Sunday 31 January 2016

वडावरची चिमणी

व्यक्त होणं ही माणसाची एक प्राथमिक गरज आहे. भाषेची निर्मितीच या गरजेतून झाली..! छोटं मोठं काहीही घडलं तरी ते लगेच कुणालातरी सांगावसं वाटतं. पण बर्‍याचदा मनात असं काही असतं की ते उघडपणे सांगता येत नाही. कधी कधी तर काय सांगायचंय ते आपल्यालाच नीट उमगलेलं नसतं. पण दाटून आलेल्या मेघांसारखं कोसळून मोकळं व्हायचं असतं मनाला... अशावेळी अव्यक्त राहूनही व्यक्त होण्याचं समाधान देणारं अद्‍भुत साधन म्हणजे कविता..! आजवर अनेकांनी कवितेची अनेक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पण लगेच लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे कविता एकाच वेळी अतिशय सोपी वाटते पण तितकीच ती दुर्लभ असते. हायकू, चारोळीएवढी अल्पाक्षरी असते आणि खंडकाव्याइतकी दीर्घही असते. साहित्याचा सर्वश्रेष्ठ प्रकार असते कविता पण गौरवा इतकंच टीकेलाही सामोरं जावं लागतं तिला. कुणाला आयुष्यभर झपाटून टाकते ती तर कुणी तिच्याकडे ढुंकूनही पाहात नाही...

काही असलं तरी ज्याला व्यक्त होण्याची आंतरिक निकड अस्वस्थ करत राहते, आणि ज्याला शब्दांचा लळा लागलेला आहे अशा प्रत्येकाला कविता लिहिण्याचा मोह होतो. आणि एकदा लिहिली की ती कुणालातरी दाखवावीशी वाटते. कुणीतरी ऐकून व्वा..छान.. असं म्हटलं की कवितेच्या जन्माचं एक आवर्तन पूर्ण होतं..! मग ती मागच्या पानावर जाऊन बसते. एकेक करत जमत गेलेल्या अशा कविता पुस्तकरूपात एकत्रित करून प्रकाशित करणं हा कवीच्या जीवनातला एक सुखाचा सोहळा असतो. कवी-मनात यावेळी आत कुठेतरी अपुरेपणाच्या जाणिवेनं जागवलेली हुरहुर असते पण हा सोहळा अधिक चांगलं लिहिण्याची, एका अर्थानं अधिक चांगलं जगण्याची उमेद बहाल करणारा असतो..!

 ‘वडावरची चिमणी’ या संग्रहाला प्रस्तावना लिहिताना कवितेविषयीचे असे सगळे विचार मनात गर्दी करताहेत... राजश्री सोले यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. निवृत्तीनंतरच्या टप्प्यावर नव्यानं जगण्याच्या उत्साहात तो सामिल झाला आहे. या संग्रहाचं स्क्रिप्ट घेऊन त्या घरी आल्या तेव्हा आमचा प्रथम परिचय झाला. कविता माझ्या हातात सोपवताना त्या म्हणाल्या, ‘माझा पहिलाच कवितासंग्रह आहे हा. कविता वाचून मला काही सूचना केल्यात तर आवडेल...’ मग इतर काही बोलणं झालं. तेवढ्यानं आमच्यात मैत्री झाल्यासारखं वाटलं. स्क्रिप्ट ठेवून त्या गेल्या. दोन तीन दिवसांनी जरा निवांती मिळाल्यावर कविता वाचायला घेतल्या. आधी मनोगत वाचलं. छोटसं आणि खरंखुरं. स्वतःच्या कवितेविषयीची जाण असलेलं.. मग कविता वाचायला लागले. ‘वडावरची चिमणी’ या शीर्षक-कवितेपासूनच या संग्रहाची सुरवात झाली आहे... ‘गावाकडचं पानी’, ‘भोज्जा’, ‘बंडांच्या मनीचे बंड’, ‘बकुळे’ या कविता वाचल्या आणि जाणवलं यात छानसं कथाबीज लपलेलं आहे. ते कितीही विस्तारू शकतं. पण या कवितांमधे ते हात-पाय आवरून बसलंय. आशयाच्या दृष्टिनं त्याचा संकोच आणि कवितेच्या आकृतिबंधाच्या दृष्टिनं पसरट अशा या कविता वाचून मी थांबले. राजश्रीताईंनी सूचना करण्याबद्दल आवर्जून सांगितलेलं आठवलं. मग त्यांना फोन करून सांगितलं, ‘या या कविता.. खरंतर सगळ्याच कविता पुन्हा पुन्हा वाचून पहा. तुम्हाला वाटलं तर काही ओळी कमी करा, शब्द बदला.. परिष्करणाचा हात फिरला की तुमच्याच कविता तुम्हाला नवीन आणि छान वाटतील...’ त्यांनी ते मानलं...

या संग्रहातील कविता पुढे वाचत गेले तेव्हा जाणवलं की या कवितांमधे सामाजिक वास्तवाचं, विशेषतः स्त्रीविषयक वास्तवाचं भान जागं आहे. नात्यांमधल्या विसंवादाचं चित्रणही आहे काही कवितांमधे. रूपकात्मकता हे वैशिष्ट्य असलेल्या ‘वडावरची चिमणी’, ‘बंडांच्या मनीचे बंड’ अशा काही कविता आहेत. सामाजिक वास्तवावर त्या भाष्य करतात. समाजाची दुटप्पी, विसंगत आणि स्वार्थी मानसिकता अधोरेखित करतात. कवितेतील प्रतिमा, रूपकं कवितेला कवितापण देत असतात. व्यक्त होऊनही अव्यक्त राहता येतं ते यामुळंच..!

‘मेघराजा’ ही कविता स्वतंत्रपणे वाचताना या कवितेतला मेघ हा खराखुरा मेघ आहे असं वाटतं पण त्याच्या शेजारची ‘प्रतिभा’ ही कविता वाचल्यावर लक्षात येतं की मेघ ही एक अर्थपूर्ण प्रतिमा आहे..! राजश्री सोले यांनी या प्रतिमेचा सुंदर वापर केलाय-

‘ती उसवलीय उन्हाच्या तापाने
भेगाळलीय चटक्याने
बीज पोटात घेऊन बसलीय रे..’

पोटात बीज घेऊन बसलेल्या जमिनीसारखंच तृषार्त झालेलं असतं सृजनोत्सुक मन. आणि सृजनवेळेची वाट पाहताना तेही उसवतं... भेगाळतं!  

 काही कवितांत महाभारताचे संदर्भ आहेत. असे संदर्भ असलेली ‘हे योगेश्वरा’ ही कविता काहीसा वेगळा आशय घेऊन वाचकांना भेटते. यात योगेश्वराला विचारलंय,

‘हे योगेश्वरा,  
अजून अस्तित्वात आहेस तू?’

आणि लगेच उत्तरही दिलेलं आहे. मार्मिक आणि जिव्हारी लागणारं.. ते असं-

‘नक्कीच, लाखभर दुर्योधन दुःशासनांमागे
एकदा तुझं अस्तित्व जाणवतं
पण पुन्हा भेटण्यासाठी
एक लाख दुर्योधन दुःशासनांना  
सामोरं जावं लागतं..!

महाभारतातल्या द्रौपदीवर दीर्घ काव्य लिहिण्याचा राजश्री सोले यांचा संकल्प आहे. त्यात भरपूर अभ्यासपूर्ण संदर्भ आहेत. त्यातला काही भाग या संग्रहात समाविष्ट केलेला आहे. सर्वांना माहीत असलेलं कथानक आपल्या नजरेतून पाहून त्याविषयी लिहीणं हे एक मोठं आव्हान आहे.

या कवितासंग्रहातील स्त्री-जाणीवांच्या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. उदा. एक अल्पाक्षरी कविता पहा-

‘तो आकाशाला भिडला
म्हणून घाबरतेस काय  
अगं तुझ्या पोलादी मिठीत  
त्याचे मातीचे पाय !’

इथे स्त्री-सामर्थ्याची सार्थ जाण आहे. पण तिच्यातील प्रेमभाव या पोलादी सामर्थ्यात हरवलेला नाही उलट त्यात बळ आहे त्याचे ‘मातीचे पाय’ समजून घेण्याचं याचंही भान आहे. त्या दृष्टिनं ‘पोलादी मिठी’ ही शब्दयोजना फार प्रभावी झाली आहे.

‘मादी आणि देवता’ या कवेतेत प्राणी आणि माणूस यांच्या माद्यांची केलेली तूलना लक्षवेधी आहे. त्यासाठी ही पूर्ण कविता वाचायला हवी. ‘खेळ नियतीचा’ या छोट्याशा कवितेतला दृष्टिकोनही कौतुकास्पद आहे.-

‘भुकेल्या पोटी उन्हात कष्ट करताना  
शरीरातून तिच्या घामाचा पाऊस बरसतो  
भुकेल्या पोटी पावसात कष्ट करताना
पोटात तिच्या भुकेची आग असते
नियती तिच्याशी खेळते? छे !
उन्हात पाऊस अन्‍ पावसात आग  
निर्माण करून
नियतीलाच ती खेळवत असते..’

‘खात्री कुणी देईल का?’ या कवितेत स्त्रीसंदर्भातलं जळजळीत वास्तव चित्रित झालंय. ही पूर्ण कविता कवयित्रीच्या तोंडून ऐकल्यावर त्यातल्या दहकतेचे चटके बसल्याशिवाय राहणार नाहीत. असं वास्तव असलेल्या आणि तरीही झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला ‘संसार’ या कवितेत राजश्री सोले यांनी एक खणखणीत प्रश्न विचारलाय-

‘जाळणारे हात परकेच असतात  
पण तेव्हा आपले काय झोपलेले असतात?’

याशिवाय ‘अग्नीदिव्य’, ‘निर्वाचित कलाम बाय तस्लिमा नसरीन’, ‘शिक्का’, ‘लढा’ आणि ‘आई’ या कविता स्त्रीविषयी वेगळेपणानं काही सांगू पाहतात, विचार करायला लावतात.

नात्यांमधल्या विसंगती, गोडवा, प्रेम..जिव्हाळा अशा वेगवेगळ्या अर्थच्छटा असलेल्या ‘दुधावरची साय’, ‘सप्तपदी’, ‘स्वप्न’ अशा काही कविता, कविताविषयक कविता आणि वेगळ्या विषयांवरच्या ‘शहीद जवानांना वाहिलेली श्रद्धांजली’, ‘आयाराम गयाराम’, अशाही कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. राजश्री सोले यांनी आपल्या निवृत्तीपर्यंतच्या काळात पाहिलेलं जग, घेतलेले अनुभव, त्यातून झालेला अंतर्मुख विचार, आलेली अस्वस्थता, उमटलेले भावतरंग या त्यांच्या पूर्वसंचितातून या संग्रहातल्या अशा विविध कवितांचा जन्म झालेला आहे.

कवितेतून व्यक्त होता येणं ही दुर्मिळ क्षमता आहे. आयुष्य जगत असताना प्रत्येकजण अनुभवातून काही शिकत असतो. आपलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी कवितेसारखं प्रभावी साधन हाताशी असेल तर वाट्याला आलेल्या सुख-दुःखांच्या उत्कट क्षणांना त्यांच्यापासून अलग होऊन निरखता येतं. त्यातून स्वतःची ओळख होते. आयुष्य घडवण्याच्या प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा. तिथून अधिकाधिक विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जाता येतं. माणूस म्हणून जगणं याचा अर्थच आपलं आयुष्य घडवत राहाणं..! या अर्थपूर्ण प्रवासात राजश्री सोले यांना कवितेची अखंड सोबत मिळत राहावी ही शुभेच्छा.

आसावरी काकडे
21 जुलै 2014



      

1 comment:

  1. आशय घन कवितेची अर्थपूर्ण समिक्षा.

    ReplyDelete