाणे व्यक्त होण्याच्या अपरिहार्य क्षणाची वाट पाहावी. घाई करू नये. व्यक्त होण्याआधी अनुभवाच्या सर्व बाजू, गुंतागुंत असह्य होण्याइतक्या जाणवायला हव्यात. कधी कधी त्या लिहिता लिहिता जाणवायला लागतात. परिपूर्ण दृश्य कविता आधी मनात तयार असत नाही.

कवितेत Spontaneous overflow असतो, असावा. पण हा ओव्हरफ्लो अचानक नसतो. आपल्या नकळत आत बरंच काही घडलेलं असतं... थोडक्यात, व्यक्त व्हायची घाई करू नये. संत तुकारामांनी म्हटलं आहे- ‘फांकूं नका रुजू जालिया वाचून..’ गथा अभंग १२७/पृ.१८

अनुभवसमृद्धी

कविता आशयसमृद्ध होण्यासाठी आधी एक व्यक्ती म्हणून आपण समृद्ध व्हायला हवं. विविध प्रकारचं वाचन, त्यावर स्वतःचा विचार, एखाद्या आवडीच्या विषयाचा सखोल अभ्यास, ज्येष्ठांशी संवाद... अशा गोष्टी आपला दृष्टिकोन घडवायला मदत करतात. एखाद्या घटनेकडे किंवा व्यक्तीकडे पाहण्याचे किती वेगवेगळे दर्शनबिंदू असू शकतात ते अशा व्यासंगातून लक्षात येते. देवाला प्रदक्षिणा घालताना वाटेवरच्या प्रत्येक कोनातून त्याचे वेगळे दर्शन घडते. तसेच असते जगणे समजून घेणेही. वेगवेगळ्या भूमिकांमधून जगण्याविषयीची समज वाढवणं हा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग आहे.

कवितेतून नकळत इतर कलाप्रकारांना साद घातलेली असते. उदा. कवितेतले नादभारले शब्द संगीतकाराला, त्यातली चित्रदर्शी वर्णनं चित्रकाराला तर त्यातलं कथाबीज नृत्याला...! तसंच इतर कलांच्या आस्वादातूनही कवितेला प्रेरणा मिळते. हे आदान-प्रदान बर्‍याचदा सहज होते. पण ते होण्यासाठी कवीची नजर चौफेर भिरभिरली पाहिजे. समकालिन कवी कवयित्री काय, कसं लिहितायत याचं भान असतं, असावं तसंच इतर कलाक्षेत्रात काय चाललंय हेही सजगपणे समजून घ्यावं.

कवितांचा अनुवाद

कवितांचा अनुवाद करणं हा कवितेसाठीचा खरा रियाज आहे असा माझा अनुभव आहे. गायक जसा स्वरसाधनेसाठी शब्दांचा आधार घेऊन स्वर आळवतो तसेच काहीसे अनुवादाच्या प्रक्रियेत होते. इथे दुसर्‍या कवीच्या दुसर्‍या भाषेतील शब्दांमधून व्यक्त होऊ पाहणारा भावाशय तुमच्या समोर असतो. शब्दांचा एक चक्रव्युह रचलेला असतो त्या कवीनं. त्यातील प्रत्येक शब्द भाल्यासारखा त्याच्या आशयाच्या समोर उभा असतो. अनुवादकाला सर्व क्षमतेनिशी त्या व्युहात शिरून त्या शब्दांना जिंकून घेऊन त्यामागे दडलेल्या आशयापुढे आपला शब्द उभा करायचा असतो...! या प्रक्रियेत भाषेशी, शब्दांशी आतून बाहेरून जवळीक साधली जाते. शब्दांच्या सामर्थ्याचं भान अनुवाद करताना जेवढं येतं तितकं नुसतं वाचताना, लिहितानाही येत नाही.

अनुवादात शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा पुन्हा परिष्करण करावं लागतं. ते करताना एकाच वेळी दोन भाषांतील शब्दांशी निकटचं नातं तयार होतं. नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवी कथनशैली यांचाही हार्दिक परिचय होतो... ही प्रक्रियाही कवितेविषयक, निर्मिती-प्रक्रियेविषयक समजुतीत भर घालणारी असते. या प्रक्रियेत जी आंतरिक मशागत होते त्यातून नव्या स्वतंत्र निर्मितीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच कवितांचा अनुवाद करणं हे सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं.

ब) रूपांतर-

     अनुवाद आणि रूपांतर यात फरक आहे. अनुवादात मूळ कवितेशी प्रत्येक स्तरावर प्रामाणिक राहावं लागतं. रुपांतरात भावानुवाद पुरतो. मूळ काव्य कळणं हा महत्त्वाचा हेतू असतो असं मला वाटतं. पसायदान, चांगदेवपासष्टी.. अमृतानुभव.. उपनिषदं यांचे बर्‍याच अभ्यासकांनी, साहित्यिकांनी रुपांतर केले आहे. मी प्रथम तसा प्रयत्न केला तो चांगदेवपासष्टीच्या रुपांतराचा. या प्रक्रियेत मला महत्त्वाची गोष्ट जाणवली ती ही की रुपांतर ही एक दृश्य स्वरूपातली आकलन-प्रक्रियाच आहे. रुपांतर करताना मूळ संहिता समजून घेणं आणि काय समजलंय ते आपल्या शब्दात उतरवणं अशा दोन कृती घडतात. शब्दांकन करताना कस लागतो खरोखर काय समजलंय त्याचा. आणि समजलेलं आपल्या शब्दात मांडताना भाषिक क्षमतेचीही परीक्षा होत असते. या प्रक्रियेत दोन गोष्टी घडतात... समजलेलं मनात सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मोकळं होता येतं त्याचवेळी नव्या समजुतीला जागा करून दिली जाते. ओघ चालू राहतो.

कवितेची समीक्षा

     समीक्षा हा साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समीक्षेमुळे साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लेखक आणि वाचक दोघांना मार्गदर्शन मिळतं. त्यामुळं साहित्याचे अभ्यासक, सामान्य वाचक आणि सर्जनशील लेखन करणार्‍या लेखकांनीही समीक्षाविचार करणं गरजेचं आहे.

कविता लिहितांना सहसा अमुक प्रकारची कविता लिहू असा विचार होत नाही. पण अभ्यासासाठी कवितांचे प्रकार विचारात घेतले जातात. उदा. स्त्रीवादी, दलित, ग्रामिण, शहरी, निसर्ग-कविता इत्यादी. हे कवितांचे प्रकार म्हणजे खरं तर कविता समजून घ्यायचे हे दृष्टिकोन आहेत.

     सर्व माणसं सारखी असली तरी जन्मानुसार अनुभवविश्व बदलतं. स्त्रीवाद मूलतः माणूसपणाची मागणी करत असला तरी स्त्री असण्यामुळे जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन घडत असतो. शिवाय मासिक पाळी, मूल जन्माला घालणे.. असे स्त्रीचे खास वेगळे अनुभव असतात. त्यामुळं तिचं भावविश्व पुरुषांपेक्षा वेगळं होतं. त्यामुळं ‘ती’ची कविता वेगळी होऊ शकते. त्याच प्रमाणं दलित कुटुंबात जन्माला येण्याचे आणखी वेगळे अनुभव असतात. शहरी सवर्ण लोक कल्पनाही करू शकणार नाहीत असं त्यांचं जगणं असतं. त्यांच्या कवितेत अपरिहार्यपणे ते अनुभव, ती भाषा, त्या वेदना येणार... अशा कविता समजून घेण्यासाठी ठराविक संस्कारातून घडलेली दृष्टी पुरेशी नसते. समीक्षा-विचारातून असे वेगवेगळे दृष्टिकोन समजतात. आस्वादक, चिरित्रात्मक, आदिबंधात्मक... असे समीक्षेचे सात-आठ प्रकार आहेत. यांच्या अभ्यासातून आपल्या विचारांचा पैस रुंदावतो.

     मात्र अभ्यासातून साचेबद्ध विचारात आपला दृष्टिकोन बसवू नये. तिथेही creative thinking आवश्यक आहे. आपण ठराविक पद्धतीनं, आपल्या चष्म्यातून दिसेल तसा विचार करत राहतो. त्याच तर्‍हेनं माणसं, घटना समजून घेतो. पण वस्तुस्थिती त्यापेक्षा खूप वेगळी असू शकते. आपल्यासह सगळे सतत बदलत असते. पण आपण संस्कारांनी दृढ झालेल्या तर्‍हेनंच विचार करतो. खरंतर वास्तवाचे केंद्र आणि परीघ दोन्ही बदलत असते, प्रत्येकाच्या नजरेतून वेगळे असू शकते. परीघावरचा कोणताही बिंदू केंद्रबिंदू होऊ शकतो. आणि तिथून पूर्ण चित्रच वेगळे दिसते. उदा. पांडव आणि कृष्ण यांना मध्यवर्ती मानून ऐकलेले महाभारत कर्ण नायक होतो तेव्हा वेगळे जाणवू लागते... कथनातील ‘नायक’ बदलला की पूर्ण कथन बदलून जाते...

सारांश, आपला दृष्टिकोन आपण सतत तपासून घेत गरजेनुसार बदलत राहायला हवं. समीक्षा ही ‘वाचना’ची पद्धती आहे. साहित्य असो, माणूस असो की घटना हे सर्व वाचताना, समजून घेताना परिप्रेक्ष बदलून पाहता आलं पाहिजे..!

मुक्तछंद- छंदोबद्ध कविता

पूर्वी कविता म्हणजे छंदोबद्धच असायची. हल्ली मुक्तछंदाचा जमाना आहे असं म्हणतात पण सध्या परत छंदोबद्ध कवितेचा जोरदार पुरस्कार होताना दिसतो आहे. फेसबुक, WhatsApp सारख्या माध्यमांमध्ये, कार्यशाळा, विविध उपक्रम घेऊन वृत्तांविषयी व्यवस्थित माहिती देऊन सभासदांकडून त्यानुसार कविता लिहून घेतल्या जातात...

छंदोबद्ध कवितेला अक्षर-संख्या, त्यांच्या मात्रा, त्यांचा अनुक्रम, यमक... असे बरेच नियम असतात. त्यानुसार अंतःस्फूर्त लेखन करणं सोपं नाही. पण नियमानुसार प्रयत्नपूर्वक कविता लिहिता येते. सरावाने कृत्रिमतेचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो.. पण धडे गिरवणारे बरेचजण अलिकडेच राहतात.

मुक्तछंद कवितेला काही नियम असल्याचं माझ्या वाचनात आलेलं नाही. त्यात आशयाची लय असते असं म्हणतात पण ती छंदोबद्ध कवितेसारखी तपासता येत नाही. त्यामुळे मुक्तछंद कविता लिहिणं सोपं आहे असं अनेकांना वाटतं. पण तसं नाहीए. नियम नसल्यामुळं उलट ते अधिक जबाबदारीचं आहे. बोट सोडून सुटं चालण्यासारखं...

मुक्तछंद कवितेत मनातला आशय तुम्हाला योग्य शब्द निवडायला लावतो. छंदोबद्ध कवितेत नियमांचं बोट धरून तुम्ही शब्दांचे पर्याय शोधता. त्यांच्या दिग्ददर्शनानुसार शब्द निवडता. त्यातून कधी नको असलेला आशय स्वीकारावा लागतो तर कधी मनात नसलेला पण अधिक महत्त्वाचा आशय तुमच्या ओंजळीत अलगद येऊन पडतो..! मुक्तछंदात तुम्ही स्वावलंबी असता. आणि कोणत्याही दिग्दर्शनाशिवाय तुम्हाला तुमचे अनावरण करायचे असते...!

माझ्या मते मुक्तछंद कवितेत भावाशय कुठल्याही तडजोडीशिवाय थेट मांडता येतो. पण म्हणजेच तो स्वतःला खोदून उपसून काढावा लागतो. स्वतःला समजून घ्यावा लागतो. पूर्ण आशय मनात तयार असेल असं नाही. लिहिताना तो उलगडत जातो. लिहिणं म्हणजेच खोदणं असतं एकप्रकारे. मुक्तछंद कविता लिहिताना शब्दांना यमक.. इ. नियम नसतात. पण शब्दांचा फापटपसारा झाला की कविता पसरट होते आणि पुरेसं व्यक्त होता आलं नाही तर अर्थहानी होते. कविता फसते. कवितेच्या लांबीला काही नियम नाहीत. पण त्यातली एकही ओळ काढली किंवा खालीवर केली तर कवितेचा तोल जाईल अशी तिची बांधणी पक्की असावी लागते. कवितेची सुरुवात, विस्तार आणि शेवट याही बाबतीत नियम नसले तरी शेवट असा असावा की लगेच खाली सही करता यावी. शेवटी पंचलाइन किंवा क्लायमॅक्स असावा. विस्तार करताना त्यातली प्रत्येक ओळ आशय पुढे नेणारी असावी. एकच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यातही कवीची झेप व्यक्त होऊ शकते. त्यातून आशयाच्या कक्षा लक्षात आणून दिल्या जातात. उदा. कुसुमाग्रजांची ‘प्रेम कुणावरही करावं...’ ही कविता.

समारोप-

कविता लिहिणं एकूणातच सोपं नाही. आकाशातली वीज हातात धरण्यासारखं आहे ते.. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्याही एकुणएक कविता उत्तम असत नाहीत. जमून गेलेल्या कोणत्याही कलाकृती संख्येनं थोड्याच असतात. त्यामुळं मुक्तछंद असो की छंदोबद्ध असो त्यात खरं काव्य उतरलंय का? हे महत्त्वाचं. पूर्वी छंदोबद्ध कवितेत पौराणिक कथा गुंफलेल्या असायच्या. तेव्हा ते माध्यम होतं. कथानक असलेल्या त्या कविता छंदोबद्ध असल्या तरी त्यांना कविता का म्हणायचं असा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. मुक्तछंदाला तर असा प्रश्न विचारलाच जाऊ शकतो.

मग प्रश्न निर्माण होतो की कोणत्या रचनेत काव्य आहे असं म्हणायचं? असे प्रश्न पडणं, त्यांच्या उत्तरांसाठी संवाद साधणं, अभ्यास करणं, इतरांच्या चांगल्या कविता वाचणं, आपल्यापुरतं त्याचं रसग्रहण करणं.. यात चांगलं काय आहे? कशामुळे आहे? ते पाहणं... चांगलं असण्याचे काही ठोस नियम नाहीत. आपणच ठरवायचं आपल्याला हे कशामुळं भावलं ते. ही रियाजाची दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. ज्याला तीव्र आंतरिक ध्यास आहे अशा व्यक्ती हे उत्स्फूर्तपणे करत असतात.

अनुभवांचे आंतरिकीकरण, अनुभवसमृद्धी, कवितांचा अनुवाद, समीक्षा, मुक्तछंद-छंदोबद्ध रचनेचा विचार... अशा विविध अंगांनी कवितेला भिडता येतं. हा एक प्रगल्भतेकडे नेणारा आंतरिक प्रवास आहे. कवीचे समृद्ध व्यक्तित्व हा कवितेचा पूर्वार्ध असतो तर शब्दात प्रकटलेली कविता हा उत्तरार्ध असतो. म्हणून कवितेचा रियाज म्हणजे खरंतर एक चांगलं, प्रगल्भ माणूस होण्याचाच रियाज असतो..!

आसावरी काकडे

१९.०४.२०२१