Friday 8 January 2016

एक मैफिल : आत्मशोधाच्या कवितांची


लेख
(पद्मा गोळे (१९१३-१९९८) - पद्माताईंचे प्रकाशित कवितासंग्रह - प्रीतिपथावर’ (१९४७ ),  निहार’ (१९५४),  ‘स्वप्नजा (१९६२),  ‘आकाशवेडी (१९६८)  आणि  श्रावणमेघ (१९८८))

“नियतीने करायला लावले ते मी निमूट केले
नियतीने करू नको म्हटले तेही धृष्टपणे केले
नियतीच्या डाव्या पायाची ठोकर खात
मी उजव्या पायाने तिला ठोकरून दिले

आता आमोरासमोर उभ्या आहोत दोघी
आधी कुणाचा हात येतो पुढे
हस्तांदोलनासाठी ते अजमावीत !”

      १९६८ साली प्रकाशित झालेल्या ‘आकाशवेडी’(पृ.७७) या कवितासंग्रहातली ही कविता ! नियतीच्या आधीन न होता तिच्याशी ‘हस्तांदोलन करण्यासाठी तिच्या नजरेला नजर देत तिच्या समोर उभं राहण्यातली स्वत्व जोपासण्याची ही वृत्ती पद्माताईंच्या अनेक कवितांमधून व्यक्त झाली आहे. कारण हा पद्माताईंच्या व्यक्तित्वाचाच विशेष पैलू आहे. खानदानी सरदार-घराण्यात जन्म झालेल्या पद्माताईंनी खानदानीपणाच्या बंधनात न आडकता स्वतःला आवडलेल्या तरुणाशी प्रेमविवाह करण्याची बंडखोरी केली. ही घटना त्यांच्या व्यक्तित्वातील हाच विशेष अधोरेखित करणारी आहे. सरदार घराण्यातल्या वातावरणात असूनही त्यांचा समाजवादी विचारांकडे कल होता. समाजवादी साहित्याचे त्यांचे वाचन होते. भोवतालाच्या विषमतेची सजग जाणीव त्यांना होती. बंडखोरी आणि खानदानी वृत्तीची सांगड असलेलं त्यांचं व्यक्तित्व त्यांच्या कवितांमधून वेगवेगळ्या तर्‍हेनं डोकावत राहातं

      पद्माताईंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या एकूण कवितांची ओळख करून घ्यायची तर ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करून घेणे उचित ठरते. त्यातून त्यांच्या कवितेचे समग्र आकलन होऊ शकेल. पद्माताईंनी आपल्या कवितांतून आत्मशोध कसा घेतला हे जाणून घेणं हा त्यातील एक मूलभूत महत्त्वाचा  दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. पद्माताईंच्या ‘आत्मशोधाच्या कवितां’कडे वळण्यापूर्वी आत्मशोध म्हणजे नेमकं काय? आणि कवितेतून आत्मशोध घेणं कसं शक्य आहे? हे पाहणं उचित ठरेल.

      आत्मशोध म्हणजे नेमकं काय?..

      आत्मशोध, स्वशोध असे शब्द बर्‍याचदा सहज वापरले जातात. पण त्याविषयीची आपली समजूत काहीशी मोघम स्वरूपाची असते. ‘स्व’ म्हणजे नेमकं काय? त्याचा शोध घेणं म्हणजे काय? हे तत्त्वज्ञानातले मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत. रोजच्या जगण्यात याचा सहसा विचार होत नाही. पण तत्त्वज्ञानातही ‘स्व’ची सर्वमान्य अशी एकच एक व्याख्या नाही. ‘स्व’ म्हणजे साध्या भाषेत ‘मी’. पण आपल्याला हे सहज समजू शकतं की माझं नाव म्हणजे ‘मी’ नव्हे. हात-पाय ही कर्मेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे. किंवा कान नाक.. ही ज्ञानेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे... आपलं पूर्ण शरीर, आपलं दिसणं म्हणजेही ‘मी’ नव्हे... फुलाची एकेक पाकळी बाजूला करत फूल शोधत गेलं तर फूल म्हणून हातात काहीच उरत नाही. ‘स्व’च्या बाबतीत अभ्यासकांचं तसंच झालं असावं...

मग ‘स्व’ असं काही नाहीच अशी काहींनी भूमिका घेतली तर दृश्य अशा आपल्या रूपापलिकडे काहीतरी असलं पाहिजे त्याशिवाय आपल्या असण्याची पुरेशी संगती लावता येणार नाही अशी भूमिका काहींनी घेतली. ते काहीतरी म्हणजे आत्मा. आपल्याला हा शब्द ऐकून परिचयाचा झालेला आहे. पण आत्मा म्हणून दाखवता येईल असं काही नाही. खरं तर काही नसण्याला दिलेलं ते एक नाव आहे. ती एक संकल्पना आहे.

ती समजून घेण्याची सुरुवात व्यक्ती ‘मी’ला समजून घेण्यापासून करावी लागते. म्हणजे साध्या व्यवहारी भाषेत स्वतःला ओळखणं. हा आत्मशोधाचा आरंभबिंदू आहे... आत्मशोधाच्या प्रवासात स्वत्वाची जाणीव असणं, आत्मभान असणं ही प्राथमिक गरज आहे. माझी बलस्थानं कोणती? मर्यादा कोणत्या? मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? काय साधायचं आहे?... स्व-शोध म्हणजे हे सर्व प्रत्यक्ष जगण्यातून जाणून घेत घेत आपण काय होऊ शकतो याचा शोध घेत राहाणं, आपल्यातील वाव न मिळालेल्या सूक्ष्म क्षमतांचा शोध घेणं. या प्रक्रियेत सतत सजग असणं, स्वतःला तपासत राहणं, आत्मपरीक्षण करणं, आपण कुठे चुकलो, का चुकलो, काय काय करता आलं असतं याचा विचार करणं... हे सर्व येतं ! स्व-शोध ही एक अखंडपणे चालूच राहणारी प्रक्रिया आहे. या शोधाची जी अनेक साधनं आहेत त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण साधन म्हणजे कविता-लेखन !

कवितेतून आत्मशोध घेणं कसं शक्य आहे?

व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. प्रत्येकाचं व्यक्तित्व वेगळं. आंतरिक प्रक्रिया वेगळी. त्यामुळे कवितेचा आशय, तो मांडण्याची शैली, त्यासाठी केलेली शब्दांची निवड... हे सर्व प्रत्येकाचं वेगळं असतं. अशा सर्व स्तरांवरच्या प्रत्येक अभिव्यक्तीतून कविचा ‘स्व’च व्यक्त होत असतो. म्हणून तर प्रत्येकाची कविता वेगळी होते. कवितेचं स्वरूप असं असतं की ती एकाच वेळी अगदी वैयक्तिक असते आणि सार्वत्रिकही असते. त्यामुळे अगदी स्वतःपुरत्या, खाजगी स्वरूपाच्या डायरीलेखनाप्रमाणे कवितेतही थेटपणे स्व-संवाद होऊ शकतो. स्वतःची उलटतपासणी घेता येते. आत्मपरिक्षण करता येतं. त्यामुळं अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा तळमळीतून झालेलं कविता-लेखन म्हणजे स्व-शोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग ठरू शकतो..! संत तुकारामांचे अभंग हे याचं ठळक उदाहारण आहे.

      व्यक्तित्व आणि कविता एकमेकांना घडवणारे परस्पर पूरक असे घटक असतात. जाणिव विकसित होत जाते तशी कविता अधिक प्रगल्भ होत जाते. आणि कवितेतून व्यक्त होता होता स्व-शोध घेत व्यक्तित्व विकसत राहातं. कुसुमावती देशपांडे यांनी ‘पासंग’ या आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- “काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.” या संदर्भात पद्माताईंच्या ‘कविते’ या कवितेतल्या पुढील ओळी पाहण्यासारख्या आहेत- “तुझिया डोळ्याने पाहिले सुंदर / निर्भर अंतर झाले माझे ॥” (‘श्रावणमेघ’ पृ.१०३)

      कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकूळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळे आतल्या आत होत राहणार्‍या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं...तर जगताना होणारा ‘स्व’चा पराभव मरणाचं दुःख देणारा ठरतो. पद्माताईंनी, याच अर्थानं बहुधा एका कवितेत म्हटलंय- ‘देहावाचुनि जन्म आणखी / नाशावाचुनि मरण मिळे..!’ (स्वप्नजा पृ.६०)

      कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेत केवळ मनाला संदिग्धपणे जाणवलेलंच अधिक स्पष्ट होतं असं नाही तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात ! ती आपली नवी ओळख असते... कवितेसाठी आयते, स्वतः न कमावलेले शब्द न स्वीकारता परोपरीनं, स्वतःचाच आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा शब्द शोधणं ही स्वतःच्या अनावरणाचीच प्रक्रिया असते. कारण असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःला नेमकं काय अभिप्रेत आहे ते शोधणं असतं..! इथे पद्माताईंच्या ‘नवलाईचं फूल’ या कवितेतली एक ओळ नमूद करण्यासारखी आहे- ‘हव्या त्याच शब्दावाचून / त्याला फुलायचंच नसतं..’ (‘आकाशवेडी’ पृ. ९)

      एखाद्या कावितेतून अस्वस्थता व्यक्त होते तेव्हा शब्दयोजना करतांना त्या अस्वस्थतेची प्रत काय आहे, तिची तीव्रता किती आहे, तिच्या मागे कोणती कारणपरंपरा आहे या सगळ्याचा नकळत विचार होतो आणि तिचं नेमकं स्वरूप व्यक्त करणारा शब्द योजला जातो. (एका कवितेत एस.ओ.एस. या ‘शब्दा’चा पद्माताईंनी केलेला चपखल वापर या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आहे.) शब्द-निवडीची ही प्रक्रिया आपल्याला आपली ओळख करून देणारी असते... कवितेत बर्‍याचदा व्याकरणाची, शब्दांची मोडतोड केली जाते किंवा भाषेत नसलेले नवेच शब्द योजले जातात, नवी शैली निर्माण केली जाते ते आपलं स्वतःचं वेगळं वाटणं वेगळेपणानं व्यक्त करण्यासाठीच ! लेखन-प्रक्रियेतली ही निस्सिम जाणीवपूर्वकता ‘स्व’च्या अधिकाधिक जवळ नेणारी असते. असं कविता-लेखन स्व-शोधाचं प्रभावी साधन होऊ शकतं..!

            पद्माताईंच्या कविता-

आत्मशोधाच्या कविता वेगळ्या असतात का? आपण पाहिलं की कुठल्याही कवितेतून खरं तर आत्मशोधच चालू असतो.. तरी थेट हाच स्वर असलेल्या पद्माताईंच्या कविता कोणत्या? या विशिष्ट दृष्टिकोनातून त्यांचे पाचही कवितासंग्रह ओळीनं वाचल्यावर जाणवलं की ‘प्रीतीपथावर’ या पहिल्याच संग्रहात हा स्वर अधिक स्पष्टपणे उमटलेला आहे. छान जमून गेलेल्या काही कवितांचा अपवाद वगळता नंतरच्या संग्रहातल्या बर्‍याचशा कवितांमधे अभिव्यक्तीची सफाई आहे पण आशयातली उत्कटता मात्र काहिशी उणावलीय. पण आत्मशोध हाच पद्माताईंच्या कवितांचा स्थायीभाव असावा. कारण शेवटच्या संग्रहात पुन्हा आत्मभानाचा कासावीस उद्‍गार स्पष्ट झालेला आहे... हा एकूण प्रवास समजून घ्यायचा तर त्याची सुरुवात ‘प्रीतीपथावर’ या पहिल्या संग्रहातल्या पहिल्या कवितेपासूनच करता येईल. या कवितेत ‘सुर्‍हुदास’ उद्देशून कळकळीनं म्हटलं आहे-

“नको अतिवृष्टि । प्रेमाच्या सिंचनी
बीजच वाहूनि । जाईल हो !...
गळोत थंडीने । जीर्ण फुले पाने
नव्या उत्साहाने । उगवाया”... (पृ. २)

      प्रेमाच्या अतिवृष्टीत स्वत्वाचं बीज वाहून जाऊ नये, कठोर वास्तवाला सामोरं जावं लागण्यातून ‘पानगळ’ झाली तरी चालेल.. पानगळखुणांमधून नव्या उमेदिने उगवता येईल असं त्यांना वाटतं..! सुरक्षित आयुष्य जगताना क्षमतांचा कस लागत नाही. विकासाला वाव राहत नाही. स्वत्व झाकोळलं जातं. म्हणूनच बहुधा पद्माताईंना सुरक्षितपणा हा शाप वाटतो. ‘आकाशवेडी’ संग्रहातील ‘एस.ओ.एस.’ ( एस ओ एस = save our ship / save our souls i.e. an urgent appeal for help )  या कवितेत त्या म्हणतात-

“दाट धुक्याच्या पांढर्‍या वणव्यात सापडून
गुदमरत होते एकदा प्राण
म्हणून पाठविला एस.ओ.एस
आणि वाट पाहत होते सुटकेची:
दिसला लाल दिवा नेमक्या वेळी
आणि मी घेतली सुरक्षित दिशा,
पोचले सुरक्षित जागी !
-पण सुटका झालीच नाही.
आता वाटते, मीच पेटवले असते रान चोहीकडून
आणि पाठवला असता एस.ओ.एस. तर
-तर लाल ज्वालात लाल दिवा दिसला नसता,
सुरक्षितपणाच्या घोर शापात
प्राण असा फसला नसता !” (पृ.७३)

      स्वस्थ, निरामय, सुरक्षित आयुष्याला इथं पद्माताईंनी ‘पांढरा वणवा’ असं म्हटलं आहे ! हाच स्वर दुसर्‍या एका कवितेतही उमटला आहे. त्या म्हणतात-

“शांतता नको कधीच जीवनात माझिया
क्षण छाया क्षण प्रकाश,  सुख-दुःखांचा विलास
नव रंगी जीवन-पट सतत निघो रंगुनिया ॥१॥” (‘प्रीतीपथावर’ पृ.४४)

      शांतता कधी नकोच, अस्वस्थताच असूदे कारण त्यावेळी मन अंतर्मुख होतं.. त्यातून नवं काही सापडू शकतं.. प्रीतीपथावर’ संग्रहातील ‘इशारा’ या कवितेत तर त्या स्वतःला सावध करतात की या छोट्या उपवनात रमू नकोस. ‘सुखा’चा पक्षी हाती गवसणार नाही. गवसला तरी तुला मोहात पाडून विचलित करेल. आपल्या भावनांच्या जाळ्यात त्याला बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात तूच बंधनात अडकशील आणि स्वत्व गमावून बसशील !

            एका बाजूला ही अखंड सावध भूमिका- आत्मतृप्ती देऊन निष्क्रीय करणारी सुख-शांती, सुरक्षितता नको असं म्हणणारी आणि दुसर्‍या बाजूला तिला पूरक ठरणारी भूमिका- दुःख, उदासी, निराशा, अस्वस्थता हवी असं म्हणणारी ! ‘प्रीतीपथावर’ या संग्रहात ‘निराशेस’ या नावाची एक काहीशी दीर्घ कविता आहे. या कवितेचा आशय अत्यंत मननीय आहे. त्यातून निराशेकडे पाहण्याचा सर्जक दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. त्यातील काही ओळी-

“निराशे ! तुझे शांत सौंदर्य शोभे / खुले फेन रंगी तुला पातळ
मुखी रम्य औदास्य नांदे सदाचे / कधी भावनांचे उठे वादळ...
परी सांग ना भग्न झाल्या मनांची / अवस्था कधी का टिके कायम?
विरागी बने का तुझा भक्त किंवा / जगी मानितो सौख्य-दुःखा सम?
तया चक्षु देतेस का तू सहिष्णू / जगत्सौख्य देखावया देवते !
कधी अश्रु येतात का नेत्र-शिंपात / देखूनिया दुःख जे भोवते?
बघे आत्मकेंद्रा त्यजोनी तयाचा / मनोभाव विश्वांतरी बंधुता?
असे दिव्य सामर्थ्य लाभेल का गे / निराशे ! तुझी साधना साधिता?...
निराशे ! परी बंद केलींस द्वारे- / -मनांची, खुलें राहिले एक जे
गवाक्षातुनी त्याच काव्याचिया या / जगद्रूप देखावया मी सजें !  (पृ.८८)

      निराशेला ‘देवता’ म्हणणं, निराशेची ‘साधना’ करण्यातून दिव्य सामर्थ्य लाभू शकेल का असं मनात येणं हा निराशेकडे पाहण्याचा या कवितेतला दृष्टिकोन आत्मशोधाच्या प्रक्रियेची सुरुवात करून देणारा आहे ! (इथे अस्तित्ववादी तत्त्वज्ञानातील anguish’ या संकल्पनेची आठवण होते.) कारण निराशा आधीपासून उघडीच असलेली सगळी दारं बंद करून टाकते. मग घुसमटीतून सुटण्यासाठी एखादं नवं दार उघडावंच लागतं. नव्याच्या शोधाची ही सर्जक प्रेरणा निराशेतून मिळते. कवयित्रीला, निराशेनं सगळी दारं बंद केल्यावर उघडी राहिलेली ‘कवितेची’ खिडकी दिसते. त्यातून ती ‘जगाचं रूप’ पाहायला सज्ज होते... आत्मशोधाच्या वाटेवरची कवितेची सोबत आणि तिचं सामर्थ्य या विषयीची पद्माताईंची जाण इथं अधोरेखित होते.

      त्यांची ही तळमळ ‘दुःख हवे’, ‘माझे दुःख आले घरा’, ‘उदास काळोखाच्या सीमा’ अशा दुःखाचं स्वागत करणार्‍या कवितांमधूनही व्यक्त झालेली आहे. त्यातल्या काही ओळी समजून घेण्यासारख्या आहेत.-

“वामनाच्या पावलांनी / माझे दुःख आले घरा,
घाला सौभाग्याचे हेळ / सोनकेळ लावा दारा...
माझ्या मिटल्या कळ्यांनो ! / उघडा ग चोरखण
माझ्या दुःखाच्या चरणी / अर्पा आपुलाले धन...” (स्वप्नजा’ पृ. २०)

      आपल्यातील सूप्त क्षमतांना ‘मिटल्या कळ्या’ असं म्हणत ‘चोरखण’ उघडण्याचं आर्जव इथं केलेलं आहे. सोनकेळ लावून घरी आलेल्या दुःखाचं स्वागत करा आणि त्याच्या चरणी आपलं ‘धन’ अर्पण करा असं म्हणण्यातली दुःखाकडे पाहण्याची वृत्ती किती विरळा आहे..! दुःखाचं स्वागत करावं असं इथं का म्हटलं असेल? निराशा, दुःख, उदासी, अज्ञात हुरहुर, संभ्रम यांचा काळ हा अंतर्मुख होण्याचा काळ असतो हे पद्माताईंनी मनोमन जाणलेलं असणार. हा आशय वेगळ्या प्रतिमांमधून व्यक्त करणार्‍या आणखी एका कवितेच्या काही ओळी-

“पाहू कुठे तुला । विचारिता ऐसे
फुलामध्ये हासे । तेजोनिधी....
नेत्र कर्ण माझे । कोणी झाकियेले
मन वेडावले । शोधू जाता
मोहाची अंगाई । गाउनिया मज
कोण आणी नीज । अवेळी या..” (प्रीतीपथावर’ पृ.२४)

      ‘मोहाची अंगाई गाऊन नको त्या वेळी कुणी निजवू पाहतंय. पण स्व-शोध घेताना ‘जागं’ असणं आवश्यक आहे याचं भान इथं व्यक्त झालंय. 

      रूढी माणसाला मळलेल्या वाटांशी बांधून ठेवतात. स्व-तंत्र चालायला मना करतात. म्हणून त्यांचे बंधन झुगारायला हवे ही जाणीव पद्माताईंच्या कवितांतून सतत व्यक्त होत राहाते. त्यांच्या निसर्ग-कवितांतील वर्णनांमधूनही हा आशय कसा व्यक्त होतो हे पाहण्यासारखं आहे.-

१)‘हळु हळु दंवपट जाई विरुनी / रूढि-बंध जणुं आपुल्यामधुनी’ (‘प्रीतीपथावर’-‘प्रभात-काली’-पृ.३७)

२)‘प्रपातास’ या कवितेत म्हटलंय -
‘तटा गदगदा हालवीसी बलाने / जणू वीज मेघासि ये फाडित...
तुझी ध्येय-मूर्ती कुठे सांग वीरा ! / कुणासाठि रे दिव्य संग्राम हा?’...

यावर प्रपाताचे उत्तर आहे,

‘कुणी दुर्बला रूढिचे मद्य पाजी / कुणी शृंखला ठोकिती तत्पदीं...’ (‘प्रीतीपथवर’- पृ.५७)
हे सारं उन्मळून टाकायाला निघालोय!... या ओळीतली ‘रूढीचे मद्य’ ही शब्दयोजना वेगळी आणि अगदी समर्पक अशी आहे.

      कविचा मूळ पिंड कोणत्याही कवितेत डोकावतच असतो... पद्माताईंच्या प्रेमकविता आणि स्त्री जाणीवांच्या कवितांमधूनही त्यांचं स्वत्वाचं भान व्यक्त होत राहिलंय. काही उदाहरणं पाहाण्यासारखी आहेत. ‘प्रीतीची चाहूल’ या कवितेत त्या म्हणतात-

घेउनि संगे भावसखी अन्‍ संपत्ती “मीपण” / व्याकळुन शोधी जगतांतुन
रम्य विलासी, राजमंदिरें वनोवनीं शोधिलें / परी ना मज माझे गवसले...’ ( ‘प्रीतीपथावर’- पृ.५१ )

      इथे स्त्री-पुरूष प्रेमापलिकडल्या खर्‍या प्रेमाचा शोध आहे. त्याविषयीचं स्वतःचं स्वतंत्र मत आहे. त्यानुसार काही न सापडण्याची खंत आहे, कबुली आहे. शोध थांबवणारी आत्मतृप्ती नाही... आतून उगवलेली स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त करणार्‍या ‘पाऊलवाट’ या कवितेत म्हटलंय-

“परक्याची पाऊलवाट ही मान्य नसे मज मुळी
बनविन वाट मीहि वेगळी...
का परक्याच्या चाकोरींतुन न्यावा जीवन-रथ?
नये कां निर्मु स्वबले पथ?
पाऊलवाट ही माझी माझ्यास्तव
दावील जगाचे रूप मला वास्तव
देईल नित्य मज स्वबलाचा आठव
अनुभूतीच्या रत्नखनीला जिंकित ही चालली
सहचरी खरी जीवनांतली (‘प्रीतीपथावर’- पृ. ७३)

      याच संग्रहातल्या ‘नव्या युगाची युगंधरा’ (पृ.१०१) या सर्वपरिचित कवितेतही स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त झालेली आहे.. यात घर संसार, पती, मुलं यांचं जीवनातलं महत्त्वाचं स्थान मान्य केलेलं आहे. पण त्यांच्या बंधनात स्वत्व गमावायचं नाही याचं स्पष्ट भानही व्यक्त झालेलं आहे. या कवितेत पद्माताईंनी स्त्रीला राष्ट्रशक्ती, अर्धी मानवता असं म्हटलं आहे. त्यांची ही प्रगल्भ जाण लक्षणीय आहे.

      ‘श्रावणमेघ’ या संग्रहातल्या ‘मी घरात आले’ (पृ.२४) या कवितेत, भूमिकांमधे जगता जगता खरी मी हरवून गेलीय आता ‘माझी मला शोधू दे / तुकडे तुकडे जमवू दे..’ ही स्वत्व जपण्याची जाणीव व्यक्त झालीय. याच कवितेत शेवटी म्हटलंय ‘मोकळा श्वास घेऊ दे / श्वास दिला, त्याचा ध्यास / घेत घेत जाऊ दे !..

            आत्मशोध घेताना अंतर्मुख आत्मनिरीक्षण आवश्यक असतं. काही कवितांमधून ते फार प्रभावीपणे व्यक्त झालेलं आहे. उदा.- ‘वेगळी’ या कवितेतलं हे निरीक्षण पाहा-

“पंख असून जमिनीला खिळणारी मी वेगळी
तुटलेल्या पंखांनी झेप घेणारी वेगळी
डोळे बांधून पाहाणारी मी वेगळी
उघड्या डोळ्यांनी न पाहणारी वेगळी
संतप्त वाणीला मुकी ठेवणारी वेगळी
निःशब्द निःश्वासांचे ग्रंथ लिहिणारी वेगळी....
क्षणभर भेटतात वेगळेपणीं जायला
मी वेगळी उरते ती भेट पहायला! (‘आकाशवेडी’- पृ.६३)

      आपल्यातली आपलीच वेगवेगळी रूपं पाहताना, ती पाहणारी आणखी एक मी वेगळी उरते हे या कवितेतलं ‘स्व’विषयीचं भान फार महत्त्वाचं आहे. आत्मशोधाच्या प्रक्रियेत अंतर्मुख निरीक्षण केवळ पुरेसं नाही. जाणिवांच्या कक्षा विस्तारत स्वतःला घडवत राहाणं अभिप्रेत आहे... हे कळतं पण प्रत्यक्षात घडवण्याऐवजी आपण स्वतःच स्वतःवर घाव घालत स्वतःसाठी क्रुस तयार करत राहतो. ‘स्वप्नजा’ संग्राहातल्या ‘क्रुस’ या कवितेतलं हे निरीक्षण या दृष्टीनं पाहण्यासारखं आहे-

“एकांताच्या कृष्ण शिलेवर / कुणी चालवी छिन्नी संतत:  
घाव संथ अन्‍ लयीत एका; / खिन्न मनाला तिचीच सोबत
जरा थांबते छिन्नी आणिक / नजर सरावे अंधाराला;
उभा कोरिला क्रूस दिसे अन्‍ / मूर्तिमंत ‘मी’ लटके त्याला
खिळे ठोकितो हात कुणाचा- / तो तर माझा... माझा क्रुश कर;
डोळे मिटुनी मी पुटपुटते, / “अजाण तो त्या प्रभो क्षमा कर !” (पृ. ८)

      या कवितेतलं ‘मूर्तिमंत ‘मी’ लटके त्याला’ हे ‘स्व’चं दर्शन आणि ‘खिळे ठोकणारा हात माझाच आहे पण तो अजाण आहे. हे प्रभो त्याला क्षमा कर’ हे म्हणणं अंगावर शहारे आणणारं आहे !... ‘क्षणाक्षणाला जन्म नवा’ या कवितेत घडणीच्या प्रक्रियेतले जन्ममरणाचे फेरे अगदी अस्सल अनुभूती बनून व्यक्त झाले आहेत. त्यातल्या काही ओळी-

“क्षणाक्षणाला जन्म नवा अन्‍ / क्षणोक्षणी वेदना नवी;
जन्म मला अन्‍ प्रसववेदना / मलाच का व्हायास हवी?

देहावाचुनि जन्म आणखी / नाशावाचुनि मरण मिळे
मनाहुनीही निरुपम सुंदर / कांहितरी हृदयात फुले....”(‘स्वप्नजा’ पृ. ६०)

      ही पूर्ण कविता अतिशय मननीय झाली आहे. ती मुळातून पुन्हा पुन्हा वाचायलाच हवी... या प्रक्रियेतून जाताना, ‘मागायचे असेल दान तर आभाळापाशी माग...’ (‘आकाशवेडी’- ‘दान’ पृ.१) अशी पद्माताईंची भूमिका आहे. कारण गाठायचं ते आधलं मधलं काही नको !

      कविचा शोध कळत नकळत अखंड चालूच असतो.. प्रत्येक कविता ही कुठल्या न कुठल्याप्रकारे स्वशोधाचीच कविता असते.. नेमकं काय हवंय, काय शोधायचंय ते कळेनासं होतं. तरी शोध थांबवता येत नाही. मग ‘इतरां’च्या शोधयात्रेत सामिल होऊन पाहता येतं. ‘आकाशवेडी’ संग्रहातल्या ‘शोध’ या कवितेत म्हटलंय-

“सारखा शोधतो आहे पश्चिमवारा:
काय हरवले आहे त्याचे झाडात?
सारखा भिरभिरतो आहे निळा पारवा
काय पडले आहे त्याचे आडात?
पाठीवर दिवा घेऊन काजवा
तळमळत काय शोधतो अंधारात?
मीही सारखी चाचपडते, शोधते:
काय हरवले आहे माझे माझ्यात?” (पृ. ३९)

      याच संग्रहात ‘पन्नाशीचा डोळा’ ही एक अप्रतिम कविता आहे. आयुष्याच्या मध्यावर आत्मपरीक्षण करण्यासाठी हा ‘तिसरा’ डोळा आत उघडतो..! कवितेत म्हटलंय-

“पन्नाशीला एक नवीन डोळा फुटतो
त्याच्या बुबुळाला नसतो रंग ना बाहुली,
असतो फक्त एक बाण सदा आत रोखलेला,
‘क्ष’ किरणांनी न्याहाळणारा,
नको ते जाळून शुद्ध करू पहाणारा...” (पृ. ४८)

      हा डोळा नुसतं निरीक्षण करणारा नाही तर काय बरोबर काय चूक, काय हवं.. काय नको याचा सजग विचार करून नको ते जाळून शुद्ध करू पाहणारा आहे ! हा डोळा भोळा नाहीय, तो मेंदूच्या गुंत्यातून आरपार पाहू शकतो न दचकता पण हृदयातल्या रक्तात गटांगळ्या खातो...! असं आत्मावलोकन करत वयाच्या एकेका टप्प्यावर अधिक प्रगल्भ उत्कटतेनं स्व-शोध घेता घेता अखेरच्या वळणावर येऊन ही शोधयात्रा थबकते... ‘श्रावणमेघ’ या शेवटच्या संग्रहात ‘आईच’ नावाची एक विचार करायला लावणारी कविता आहे.-

“दीर्घ आजारानं पछाडलेला दुर्बल देह कॉटवर:
डॉक्टर येतात, औषधं येतात, उपचार होतात;
स्नेही येतात; फुलंफळंही येऊन बसतात टेबलावर
औषधांच्या शेजारी; आणि जातातही कोणी कोणी;
डॉक्टर जातात, स्नेही जातात, आप्त जातात-
अंतर्मुख लेखिका गुप्त होते;
रसिक प्रेयसी निघून जाते;
दक्ष गृहिणी दाराआड होते;
उरते फक्त एकच
खोलीत, खोलीभरून,
डोळ्यांनी पहारा करीत,
मरणाशी सामना देत,
पंख पसरून प्राणपणानं
पिलाच्या रक्षणाला सिद्ध झालेली आई
त्याच्या पिलांची- आणि आता
त्याची- नव्हे, आता त्याचीच.
आई ! हो, आईच !
खोलीत, खोलीभरून !” (पृ. ४४)

      जगण्यापासून दूर होऊन केलेलं एक मनस्वी चिंतन चित्रित झालंय या कवितेत. अनेकार्थांच्या शक्यता इथे घुटमळतायत... पहिल्या ओळीत निर्देश केलेला ‘दीर्घ आजारानं पछाडलेला दुर्बल देह’ कुणाचा? त्याचा की स्वतःचा? या प्रश्नाचं उत्तर कवितेचा पैस ठरवणारं होऊ शकेल. पण अर्थनिश्चितीसाठी संदर्भ तपासत कविमनाला काय अभिप्रेत असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करावा की कवितेतल्या शब्दांचं बोट धरून आपल्या पायांनी चालताना लागेल त्या अर्थाच्या गावी पोचावं? मला वाटतं अनेकार्थांच्या शक्यता प्रसृत करणं हे कवितेचं वैशिष्ट्यच असल्यामुळे आस्वाद-स्वातंत्र्य स्वागतार्ह ठरतं.

      ‘मरणाशी सामना देत’ केलेलं एक उत्कट ‘आत्मावलोकन’ या दृष्टिकोनातून या कवितेकडे पाहिलं तर समजून घेता येईल की अखेरच्या वळणाशी पोचल्यावर कवयित्री आपल्यातल्या सर्व ‘भूमिका’ विसर्जित करतेय. सगळे पांगलेत. आता उरलीय फक्त ‘त्याची आई’. खोलीत पहारा करतेय ती !.. इथे पुन्हा अर्थनिर्णयनाला जागा आहे. त्याची म्हणजे कुणाची आई?, आणि कुणावर पहारा करतेय ती?... स्वत्व जपत, हरप्रकारे आत्मशोध घेणार्‍या कविता लिहिता लिहिता, क्रुसावर लटकलेल्या ‘मी’ला पाहू शकणार्‍या कवयित्रीला शेवटच्या वळणाशी आल्यावर ‘त्याची’ म्हणजे आत्मरूपाची आई होऊन त्याच्या दर्शनासाठी खोलीत पहारा देत टक्क जागं असलेलं ‘स्व’रूप दिसलं असेल का?
शेवटच्या संग्रहातली शेवटची कविता याचा अन्वयार्थ लावायला मदत करू शकेल बहुधा...

“पंचाहत्तरावी चढले पायरी
आता श्वास उरी कोंदाटतो ॥
दयाळा ! हात दे किती दमविसी
आसरा पायाशी देई तुझ्या ॥
एक एक पाश तोडिता, सोडिता
पुन्हा कसा गुंता होतो पायी? ॥
अडकतो पाय फुलात, काट्यात
गोंधळात मन गोते खाई ॥
बुडते, तरते काहीच कळेना
थांबव या वेणा अंतरीच्या ॥” (पृ.१०४)

            पंचाहत्तराव्या पायरीवरही काहीच कळेना हीच अवस्था आहे... आत्मशोधाचा प्रवास न संपणारा आहे. पोचण्यापेक्षा निष्ठेनं चालत राहाणंच इथं महत्त्वाचं आहे. किती चालणं झालं यापेक्षा ते कसं झालं हे महत्त्वाचं आहे. एकेक पाश तोडत चालले तरी पाय कसे गुंततात? या प्रश्नानं व्याकुळ होणं, मन गोंधळलंय हे उमगणं, काहीच कळत नाहीय हे कळणं... या अवस्थेला काय म्हणता येईल? अंतर्मुख निरीक्षण अजून चालूच आहे. आत्ता जी अवस्था आहे तिला बुडणं म्हणावं की तरणं मानावं हे कळेनासं झालंय.. खरंतर या स्तरावरची ‘शोध-यात्रा’ यशस्वी झाली की नाही असा हिशोब मांडायचाच नसतो. ती मनस्वी झालीय ही पावती पुरेशी असते...!
पद्माताईंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या कवितांचं असं ‘वाचन’ करणं ही आदरांजली त्यानाही अगदी समर्पक वाटेल...!

आसावरी काकडे

4 comments:

  1. पद्मा ताईंच्या कवितेमुळे तर आहेच पण तुमच्याही लेखामुळे "स्व" चा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. फारच छान लिहिलत तुम्ही.
    "मीही सारखी चाचपडते, शोधते:
    काय हरवले आहे माझे माझ्यात?” आहा फारच भावलं मनाला. अश्या निवडक पण उत्कृष्ट कविता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक आभार.
    - अमृता

    ReplyDelete
  2. स्वप्नजा या काव्यसंग्रहातील 'दु:ख हवे' ही संपूर्ण कविता मिळू शकेल का मॅडम?

    ReplyDelete
  3. 'आठवणी' ही कविता कुठल्या कवितासंग्रहातील आहे हे मला कळू शकेल का?

    ReplyDelete