Monday 4 January 2016

तू लिही कविता...

गोवा येथील महिला साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेसाठी-
अचानक एखाद्या अनाहूत क्षणी कवितेची चाहूल लागणं.., पाठोपाठ शब्दांचं आगमन होणं, किंवा नेमक्या शब्दाची वाट पाहायला लागणं... कविता लिहून झाल्यावर कधी आकंठ तृप्त होणं तर बर्‍याचदा अपूर्णता सलत राहणं... कविता लिहिता लिहिता ही आंतरिक क्रिया जवळून अनुभवल्यावर तिलाच कवितारूप देण्याचा मोह प्रत्येक कविला होतो. कवितेविषयीच्या अशा बर्‍याच कविता आपण ऐकल्या-वाचलेल्या असतात. पण या प्रक्रियेचंच सूत्र पकडून एक पूर्ण कवितासंग्रह लिहिणं ही लक्षवेधी गोष्ट आहे. असा एक हिन्दी कवितासंग्रह अलिकडे वाचनात आला. डॉ. दामोदर खडसे यांच्या या संग्रहाचं शीर्षकच ‘तुम लिखो कविता’ असं आहे. यातील कविता अनुभवणं म्हणजे कवितेची निर्मिती प्रक्रिया समजून घेणं... कविता आणि कवी यांच्यातलं नातं उमगणं... कवी अलिप्तपणे कशी निरखतो लेखनप्रक्रिया ते अनुभवणं...!
निर्मिती-प्रक्रियेसंदर्भात स्मरणिकेसाठी काही लिहायचं तर या संग्रहातील कवितांच्या आधारे लिहिलं तर ते वेगळं, रंजक आणि अधिक मनस्पर्शी होईल असं वाटलं. म्हणून हा संग्रह पुन्हा पुन्हा आस्वादताना आलेला कविताविषयक समजूत घडवणारा अनुभव सर्व कविता-रसिकांसमोर ठेवायचं ठरवलं...
 ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांमधे प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला, शेवटी आणि मधेमधेही धृवपदासारखी परत परत ‘तुम लिखो कविता’ ही ओळ आलेली आहे. या स्वसंवेद्य कवितांच्या गाभ्यात शिरायचं तर या ओळीतील ‘तुम’ आणि ‘लिखो’ असं म्हणणारा ‘मैं’ यांच्यातलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. कविता वाचताना हळूहळू हे नातं उलगडत गेलं. जाणवलं की या कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे. आत्मसंवाद आहे. व्यवहारी जगात व्यग्र असलेला मी स्वस्थित मीशी संवाद करतो आहे... जगण्याचे अनुभव घेणारा ‘मी’ त्या अनुभवांवर कवितेतून भाष्य करणार्‍या ‘मी’शी हितगुज करतो आहे. निरखतो आहे त्याचं शब्दांमधे उतरणं आणि प्रकटलेल्या शब्दांमधे स्वतःचं प्रतिबिंबित होणं..! असंही जाणवलं की हा संवाद फक्त व्यक्तीरूपातील ‘मी’शी नाही तर समष्टीरूपात विस्तारलेल्या ‘मी’शीही चाललेला आहे.. या आत्मसंवादात दोन्हीतला एक ‘मी’, ‘तू’ होतो. ही पूर्ण आंतरिक प्रक्रिया...! संवादापुरते दोन  झालेले ‘मी’ आपल्या भूमिका बदलत राहतात. त्याच्यातलं निरखणारं कोण?, अनुभवणारं कोण?, लिही म्हणणारं कोण? आणि लिहिणारं कोण?...
परत परत वाचताना कवितांशी पुरेसं अनुसंधान साधलं गेलं तेव्हा जाणवलं की या कवितांमधल्या ‘मी-तू’च्या नात्याचं परिमाण बदलत गेलं आहे... यातला ‘मी’, ‘तू’सह विशिष्ठतेचा परीघ ओलांडत राहतो... भोवतालाचं उत्कट भान असल्यामुळे त्याचा ‘परीघ’ विस्तारत राहतो.. ‘मी’ केवळ अलिप्त निरीक्षण करत नाहीय.. तो जगतोय असंख्यांमधला एक होऊन. तो अनुभवतोय नात्यांमधली गुंतागुंत, निसर्गाचे विभ्रम, आयुष्याला लगडलेली सर्व स्तरांवरची गर्दी... आणि यातून वाट्याला येणारी सुख-दुःखं..! ‘तू लिही कविता’ असं म्हणत हे सगळं ‘तू’ला सांगता सांगता या सांगण्याचीच कविता होऊन जाते..!! हे ‘कविता-दृश्य’ टिपणार्‍या कॅमेर्‍याच्या भूमिकेतला निवेदक कधी दुरून पाहतोय ही ‘निर्मिती प्रक्रिया’ तर कधी तिचा भाग होऊन जातोय... या कविता म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि या दोघाना जोडणारी ‘पाहणं’ अनुभवण्याची प्रक्रिया या तिन्ही भूमिकांमधल्या ‘मीं’चा अद्‍भुत खेळ आहे... या खेळात इतक्या मिती सामावलेल्या आहेत की दर मितीनुसार कवितांतील शब्दांचे अर्थ बदलत...विस्तारत राहू शकतात...
मूळ हिन्दी कवितांची काही मोजकी उदाहरणं पाहिली तरी या सार्‍याचा प्रत्यय येऊ शकेल-
-‘‘कविता खिड़की है यात्रा की
तुम हो जाओ द्रष्टा
और मैं
यात्रा का गुजरा हुआ दृश्य...
आनेवाला दृश्य भी मैं ही होऊँ
तुम लिखो कविता..!’’(२५)

-‘‘तुम लिखो कविता...
कविता जब आती है बाहर तुम्हारे
लगता मेरा ही प्रतिबिंब
बना रहे हो तुम
अपने को साकार होते देखना
कितना रोमांच भरा होता है !’’(६८)

-‘‘कविता में मौन
शब्दों में कोलाहल
वाक्यों में हकलाहट
अंतरतम का उद्‍घाटन है
किसी भोर की आहट है यह..’’(९४)

-‘‘कविता खोजती है सतत्‍
आदमी में एक नया आदमी
आदमी की हर परत से
कविता लेती है एक नई गंध
कविता ऊबती नहीं कभी
आदमी के किसी नए भीतरी उद्‍घाटन से...’’(१०३)

-‘‘कविता ऊर्जा बन
करती है कायाकल्प उम्र का
कविता अंग-प्रत्यंग में बसकर
आस्था बन उभरती है भीतर
ईश्वर के अहसास की तरह..’’(९९)

-‘‘कविता स्मृतियाँ है अनंत
कविता हर पाठ में
एक नए उत्सव का उद्‍गम है...’’(११४)

कवी द्रष्टा असतो.., कवितेत माणसाच्या अंतरंगाचं उद्‍घाटन करण्याची क्षमता आहे.., कविता प्रत्येक वाचनात नवा प्रत्यय देते.., कविता ऊर्जा बनून कायाकल्प घडवते... कवितांमधूनच कवितेच्या स्वरूपाविषयीचं असं आकलन होतं तेव्हा ते मनाला खोलवर भिडतं. एखाद्या समीक्षा-ग्रंथात व्याख्यांच्या आधारे विशिष्ठ परिभाषेत कवितेच्या स्वरूपाविषयी लिहिलेलं वाचताना जे कळतं ते बुद्धीला.. हृदयाला नाही..! त्यामुळे अशा कवितांचं सहर्ष स्वागत करावसं वाटतं..! 
कवितेच्या आतल्या अवकाशात फिरवून आणणार्‍या या कविता ‘स्व-रूपा’विषयीच्या वेगळ्याच अनुभूतीचा आनंद देतात. इतकंच नाही तर त्यांचा अनुवाद करण्याचं आवाहनही त्यात आहे... उदाहरण म्हणून त्यातल्या एका कवितेचा अनुवाद पहाण्यासारखा आहे-

‘‘तू लिही कविता
मी पाहीन मनभरून
लेखणीतून कागदावर उतरलेलं
जीवनाचं मूक राहिलेलं गाणं..
प्रवासात खूप मागे राहिलेलं
एक नाव हरवलेलं वळण
चिंचेच्या झाडावर
काटला गेलेला पतंग
कबुतरांचा थवा
रस्त्यावर उडणारी धूळ..
मागे वळून पाहत अडखळणारी पावलं
हलणारा हात
थोडी जवळीकबरचसा दुरावा
आत-बाहेर भिरभिरणार्‍या
डोळ्यांच्या बाहुल्यांमधे
केल्या - केलेल्याची बेचैनी
आत्मघाती घुसमट..
कसा दिग्‍भ्रमित करू शकेल कोणी
आपलाच आवाज..
तू लिही कविता
आणि मी पाहीन तुझ्या बोटांमधे
एक अस्वस्थ लेखणी
पाहीन
शब्दांत न्हाऊन निघालेल्या बाहुल्या
डोळ्यांत खोलवर  अर्थांच्या रांगा
कपाळावर उमटणार्‍या रेषा
सागरलाटांसारख्या...
तू लिही कविता
आणि मी पाहीन तुला
कविताच होऊन जाताना..!”
***

No comments:

Post a Comment