Sunday 3 January 2016

अमूर्त आर्ताचे मूर्त देणे....

प्रस्तावना-
निर्मितीच्या एका पातळीवर स्वांतःसुखाय असलेली कविता लिहून हातावेगळी झाली की ती स्वतंत्र होते. शब्दांत साकार होऊन स्वतंत्र झालेली कविता म्हणजे अमूर्त आर्ताचे मूर्तरूपातले देणे असते..! देणं देऊन मोकळं होता होता कवी-मनाला तिनं दिलेला असतो समाधान-असमाधानाचा एक झोका..! कवी-मन त्यावर बसून आत-बाहेर डोकावत राहातं. असमाधानाच्या बाजूनं ते आत डोकावतं तेव्हा त्याला उमगतं की आर्ताचे बरेच देणे द्यायचे बाकी राहिले आहे अजून... आणि समाधानाच्या आवेगात बाहेर डोकावते तेव्हा त्याला दिसते आपली कविता कसल्याशा प्रतीक्षेत उभी असलेली..! कोणाची, कशाची असते ही प्रतीक्षा? कवी-मनातून सादरूपात बाहेर पडलेल्या या कवितेला प्रतीक्षा असते प्रतिसादाची. मग कवी-मनही तिच्यासोबत उभं राहातं जाणकार रसिकाच्या स्वागताला तत्पर होऊन प्रतिसादाच्या अपेक्षेत... ‘हातावेगळ्या’ झालेल्या अशा कवितांचा संग्रह प्रकाशित करताना इतकं सगळं घडलेलं असतं...
कवितेच्या संदर्भात अत्यंत अर्थपूर्ण असे ‘आर्ताचे देणे’ हे शीर्षक असलेल्या गिरिजा मुरगोडी यांच्या या कवितासंग्रहात अधिकतर कविता अंतर्मुख मनाला साक्षी ठेवून साकारलेल्या आहेत. त्या बोलत राहतात भरभरून आंतरिक अवस्थांविषयी... अनाम वेदना, जाणवलेलं अपुरेपण, जगण्याची ऊर्मी, आर्तता, व्याकुळ करणारी तहान, निःशब्द स्तब्धता...याविषयी. म्हणजे त्या बाह्य वास्तवाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात असं मात्र नाही. इतकंच की त्या त्याच्या तपशिलात फारशा अडकून बसत नाहीत. नातेसंबंधांमधले ताण आणि लाघव, निसर्गातले आर्त विभ्रम, सामाजिक प्रश्नांनी निर्माण केलेली कासावीस अगतिकता, भोवतालाला लाभलेला अनावर वेग... या सार्‍यांचं अंतर्मुख मनाला उमगलेलं, डसत राहिलेलं व्यामिश्र आणि सूक्ष्म रूप आंतरिकीकरणाच्या दीर्घ प्रक्रियेत फिरून मग एखाद्या उत्कट क्षणी कवितारूपात प्रकटतं.. या संग्रहातली कोणतीही कविता घेतली तर ती सतत आत डोकावत व्यक्त होत असलेली दिसेल.
अशा कवितांना आत्मकेंद्री म्हणता येईल का?... आपली इच्छा असो वा नसो त्वचेबाहेरचे सगळे कोलाहल रंध्रारंध्रांतून आत घुसत राहतात. अंतर्व्यवस्था बिघडवून टाकतात. एक गोंधळ माजतो मनात. उलथापालथ होते सगळी. या झंझावातात नाहीसे होतात त्यामागच्या कारणांचे तपशील. आणि अवशेष रूपात मनात उरते एक अनाम आर्त. ते अस्वस्थ करत राहते. शब्दांच्या दारांवर धडका देत बाहेर पडू पाहते.. पण दार उघडणं इतकं सोपं नसतं.. एका कवितेत गिरिजा यांनी म्हटलंय-
सोपं नसतं गं असं
नव्यानव्यानं रुजणं
भोवतालच्या कोलाहलात
आतला सूर जपणं ...
खूप काही उखडून ,
नवं चांदणं पेरणं ...
पण दार उघडतं तेव्हाही जे शब्दरूपात बाहेर पडतं त्यात सापडत नाहीत स्थूल वास्तवाचं नाव असलेले तपशील. ते असतं केवळ व्यथित मनाचं शब्दचित्र. उदा.-
‘उन्मळवेळा टळलेल्या
कोसळवेळा उललेल्या
आषाढ तिष्ठत राहिलेला
कातर कातर झालेला ..
आषाढ.. दाटलेला ..
आतच आटलेला..
कोणत्याही कारणानं कातर झालेलं कोणतंही मन या कविता-चित्रात दिसू शकतं. कोणताच तपशील नसलेली, अशी जमून गेलेली कविता आरशासारखी असते. त्यात डोकावून पाहणार्‍या प्रत्येकाला ती दाखवते त्याचं स्वतःचं रूप! कवितेचं हे स्वरूप समजून घेताना Archibald MacLeish या कविच्या Ars Poeticaया कवितेतल्या दोन ओळी आठवतायत.. व्याख्यारूप बनून गेलेल्या त्या ओळी अशा- A poem should not mean / But be..! या ओळी अत्यंत मननीय आहेत. यातून कवीला काय सुचवायचं असेल? कवितेनं फक्त असावं.. कवितारूपात. तिनं काही सांगू नये.. एकाच एका विशिष्ठ अर्थाकडे निर्देश करू नये.. गिरिजा यांच्या कवितांविषयी लिहिताना या कवितेची आठवण व्हावी यात बरंच काही आलं...

या संदर्भात त्यांच्या कवितेतल्या काही ओळी काही, काही शब्द लक्षात घेण्यासारखे आहेत. उदा.- निळा डोह..हलके तरंग / हिरवाईचा आर्द्र संग.. / शांत मृण्मय ..मौनरंग..’,       ‘तुझ्या चंद्रभाळावर / अलगद खूण ठेवताना / मृण्मयी पापण्यांच्या / जन्मज्योती झाल्या’ ... काही शब्द-  आत्मनाद, निर्झरसाद, आदिम तृष्णा, आर्त तिमिरवेळा.., गोंदणवाळे.. इ. या शब्दांतून, ओळींतून वाच्यार्थापेक्षा बरंच काही प्रसृत होतं. कारण त्यांना अर्थाबरोबर एक लय मिळालीय. एक नाद आहे त्यांच्या उच्चारणाला. आशयाला ही एक अधिकची मिती बहाल करणं हे अशा कवितेत शक्य होतं.

कवितेच्या नाना परी असतात. त्यातलं कोणतंही एक रूप इतरांहून श्रेष्ठ असतं असं म्हणता येत नाही. जळजळीत वास्तव प्रत्ययकारी रीतीनं चित्रित करून वाचकांना अंतर्मुख व्हायला लावणारी कविता केवळ मंचीय म्हणून बाद ठरत नाही. तत्त्वज्ञान ‘शिकवणारी’ मार्गदर्शक कविता मनामनांत रुजलेली राहू शकते... कोणताही कवी त्याच्या वृत्तीनुसार लिहीत असतो. तसंच त्यानं लिहावं. कवितेच्या बाबतीत जाणीवनिष्ठा महत्त्वाची. चांगल्या कवितेची जी लक्षणं आहेत त्यात स्वतःशी प्रामाणिक असणं हे सर्वात महत्त्वाचं... गिरिजा मुरगोडी यांची कविता प्रामाणिक आहे. या कविता वाचताना तसं जाणवत राहातं..  
      कवी आपल्या वृत्तीनुसारच लिहित असला, त्याचा स्वतःचा असा एक वैशिष्ट्यपूर्ण अंतःस्वर त्याच्या कवितांमधून उमटत असला तरी कवितासंग्रह प्रकाशित होतो तेव्हा त्यात काही कवीवृत्तीहून वेगळ्या कविताही वाचायला मिळतात... या संग्रहात काही गेय रचना आहेत. त्या ‘गिरिजाच्या कविते’हून काहीशा वेगळ्या वाटतात. त्यातल्या एका कवितेच्या मला आवडलेल्या दोन ओळी- 
‘काजवे चमकून गेले दूरच्या ताऱ्यांपरी
पावलांशी कवडसे अन् मन पळाया लागले’

काही कवितांमधून सामाजिक आशय काहिसा स्पष्ट रूपात व्यक्त होतो. उदा. एका कवितेतल्या काही ओळी-
‘कुणी एक कविता, कुणी एक मेधा
आनंदवनात समिधा बनून राहिलेली
कुणी एक साधना
जेव्हा अशा भोगवटयांच्या खुणा
उघड्या करून दाखवतात
तेव्हा इथल्या अस्तित्वाचे क्षण
जड जड वाटू लागतात ...

कविता व्यक्त होऊन एका पातळीवर कवी-मनाला दिलासा देते, मुक्त करते कसल्याशा अनाम ऋणातून आणि दुसर्‍या पातळीवर खोलवर दुखवत राहते अव्यक्त राहिलेल्याचा सल ताजा ठेवून. कवितेसोबतच्या प्रवासात येणारे हे दोन्ही अनुभव कवीला कवी म्हणून जिवंत ठेवणारे असतात. याविषयी एका कवितेत गिरिजा यांनी म्हटलंय-
‘शब्दांना साकडे घातले नव्हते मी
नव्हते सांगितले ,
माझ्या अंगणात या
अनुभूतींना तुमच्यासोबत
हिंदोळयावर न्या ...’

पण ते येत राहिले सोबत. असा एक काळ होता. सृजनसोहळा अनुभवता येत होता... पण...
‘आता कुठे असतात ते?
काळोखाच्या गर्तेत,
खोल खोल दऱ्यात?
दूर दूर क्षितिजपार?
सादच पोचू नये,
अशा अगम्य वाटेवर ?..

अशा मिटलेल्या, निःशब्द झालेल्या मनाला अचानक एखादं भांडार गवसतं तेव्हा गोंधळून जायला होतं. या भारावलेल्या अवस्थेचं वर्णन एका कवितेत आहे-

‘कवितेचं अख्खं गाव
आणलंस भेटीला
रुजवणीचं ते आर्त
ओंजळीत कुठलं मावायला?

पण कोणतीच अवस्था कायमसाठी वस्तीला आलेली नसते. ‘आत आत सतत / होत राहते उलथापालथ / कधी वेशीपर्यंत जाऊन परतणे / कधी भोज्यापाशी घुटमळणे’ चालू राहते. अशावेळी स्वतःला धीर देऊन उभं करावं लागतं. थांबल्या पावलांना बळ द्यावं लागतं. गिरिजा यांनी एका कवितेत म्हटलंय-
आता उजाडेल आता उजाडेल
म्हणत अंधाराला कवटाळू नकोस
आत उजाडेल, आत उजाडतेय
या विश्वासावर विसंबून
पाऊल उचल ... !

असंच आणखी एका कवितेत त्यांनी मनाला समजावलंय -

‘वेळीच गळून जावं एकेका नात्यातून
नाहीतर नातीच वगळू लागतात
आपल्याला स्वतःतून....

कवितेतून असं स्वतःला समजावणं स्वतःपुरतं राहात नाही. कवितेचं सामर्थ्य असं की तिनं कमावलेलं शहाणपण वाचकालाही बळ देतं, शहाणं करतं. कवितारूपात हस्तांदोलन करणारं हे शहाणपण रसिक वाचकांना विशेष आवडतं. त्यातला आशय गुणगुणत राहतो मनात..

या संग्रहात काही कणिका आहेत. गिरिजा यांच्या कवितेचं वैशिष्ट्य अधोरेखित करणार्‍या एक-दोन आशयघन कणिका-

‘समोर नदी वाहते आहे
माझ्या अस्तित्वाचे सारे संदर्भ
सोबत घेऊन ..
काय वाहू द्यायचे, काय राहू द्यायचे ,
कोणी ठरवायचे ?
मी की नदीने?..

जगताना असे पेच विचार करणार्‍या प्रत्येकाला पडत राहतात. कितीही विचार केला तरी सुटता सुटत नाहीत ते. पण त्यांना असं काव्यरूप देऊन, सार्वजनिक करत त्यांच्या ताणातून बाजूला होण्याचा पर्याय कवीजवळ असतो..

‘आपण भेटलो की
माझ्यातलं मीपण भेटीला येतं
मातीच्या कणाकणात सांडलेलं स्वत्व
पुन्हा घटात वस्तीला येतं ...

या ओळी वाचून लगेच पान उलटताच येणार नाही. थांबून, थोडा वेळ मूक राहून मग त्यातल्या शब्दांशी संवाद करायला त्या भाग पाडतात. ‘मातीच्या कणाकणात सांडलेलं स्वत्व पुन्हा घटात वस्तीला येणं’ ही कल्पना वाचकाच्या मनात आर्थांची वलयं निर्माण करणारी आहे. एखाद्या भेटीत आलेल्या अनुभूतीचं अंतर्मुख मनानं केलेलं हे शब्दांकन चिंतनशील मनाला तात्त्विक आशयापर्यंत नेऊ शकेल..

जगताना आपण सर्वजण अनुभवत असतो की कधी कधी एखादा दिवस नवी उमेद घेऊनच उगवतो. त्या दिवशी सगळं काही आवाक्यात आल्यासारखं वाटू लागतं. पण गिरिजा मुरगोडी यांना याहून काही वेगळं सुचवायचं आहे... त्यांना वाटतं, एखादा नाही प्रत्येकच दिवस ‘एक नजराणा होऊन’ येत असतो. तो घेणारे आपणच ठरवायचं त्यातनं काय काय आणि कसं घ्यायचं.. दिवस नजराणा घेऊन येत नाही तर तो स्वतःच नजराणा होऊन येतो हे सुंदर ‘वास्तव’ आणि सोबत आपल्या जबाबदारीची समज असलेली एक कविता-

‘प्रत्येक सोनसकाळी
दिवस येतो सामोरा
एक नजराणा होऊन
उतरते पाखरू फांदीवर
आपली नवी धून घेऊन ..
असते उभे आपल्यासाठी
आभाळ बाहू पसरून
असतात उसळत लाटाही
अनंताची साद होऊन ..
गाता येते आपल्याला
एक नवी धून
वा देता येते पापण्यांना
आतली ओली खूण ..
आपल्या आपल्या रांगोळीत
कोणते रंग भरायचे;
आपल्या आपल्या ओंजळीत
कोणते गंध झेलायचे,
सारं आपल्यावर सोपवत
येतो प्रत्येक दिवस
नवं स्वप्न पेरत ....!’

‘माणसं धावतायत’ ही अर्थपूर्ण प्रतिमा असलेली कविता अतिशय प्रत्ययकारी आहे. या कवितेची लय कवितेतील आशय अधोरेखित करते. जगण्याला आलेली अनावर गती या लयीतूनही जाणवत राहते. भोवतीच्या गतिमान वास्तवाचे काव्यात्म वर्णन करणारी ही पूर्ण कविता पुन्हा पुन्हा वाचत अनुभवण्यासारखी आहे-

‘माणसं धावतायात
पाऊस धो धो कोसळतोय
रस्ता वाहतोय
वाहनं पळतायत
माणसं धावतायत
वारा झपाटल्यागत घुमतोय
झाडांना घुसळतोय
रोपांना पिटतोय
रपरपत्या पावसात
रस्त्याकडेला भिजणारं पोर
आकांतानं रडतंय
पाऊस कोसळतोय...
माणसं धावतायत
पाठलाग चाललाय
मृगजळी यशाचा
अनिर्बंध आकांक्षांचा
अतृप्त वासनांचा
अपूर्ण अपेक्षांचा
न संपणाऱ्या हव्यासाचा
अज्ञाताचा, अव्यक्ताचा ..
माणसं धावतायत..
सुटत चाललेल्या धाग्यांना,
हरवत चाललेल्या स्वतःला,
मागेच सोडून,
माणसं..धावतायत...

‘माणसं धावतायत स्वतःला मागेच सोडून’ हे भयंकर आहे.. स्वत्व गमावणं हे अविवेकी सुसाट धावण्याचं फलित...! या कवितेनं हे भयंकर वास्तव निदर्शनास आणून दिलेलं आहे..! भोवतीच्या भोवळ आणणार्‍या अशा गतीशी जमवून घेताना दमछाक होते. अंतर्मुख वृत्तीला तर लगेच अर्थशून्यतेचा काठ गाठावासा वाटतो. एका कवितेत म्हटलंय-

‘धुकं आणखीच दाट झालं ..
अन् कुठले अन्वय शोधणं सुद्धा
अर्थहीन वाटू लागलं....
      वेगवेगळ्या स्तरांवरचे भयंकर वास्तव समजून घेताना थकलेल्या मनाला सगळं हाताबाहेर गेल्यासारखं वाटत राहातं. अशावेळी सगळ्याचं विश्लेषण करत कार्यकारण शोधणं अर्थहीन वाटलं तर नवल नाही.. सर्वसामान्य मनाची ही स्वाभाविक अवस्था आहे..!
      कविता हे अभिव्यक्तीचं असं साधन आहे जे आत आत नेऊन उत्खनन करायला लावतं, शोधून काढतं खोलवरचे सल, त्याची मुळं उघडी पाडतं आणि सापडलेलं सगळं शब्दांच्या ओटीत घालतं. आपण वाचक असू किंवा स्वतः कवी, आपल्याला आपलं रूप दाखवतं.. गिरिजा मुरगोडी यांच्या कविता आस्वादताना कवितेच्या या सामर्थ्याचा प्रत्यय येतो..!
आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com / ९७६२२०९०२८
११ मे २०१४

No comments:

Post a Comment