Thursday 19 May 2016

‘स्त्री-लिखित मराठी कविता’मधे समाविष्ट कविता

‘स्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)’ संपादन : अरूणा ढेरे
या खंडात समाविष्ट कविता-
१)

कणिका

सभोवती उडालेली
प्रकाशाची धूळ
हळूहळू खाली बसली
आणि वातावरण
लख्ख निवळले !
मोकळ्या अंधारात
मग घुसमटीने
अस्ताव्यस्त पसरून घेतले..!
***

या रथाचे घोडे
असे कुणी बांधलेत?
दोन्ही घोडे
आळीपाळीनं,
प्रामाणिकपणे धावतायत
पण रथ
जिथल्या तिथेच आहे !
***

तुझ्या दिव्याचा लख्ख उजेड
नसतानाही
वाट स्वच्छ दिसते आहे !
संधिप्रकाशासारखा
तुझाच उजेड
अजून रेंगाळतोय
की
मी स्वयंप्रकाशी आहे?
***

अनाहूत दुःखासारखे
विवस्त्र विचार छळू लागतात
तेव्हा त्यांना शब्दांनी झाकून टाकावं म्हटलं
तर ते निमूटपणे
शब्दांपाशी येत नाहीत
आणि ओढून आणावं म्हटलं
तर शब्द त्यांना स्वीकारत नाहीत..!
***

(‘आरसा’, एप्रील १९९०, सेतू प्रकाशन)

२)

जाणीव

आपण रोज पाहतो
तेवढा एकच सूर्य नाही
आपण गाणी रचतो
तो चंद्रही एकमेव नाही
आपल्याला माहिती आहेत
अशा अनेक ग्रहमाला आहेत
नि अनेक आकाशगंगा सुद्धा !
हे मला समजलं तेव्हा मी म्हटलं,
असतील- असू देत !

पण माथ्यावरचं
हे अथांग निळं आकाश
हे सुद्धा एकच एक नाही
हे कळलं तेव्हा मात्र
मी कासावीस झाले
कारण
आता माझ्या नगण्यतेला
काही सीमाच उरली नाही !
***

(‘आकाश’, ऑगस्ट १९९१, सेतू प्रकाशन)

३)

आपल्यामधे

आपल्यामधे जुळू लागलेल्या
नव्या नात्याची चिमुकली नाव
संभ्रमाच्या अथांग पाण्यात घालताना
मी कसनुशी झाले आहे !
माझे सज्ज सुकाणू
मी सर्व ताकदीनिशी
हातात गच्च धरून ठेवले आहे.
अनेकांच्या सवयीचे असलेले
हे पाणी तितकेसे गढूळ नाही.
शिवाय
दुरून न दिसणारी आतली खळबळ
आणि बसणारे हेलकावे
यांना न जुमानता
आतापर्यंत अनेक नावा
पैलतीरापर्यंत सुखरूप गेल्याच्या
कितीतरी नोंदी
परंपरेच्या बासनात
स्वच्छ नोंदलेल्या आहेत !
तरीही
पाणी संभ्रमाचेच आहे
आणि आपली पुरती ओळखही नाही
आपल्या सुकाणूची ताकद
आपण आजमावलेली नाही
आणि आपल्या सामानाचीही
आपल्याला हवी तशी माहिती नाही !
एकमेकांच्या सोबतीनं
थोडं पुढे गेल्यावर,
आपले अंदाज चुकले
आणि नाव हेलकावे घेऊ लागली
तर कुणाच्या स्वप्नांचे ओझे कमी करायचे
हेही आपले ठरलेले नाही !
म्हणून
मी जरा बावरलेच आहे
आपली चिमुकली नाव
या अथांग पाण्यात घालताना !
***

(‘लाहो’,  मे १९९५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन)

४)

जागच्या जागी

जागच्या जागी
विस्थापित होतो आपण
अटळ अनोळखी जंगलात
जिथे झाडांच्या दुतर्फा झाडंच
आणि वाटा वावटळीसारख्या असतात !

दहशतीच्या नियमांनुसार
स्वरक्षणार्थ
होतात आपल्यावर हल्ले
किंवा तोंड फिरवून
नाहीसे होतात
त्यातल्यात्यात ओळखीचे चेहरे !

स्वत:च्या निरूपद्रवीपणाची
खूण पटवता यावी
अशी भाषा नसते अवगत
आणि हव्या असलेल्या
उजेडाशी नेईल
अशी नेमकी वाटही नसते कळत...

हीच ती अनाथ वेळ
जेव्हा शोध लागतो
कनवटीच्या बासरीचा
उमटवता येतात तिच्यातून
आदिवासी स्वर
आणि पटवता येते ओळख
आपल्या असलीपणाची !
***

(‘मी एक दर्शनबिंदू’, डिसेंबर १९९९, सुमती प्रकाशन)

५)

रोज...

रोज सकाळी
मी तयार होऊन बाहेर पडते
रस्त्याच्या या बाजूला उभी राहते
मला पलीकडे जायचे असते
मला मुक्कामी नेणारी गाडी गाठायची असते
अखंड वाहता रस्ता
त्वचेखालील कल्लोळांसारखा
त्यावर कुणी सिग्नल्स बसवलेले नाहीत
मला पलीकडे नेणारी
एकही फट दिसत नाही

मी जागच्या जागी
वाहणार्‍या गर्दीत हेलपाटत राहते
आणि निजल्या निजल्या
भयंकर स्वप्नांचा थकवा यावा
तशी थकून
रस्त्याच्या अलीकडूनच घरी परत येते...

कितीतरी दिवस झाले
रोज कुठेच न पोचता परततेय
रोज नव्या उमेदीने तयार होऊन
बाहेर पडतेय
  
आणि
स्वत: दुभंगून
वसुदेवाला वाट करून देणार्‍या
यमुनेची गोष्ट आठवत
रोज रस्त्याच्या या बाजूला उभी राहतेय !
***

(‘मी एक दर्शनबिंदू’, डिसेंबर १९९९, सुमती प्रकाशन)

६)

तेवढेच काही निरागस श्वास

नुकत्याच चालू लागलेल्या
छोट्या छोट्या
नव्या दमाच्या पावलांखालीही
तीच जमीन
अनेकांनी तुडवलेली
मळवलेली...

असंख्य पावलांच्या ठशांना
आपल्यात सामावून घेतलेली जमीन
निर्विकार
नि छोटी पावले बेदखल
न वाटेचे भान
न पोचण्याची घाई

आईच्या हातात
विसावलेले बोट नेईल तिकडे
जात राहातात छोटी पावलं !

आपला ठसा उमटवण्याची जिद्द
ओळखीची होईल हळूहळू
छोटे मोठे संघर्ष
अडवत राहातील वाट
पावलांखालच्या जमिनीची जाणीव
भिनत जाईल मस्तकात

जमीन लावेल ओढ
अधांतरी मनाला आधार देऊन
देईल आभाळाचे भान
दूर क्षितिजरेषा होऊन

कधी ठरणार नाहीत पावलं जमिनीवर
कधी पायाखालची जमीन सरकेल...

आयुष्याचे देणे
वसूल होत राहील पावलांकडून...
हे सारे घडेलच हळूहळू

तोपर्यंत चालू दे पावलांना
आईचे बोट धरून
तेवढेच काही निरागस श्वास
घेता येतील जमिनीलाही !
***

(‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी’, जानेवारी २००५, सेतू प्रकाशन)

७)

स्त्री असण्याचा अर्थ

स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरूषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीनं स्त्रीत्व

स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही

स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना... प्रेम... तितिक्षा

पुरूषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण

(‘स्त्री असण्याचा अर्थ’, डिसेंबर २००६, सेतू प्रकाशन)

८)

एकेकाने फळी ओढली की !

घट फुटे तेव्हा  तुटे देहपाश
आकाशी आकाश  मिळतसे

लाडका दृष्टांत  हीच जर साक्ष
मृत्यू हाच मोक्ष  का न होई ?

बंधनात कोण  मृत्यू आल्यावर
काय बांधणार  नाहीच जे ?

सूक्ष्म देह-बीहं  संकल्पना काही
एकमत नाही  त्यांच्याविशी

‘बंध-मोक्ष’ सुद्धा  एकमार्गी नाही
देही की विदेही  किती मार्ग !

नेमक्या दिशेने  नेमक्या पक्षात
मृत्युच्या दारात  जावयाचे

मग म्हणे मोक्ष  मिळतो योग्याला
इथेच शंकेला  जागा आहे !

सारेच सापेक्ष  अल्बर्ट म्हणतो
काळ दिशा जो तो  सवे घेई

सर्व दिशा आणि  सगळ्याच वेळा
पवित्र भक्ताला  तुका म्हणे

अद्वैताच्या चवी  चाखलेला भक्त
होईना विभक्त  कोणेवेळी

ज्ञाना म्हणे त्याला  मोक्ष सारखाच
दिशा, पक्ष जाच  नाही नाही

मार्क्स म्हणे मुक्ती  हीत शोषितांचे
मुक्त समाजाचे  त्याचे स्वप्न

नवेच सांगती  आधीचे खोडून
कुणाला सोडून  कुठे जावे ?

संकल्पनाधार  होते पायातळी
एकेकाने फळी  ओढली की !

झाले अधांतरी  झाले हतबुद्ध
असा बुद्धिभेद  बरा काय ?
***

(‘उत्तरार्ध’, सप्टेबर २००८, राजहंस प्रकाशन)

९)

पोटात कळ

पोटात कळ दुख थाम दुख थाम
डावा दंड आतल्या नसांची नक्षी बिघडलेला
मनात बरेच गुंताळे
पायात पाय अडकून गडद होणारे
घशात... कानात खवखव
टाचेत विचलित करणारी वेदना
दात सतरा टेकू दिलेला
कणा ठसठसत ताठलेला
तरी
देहाची गुढी उभारलेली
बुद्धी चंबूसारखी
गुढीवर लटकलेली

‘ती’ निभावतेय आपला पसारा
आपला व्यूह !

‘तो’ निरखतोय नुसतं
अचल गुणातीत आनंदात

‘मी’ उद्वेगाचे टोक
शहाणपणाच्या हातात देऊन
पोळणारे पाय नाचवत
घाईघाईत
त्याच्या सावलीत क्षणमात्र

आणि दुसर्‍याच क्षणी
उताराचे पाणी खेचले जावे डोहात
तशी तिच्या व्युहात
गोळा करून एकेक गात्र !
***

(‘उत्तरार्ध’, सप्टेबर २००८, राजहंस प्रकाशन)

१०)

कुठून तरी कुठे तरी...

कुठून तरी कुठे तरी एकसारखी
निमूट धावतेय मुंबईतली गर्दी...
केव्हाही काहीही होईल
अशी मनाची तयारी असलेली
स्वस्थता आहे तिच्या गतीला
एक लय आहे आनाकलनीय झिंग असलेली
प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच
वापरून वापरून
जुनं मोडकळीला आल्यासारखं
तरी मेकअप करून चालू पडलेलं...

जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज
राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची
कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..
तिनं काय करावं या चेहर्‍यांचं?
त्यांनी काय करावं
या बेढब वाढलेल्या जनतेचं?

प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !
अशा जगण्याची लाज वाटायलाही
उसंत नाही कोणाला !
माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या
टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून
धावतायत सगळी...
त्यांची टिक्‍टिक्‍ ऐकू येऊ नये म्हणून
ढोल वाजवतायत जीव खाऊन
फटाक्यांच्या माळा फोडतायत
लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून
बेसूर गाणी आदळवतायत
केविलवाण्या छात्यांवर
कुणाला काही दिसू नये
म्हणून रोषणाई करतायत जागोजाग
बधीर होत चाललेल्या मनांवर
प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!

क्षितिजाला तडा जाईल
असा आक्रोश करावा म्हणून
बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय
कपाळावर आठी उमटवून जेमतेम
अशा आठ्यांचे खांब दुभंगून
कधी प्रकटतील माणसामाणसांतले नरसींह?
***

(‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’, राजहंस प्रकाशन)
  
११)

भर रस्त्यावर
भर रस्त्यावर
किती बेभरवश्याच्या ठिकाणी
उगवलाय चिमणचारा
कुणाचाही सहज पडेल पाय
त्या झिरमिरीत पारदर्शी तुर्‍यावर
किंवा वेगात धावत येणारी चाकं
त्याला चिरडून नकळत
जातील निघून

कधीही तुटून पडेल
किंवा तोडली जाईल
अशा फांदीवर घरटं करुन
आपल्या पिलांना त्यात अलगद ठेवणार्‍या
चिमणी इतकाच
बेफिकीर आहे
तिच्यासाठी उगवलेला
चिमणचारा

त्याला कळत नाहीए का
की काळ बदलत चाललाय सुसाट वेगानं ते
आणि बेसुमार वाढत चाललीय वर्दळ ते
आणि कुणाला इकडेतिकडे, खाली
आत बघायला वेळ नाहीए ते ?
खुशाल उगवलाय भर रस्त्यात
एकूणएक असण्याचा स्वामी असल्यासारखा
किंवा उगवण्याच्या क्षणाखेरीज
काहीच आपलं नसल्यासारखा
उगवलाय चिमणचारा !
***

(‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’, राजहंस प्रकाशन)

आसावरी काकडे
9762209028