Monday 25 January 2016

उत्सव


उत्सवहा अनुजा जोशी यांचा कवितासंग्रह आज प्रकाशित होतो आहे. संग्रहरूपात कविता वाचकांसमोर येणं हा कवितेसोबतच्या प्रवासातला महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा आहे. इथवरच्या प्रवासाबद्दल अनुजाचं मनःपूर्वक अभिनंदन.!

सावंतवाडी इथं झालेल्या एका कवयित्री-संमेलनात अनुजाची प्रथम ओळख झाली. तेव्हाच तिच्या कवितेनं सर्वांबरोबर माझंही लक्ष वेधून घेतलं होतं. या वर्षीच्या शेकोटीसंमेलनातील कवीसंमेलनातही तिच्या कवितेनं रसिकांची चांगली दाद मिळवली होती. तिची कविता आणि ती चांगली लक्षात राहिलीतिनंही  नंतर  माझ्याशी फोनवर, मेलद्वारा संपर्क साधला. त्यातून ती कवितेकडे पुरेशा गांभिर्यानं बघते आहे हे जाणवलं. अधिक चांगलं लिहिता यावं यासाठीची तिची उत्कटता जाणवली.. मग एकदा तिनं तिच्या सात कविता पाठवल्या. त्या कविता वाचून मी तिच्या कवितेच्या प्रेमातच पडले. तिच्या कवितेत अभिव्यक्तीचं ताजेपण आहे. प्रामाणिक उद्गार स्वतःचं स्वतंत्र रूप घेऊन कवितेत अवतरतात तेव्हा कविता सांकेतिक भाषेच्या अतिपरिचयात हरवून जात नाही. आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करते.. या कवितांचा समावेश असलेला अनुजाचा उत्सव हा कवितासंग्रह आतून बाहेरून आपलं वेगळेपण जपणारा आहेयाच्या अंतरंगाबद्दल पुढे सविस्तर सांगायचंच आहे पण याचं बहिरंगही तितकंच लक्षवेधी झालं आहे. याचं मुखपृष्ठ.. आतील मांडणी.. सर्व स्तरावर कलात्मकता जाणवते. पुस्तकाच्या देखण्या निर्मितीबद्दल शरद प्रभुदेसाई यांचं अभिनंदन करायला हवं.. डॉ. .भि. कुलकर्णी यांची मर्मग्राही प्रस्तावना हे या संग्रहाचं बलस्थान ठरू शकेल..!  

आता अनुजाच्या कवितांबद्दलसमीक्षेच्या भाषेत श्रेष्ठ, विशुद्ध कवितेचे काही निकष असतील.. उत्सुकता म्हणून ते समजून घ्यायला हरकत नाही. पण निकष समजून घेतले म्हणून तशी कविता लिहिता येईल असं नाही. सजगपणे जाणीवनिष्ठा ठेवत लिहित राहाणं एवढं आपण करू शकतो. सामान्य कवितेपासून ते श्रेष्ठ कवितेपर्यंत कवितांच्या अनेक परी असतात.. शहाणं करणार्‍या.. जगण्याची उभारी देणार्‍या, बळ देणार्‍या.. लढण्यासाठी ऊर्जा पुरवणार्‍या.. भावव्याकूळ करणार्‍या.. सौंदर्यानुभूती देणार्‍या.. दाहक वास्तवाची जाण देणार्‍या.. दुर्बोधतेतून गूढ भाव जागवणार्‍या.. तत्त्वशोध घेणार्‍या.. . अनुजाच्या कवितांची परी कोणती?.. मला वाटतं अनुजाच्या कविता, कवितावाचनाचं समाधान देणार्‍या आहेत, आतील सूप्त सृजनाला जाग आणणार्‍या, शैलीचं अनुकरण करण्याचा मोह पाडणार्‍या आहेत... कवितेचे अभ्यासक अभ्यासाचा भाग म्हणून प्रेमकविता, सामाजिक, स्त्रीवादी, महानगरी संवेदनांची, निसर्गकविता.. अशी कवितांची वर्गवारी करत असतात. अनुजाची कविता यापैकी कोणत्या गटात घालता येईल ?.. असा विचार केल्यावर लक्षात आलं की या सगळ्यांना सामावणार्‍याकविताया गटातच बसवता येतील त्या.. कारण अनुजाची कविता शैलीदार आहे. आणि कवितेची माझ्या आवडती एक व्याख्या आहे.. ‘A poetry is not the thing said but the way of saying it’..  भावना त्याच असतात.. अनेकांच्या अनुभवाच्या.. पण कवितारूपात वाचल्यावर वाचकाला पुनःप्रत्यय येतो. अनुजाची कविता भावाशयाला कव्यात्म पातळीवर नेण्यात बर्‍याचदा यशस्वी झाली आहे. या कवितांचा आशय सांगता येत नाही. तो अनुभवावा लागतो.

‘उत्सव’ या संग्रहात अनुजाच्या कवितांचा प्रवास जाणवतो. सुरुवातीच्या काही कविता कवितेच्या प्रेमात पडून लिहिल्यासारख्या वाटतात. प्रेमाचा खरा अर्थ कळण्यापूर्वी प्रेमभावनेच्याच प्रेमात पडण्याचं एक वय असतं.. तसं काहीसं.. अनुजाची कविता शब्दप्रधान आहे. कविता वाचल्यावर पहिला प्रभाव पडतो तो वेगळ्या शब्दरचनेचा. अगदी सुरुवातीच्या कवितांमधेही तिचं हे वैशिष्ट्य जाणवतं.. उदा. ‘शब्दांना पालवी फुटलीया पहिल्याच कवितेत एक ओळ आहे- ‘सृष्टीचे वृष्टीचे कौतुक कराया शब्दांनी पंगत मांडलीया ओळीतील सृष्टीचे वृष्टीचेही शब्दयोजना किंवा पुढच्या ओळींमधे आलेले गुणगुणगुण, भुणभुणभुण हे त्रिरुक्ती करणारे शब्द वेगळे, छान वाटतात. शेवटच्यायथेच्छ’, ‘इथेही तिच्या कपाळी कुंकु आहे’.. अशा काही कवितात ही शैली अधिक प्रभावीपणे आलेली आहे. ‘सुखोष्ण गरम, घाणघुण, गुरुत्वाचे आकर्षण (गुरुत्वाकर्षण ऐवजी), जीववंत.. ही शब्दरचना वेगळेपणानं लक्ष वेधून घेणारी आहे..! वेदनाही रंगवून सांगणारी ही शैली.. ती शब्दांतून दुःखाचा सल पोचवते, रडकथा सांगत नाही. ‘अगं वेदने वेदने / पीडे, छळू नकोस अशी’, ‘ ए, दगडधोंड्या / तूही राहा रे सुखात / बरबटून घे अवघं शरीर..’ अशा उपहासात्मक शब्दरचनेतला काहिसा मिस्किल भाव भाव खावून जातो.. जखम न करता व्रण ठेऊन जातो..

या कविता वाचताना आणखी एक जाणवलं की इथे पंचेंद्रियांच्या संवेदनांचा उत्सव साजरा होतोय.. उदा. ) ‘शुभ्र शुभ्र न्हाऊनया कवितेतली रंगसंवेदना-  लालचुटुक पाकळी, गुलाल केशर पिंजर, हिरवा श्रावण-किणकिण-अत्तर,  निळा-जांभळा मोर, निळासावळा ढग, काजळमेघ, पिवळे रान-पान-दान-पक्षी.. शुभ्र फुले, गोरी गवळण... ) ‘स्पर्श रेशीमया कवितेतली स्पर्श संवेदना- ‘बिलगून, कवळून, हातांचा झुला, दुलईची ऊब, मिठीतला लाजवा, जूनसा देठ, कोवळा गर… (या कवितेतलीसावली पुढे तन मन मागे..’ ही ओळ अभिव्यक्तीचं सौंदर्य अनुभवल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही..))‘रसरसूनया कवितेतील रससंवेदना- ‘कणसात गोडशा ताना, जळजळीत मिरची आग, शिरशिरते आंबट कैरी, कडु गोड तुरटसे पान, मीठच आळणी झाले.. . आणि ) ‘पाखरू पुन्हा पुन्हाया कवितेतली नादसंवेदना- ‘एक पाखरू उडे नभांगणास सावरे / वर्तुळात कोवळा तरंग एक थर्थरे / पाखरू पुन्हा पुन्हा जलांगणात रांगते / नाहते तुडंब चिंब डुंबतात पंख ते.. ..’ एक र्‍हस्व अक्षर एक दीर्घ अक्षर अशा क्रमानं केलेली ही रचना कोणतीही चाल लावता स्वगत लयीत गुणगुणता येते..

पंचेंद्रीयसंवेदनांच्या या रचना ठरवून केल्या असतील असं वाटत नाही. पहिल्या संग्रहात बहुतेक वेळा काहीसा अनघड आणि उत्कट उत्स्फूर्तपणा असतो. तसाच तो इथेही असणारया कविता वाचताना जाणवतं की यांत संवाद साधणार्‍या बोली भाषेचा सहज वापर आहे. त्यातले काही शब्द, प्रतिमा खास अनुजाच्या आहेत. सुरुवातीच्या काही कविता सोडल्यास काव्यभाषेचीसांकेतिकतातिनं ओलांडलेली आहे. हे अभ्यासातून आलेलं वाटत नाही. कविता लिहिण्याच्या प्रामाणिक जाणिवेतून आलेलं आहे. खरी, आतून आलेली कविता आपल्या स्वत्वानिशीच येत असते. उदा. काही कवितातली ही अभिव्यक्ती पहा- ‘किती दिवस लपेटणार चिकटगाळ’, ‘गढूळ गढूळ बोभाट’, ‘श्वास घेता येतात अडखळता... आणि छान भास होतात पुन्हा पुन्हा मी जगत असल्याचे’, फिरत झरत झुरत आवरत सावरत सगळं ब्रह्मांड..’, ‘घट जंतर घट मंतर पुटपुटले’, ‘...तरी बंद होत नाही एकही आवाज धुसफुसणार्‍या भिंतींमधला’, ‘उजाडले, उठा.. सूर्य हातात.. नक्षत्र पायांवर..’इ. अशी आणखी बरीच उदाहरणं देता येतील.. या संग्रहातल्या उत्सवया शीर्षक-कवितेला अप्रतिम लय आहे.. यातील आशयही भारदस्त आहे.

अनुजा कवितेचा गांभिर्यानं विचार करते हे तिच्याशी झालेल्या संवादातून मला जाणवलंय. कवितेच्या मर्यादांबद्दलही मी सांगावं असं तिनं मला आवर्जून सांगितलं. तिची ही जिज्ञासा, आत्मपरीक्षण करण्याची तयारी मला कौतुकास्पद वाटली. कवितेत जाणिवनिष्ठा सर्वात महत्त्वाची असते. सोप्या भाषेत- स्वतःशी प्रामाणिक असणं ! त्यासाठी स्वतःला नेमकं काय म्हणायचंय ते समजून घ्यायला हवं. बरेचदा वरवरच्या वाटण्याला आपण आपलं म्हणत असतो. ही आंतरिक प्रक्रिया ज्याची त्यानं अनुभवायची.. घडवायचीमार्गदर्शन चौकातील दिशादर्शक पाट्यांसारखं असतं. कोणती पाटी follow करायची हे आपलं आपण ठरवावं लागतं. तरी काही सुचवायचंच तर असं सांगीन कीफिरत झरत झुरत आवरत सावरत सगळं ब्रह्मांड..’, ‘घट जंतर घट मंतर पुटपुटले’’ ही दाद मिळवणारी आणि मलाही आवडलेली शैली पुन्हा पुन्हा वापरली गेली तर कदाचित प्रभावी राहाणार नाही. स्वतःचं अनुकरणही जाणीवनिष्ठेच्या कसोटीवर उतरत नसेल तर करू नये.. असो.

शेवटी ज्येष्ठ समीक्षक डॉ. . भि. कुलकर्णी यांनी या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या दोन ओळी इथे आवर्जून उद्धृत करते. त्यांनी म्हटलंय कीअनुजा जोशी या गोमंतकन्येला कविप्रतिभा कवचकुंडलांप्रमाणे जन्मतःच लाभली आहे यात शंका नाही. पेशाने डॉक्टर असलेली अनुजा एरव्ही इतकी लोभस कविता करती? जैविक अनुभवाशी सौंदर्यानुभूतीचे नाते विपरीत असते.! बोरकर, शंकर रामाणी, आरती प्रभू यांच्या सौंदर्य सुगंधी कवितेने ते दाखविले आहेच; आता गोमंतकी सागरक्षितिजावरअनुजा जोशीनावाची पुखराज चांदणी उगवली आहे. आता कोणीच अंधाराची तमा बाळगायची नाही. आता कोणीच मराठी कवितेबद्दल तक्रार करायची नाही..!’..

हा संग्रह प्रकाशनप्रक्रियेत असताना अनुजानं संग्रहाचं कव्हर मला इमेलनं पाठवलं होतं. ते पाहून आणि . भि. सरांचा मलपृष्ठावरचा हा अभिप्राय वाचून मी तिचं अभिनंदन केलं. तेव्हा अनुजा हे कौतुक स्वीकारताना किती संकोचली होती ते आठवतंय. तिनं मला sms केला होता- ‘. भि. सरनी प्रस्तावनेतील याच ओळी मलपृष्ठावर घाला असे सांगितले.. खरं तर हे कौतुक जरा जास्त वाटते आहे.. तसे त्याना मी म्हटलेही. तर म्हणाले, आहे त्यापेक्षा कमी तर मी लिहिणारच नाही नि ज्यादा लिहून माझा काय फायदा?’... हा sms पुरेसा बोलका आहे... कौतुक स्वीकरतानाचा हा सजगपणा, कवितेसंदर्भातील जिज्ञासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा.. या गुणांमुळे अनुजा अधिकाधिक सकस कविता लिहीत राहील असा मला विश्वास वाटतो.

उत्सवया सर्वांगसुंदर कलाकृतीबद्दल अनुजाचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या काव्यप्रवासाला अनेक हार्दिक शुभेच्छा..

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment