Monday 9 January 2023

अभिव्यक्तीची आस

फांदीवरच्या पानगळखुणा रिकाम्या दिसतात. पण बंद गुहेसासारखी असते ती खपली धरलेली जखम. पालवी फुटायला लागली की समजतं काय काय दडलेलं होतं त्या गुहेत... अशी पालवी उगीच फुटत नाही. साचत गेलेलं आत मावेनासं होतं. मग ते हळूहळू बाहेर पडायला लागतं. कविता लिहाविशी वाटण्याचा क्षण असा संपृक्त असतो. त्यातून ज्याचं जेवढं, जसं संचित असेल तेवढं त्याच्या शब्दात उतरतं.

‘झाली फुले कळ्यांची’ या प्रा. निलीमा कुलकर्णी–खर्डीकर यांच्या कवितासंग्रहातल्या कविता त्यांचं संचित सोबत घेऊन आलेल्या आहेत. या संग्रहात शंभराहून अधिक कविता आहेत. त्या वाचताना प्रथम जाणवते ती त्यांची अभिव्यक्तीची तीव्र आस..! त्यांना भरभरून काही ना काही सांगायचं आहे. या सांगण्यात स्वाभाविक आवेग आहे. एखाद्या मैफिलीची सुरुवात गणेशवंदनेनं व्हावी तशी या कवितासंग्रहाची सुरुवात ‘हे गणराया प्रणाम माझा’ या भावपूर्ण कवितेनं झाली आहे. निलिमाताईंना गणेशभेट केवळ मूर्तीतून होत नाही. तर  प्रत्येक श्वासातून, माता, पिता, गुरू, बंधू-भगिनी, सासू-सासरे, नणंद-जावा, मुली-सुना.. अशा गणगोतांपासून ते उदयास्तातून रोज भेटणार्‍या चंद्र-सूर्यापर्यंत सार्‍यातून गणेशभेट होते. क्षणोक्षणी भेट घडवणार्‍या कणाकणाला त्या प्रणाम करतात. शब्दफुलांनी त्याची पूजा करतात. ‘निलीमा’ ही या संग्रहातली शेवटची अल्पाक्षरी कविता. यात त्या गगन माऊलीला प्रणाम करतात. कवितासंग्रहाची  सुरुवात विस्तृत तपशील असलेल्या कवितेनं होते तर शेवट सूचक आणि संयत अशा कवितेनं होतो... स्थूलाकडून सूक्ष्माकडे झालेला हा जाणीवेचा प्रवास हृद्य आहे.

निलीमाताईंच्या कविता आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगानं विकसित होत गेलेल्या आहेत. या कवितेत विषयांचं वैविध्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कविता वाचकांच्या डोळ्यासमोर चलत्‍चित्र उभं करणार्‍या आहेत. ‘ते खरं तर राहूनच गेलं’, ‘कालाय तस्मै नमः’ या कवितांमधे पूर्ण जीवनाचा पट उलगडलाय. ‘कृष्णकथा भावते मनाला’ या कवितेत पूर्ण कृष्णकथा उलगडत जाते. तर ‘हिमकन्या मी’ या कवितेत गंगा नदीच्या उगमापासूनच्या प्रवासाचं भावपूर्ण वर्णन आहे. या कवितांमधला हा आशयविस्तार पाहून त्या गद्य लेखनही प्रभावीपणे करू शकतील असं वाटतं.

काही कवितांमधे निसर्गवर्णन आहे. उदा. ‘चंदेरी दुनियेतली कहाणी’ या कवितेतलं वर्णन आणि रचना बालकवींच्या ‘ती फुलराणी’ या कवितेची आठवण करून देणारी आहे. काही कविता शब्दांतून व्यक्तिचित्र साकारतात. उदा. ‘सांगोल्याचे शंभर नंबरी सोने..’ या कवितेत लोकप्रिय आमदार गणपतरावजी देशमुख यांचे चित्रण केले आहे. ‘ही एक आस मोठी’ ही कविता जन्मभूमीचे वर्णन करत तिच्याविषयीचं ऋण व्यक्त करते. ‘विठोबा रखुमाई’ ही कविता तर वाचकाला पंढरपूरला नेऊन आणते. ‘जय जवान.. जय किसान.. जय विज्ञान..!’, आणि ‘पौर्णिमेचा चंद्र’ या कवितांमधे जीवनाकडे सकारत्मकतेनं कसं बघता येतं हे परोपरीनं सांगितलं आहे. या कविता वाचताना पाडगावकरांच्या ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत?’ या कवितेची आठवण होते.

एखाद्या विषयावर एक कविता लिहून निलीमाताईंचं सांगणं पूर्ण होत नाही. मग वेगवेगळ्या कविता लिहून त्या तो विषय सांगोपांग कथन करतात. कृष्ण, विठ्ठल यांसारखी भक्तिस्थानं असोत की आई, मुलगी आशी जिव्हाळ्याची नाती असोत. ती एका कवितेत मावत नाहीत. या संग्रहात अशा कितीतरी विषयांवरील कवितांचे गुच्छ आहेत. आई-मुलगी हे नातं तर त्यांनी जन्मदात्री आईपासून सुरू करून उतारवयात मुलगीच आपली आई कशी होते इथपर्यंत फुलवलं आहे.

या संग्रहातील कवितांमधे परंपरा आणि आधुनिक विचार यांची सुरेख सांगड घातलेली आहे. ‘देवीचे नवरात्र’, ‘आईचा जोगवा’, ‘आधुनिक ओवी’, ‘साक्षरतेचा जोगवा’, ‘विजयादशमीचे सोने’, ‘शुभसंक्रमण’... अशा अनेक कवितांमधे पारंपरिक प्रथांना आधुनिक आयाम दिलेला आहे.

यातील काही कविता विशेष उल्लेखनीय आहेत. ‘असा कसा देव तू?’ या कवितेत क्लेशकारक समाजवास्तवाचे आणि कटीवर हात ठेवलेल्या विठ्ठलाचे एकत्रित वर्णन करून त्यातली विसंगती अधोरेखित केली आहे. आणि शेवटी म्हटलंय, ‘हात सोड ये बाहेर, दीनांचा नाथ तू..!’ प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केलेल्या निलीमाताई विद्यार्थ्यांचं आजचं रूप पाहून त्यांना उपदेश करतात. ‘आणि मग म्हण I love you’ या कवितेत, आधी काय कर ते सांगून शेवटी म्हटलंय, ‘...आणि आता म्हण I Love my country... my mother.. brother.. sister.. all the world..! ‘मी कोण’ या कवितेत तर मानवी जीवनाचा खोल विचार आलेला आहे. जन्मापासूनचे सर्व टप्पे पार करत माणूस वृद्ध होतो. तरी मी कोण? हे त्याला उमगत नाही. ‘कोहम्‍... सोहम्‍...’ हा तात्विक विचार पचनी पडत नाही. पण कवयित्रीला वाटतं, हे कशाला समाजायला हवं? कवितेत शेवटी म्हटलंय, ‘इतकंच कळावं माणसाला, मी एक माणूस आहे / माणूस म्हणून माणसाशी माणसाप्रमाणे वागणार आहे..!’

नोकरीतील अध्यापनाच्या कामाबरोबर निलीमाताई डॉ. संजीवनी केळकर यांच्या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत सचिव या भूमिकेतून सक्रीय आहेत. त्यांच्या कवितेत उतरलेल्या विचार-भावनांमागे या कार्यातील अनुभवाचे संचित उभे आहे. त्यांचा भरभरून लिहिण्याचा आवेग त्यांना कवितेच्या वाटेवर पुढे पुढे नेत राहो ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

८ जानेवारी २०२३