Tuesday 5 January 2016

मीरा

निबंध- 
(आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र आणि गुरुदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मंगेश पाडगावकर यांनी केलेली भाषांतरे’ या विषयावरील चर्चासत्र-  ३० सप्टेबर- १ आक्टोबर २०११) 
मीरा
संत मीराबाईच्या पदांचा मंगेश पाडगावकर यांनी केलेला छंदोबद्ध मराठी अनुवाद

प्रास्ताविक-
माननीय प्रा. पुष्पा भावे, डॉ. हरिश्चंद्र थोरात, आजच्या चर्चासत्रात सहभागी असलेले सर्व अभ्यासक आणि उपस्थित श्रोते,
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र आणि गुरुदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मंगेश पाडगावकर यांनी केलेली भाषांतरे’ या  विषयावरील चर्चासत्रात आपला निबंध सादर करण्याची संधी आयोजकानी मला दिली याबद्दलचा आनंद सुरुवातीला व्यक्त करते...
पण या आनंदाबरोबरच बरचसं दडपणही आहे.. कारण अशा प्रकारे एका मोठ्या व्यासपीठावरून महत्त्वाच्या विषयावरील चर्चासत्रात मी प्रथमच निबंध सादर करते आहे. शिवाय थोड्या अनुभवाच्या आधारे पाडगावकरांसारख्या ज्येष्ठ कवीच्या अनुवादावर बोलणं ही मोठीच जबाबदारी आहे. पण अनुवाद हा माझा आवडता विषय आहे आणि या निमित्ताने इतर अभ्यासकांचे अनुवादविषयक विचार ऐकायला मिळतील, आपले विचार तपासून घेता येतील या हेतूनं मी इथं आले आहे.
आजच्या चर्चासत्रात मंगेश पाडगावकर यांच्या ‘मीरा’ या पुस्तकातील संत मीराबाईच्या पदांच्या अनुवादासंदर्भात लिहिलेला निबंध मी सादर करणार आहे... चर्चासत्राच्या विषयाच्या शीर्षकात भाषांतर असा शब्द वापरला आहे. पण ‘मीरा’ या पुस्तकावर लिहिताना मी अनुवाद हा शब्द वापरला आहे. कारण पाडगावकरांनी मीराबाईच्या पदांचे भाषांतर नाही अनुवाद केला आहे असं मी मानते. [भाषांतर आणि अनुवाद यात थोडा फरक आहे असं मला वाटतं. तो इथं स्पष्ट करून सांगायला हवा असं नाही.]  त्यांच्या अशा एकूण लेखनाविषयी लिहितानाही सोयीसाठी सरसकट अनुवाद हाच शब्द मी वापरला आहे.  

मंगेश पाडगावकर यांचे अनुवादित साहित्यातील योगदान-
एखाद्या साहित्यकृतीविषयी विस्ताराने काही म्हणायचे असेल तर त्या साहित्यकाराचे एकूण साहित्यिक योगदान नजरेसमोर ठेवावे लागते... १९५० साली ‘धारानृत्य’ हा मंगेश पाडगावकर यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे त्यांचे लेखन चालू आहे. अगदी अलिकडे त्यांचा ‘गिरकी’ हा नवा कवितासंग्रह वाचकांसमोर आला आहे. त्यांच्या ‘सलाम’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा १९८० सालचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर केलेल्या भाषणात आपल्या कवितेच्या प्रेरणेविषयी बोलताना ते म्हणाले होते, ‘मला माणूस समजून घ्यायचा आहे आणि माणसावर प्रेम करीत माणसाचे गाणे मला गायचे आहे. याच प्रेरणेतून त्यांनी हरप्रकारे कवितालेखन केलं. भावगीत, प्रेमगीत, बालगीत, विडंबन, वात्रटिका, बोलगाणी... कोणताच प्रकार आणि कोणताच विषय त्यांनी वर्ज्य मानला नाही. वृत्तबद्ध, मुक्तछंद... अशा कुठल्याही साच्यात न अडकता त्यांनी लेखन केलं. सर्व प्रकारच्या अनुभवांना सामोरं जात स्वतःशी आणि जगण्याशी प्रामाणिक राहात लिहिता यावं म्हणून सर्व स्तरांवर असा खुलेपणा त्यांनी स्विकारला असणार.
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. या निमित्ताने माणूस समजून घेण्यासाठी एका व्यापक पटावरचे अनेक दर्शनबिंदू त्यांना सापडले असतील. त्यांच्या अशा लेखनामागेही हीच प्रेरणा असेल. कारण अनुवाद करतानाही त्यांनी साहित्यप्रकार किंवा विषय याचे कोणतेच बंधन स्वतःवर घालून घेतले नाही. स्वतंत्र लेखनाबरोबर असे लेखनही ते सातत्यानं करत आहेत. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि अलिकडेच ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र... असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यात आहेत.
त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’  या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केलेला आहे. निवडक समकालिन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. आणि ‘ज्यूलिअस सिझर’, ‘रोमिओ आणि ज्यूलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्स्पीअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतर’ही त्यांच्या नावावर आहे. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टात भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.
पाडगावकरांच्या एवढ्या मोठ्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे. मराठी विश्वकोश खंड १३ मधे मीराबाईवर लिहिलेल्या नोंदीत या संग्रहाचा उल्लेख आहे. भारतीय संस्कृतीकोशात तर काकासाहेब कालेलकर यांच्या प्रस्तावनेतलाच काही भाग उद्‍धृत केला आहे. यावरून या पुस्तकाचे संदर्भ-मूल्य किती आहे ते लक्षात येण्यासारखे आहे.

विषय प्रवेश-
मीराबाईच्या निवडक पदांचा पाडगावकरांनी केलेला अनुवाद त्यावर निबंध लिहिण्याच्या दृष्टीनं अभ्यासायचा तर मीराबाईच्या काव्याची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे.
वैयक्तिक संदर्भ- मीराबाईच्या कार्यकालाविषयी अभ्यासकांत बरेच मतभेद आहेत. भारतीय संस्कृतीकोशात १६ वे शतक असा मोघम उल्लेख आहे तर मराठी विश्वकोश [खंड १३] आणि इंटरनेटवरील एका नोंदीनुसार मीराबाईचा कार्यकाल अंदाजे १४९८-१५४७ असा आहे. किरण नगरकर यांच्या ‘ककल्ड’ या मीराबाईसंदर्भातील महत्त्वाच्या कादंबरीत शेवटी दिलेल्या ऐतिहासिक टिपणात मीराबाईचा जन्म १४९८ मधे झाला आणि १५१६ मधे तिचं चितोडच्या राणा संगाच्या ज्येष्ठ मुलाशी- युवराज भोजराजाशी लग्न झालं अशी नोंद आहे. कालेलकर यांच्या प्रस्तावनेत कालखंडाचा उल्लेख नाही... मीराबाईचा जन्म राजघराण्यात झाला आणि तिचे लग्नही राजघराण्यात झाले. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे विष्णुभक्त असलेल्या आजोबांकडे ती वाढली. तिथे तिच्यावर भक्तीचे संस्कार झाले. संतसाहित्य, आध्यात्मिक आणि पौराणिक साहित्याशी तिचा चांगला परिचय होता... लहानपणी एका साधूकडून तिला मिळालेली कृष्णाची मूर्ती, तोच आपला पती मानणं, सासरी झालेला छळ...विषप्रयोग...अशी मीराबाईविषयीची माहिती आख्यायिकांमधून आणि काही प्रमाणात तिच्या पदांमधून कळते. पण प्रमाण माहिती फारशी मिळत नाही असे तिच्याविषयीच्या लेखनात म्हटलेले दिसते.
भौगोलिक पार्श्वभूमी- जन्मापासून लग्नानंतरचा काही काळपर्यंत राजस्थानात, पतीनिधनानंतर काही वर्षांनी  वृंदावनात आणि शेवटी..व्दारकेत तिचे वास्तव्य होते..
ऐतिहासिक पार्श्वभूमी- मोघल साम्राज्याचा काळ.. आक्रमणं, लढाया, हिंदू राजांमधेही आपापसात वैमनस्य, कौटुंबिक कलह, राजघराण्यातल्या व्यक्तींचे मृत्यु... मीराबाईने हे सर्व जवळून अनुभवले.

मीराबाईच्या अशा चरित्रविषयक माहितीवरून लक्षात येतं की ऐहिक स्तरावर वैभवसंपन्न आयुष्य लाभूनही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक स्तरांवर अस्थिरता, सर्वत्र कलहाचे वातावरण, जवळच्या व्यक्तींचे मृत्यु.. अशा गोष्टींमुळे ऐहिक जीवनाविषयी तिच्या मनात वैराग्यभाव जागा झाला असेल आणि तिच्यावर झालेल्या आध्यात्म-भक्तीच्या संस्कारांमुळे मीराबाईनी सामान्य जीवनाचा त्याग करून भक्तीमार्ग स्विकारला असेल.  
तिच्याविषयीच्या लेखनात अशीही माहिती मिळते की तिला काव्य, संगीत, नृत्य.. या कला चांगल्या अवगत होत्या. तिने आपला आर्त उत्कट भक्तीभाव काव्यरूपात शब्दबद्ध केला. इतकंच नाही तर ही पदं स्वतः गाऊन, नाचून, उघडपणे संतांना बरोबर घेऊन ती तो व्यक्त करत असे. तिच्या समूहसाधनेचाच हा भाग होता. तिची पदं अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे मौखिक परंपरेतून  सर्वदूर पसरली आणि टिकली.. त्यातली सुमारे ५०० पदं आजही उपलब्ध आहेत. पण त्यात प्रक्षिप्त भाग बराच आहे. त्यामुळे उपलब्ध पदांमधे अनेक भाषांचे मिश्रण आढळते. मूळ काव्य-रचना १५-१६व्या शतकातली राजस्थानी, ब्रज आणि गुजराती या भाषांमधे आहे. पण त्यात पंजाबी, खडी बोली.. इ. भाषांमधले शब्दही आढळतात. मीराबाईच्या काव्याचा विषय प्रामुख्यानं कृष्ण-भक्ती..विरह, मीलन..हा आहे. पण काही पदांमधे वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भही आढळतात. उत्कटता, भाव-सौंदर्य, शब्दमाधुर्य, नादमयता, गेयता, चित्रात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मप्रचीतीचं सच्चेपण... ही तिच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मीराबाईच्या उपलब्ध पदांपैकी साठ निवडक पदांचा मराठी अनुवाद पाडगावकर यांनी केला आहे. ‘मीरा’ या पुस्तकात पाडगावकरांचे मनोगत नसल्यामुळे अनुवाद करताना त्यांनी पदांची त्या काळची, तीही संमिश्र असलेली भाषा कशी समजून घेतली, पदांची निवड करताना त्यांनी पदांचा आशय-विषय किंवा कालक्रम लक्षात घेतला की पदांचे काव्यगुण, पदांची लोकप्रियता हा निकष लावला? हे कळायला मार्ग नाही... पण ही पदे बारकाईने वाचल्यावर जाणवते की मीराबाईच्या एकूण पदांचे स्वरूप लक्षात यावे अशी प्रातिनिधिक स्वरूपाची ही निवड असावी. पुस्तकात मूळ पदं डाव्या पानावर आणि त्यांचा मराठी अनुवाद उजव्या पानावर आहे. त्यामुळे अनुवादाच्या आधारे मूळ पदं समजून घेता येतात. आणि मूळ पदांशी ताडून बघत अनुवादाचा आस्वाद घेता येतो. अनुवादाविषयीची निरीक्षणं नोंदवण्याच्या दृष्टीनं ही मांडणी विशेष उपयुक्त आहे.

अनुवादाविषयीची निरीक्षणं-
‘मीरा’ या अनुवादाविषयीची निरीक्षणं नोंदवताना काही विधानं करण्यापूर्वी अनुवादप्रक्रिया लक्षात घेणं गरजेचं आहे. अनुवाद करताना प्रथम मूळ भाषेतील शब्दांचा व्युह भेदत भाषा, तिची संस्कृती, विषय, मांडणी, वेगवेगळे संदर्भ... अशा सर्व स्तरांवर मूळ साहित्यकृती समजून घ्यावी लागते. मग त्या समजून घेतलेल्या सर्व घटकांमधून, एक प्रकारे ‘दिलेल्या’ सामग्रीतून आपल्या भाषेत निर्माण करायची असते मूळ साहित्यकृतीची प्रतिकृती ! या पूर्ण प्रक्रियेत ‘आस्वाद’ आणि ‘निर्मिती’ या दोन्ही क्षमतांची कसोटी लागते. वेगवेगळ्या स्तरांवर असंख्य अडचणी येतात. त्यामुळे कोणताही अनुवाद अनुवादकाला एकाच वेळी बरचसं असमाधान आणि काही प्रमाणात निर्मितीचा आनंद देत असतो.
कवितांच्या अनुवादाबाबत हे अधिक खरं आहे. कारण कवितेचं स्वरूपच असं की तिचा अनुवाद करणं ही तारेवरची कसरत ठरावी... तोल जाण्यासाठी भरपूर अवकाश असलेली आणि तोल सावरण्यासाठी क्षीण आधार देणारी...  कविता मितभाषी असते. जे बोलते तेही प्रतिमांमधून किंवा सरळ मौनातूनच. शिवाय ती काय बोलते त्यापेक्षाही ती कशा पद्धतीनं बोलते यातच तिचं कवितापण असतं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लिहून / उच्चारून मनावेगळी झालेली, शब्दांमधे स्थिरावलेली कविता एखाद्या स्मारकासारखी मूक असते. तिचा आस्वाद घेतला जातो तेव्हा ती पुन्हा बोलू लागते. पण तेव्हा ती रसिकाची झालेली असते... त्यामुळे कवितेचा अनुवाद करताना पहिला प्रश्न पडतो की... कोणत्या कवितेचा अनुवाद करायचा शब्दातून व्यक्त होण्यापूर्वी कवीच्या मनात होती तिचा की आस्वादप्रक्रियेत रसिकमनात उमटते तिचा?.... खरंतर कवितेची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात एक वैशिष्ट्य असं आहे की तिचा अनुवाद करता येत नाही! प्रतिमा, शैली, मौन, भावसौंदर्य, लय... यांचा अनुवाद कसा करणार? 
 मुळात कवितेचा अनुवाद इतका अशक्य, त्यात मीराबाईसारख्या पुरेसा परिचय उपलब्ध नसलेल्या संत कवयित्रीच्या, भक्ती-अध्यात्म हा अनुभव-कक्षेच्या बाहेरचा विषय असलेल्या काव्याचा छंदोबद्ध अनुवाद करणं किती अवघड आहे याची कल्पना करता येईल...असा अनुवाद करताना एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि कितीही शिकस्त केली तरी त्यातल्या एक-दोन गोष्टी तरी हातून निसटतातच. एक चूक टाळताना दुसरी चूक होऊन बसते... त्यामुळे ‘मीरा’ या अनुवादाविषयीची निरीक्षणं नोंदवताना त्यातील गुणदोषांविषयी निश्चित अशी विधानं करता येण्यासारखी नाहीत. पण या अनुवादाविषयीच बोलायचं असल्यामुळे काही मुद्दे विचारार्थ घेऊन त्या अनुषंगानं थोडी चिकित्सा करणार आहे. त्यासाठी विशिष्ट परिभाषा बहुधा मला वापरता आलेली नाही. माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. इथे हेही स्पष्ट करायला हवं की ही निरीक्षणं नोंदवताना दाखवून दिलेल्या मर्यादा या अनुवादकाच्याच केवळ नाहीत. अनुवादप्रक्रियेच्याही त्या मर्यादा आहेत.

१] अर्थनिश्चिती / अन्वयार्थ
 वर म्हटल्या प्रमाणे अनुवाद करताना मूळ काव्य समजून घेणं ही पहिली पायरी असते. मीराबाईच्या काव्यामागची पूर्ण पार्श्वभूमी समजून घेतल्यावर मगच काव्यरचनेला भिडता येतं. या टप्प्यावर प्रमुख अडचण येते ती भाषा, शब्दार्थ समजण्याची. शब्दार्थासाठी शब्दकोश वापरणे हाच एक पर्याय असतो. प्राचीन काव्याच्या बाबतीत त्यातील विशिष्ट संदर्भ जाणून घेण्यासाठी कविशी संपर्क साधणं शक्य नसतं. दुसरा पर्याय म्हणजे त्या संदर्भातल्या इतर पुस्तकांचा आधार घेणं किंवा अभ्यासकांचं सहकार्य घेणं.. पण इथे मतभेदांचीच शक्यता अधिक... शब्दार्थांसाठी शब्दकोश कोणता वापरायचा हाही प्रश्नच आहे. कारण या रचनांमधे सोळाव्या शतकातल्या राजस्थानी, ब्रज, गुजराती इ. भाषांचे मिश्रण आहे. शिवाय काव्यरचनेसाठी शब्दांची रूपं बदलली जात असल्यामुळे मूळ शब्द कोणता असेल हे कळणंही कठीण. त्यामुळे मीराबाईच्या पदांचा अन्वयार्थ लावताना वस्तुनिष्ठ विचार करता येणं अवघड आहे. शिवाय जाणून घेतलेला आशय जसाच्या तसा अनुवादात उतरवणंही सोपं नाही.  काव्य-रूपात, तेही छंदोबद्ध रचनेत त्याचं शब्दांकन करताना काही तडजोडी कराव्य़ा लागतात. अशा तडजोडी म्हणजे समजलेल्या आशयापासून ढळणं.. अशा सर्व अडचणींना सामोरं जात कुणीही लावलेला अन्वयार्थ वाचकाच्या किंवा दुसर्‍या अभ्यासकाच्या दृष्टीनं ‘वेगळा’, अपुरा किंवा चुकीचा ठरू शकतो. अर्थनिश्चितीसंदर्भात पाडगावकरांनी आपल्या ‘कबीर’ या १९९७ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे- ‘पुष्कळदा शब्दार्थाच्या वाटेने न जाता अध्याहृत भावार्थाच्या वाटेने जाणे मला भाग पडत होते. पुष्कळ वेळा कवितेची जाणीव हा एक कलात्मक ‘अंदाज’ असतो. तो युक्तिवादाने सिद्ध करता येत नाही. आणि शेवटी माझ्या काही शक्ती आहेत तशा माझ्या काही मर्यादा या असणारच.’  मीराबाईच्या पदांचा अनुवाद करतानाही त्यांची अशीच भूमिका असू शकेल.

‘अर्थनिश्चिती’संदर्भातली काही उदाहरणं पाहू—
अ] ‘कळत नाहीय प्रभुशी माझं मीलन कसं होईल.. तो आला होता पण परत गेला निघून कारण मी अभागी झोपलेली होते...आता मी बैरागिण बनून फिरेन..’ अशा आशयाचं एक पद आहे.[पृष्ठ २२] त्यात एक ओळ अशी आहे-
‘चुडियां फोंरू मांग बखेरूं कजरा मैं डारूं धोय री’
अनुवाद- ‘करिन जटा मी, चुडाहि फोडिन, धुवून काजळ टाकिन ग’ [२३]

इथे ‘मांग बखेरू’ चा ‘करिन जटा मी’ हा अनुवाद वाचताना थोडं खटकतं. जटा हा शब्द बैरागी बनण्याच्या संदर्भात ठीक वाटला तरी या ओळीत पुढे आलेल्या ‘चुडा फोडीन, काजळ धुवून टाकीन...’ या वर्णनाच्या संदर्भात ‘मांग बखेरू’चा अर्थ केस मोकळे सोडीन, विस्कटून टाकीन.. असा अधिक योग्य वाटला असता... ‘मांग’, चुडा, काजळ.. ही सौभाग्यचिन्ह आहेत. त्यांचा त्याग करीन कारण तो पुन्हा भेटला नाही तर या सगळ्याचा काय उपयोग? असाही अर्थ यातून निघू शकेल... अन्वयार्थ लावण्यात असे मतभेद अपरिहार्य असतात. आणि मतभेद म्हणजे वेगळा पर्याय सुचणं. कोणताच पर्याय वस्तुनिष्ठपणे चूक किंवा बरोबर ठरवता येत नाही. कारण अशा काव्याचा अनुवाद करताना ‘कलात्मक अंदाज’ हाच प्रमुख आधार असतो.

ब] ‘तेरे खातर जोगण हूंगी करवत लूंगी कासी’ [पृ.३४]
अनु.- ‘तुझिया खातर बनेन जोगिण, लाविन फांस गळ्याशीं’ [३५]
‘करवत लूंगी कासी’ चा ‘लाविन फांस गळ्याशीं’ हा अनुवाद योग्य वाटत नाही. करवतचा अर्थ
करवट आणि कासी म्हणजे काशी... जोगण बनून काशीला निघून जाईन आणि जीव देईन असा अन्वयार्थ अधिक संदर्भाला धरून झाला असता. कारण ‘करवट लेना’चा अर्थ हिन्दी शब्दकोशात ‘स्वर्गप्राप्ती के लिये काशी, प्रयाग आदी में विशेष आरे के नीचे कटकर मर जाना’ असा दिला आहे.

क]
‘माई म्हांने सुपने में बरी गोपाल
रातीपीती चुनडी ओढी मेंहदी [मेहॅंदी] हाथ रसाल
कांई और को बरूं भांवरी म्हां के जग जंजाल
मीरा के प्रभु गिरिधर नागर करी सगाई हाल’ [पृ.४०]
अनुवाद-
‘स्वप्नांत मला हरिने वरिलें
पदर ओढिला, लाल मेंदिचे करांत कर धरिले
जगजंजाळीं कुणा वरूं मी? हरिने मन हरिले
छळ मांडी जग, परि मीरेने हरिला अनुसरलें’ [४१]

इथे ‘चुनडी ओढी’चा ‘पदर ओढिला’ हा अनुवाद शब्दशः केल्यासारखा वाटतो. मराठीत ‘पदर ओढणे’ चा अर्थ ‘चुनडी ओढना’ सारखा होत नाही. मुळात चुनरी आणि पदर यातही फरक आहे. पहिल्या ओळीचा अनुवाद `स्वप्नांत मी हरिला वरलं’ असा करण्याऐवजी ‘स्वप्नांत मला हरिने वरिले’ असा केल्यामुळे तर ‘पदर ओढिला’चा अर्थ ‘त्याने पदर ओढला’ असा वाटू शकतो... पहिल्या ओळीच्या या अनुवादाशी जोडून घेत केलेला ‘मेंहदी हाथ रसाल’ चा ‘लाल मेंदिचे करांत कर धरिले’ हा अनुवाद दूरान्वयानं, ओढून ताणून केल्यासारखा, खरंतर चुकीचाच वाटतो. कारण मूळ पदात, ‘करात कर धरिले’ असा अर्थ लावायला जागा नाही.
इथे पहिल्या दोन ओळींचा अर्थ ‘स्वप्नात मी गोपालाला वरलं, रातीपीती म्हणजे लाल-पिवळी चुनरी डोक्यावर घेतली, मेंदीने हात रंगवले..’ असा घेणं पुढच्या ओळीतील ‘दुसर्‍या कुणाला मी का वरू?’ या आशयाशी सुसंगत झाला असता... लग्नप्रसंगी चुनरीचा लाल-पिवळा रंग राजस्थानात शुभ  मानाला जातो. हा आशय सूचीत करणार्‍या ‘रातीपीती’ या अर्थपूर्ण शब्दाचा आशयही अनुवादात आलेला नाही.

      ड] बहुतेक सर्व पदांचा अनुवाद करताना पाडगावकरांनी प्रत्येक ओळीचा समांतर अनुवाद स्वतंत्रपणे केलेला आहे. त्यामुळे पूर्ण पद उद्‍धृत करण्याऐवजी ज्या ओळीबद्दल काही सांगायचं आहे तेवढीच ओळ उद्‍धृत केली तरी चालण्यासारखं आहे. एका पदाची सुरुवात अशी आहे-
      ‘सुनी हो मैं हरि आवन की आवाज
म्हेल चढ चढ जोऊं मेरी सजनी कब आवैं महाराज’ [पृ.५६]
      अनु.- ‘येइ हरि : ऐकियला आवाज
चढुनी महालीं बघते सजणी, कधि येतिल महाराज’....[५७]   

या अनुवादात ‘हरिच्या येण्याचा आवाज ऐकला / चाहुल ऐकली’ असा आशय आलेला नाही. त्यामुळे ‘हरि आवन की आवाज’ असं म्हणण्यातलं भावसौंदर्यही अनुवादात उतरलेलं नाही. शिवाय ‘येइ हरि’ याचा अर्थ ‘हरि येतो किंवा येतोय’ असा होईल किंवा ‘हरि ये’ असाही होईल. पहिल्या ओळीत ‘येइ हरि’ असं म्हटल्यावर नंतरच्या ओळीत ‘कधि येतिल महाराज’ असं म्हणणं बरोबर वाटत नाही. मूळ पदातल्या ओळींमधे चाहुल तर ऐकलीय, प्रत्यक्षात केव्हा येतील...अशी अधीरता व्यक्त झाली आहे. अनुवादात हा भाव आलेला नाही.      

२] शब्दयोजना-
 शब्दयोजना हा अनुवादासंदर्भातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. मूळ रचनेशी प्रामाणिक राहून शब्दशः अनुवाद केला तर तो हास्यास्पद होऊ शकतो. पण सूचितार्थ लक्षात घेऊन त्या अर्थाचा शब्द वापरला तर ते स्पष्टीकरण केल्यासारखं होतं. आणि सूचितार्थता हा तर कवितेचा प्राण आहे... मूळ रचनेतली सूचितार्थता तर अबाधित ठेवायची आणि शब्दशः अनुवादातला धोकाही टाळायचा... ही अनुवादातली कसरत खूप अवघड आहे...
शब्दयोजना करताना मूळ काव्यातले विशिष्ट संदर्भ असलेले शब्द, संदिग्ध अर्थच्छ्टा असलेले शब्द, छंदोबद्ध अनुवादासाठी समान वजनाचे शब्द, मूळ शब्दयोजनेतले सौंदर्य, भाषेच्या पोतामधला फरक... या सर्वाचा विचार करावा लागतो. शिवाय एवढा विचार करून योजलेल्या शब्दांना त्यांचे स्वत:चे, त्यांच्या भाषेतले संदर्भ असतात. अनुवाद करताना ते पुसून त्यांना नव्या संदर्भात प्रस्थापित करता येणं अवघड आहे...
कितीही कौशल्य पणाला लावलं तरी अनुवादाच्या अशा काही मर्यादा असतातच. शिवाय छंदोबद्ध अनुवाद करताना मूळ पदांमधली गेयता, लय, यमक अनुवादात आणण्याचा तगादा असल्यामुळे पाडगावकरांना बर्‍याच तडजोडी कराव्या लागल्या आहेत. उदा.-

अ] मूळ शब्द जसेच्या तसे वापरणे- उदा.-
* ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिला अविनाशी रे’ [पृ.२०] 
अनु.- ‘मीरेचा प्रभु गिरिधर नागर सहज मिळे अविनाशी रे’ [पृ.२१]
* ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर चरनकमल बलिहारी रे’ [पृ. ३८]
अनु.- ‘मीरेचा प्रभु गिरिधर नागर चरणकमल बलिहारी रे’ [पृ. ३९]

‘गिरिधर नागर’ हे शब्द मीरेच्या पदांमधे नेहमी ऐकून इतके सवयीचे झालेत की ते तसेच अधिक चांगले कळतात. जरी ‘नागर’ शब्दाचे ‘चतुर’, ‘सभ्य पुरुष’, ‘व्याख्याता’... असे शब्दकोशातले अर्थ माहीत नसले तरी... बाकीचे शब्दही भावार्थाने कळतात पण ‘बलिहारी’ साठी मराठी शब्द यायला हवा होता.

ब] हिंदी शब्दांचा वापर- उदा.-
* ‘ लोग कहैं मीरा हो गइ बावरि सास कहे कुलनासी रे’ [पृ.२०]
अनु.- म्हणति लोक, हो पागल मीरा; सासु म्हणे कुलनाशी रे’ [पृ. २१]
* ‘अंखिया हरिमीलन की प्यासी’ [पृ. ६०]
अनु.- ‘नयनां हरिमीलन ही प्यास’ [पृ. ६१]

‘बावरी’ शब्दासाठी ‘पागल’ आणि ‘प्यासी’ शब्दासाठी ‘प्यास’ हे हिंदी शब्द वापरण्याची तडजोड करूनही मुळातलं भावसौंदर्य अनुवादात येऊ शकलं नाही. ‘पागल’ शब्दामधे ‘बावरी’ शब्दाच्या सर्व अर्थच्छटा नाहीत शिवाय त्यातलं नादमाधुर्यही ‘पागल’ या काहीशा सपाट शब्दामधे नाही...
दुसर्‍या उदाहरणात ‘नेत्र हरिमीलनासाठी तहानलेले’ आहेत हा मूळ रचनेतील भाव ‘नेत्रांना हरिमीलन ही तहान’ आहे या अनुवादात नाही. अर्थ फारसा बदललेला नसला तरी अभिव्यक्तीची शैली...म्हणजे एका अर्थी काव्यच बदलून गेलं...
शैलीचा अनुवाद करता येणं सोपं नाहीच!  

क] आशय येऊनही आशयसौंदर्य न येणं- उदा.-
* ‘मीरा के प्रभु कब रे मिलोगे तुम मिलियां सुख होय’ [पृ. २४] 
अनु. – ‘मीरेच्या प्रभु कधीं भेटशिल : तूं मिळतां सुखि होइन रे’ [पृ. २५]
* ‘आवण कह गये अजहुं न आये जिवडो अति उकलावै [३०]
अनु.- ‘व्याकुळ झाले : येइन म्हणुनी अजुनि न तो सखि येई’ [३१]
‘सुख होय’साठी ‘सुखि होइन रे’ ही शब्दयोजना किंवा ‘जिवडो अति उकलावै’साठी ‘व्याकुळ झाले’ ही शब्दयोजना पुरेशी समर्पक वाटत नाही. पण प्रत्येक भाषेचा स्वतःचा एक पोत असतो. त्यातलं सौंदर्य त्याच आशयाच्या दुसर्‍या भाषेतल्या शब्दात असेलच असं नाही... त्यामुळे अनुवाद बिनचुक झाला तरी त्यात मुळातलं आशयसौंदर्य न येणं एका अर्थी अपरिहार्य आहे.

ड] मुळात असलेला शब्द अनुवादात न येणं- उदा.-
* ‘ मीरा कहै प्रभु गिरिधर नागर सबही दुख बिसराई’ [३२] 
अनु.- ‘गिरधर प्रभु रे, सर्व दुःख हें विसरे बघ मीरा ही’ [३३]
* ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर आस वही गुरु सरनन की’ [४२]
अनु. – ‘मीरेचा प्रभु गिरिधर नागर : ओढ शरण तुज जाण्याची’ [४३]
* ‘पसु पंछी मर्कट मुनी श्रवन सुनत बैनां’  [७६] 
अनु. – ‘पशुपक्षी, मुनि यांचे शब्द श्रवणिं आले’ [७७]

इ] मुळात नसलेला शब्द अनुवादात येणं- उदा.-
* ‘ मोर मुकुट मकराकृत कुंडल करमें मुरली धारो ’ [४०] 
अनु.- ‘ मोरमुकुट, मकराकृति कुंडल, करिं मुरली मनहारी ’ [४१]
* ‘ मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकमल पै सीर ’ [६८]
अनु. ‘ मीरेचा प्रभु, पदकमलीं शिर ठेवियलें मज तारा [६९]

वर []मधे दिलेल्या उदाहरणांत मुळात असलेले शब्द अनुवादात सूचकतेनं आलेले आहेत. तर [इ]मधील उदाहरणांत अनुवादात आलेले अधिकचे शब्द सूचित अर्थ सांगणारे आहेत. सूचित अर्थ स्पष्टपणे अनुवादात येणं अपेक्षित नसतं. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे छंदोबद्ध अनुवादासाठीच्या या तडजोडी आहेत.

फ] अनुवादात पुरेसा आशय न उतरणं- उदा.-

* ‘नींद नहीं आवे जी सारी रात / करवट लेकर सेज टटोलूं / पिया नहीं मेरे साथ ’ [६०]
अनु.- ‘नीज नच येई सारी रात / अशी कुशीवर तळमळते मी / नाही सजण घरात ’ [६१]
* ‘जबका बिछड्या फेर न मिलिया बहोरि न दियो संदेस ’ [७२]
अनु.– ‘विरह घडे, नच भेट पुन्हा, हा पाठविना संदेश ’ [७३]

या दोन्ही अनुवादांत गोळाबेरीज आशय आला आहे. ‘ सेज टटोलूं ’, ‘ पिया नहीं मेरे साथ ’,   ‘जबका बिछड्या’ यातील आशयाचे बारकावे ‘तळमळते मी’, ‘नाही सजण घरात’, ‘विरह घडे’ या अनुवादात न आल्यामुळे मूळ रचनेतली उत्कटता अनुवादित रचनेमधे उतरलेली नाही.

      ग] अधिक चांगला पर्याय- उदा.-
      * ‘मथुरा जी की मस्त गुवालिनी...’ [४६]
अनु. – ‘ही मथुरेची उन्मद गौळण...’ [४७]
      * ‘कृष्णरूप छकी है ग्वालनि औरहि औरै बोले’ [६८]
अनु. – ‘हरिच्या रूपें उन्मद गौळण भलतेसलते बोले’ [६९]
अनुवादाच्या या दोनही ओळीत आलेला ‘उन्मद’ शब्द थोडा अंगावर येणारा वाटतो. त्या ऐवजी ‘उन्मन’ हा शब्द अधिक चांगला वाटला असता... अनुवाद करताना प्रत्येक वेळी असे काही पर्याय  समोर येऊ शकतात. पण त्यातला कोणतातरी एकच निवडता येतो...आणि त्या निवडीमागे अनुवादकाचा काही विचार असतो. तरी दुसर्‍याच्या नजरेतून अधिक चांगल्या पर्यायांच्या शक्यता या नेहमी राहणारच... स्वतः पाडगावकरांनाही आपले अनुवाद पुन्हा पाहताना वेगळे पर्याय सुचू शकतील.
असे पर्याय सुचत राहाणं ही प्रक्रिया मूळ काव्याच्या गाभ्याशी नेणारी आहे.

] चांगली शब्दयोजना – उदा.-
* ‘दीदार दिखाया हरिने’ [५४]  अनु. ‘दर्शन हरिने दिधले ग ’ [५५]
* ‘एक टकटकी पंथ निहारूं भई छमासी रैण ’ [७४]
अनु. – ‘सहा मास जणुं रात्र पसरली : वाट पाहते डोळे खिळवुन ’ [७५]
‘भई छमासी रैण’चा ‘सहा मास जणुं रात्र पसरली’ हा अनुवाद चांगला वाटतो... निबंधात शेवटी आणखी काही छान जमलेल्या अनुवादाची उदाहरणं दिलेली आहेत.

३] क्रियापद आणि काळ -
क्रियापदांचा अनुवाद ही अनुवादप्रक्रियेतली सर्वात कसोटी पाहणारी गोष्ट आहे. कारण कवितांमधे उत्स्फूर्तपणे शब्द येतात तेव्हा मनातल्या आशयाच्या गरजेनुसार ते आपलं रूप बदलून व्यक्त होतात. अशा शब्दांना सौंदर्यपूर्ण संदिग्धता प्राप्त होते. या संदिग्धतेचा अनुवाद करता येत नाही. जेव्हा क्रियापदं अशी संदिग्ध बनून येतात तेव्हा त्या कृतीचा निश्चित काळ ठरवता येत नाही. अनुवाद करताना त्या क्रियापदाचं कोणतं रूप वापरावं ते उमगत नाही. उदा. –

अ]  ‘मैं गिरिधर के घर जाऊं’ [२०]  अनु. – ‘मी हरिच्या घरिं जाइन रे’ [२१]
      ‘जाऊं’ हे मूळ क्रियापदाचं प्रश्नार्थक रूप या पदामधे मनातला भाव घेऊन उतरलं आहे. नुसतं वाचताना हा भाव जाणून घेऊन पुढे जाता येतं. पण अनुवाद करताना हे जाणवणं स्पष्ट शब्दांत व्यक्त करावं लागतं. ‘जाऊं’ मधे जाईन, जायचं आहे, तशी इच्छा आहे, स्वप्न आहे... असं सगळं येतं. ‘जाना’ या मूळ क्रियापदाचा या रचनेतील ‘जाऊं’ हा संदिग्ध वापर भावाशयाची वलयं निर्माण करतो. पण अनुवादातील ‘जाईन रे’ मधल्या ‘रे’ मुळे ‘जाईन’ ही एक निश्चित क्रिया वाटते. त्यामुळे मूळ आशयाच्या संदिग्धतेतलं सौंदर्य अनुवादात येऊ शकलं नाही... 

ब] अशी आणखी काही उदाहरणं पाहता येतील-
      * ‘पग घुंघरु बांधि मीरा नाची रे’ [२०] अनु.– ‘ पदिं घुंगुर मीरा नाचे रे ’ [२१]
      मूळ ‘ नाचली ’, अनुवाद ‘ नाचते ’
      * ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर सांवरे से मिलना जरूर’ [४६]
      अनु.– ‘गिरिधर प्रभुशीं या मीरेची भेट घडेल जरूर’ [४७]
      मूळ ‘ नक्की भेटायचं आहे ’ अनु. – ‘ नक्की भेट घडेल
      * ‘रामनामरस पीजै मनुआ रामनामरस पीजै’ [७२] अनु – ‘मना रे, रामनामरस प्यावा’ [७३]
      मूळ ‘ पी, पिऊन घे ’  अनुवाद – ‘ प्यावा
      * ‘दरसबिन दूखण लागै नैण’ [७४] अनु.– ‘नाही दर्शन : दुखले लोचन’ [७५]
      मूळ ‘ दुखू लागले ’ अनुवाद ‘ दुखले ’...
वर उद्‍धृत केलेली मूळ रचनांमधे वापरलेली क्रियापदं आणि अनुवादात वापरली गेलेली क्रियापदांची बदललेली रुपं बारकाईनं पाहिली तर या बदलामुळे आशयहानी कशी झालीय ते लक्षात येऊ शकेल. अनुवादात मूळ काव्यातल्या आशयाचा चेहराच बदलून गेलाय. परिणामतः मूळ आशयाबरोबर असलेलं भावसौंदर्यही टिपलं गेलं नाही.

४] छंदोबद्ध अनुवाद : मर्यादा आणि बलस्थानं
कोणत्याही छंदोबद्ध, गेय रचनेत लय साधण्यासाठी मम, तुज, दिस, कैसी... अशी शब्दांची रूपं बदलली जातात. र्‍हस्व-दीर्घ संदर्भातले नियम सोयीनुसार वळवून घेतले जातात. यमक जुळण्यात कृत्रिमता येऊ शकते. मूळ रचनेतही अशा गोष्टी असतातच. त्यामुळे छंदोबद्ध रचनेला कृत्रिमतेचा धोका असतोच. मात्र आत्मप्रचीतीचा उत्स्फूर्त आविष्कार हा मीराबाईच्या रचनांचा स्थायिभाव असल्यामुळे त्या रचनांमधे कृत्रिमता असण्याची शक्यता नाही. अनुवादात मात्र ती अटळ आहे.
 असं असलं तरी छंदोबद्ध रचना हे कवितेचं एक महत्त्वाचं, काव्यात्मकतेत भर घालणारं लक्षण आहे. शब्दांचं नादमयता हे सामर्थ्य गेय रचनेत आशयाचं वलय बनून स्वरांना आवाहन देत राहातं. असं काव्य स्वरबद्ध होऊ शकतं, त्यावर नृत्य केलं जाऊ शकतं. त्यामुळे शब्दाशयाला संगीत-नृत्य ही दृकश्राव्य मिती प्राप्त होते. मीराबाईच्या पदांना हे तिन्ही आयाम आहेत. शिवाय ईश्वर-भेटीची अनावर, सतत धगधगत असलेली ओढ आणि त्यातून वाट्याला आलेली विरहवेदना याची जिवंत अनुभूती या पदांना अस्तरासारखी बिलगलेली आहे. त्यामुळे या पदांची भाषाशैली उपजतच व्याकुळ करणारी आहे. चार-पाचशे वर्षांच्या अंतरावरून अशा काव्याचा अनुवाद करताना सतत असमाधान वाटत राहणारच. वरील सर्व उदाहरणांवरून हे सतत अधोरेखित झालेलं आहे. छंदोबद्ध अनुवादाच्या मर्यादेमुळे किती तडजोडी कराव्या लागतात आणि त्यामुळे आशयहानी कशी होते ते आपण पाहिलं... अनुवादात एवढं पकडता आलं पण मुळात काय आणि किती आहे ते वाचकाना कळावं म्हणूनच बहुधा पुस्तकात मूळ पदं अनुवादाशेजारी दिलेली आहेत.
अनुवादाच्या सर्व मर्यादा गृहीत धरूनही अशा काव्याचे अनुवाद व्हायला हवेत. साहित्य-समृद्धीच्या दृष्टीनं परभाषेतला असा मौलिक ठेवा आपल्या भाषेत येणं गरजेचं आहे.  वाचकांच्या दृष्टीनंही असे अनुवाद मूळ काव्याच्या उंचीपर्यंत पोचवणारी एक महत्त्वाची पायरी ठरू शकतात. अनुवाद मूळ काव्याची जागा घेण्यासाठी नसतातच...
मंगेश पाडगावकरांसारख्या सिद्धहस्त कवीने केलेल्या या छंदोबद्ध अनुवादात मूळ काव्यातली गेयता आली आहे. गेयतेमुळे अनुवादालाही अधिकची मिती प्राप्त झालीय. गेय रचनांचा तसाच अनुवाद व्हायला हवा. मुक्तछंद अनुवाद म्हणजे अर्थ सांगितल्यासारखं होणार... काही वेळा आशयहानीचा धोका पत्करूनही गेयतेला, लय साधण्याला प्राधान्य देणं समर्थनीय होऊ शकतं. कारण त्यात आशयहानी भरून काढण्याचं एक वेगळं सामर्थ्य असतं.

५] तुलनात्मक निरीक्षणं मांडता आली नाहीत-
अभिजात कवितेचा किंवा संतकवितेचा अनुवाद पुन्हा पुन्हा केला जातो. त्या कवितेतच अनुवादासाठीचे निमंत्रण असते. मीराबाईच्या पदांचाही असा पुन्हा पुन्हा अनुवाद झाला असणार असं वाटत होतं. पण पाडगावकरांनी मीरेची पदं प्रथमच मराठीत आणली असं ‘मीरा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कालेलकरांनी म्हटलं आहे. त्यानंतर पुन्हा कोणी अनुवाद केलाय का याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण वर उल्लेख केलेल्या कोशांमधे ‘मीरा’ याच पुस्तकाचा फक्त उल्लेख आहे. फेस बुक, गूगल सर्च ही माहितीची आधुनिक दारं ठोठवून पाहिली पण आणखी कुणी अनुवाद केल्याचं समजलं नाही. त्यामुळे पाडगावकरांनी केलेल्या अनुवादासंदर्भात तुलनात्मक निरीक्षणं मांडता आली नाहीत. 
आणखी कुणी अनुवाद केलाय का या शोधात मी अजूनही आहे. पण दुसर्‍या कुणी अनुवाद केलेला नाही असं मानलं तर पाडगावकरांनी केलेल्या अनुवादाचे महत्त्व अधोरेखित होते. मराठी अभ्यासकांसाठी तो एकमेव संदर्भ ठरतो. यातून असाही अर्थ काढता येईल की हा अनुवाद करणं इतकं अवघड आहे की तो करण्याचं धाडस परत कुणी केलं नाही. किंवा असंही असेल की मीरेची पदं ऐकून ऐकून इतकी आपलीशी झालीयत की ती मराठीतच परकी वाटतायत असं जाणवलं असेल... 
६] ‘मीरा’ या अनुवादाची बलस्थानं
 ‘मीरा’ हा पाडगावकरांनी केलेला एकमेव अनुवाद असेल तर ही या अनुवादाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे असं मानावं लागेल. अनुवाद मूळ काव्यासह दिल्यामुळे अनुवाद वाचून मूळ काव्य वाचायची प्रेरणा झाली तर ते शेजारीच उपलब्ध असते. शोधत बसावे लागत नाही. अनुवादामुळे मूळ काव्य समजायला मदत होते. नकळत अनुवाद आणि मूळ काव्य अशी तूलना होते. अनुवादात वापरलेल्या शब्दांना वेगळे पर्याय सुचू शकतात... अनुवादात मूळ काव्यातला कोणता आशय पकडता आला नाही याचा विचार करता करता पकडता न आलेले आशयसौंदर्य अनुभवता येते. दोन ओळींच्या मधला अव्यक्त आशय अनुवादामुळे उमगू शकतो. वाचकाच्या मनात अशी प्रक्रिया सुरू करून देणं हे एका अर्थी अनुवादाचं यशच आहे.
मीराबाईची निवडक पदे, त्यांचा अनुवाद, आणि तिच्या पदांची वैशिष्ट्ये, तिचे चरित्र या विषयीची माहितीपूर्ण प्रस्तावना एकत्रित वाचायला मिळणं ही सुविधाही महत्त्वाची आहे.
शेवटी काही छान जमून गेलेल्य़ा अनुवादाची उदाहरणं-

      ‘ मैं जाण्यो नहीं प्रभु को मीलण कैसे होय री
      आये मेरे सजना फिरी गये अंगना मैं अभागण रही सोय री ’ [२२]
      अनु.- ‘ मी नच जाणें प्रभुशीं माझें होईल कैसें मीलन ग
      अंगणिं येउन परते साजण : मी निद्रेत अभागिण ग ’ [२३]

      ‘ बता दे सखी सांवरियां को डेरो कित दूर
      इत मथुरा उत गोकुल नगरी बीच बहे यमुना पूर ’ [४६]
      अनु. – ‘ सांग सखि, हरिचे घर किति दूर
      इकडे मथुरा, पल्याड गोकुळ, मधिं यमुनेला पूर ’ [४७]

      ‘ पत्थर की तो अहिल्या तारी बन के बीच पडी
      कहा वोझ मीरा में कहिये सौ पर एक घडी ’ [६४]
      अनु.– ‘ अहिल्येस तारिसी पडे जी शिळा बनुनि रानांत
      शंभर भार असे असतांना मीरा जड का त्यात? ’ [६५]

अशी आणखीही काही उदाहरणं दाखवून देता येण्यासारखी आहेत.

      समारोप-
आजच्या चर्चासत्रात मला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली याचा आनंद शेवटी पुन्हा एकदा व्यक्त करते. या निमित्ताने मीराबाईविषयी अधिक माहिती मिळवणं, तिच्या काव्याची पार्श्वभूमी आणि प्रेरणा समजून घेणं या स्तरावर थोडा अभ्यास आणि विचार झाला. त्यातून  मीराबाईची विविध रूपं पुढं आली... भारतीय समाजाच्या नजरेत- अव्दितीय, श्रेष्ठ संत, मध्ययुगीन भारतीय साहित्यात स्त्री-विद्रोहाची विधायक सुरुवात करणारी क्रांतिकारी कवयित्री, स्त्रीजातीच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी निर्धारानं लढणारी सत्याग्रही...इ. आणि सासरच्या नजरेत कुलनाशिनी... तर पतीच्या नजरेतलं इतिहासाला माहीत नसलेलं प्रश्नार्थक रूप... मीराबाईच्या निवडक पदांच्या अनुवादातून या सर्व रूपांतील मीराबाईचं समग्र आकलन होणं अवघड आहे. पण आजच्या चर्चासत्रासाठी मला दिलेल्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी ‘मीरा’ या पुस्तकातील मीराबाईची मूळ पदं आणि त्यांचा अनुवाद एकमेकांशी जोडून बघताना अनुवादप्रक्रियेविषयीही पुनर्विचार झाला. एखादा अनुवाद बारकाईनं वाचणं म्हणजे त्या प्रक्रियेचा अनुभव घेण्यासारखंच आहे... पाडगावकरांनी केलेल्या इतर अनुवादांसंदर्भातले इथे आलेल्या अभ्यासकांचे विचार ऐकण्याची संधीही या निमित्ताने मिळाली.
मीराबाईची पदं पुन्हा पुन्हा वाचताना त्यातली प्रभू-मीलनाची अत्यंतिक ओढ आणि विरह- -व्याकुळता जाणून घेणं फारसं जड गेलं नाही. पण राजवैभवाचा आणि भोजराजासारख्या पतीचा त्याग करून इतक्या समर्पण भावनेनं एका मूर्तीच्या, खरंतर अमूर्ताच्या मागे लागण्यातली आंतरिक अपरिहार्यता समजून घेणं अवघड आहे हे लक्षात आलं. भक्ती, त्यातही मधुरा भक्ती ही काय चीज असेल?...त्यासाठी आयुष्यच्या आयुष्य कुणी कसं आकांत करू शकतं?... मनात निर्माण होणार्‍या अशा प्रश्नार्थक जिज्ञासेतून आणखीही वाचन होत राहील...  आचार्य रजनीशांच्या या विषयावरील व्याख्यानांच्या पुस्तकात काही प्रमाणात याचं भावनिक स्पष्टीकरण मिळू शकतं... या संदर्भातली रूढ समजूत आणि आपसुक होत राहाणारे संस्कार यातून मिळणारी उत्तरं अपुरी वाटण्यातून या सगळ्याचंच पुनर्वाचन होण्याची गरज जाणवू लागली तर ‘ककल्ड’ सारख्या कादंबर्‍यांतून हा विषय समजून घेण्याला नवी दिशा मिळू शकते...
अनुवाद ओलांडून मूळ विषयाला अशा तर्‍हेनं भिडण्याची प्रेरणा या चर्चासत्रातून मला मिळाली हेही मला महत्त्वाचं वाटतं आहे.
या सगळ्याविषयीचं समाधान व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.

१ आक्टोबर २०११                            आसावरी काकडे
९४२१६७८४८०  asavarikakade@gmail.com
     
                                               

No comments:

Post a Comment