Sunday 31 January 2016

पुन्हा नवा उत्सव.. पुन्हा नवी दिशा


श्री विजय शिंदे यांचा ‘अनुभूती’ हा पहिलाच कवितासंग्रह. ‘अनुभूती’ हे शीर्षक कवितासंग्रहासाठी  समर्पक वाटतं. कारण अनुभूती हा कवितेचा प्राण असतो. ती जितकी उत्कट तितकी ती कुणाला तरी सांगण्याची ऊर्मी अधिक. या ऊर्मीतच कविता-निर्मितीची प्रेरणा असते. अंतर्मनात रोजच्या जगण्यातले वेगवेगळे भलेबुरे अनुभव, गतकाळातल्या राहून गेलेल्या गोष्टींच्या आठवणी, नवागताविषयीची हुरहुर.. अशा असंख्य गोष्टी कवितांचा आशय बनून भावरूपात पिंगा घालत असतात. श्री शिंदे यांनी आपल्या एका कवितेत अंतर्मनातल्या या कल्लोळाला उत्सव असं म्हटलं आहे. मनातल्या कल्लोळांकडे अलिप्तपणे पाहात त्याला उत्सव म्हणण्यातली कवीमनाची समज दाद देण्यासारखी आहे.

या छोटेखानी कवितासंग्रहात ५८ कविता आहेत. या संग्रहातल्या ‘दर्द’ या कवितेत श्री शिंदे यांनी आपल्या मनाची एक अवस्था शब्दबद्ध केली आहे.- ‘कसे समजावू मनाला? / हा दर्द सांगू कुणाला?... कैफियत मांडू कुठे कशी?’... मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत शिंदे यांना पडलेले हे प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडत असतात. कारण व्यक्त व्हावंसं वाटणं ही प्रत्येकाची स्वाभाविक गरज आहे. आपला एखादा वेगळा अनुभव, मनात आलेला विचार, जिव्हारी लागलेला सल किंवा उत्तेजित करणारा आनंद आपल्याला कुणालातरी त्यातील ताजेपणासह सांगावासा वाटतो. पण सगळंच काही सगळ्यांजवळ सांगता येत नाही. काही गोष्टी सांगाव्याशा तर वाटतात पण सगळं उघडंही करायचं नसतं. काही गोष्टीतलं मर्म एखाद्यालाच नेमेकेपणानं समजू शकतं. त्यामुळं व्यक्त व्हावसं वाटलं तरी मर्मग्राही श्रोता लगेच मिळेल असं होत नाही.. अशा वेळी कवितेसारखं साधन हाताशी असलं तर मनातलं सारं शब्दांजवळ व्यक्त करता येतं.. तेही असं की व्यक्त होऊनही ते झाकलेलंही राहावं. कारण कवितेत वैयक्तिकाला सार्वत्रिक करण्याचं सामर्थ्य असतं. आपण जितकं खरेपणानं अगदी जिवालगतचं लिहू तितकं ते प्रत्येकाला आपलं स्वतःचं वाटू शकतं. मग ती कविता आणि तिचा आशय फक्त कवीचा राहत नाही. तो सर्वांचा होतो... कविता फक्त कवीलाच व्यक्त होण्याचा आनंद देते असं नाही. ‘मला अगदी हेच म्हणायचं होतं’ असं मनात म्हणत एखादा वाचक कवितेला उत्स्फूर्त दाद देतो तेव्हा त्यालाही स्वतः व्यक्त झाल्याचा आनंद झालेला असतो.

कविता म्हणजे काय? तिचं स्वरूप काय? चांगल्या कवितेचे निकष कोणते?.. असे प्रश्न पडणं, या प्रश्नांची उत्तरं शोधत चांगल्या कवितेचा ध्यास धरणं हे टप्पे प्रत्येक कवीच्या वाटचालीत येत राहतात. यायला हवेत. पण उत्स्फूर्तपणे शब्दात व्यक्त होणं उत्स्फूर्तपणेच सुरु होऊन जातं. या पहिल्या टप्प्यावरही कविता आणि कवी यांच्यात बरच काही घडतं... व्यक्त होण्याच्या निमित्तानं कवी स्वतःपासून अलग होतो आणि मनातळातलं सांगून झाल्यावर सुटकेचा निःश्वास टाकतो. पण हे केवळ मनमोकळं करणं नसतं... अलग झालेला ‘मी’ रोजच्या धबडग्यात जगणार्‍या ‘मी’ला धीर देतो, जगण्याची उमेद देतो, कधी दोष दाखवून देत त्याची निर्भत्सनाही करतो. नात्यांचे, भोवतीच्या घटनांचे अर्थ शोधत त्याच्या ओंजळीत शहाणपण टाकत राहतो !
या संदर्भात श्री शिंदे यांच्या कवितेतल्या काही ओळी उदाहरण म्हणून पाहण्यासारख्या आहेत.- ‘फाटक्या आयुष्याच्या गोधडीला / ठिगळे जोडावी तरी किती? /... सुई म्हणते थांब वेडे, दोरा घे, टाका घाल घालत राहा..’ (‘टाका घाल’ १४), ‘कधी काटे कधी फुले / ओंजळीत घ्यायचेच असतात / आयुष्याची उमेद तीच तर असते’ (‘फुलांचे काटे’ १९)... इत्यादी.

उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याच्या पहिल्या टप्प्यावर बर्‍याचदा कविता म्हणून काहीही लिहिलं जातं. पण मला वाटतं हे ‘काहीही’ कधी वाया जात नाही. पक्षी कुठली कुठली फळं खात सहज बिया टाकत राहतात.. त्या कुठे पडतील, त्यातल्या किती रुजतील, किती तग धरतील, किती फोफावतील, आणि कोणती बी वटवृक्ष बनून पिढ्यान्‍ पिढ्या सावली देत राहतील.. काही सांगता येत नाही. वटवृक्ष होण्याच्या टप्प्यापर्यंत न पोचलेल्या बिया खत बनून त्याच्या मुळांना पोसत राहतात.. त्याच्या बहरण्याच्या उत्कटतेत मिसळून टाकतात आपला क्षीण जीव.. न जमलेल्या कविता अशाच एखाद्या अस्सल कवितेची वाट प्रशस्त करत राहतात. व्यक्त होण्याचा खराखुरा आनंद देणारी अस्सल कविता लेखणीतून कागदावर उतरेपर्यंतचं मौन किंवा लिहिलेल्या कमअस्सल कविता म्हणजे एकप्रकारे कवितेसाठी चालू ठेवलेला रियाजच असतो. विजय शिंदे याना कवितेच्या या निर्मिती-प्रक्रियेचा अनुभव आहे. या कवितापूर्व अवस्थेबाबत ते म्हणतात- ‘सुचलं तर लिहावं नाहीतर उगी राहावं..’ (पृ.४३)

कवीसाठी हे मौन महत्त्वाचं असतं. मौन सोडायचं तेव्हा सुद्धा काय लिहायला हवं त्याबाबत ते म्हणतात- ‘लिही लिही रे कवी / असे काही लिही / मिळूदे संदेश नवा.. (पृ.५५)

शिंदे याना शब्दांची चांगली जाण आहे असं दिसतं. ‘शब्द’ या कवितेत ते म्हणतात- ‘शब्द बोलावून येत नाहीत / शब्द अडविता थांबत नाहीत’... / ‘कळत नाहीत इतके अवघड होतात शब्द / सहज सोपे वाटावेत इतके सोपेही होतात शब्द’ (पृ. १०)

या कवितासंग्रहात ‘अर्थ’, ‘ओंजळ’ (पृ. २३, २४), ‘गर्दी’ (पृ. ३५), ‘तूच’ (पृ. ४५) अशा काही छान जमून गेलेल्या कविता आहेत. मला त्या विशेष आवडल्या. ‘खूप झालं जीवनात’ (पृ. ३८), ‘एकदा एक’ (पृ. ५४) अशा काही कविता मात्र जुळवल्यासारख्या वाटल्या.. याखेरीज त्यांच्या इतर कवितांमधल्या काही ओळी फार सुरेख उतरल्या आहेत. त्यांच्या कवितांमधली ही सौंदर्यस्थळं पाहण्यासारखी आहेत. उदा.-

‘ऋतु फुलावयाचे थांबविल सखे, इतकी तू फुलू नको / खळखळ झरा थांबवील सखे पायी पैंजण घालू नको’ (‘सखे’ ३६), ‘अंधार हलवून तू जेव्हा येशील / काजव्यांचा प्रकाशही पुरेसा असेल तुला..’ (‘चांदणे’ ४२), ‘राष्ट्रपित्याच्या स्वप्नात नसेल, असा झाला आहे देश / अस्वलाच्या हातात दोरी आणि नाचतो आहे दरवेश..! (‘किती दिवस’ ५६) सामाजिक वास्तव अधोरेखित करणारं हे भाष्य किती मार्मिक आहे ! या ओळींमधलं सौंदर्य उलगडून दाखवण्याची गरज नाही.

आपण जगत असलेल्या भोवतालाचं उत्कट भान असणं, त्याविषयी आपण काही देणं लागतो याची मनस्वी जाणीव असणं हे माणूस म्हणून प्रत्येकासाठीच गरजेचं आहे. पण कवींकडून याची विशेष अपेक्षा केली जाते. त्यानं अलिप्तपणे केवळ कल्पनाविश्वात रममाण होऊन राहाणं त्याच्या संवेदनशीलतेला शोभणारं नसतं. श्री शिंदे यांच्या कवितासंग्राहात हे सामाजिक भान व्यक्त करणार्‍या बर्‍याच कविता आहेत. उदा.-

‘कुठेतरी कोसळली आहे बर्लिनची भिंत / आणि आम्हाला वाटले सुरवात तर झालीच आहे / इथेही कोसळतील काही अशाच भिंती / ... पण कसचं काय / साधा तडाही नाही भिंतींना / उलट सारवली जाताहेत कुडं दोन्ही बाजूंनी..!’ (‘भिंत’ ९)

‘आहे आहे अजूनही आग शिल्लक आहे /... नवचैतन्याचा अग्नी पेटवायचा आहे / आग शिल्लक आहे पण.. / फुंकर घालणारा हवा आहे..!’ (‘आग’ ८)

कामगारास उद्देशून लिहिलेल्या ‘ती तुतारी’ या कवितेत पूर्वसूरींची आठवण जागवत, त्यांच्याकडून झालेले संस्कार जोपासत श्री शिंदे सहज लिहून जातात- ‘‘उपोषणाची, मानवतेची अरे इथे, पुन्हा पुन्हा हार आहे / लांडग्यांच्या कळपास इथे हात जोडणे बेकार आहे / .... ती तुतारी फुंकण्याची, आता पुन्हा वेळ आहे’’ (३४)

समाजाचं काहीतरी भलं व्हायला हवं ही सामान्यजनांची आर्त इच्छा अशा कवितांमधून परोपरीनं व्यक्त होते तेव्हा ती एक उत्कट प्रार्थनाच असते आपापल्या पट्टीत उच्चारलेली..! श्री शिंदे यांच्या कवितांमधून अशी सदिच्छा बाळगणारं कवीमन सतत डोकावत राहातं... कवितेबरोबर स्वतः घडत राहण्याचं सामर्थ्य या कविमनाला मिळावं ही शुभेच्छा-

आसावरी काकडे

३ मार्च २०१३        

1 comment: