Tuesday 8 May 2018

परतून आलेले आभाळ

आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि आपल्या असण्याचा भाग बनून जातात. बघता बघता इतकी जवळीक निर्माण होते की यांच्याशिवाय आपण इतके दिवस कसे जगत होतो असं वाटावं... आणि जर आधीचंच गाढ जिवलग असलेलं कुणी दीर्घ दुराव्यानंतर अचानक भेटलं तर?... त्या नात्याला पुनर्स्थापित व्हायला कितीसा वेळ लागणार?... सुनीता टिल्लू आपल्या कविता घेऊन आमच्या घरी आल्या तेव्हा उपचाराचं बोलणं झाल्यावर त्यांनी आपल्या कवितांच्या अशा पुनर्स्थापित नात्याबद्दल विस्तारानं सांगितलं. ऐकताना मीही त्या नात्यात गुरफटत गेले... कवितांची फाईल माझ्या हाती देऊन त्या गेल्यावर सर्व कविता मी उत्सुकतेनं वाचून काढल्या. बराच वेळ कविता हा विषय मानात रेंगाळत राहिला.

सुनीताताईंच्या या कविता आता ‘परतून आलेले आभाळ’ या नावानं संग्रहरूपात प्रकाशित होत आहेत. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. या संग्रहाच्या मनोगतात त्यांनी कवितेशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी फार छान लिहिलंय. त्या म्हणतात, ‘कविता म्हणजे मला एक आत्मसंवाद वाटतो. भोवतालातून मनाच्या अंतःस्तरापर्यंत पोचणार्‍या अनुभवाचा कवी आपल्या व्यक्तीमत्वाच्या स्वभावधर्मानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. जे उमगतं ते सौंदर्यपूर्ण शब्दात मांडतो. ते स्वतःच स्वतःला सांगणं असतं...’ हे मनोगत सविस्तर आणि इतकं छान झालंय की खरं तर या संग्रहाला आणखी कुणाच्या प्रस्तावनेची गरजच नाही..! पण आपली कविता दुसर्‍यांना कशी दिसते, कशी वाटते, कशी पोचते दुसर्‍यांपर्यंत हे जाणण्याची कवीला ओढ असते. स्वांतःसुखाय लिहिलेल्या कविता संग्रहरूपात प्रकाशित करण्यात हीच तर प्रेरणा असते. रसिकांची दाद मिळाली की खर्‍या अर्थानं कवितेच्या जन्माचं सार्थक होतं. प्रस्तावना म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपातली पहिली दाद...! ती द्यायची संधी मी घेते आहे.

सामान्यतः माणसाच्या जगण्याच्या परीघात आपल्या भोवतीचा निसर्ग, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंध हे घटक असतात. जगताना येणारे अनेकविध अनुभव याच परीघातले असतात. संवेदनशील कवीला त्यातून कवितांचे विषय भेटतात. ‘परतून आलेले आभाळ’ या कवितासंग्रहात हे नेहमीचे विषय आहेतच. पण सुनीताताई कवितेइतक्याच कविता-प्रक्रियेच्या प्रेमात पडलेल्या आहेत. त्यामुळे कविता हाही त्यांच्या बर्‍याच कवितांचा विषय झालेला आहे.

कवितांविषयी लिहिताना सोयीसाठी त्यांचे विषयानुसार वर्गीकरण केले तरी प्रत्यक्षात कविता ठोसपणे एकरंगी असत नाही. बर्‍याच वेळा कवितेत विषयांचे एकजिनसी मिश्रण झालेले असते. भावना शब्दांमधे व्यक्त होतात पण त्यांचा पोत आणि त्यांचा पैस प्रतिमांच्या माध्यमातून साकारला जातो. उदाहरण म्हणून या संग्रहातली ‘अनावर’ ही कविता पाहण्यासारखी आहे. या कवितेत त्यांनी म्हटलंय,

‘बाहेर सुंदर पाऊस
नजर खिळवून टाकणारा... 
आर पार पाऊस
वाटते.. हळुवार कवेत घ्यावा
रक्तात जिरवून टाकावा..
किती अनावर सुचतोय पाऊस आभाळाला..
कधी कधी असेच अनावर सुचत जाते
सारे बांध तोडून पुराचा लोट फुटावा तसे
किती आवरावे.. किती पकडावे...’

कवयित्रीला कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेविषयी काही म्हणायचं आहे. ते सांगण्यासाठी प्रतिमेच्या स्वरूपात इथं निसर्ग आलाय..!

‘हेतू’ ही मला आवडलेली आणखी एक कविता. या कवितेत निसर्ग एका अमूर्त नात्याच्या हातात हात घालून आला आहे. ही कविता अशी-

‘संध्या वेडी
चंद्रासाठी
झुरताना ये तू
घेऊन हृदयी
गंधित हळवे आतुर हेतू

दुपारचे उन्ह
उष्ण हसू
खुलताना ये तू
घेऊन हृदयी
लाल लाल गुलमोहर हेतू

भल्या पहाटे
दवात पाने
भिजताना ये तू
घेऊन हृदयी
गवती हिरवे चंचल हेतू..!’

कवितेत येणारं ‘तू’ हे सर्वनाम गणितातल्या ‘क्ष’सारखं असतं. वाचक ‘तू’ ला जे रूप देईल त्यानुसार कवितेचा पैस बदलत राहतो. ‘हेतू’ कवितेतला तू असाच अमूर्त आहे.

‘रस्ते... आत वळलेले’ ही एक छान जमून गेलेली कविता.. ती पूर्ण वाचून स्वतः अनुभवण्यासारखी आहे. त्यावर कोणतेही भाष्य नको. या कवितेत म्हटलंय,

‘आसपास एखादे जलाशय असावे
तशी हवेत शीतळता
एखाद्या हळुवार गाण्याची धून
मिटत मिटत जावी
तसा झुरमुरता प्रकाश
अन मला स्वच्छ दिसले
तुझ्या डोळ्यातील मोकळे अनाग्रही
समजुतदार रस्ते...

बघता बघता माझी पावलेही पडू लागली
जिथे पोचायचे तिथूनच
निघाल्यासारखी निर्भर...
कुठवर येऊन पोचले मी
हे शोधायचेच नव्हते मला....
.....’
कवितेचा शेवट चुकवू नये असा आहे. पूर्ण कविता वाचत वाचत वाचकांनी या आत वळलेल्या रस्त्यावर पोचावे..!

सामाजिक आशय प्रभावीपणे व्यक्त करणारी ‘दगडी गाभारा’ ही या संग्रहातील उल्लेखनीय कविता. या कवितेत कवयित्रीने देवीला जाब विचारला आहे...

‘लफ्फेदार पैठणीच्या
निर्‍या सांभाळत
भरलेल्या ओट्यांनी फुगलेला
पदर सावरत
भक्तांनी केलेला जयजयकार ऐकत
इथे गाभार्‍यातच उभी राहाणार आहेस
का......?

की या भक्तांनीच
दगडी करून टाकलेयत तुझे पाय
युगानुयुगांच्या मागण्यांनी
त्रिभुवनात गाजवत ठेवला
तुझा महिमा
तू या दगडी गाभार्‍यातच
अडकून पडावेस म्हणून?
.....’

स्त्रीच्या रक्षणार्थ माणसांनी केलेले उपाय पुरे पडणारे वाटत नाहीएत. म्हणून  कवितेत शेवटी देवीला दगडी गाभार्‍यातून बाहेर पडण्याचे आवाहन कवयित्रीने केलेले आहे...!

याशिवाय ‘ओठ घट्ट मिटून’, ‘तिसरी घंटा’, ‘वाळवंट’, ‘काळोख’, ‘मन्वंतर’, ‘तिच्या आखेरच्या वाटेवर’, ‘आजी झालेले जंगल’, ‘हेच घेते मागून’... अशा आणखी काही उल्लेखनीय कविता या संग्रहात आहेत.

‘परतून आलेले आभाळ’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने सुनीताताईंना शुभेच्छा देताना म्हणावसं वाटतं- त्यांना या आभाळाची सोबत अखंड मिळावी आणि या आभाळाला अनावर सुचत राहावा पाऊस...!

आसावरी काकडे
८ मे २०१८