Friday 8 January 2016

मृण्मयी पुरस्कार प्रदान सोहळा

भाषण

नमस्कार,

ज्येष्ठ लेखक आणि संपादक श्री आनंद अंतरकर, लेखक.. कलाकार.. प्राध्यापक.. प्राचार्य असे बरेच पैलू असलेलं बहुगुणी दांपत्य डॉ. विजय आणि डॉ. वीणा देव, अभिनय-क्षेत्रातलं सद्ध्याचं प्रकाशझोतात असलेलं नाव मृणाल कुलकर्णी, नीरा-गोपाल पुरस्कार विजेत्या डॉ. सुजाता राजापुरकर आणि आपण सर्व सुहृद...,

मृण्मयी पुरस्कारासाठी एकमतानं माझी निवड केल्याबद्दल प्रथम वीणा आणि विजय देव यांचे मी मनापासून आभार मानते. मला देण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकूण लेखन-प्रवासाला समारंभपूर्वक दिलेली दाद आहे असं मला वाटतं. त्यामुळं हा पुरस्कार वितरण सोहळा माझ्यासाठी एका अर्थानं सार्थकाचा सोहळा आहे. इथं आल्यापासून तो अनुभवताना मी अतिशय भारावून गेले आहे...
आपलं मनोगत व्यक्त करताना प्रथम मी नीरा-गोपाल पुरस्काराबद्दल सुजाता राजापूरकर यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि त्याना शुभेच्छा देते. गोनीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या. त्यापैकी एक-दोन हृद्य आठवणी सुरुवातीला सांगते-

२६-२७ वर्षांपूर्वीची ही आठवण आहे. वसुधा मेहंदळे यांच्याबरोबर एका साहित्यसंमेलनासाठी तळेगावला गेले होते. तेव्हा मी नुकतीच कविता लिहायला लागले होते. माझी कुणाशी फारशी ओळख नव्हती. पण वसुधाताईंमुळं गोनीदांच्या घरी राहायची संधी मिळाली.. आई, आप्पा, वीणाताई, आणि एका श्रेष्ठ साहित्यिकाचं साधं उबदार घर.. सगळ्यांना मी प्रथमच भेटत होते. तो एक सुखद अनुभव होता... दुसरे दिवशी सकाळी आवरून आम्ही संमेलनाच्या जागी गेलो. वसुधाताई म्हाणाल्या, जा कवितावाचनासाठी संयोजकांकडे नाव देऊन ये. खूप संकोच वाटत होता. पण त्यांनी एक-दोनदा म्हटल्यावर गेले नाव द्यायला. नाव लिहून न घेता ते म्हणाले समोर श्रोत्यांमधे बसा. आम्ही बोलावू वेळेनुसार. मी बसले. कविसंमेलन सुरू झालं. गोनीदां आणि काही कवी स्टेजवर होते. समोर खाली बसलेलं पाहून गोनीदांनी मला स्टेजवर बोलावून घेतलं..!... आज गोनिदांच्या स्मृतीदिनी त्यांनी सुरू केलेला पुरस्कार स्वीकाताना या प्रसंगाची प्रकर्षानं आठवण झाली. मनात आलं, त्या घटनेचं आजच्या दिवसाशी काही नातं असेल का?

दुसरी आठवण त्यानंतर बर्‍याच वर्षांनी घडलेल्या प्रसंगाची आहे. तळेगाव सोडून गोनीदां म्हणजे आप्पा पुण्यात राहायला आले होते. आजारी असतांना एकदा त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं. झोपून होते. त्यांना नमस्कार केला आणि जवळ बसले. संवाद कठीणच होता. पण आप्पांच्या बेडजवळ एक पाटी आणि पेन्सिल होती. अर्थात ती त्यांच्यासाठी होती. कसे आहात विचारून मी थोडावेळ तशीच बसले. आप्पांनी पाटी घेतली, त्यावर काही लिहिलं आणि मला दाखवलं. एक हृद्य आशीर्वाद होता तो...! आजच्यासारखा मोबाईल जवळ असता तर फोटो काढून लगेच तो क्षण टिपून ठेवला असता.. आता फोटो नाहीए पण मृण्मयी पुरस्कारासाठी माझी निवड केल्याचा वीणाताईंचा फोन आला तेव्हा क्षणार्धात ती पाटी हातात धरलेले आप्पा माझ्या डोळ्यांसमोर आले..! आज असं वाटतंय की त्यांच्या  आशीर्वादामुळंच माझा लेखन-प्रवास चालू राहिलाय.

आता थोडंसं या प्रवासाबद्दल...

वीणाताईंनी आताच माझा सविस्तर परिचय करून दिलाय. माझ्या लेखन-प्रवासाचा आलेख तुमच्यासमोर आहे. त्यामुळं मी बायोडाटात नसलेल्या माझ्या लेखनाविषयी आणि एकूण लेखनासंदर्भातल्या माझ्या भूमिकेविषयी थोडसं सांगणार आहे.

लहानपणापासून मला लिहायला आवडतं. त्यावेळी लिहिणं म्हणजे फक्त मानातलं कागदावर उतरवणं एवढंच होतं. नुसतं वाचन कधी व्हायचं नाही. माझा अभ्यास म्हणजे अभ्यासाची पुस्तकं वाचून काय समजलं ते लिहून काढणं असा असायचा. आपल्या अक्षरातलं वाचायला आवडायचं. अलिकडे निवृत्तीनंतर तत्त्वज्ञान विषय घेऊन एम. ए. केलं तेव्हाही अभ्यासाची हीच तर्‍हा होती. माझ्या नोट्सच्या वह्यांचे गठ्ठे मी बरेच दिवस सांभाळून ठेवले.

नंतरचं लेखन म्हणजे इतर काही वाचल्यावर त्याविषयीची प्रतिक्रिया किंवा कोणत्याही कारणांनी मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यातून येणारी अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी डायरी लिहिणं किंवा लेखकांना पत्र लिहिणं... डायर्‍यांचे आणि लिहिलेल्या पत्रांचे गठ्ठे तयार होत राहिले... या गठ्ठ्यांची नंतर अडचणच होते. पण लिहिणं थांबवता येत नाही. बरीच वर्षं कविता..कथा.. ललित लेख... असा कुठलाच आकार नसलेलं निराकार लेखनच मी करत होते. प्रकाशित होईल असं काही लिहावं असं कधी मनातही आलं नाही. लिहिणं ही माझी गरज होती.

या निराकार लेखनात एकदा कवितेनं प्रवेश केला आणि लेखनाला आकार आणि दिशा मिळाली. कवितेनं मला नादावून टाकलं. आवेग इतका होता की थांबताच येत नाही अशी अवस्था झाली.. दोन डायर्‍या भरल्या आणि आवेग ओसरला. बर्‍याच दिवसात कविता लिहिली गेली नाही. वाटलं संपलं आत साठलेलं सगळं. त्या थांबलेल्या काळात योग जुळून आला आणि काहीसा संकोचत आरसा हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.. थांबलेपण प्रवाही झाल्यासारखं वाटलं. तेव्हा मनात उमटलेल्या चार ओळी या संग्रहाच्या मागच्या फ्लॅपवर टाकल्या. त्या अशा- सारी आवराआवर करून / परततच होते मी / कुंपणापर्यंतची आपली धाव सरली म्हणून / पण मृगजळासारखं / माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय..! कल्पनाही केली नव्हती एवढं या संग्रहाचं स्वागत झालं. मग कुंपण खरोखरच मृगजळासारखं दूर जात राहिलं... माझा बायोडाटा वाढत राहिला.

लिहिण्यावर माझं जिवापाड प्रेम असलं, सुरुवात दमदार झाली असली तरी कविता हा माझ्या महत्त्वाकांक्षेचा विषय कधी झाला नाही.. कारण एक चांगलं माणूस होणं ही माझी आंतरिक गरज होती, ध्यास होता. हा ध्यास बाकी सगळं गौण ठरवणारा होता. मला पडणारे प्रश्न या ध्यासापोटी पडणारे होते. त्यांच्या उत्तरांसाठी वाचन..अभ्यास होत राहिला. त्यामुळं प्रश्न-प्रक्रिया आणि अस्वस्थ होणं अधिक उत्कट होत गेलं. नवी अस्वस्थता त्यातून लेखन असं घडत राहिलं.. लिहिता लिहिता लेखन-प्रक्रिया उमगत गेली. तिचं सामर्थ्य जाणवू लागलं. विविध प्रकारच्या लेखनाकडे मी स्व-शोधाचं, स्व-विकासाचं साधन म्हणून पाहू लागले.

कोणत्याही प्रकारच्या लेखनात त्याचा विषय, मांडणीची तर्‍हा- शैली, शब्दांची निवड... अशा प्रत्येक अभिव्यक्तीतून आपल्यातील ‘स्व’च व्यक्त होत असतो. म्हणून तर प्रत्येकाचं लेखन वेगळं असतं. एकाच साहित्यकृतीचा अनुवाद अनेकांनी केला तरी प्रत्येक अनुवादाचा पोत अनुवादकाच्या ‘स्व’शी नातं सांगणारा असतो. कथा-कादंबर्‍यांमधल्या पात्रांमधूनही कोणत्या ना कोणत्या प्रकारे लेखकाचा स्व डोकावत असतो. इतकंच काय संशोधनपर लेखनातही लेखकाच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहात नाही. या दृष्टीनं विचार करता कोणतंही लेखन एक प्रकारे लेखकाचं आत्मचरित्रच असतं...

अगदी स्वतःपुरतं केलेलं खाजगी स्वरूपाचं डायरीलेखन थेटपणे स्व-संवाद साधू शकतं. स्वतःची उलटतपासणी घेऊ शकतं. आत्मपरिक्षण करू शकतं. असं लेखन म्हणजे स्व-शोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग! अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा तळमळीतून झालेलं लेखन मेडिटेशनचा परिणाम साधणारं असतं. ते स्व-समुपदेशन- सेल्फ काउन्सीलींग करणारंही होऊ शकतं. हे मी सतत अनुभवत होते. या लेखन-प्रक्रियेत कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकूळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळं आतल्या आत होत राहणार्‍या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं..! 

जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी या लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ‘कवितान्तरण’ या अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी- ‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

सर्व प्रकारच्या लेखनातूनच फक्त नाही तर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही आपला ‘स्व’, आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. ‘तरीही काही बाकी राहील’ या नावानं तो याच वर्षी प्रकाशित झालाय. त्यात एक कविता आहे- ‘अधिक चांगली कविता / लिहील तोच / जो अधिक चांगला कवी असेल / जेव्हा तो लिहीत असेल / सर्वात चांगली कविता / नक्कीच तो त्यावेळी / सर्वात चांगला माणूस असेल / ज्या जगात लिहिल्या जातील / अधिक चांगल्या कविता / तेच असेल अधिक चांगलं जग / शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही / सर्वात सुंदर स्वप्न आहे / सर्वात चांगल्या माणसाचं..!

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि लेखनाचा रियाज या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी ‘मी’पासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना, आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... आपण जे लिहितो ते संदिग्ध आशयाच्या रूपात आधी मनात रेंगाळत असतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, काही अंशी स्वतःची ओळख होणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. पण हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. त्याचवेळी त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन तुम्हाला होत असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. एखाद्या घटनेविषयी लिहिताना किंवा कविता लिहितानाही असं सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही...!

लेखन-प्रक्रियेत केवळ मनाला संदिग्धपणे जाणवलेलंच अधिक स्पष्ट होतं असं नाही तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात..! ती आपली नवी ओळख असते. या सर्व गोष्टी लेखकाला स्वतःची नवी ओळख करून देत उन्नत करणार्‍या ठरतात. लेखन अशाप्रकारे स्व-आकलनाचं, स्व-शोधाचं साधन बनून लिहिणार्‍याचा विकास घडवत असतं.

सातत्यानं काही ना काही लिहीताना हळू हळू हे उमगत गेलं. मला वाटतं सुरुवातीचं स्वैर, निराकार लेखन आणि नंतरचा ‘आरसा’ ते ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍.. हा माझा लेखन-प्रवास एकमेकांना घडवणारा, पुढे नेणारा झाला आहे. मृण्मयी पुरस्कार ही त्याची पावती आहे... या बळावर माझा प्रवास आणखी दमदारपणे चालू राहील अशी आशा करते.

माझ्या या एकूण वाटचालीत मला अनेकांचं प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. गोनिदांसारखे ज्येष्ठ साहित्यिक, सखी मंडळ, काव्यशिल्प, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ असे वेगवेगळे ग्रुप्स, मसापसारख्या साहित्यिक संस्था, राजहंस, कॉन्टिनेन्टल, पद्मगंधा अशा प्रकाशन संस्था, मित्रमंडळी, नातेवाइक.. या सर्वांविषयीची कृतज्ञता मी व्यक्त करते.

समाजकार्यासाठीचा नीरा-गोपाल पुरस्कार मिळालेल्या सुजाता राजापुरकर यांचं मनोगत ऐकायला तुमच्या इतकीच मीही उत्सुक आहे. ‘एक चांगलं माणूस होणं’ या भूमिकेत सामाजिक भान आणि त्यासंदर्भातील कृतीही समाविष्ट आहे खरंतर. पण असं प्रत्यक्ष काम करणं मला कधी जमलं नाही. सतत त्याविषयीची टोचणी मनाला लागलेली असते. कुणीतरी करत असलेल्या अशा कामांविषयी ऐकलं की भारावून जायला होतं. सामाजिक प्रश्नांचं भयंकर स्वरूप समोर आलं की त्यापुढे लेखन-वाचन या गोष्टी बिनकामाच्या वाटू लागतात... निरलसपणे रुग्णांना मार्गदर्शन करत आपल्या कार्यात व्यग्र असलेल्या सुजाता राजापुरकर यांचं पुन्हा एकदा  मनःपूर्वक अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद.

आसावरी काकडे
८ जुलै २०१४  




No comments:

Post a Comment