Thursday 7 January 2016

शेकोटी साहित्यसंमेलन-गोवा

कोकण मराठी परिषद- गोवा आयोजित सातवे शेकोटी साहित्यसंमेलन
श्री शांतादुर्गा देवस्थान परिसर, धारगळ, पेडणे-गोवा  ७ आणि ८ जानेवारी २०१२

अध्यक्षीय भाषण-

नमस्कार,

कोकण मराठी परिषद- गोवा या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. रमाकांतजी खलप,  कार्याध्यक्ष- श्री सागर जावडेकर,  कार्यवाह- श्री सुदेश आर्लेकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत सर आणि सातव्या शेकोटी संमेलनासाठी जमलेले आपण सर्व साहित्यिक आणि रसिक,

नावापासूनच वेगळं स्वरूप असलेल्या या साहित्यसंमेलनासाठी मला अध्यक्ष या नात्यानं आपण सहभागी करून घेतलंत याविषयीचा आनंद सुरुवातीला व्यक्त करते. या कार्यक्रमानं माझी या वर्षाची सुरुवात चांगली करून दिलीय. एक चांगला साहित्यिक अनुभव मला या दोन दिवसात मिळेल असा मला विश्वास वाटतो. या निमित्तानं तुम्हा सर्वांना नव्या वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देते. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. दिवसेंदिवस वाढत्या वेगानं बदलत चाललेल्या आजच्या जीवनात प्रत्येक दिवस नवं आव्हान घेऊन उगवतो आहे. हे नवं वर्ष सर्वाना नव्या आव्हानांबरोबर नव्या संधी देणारं ठरो...

नव्या वर्षाचा संकल्प

या साहित्यसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्व साहित्यप्रेमी एकत्र जमलो आहोत. नव्या वर्षात आपण एक साहित्यिक जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करूया... आपल्या भोवती असंख्य सामाजिक समस्या आहेत. त्या एकेमेकीत गुंतून अधिकाधिक कठीण होत चालल्या आहेत. सध्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सक्रीय आहे. व्यापक स्तरावर मोठ्या व्यक्ती या संदर्भात आपापली मतं मांडत आहेत. एका महत्त्वाच्या निर्णय-प्रक्रियेचे आपण साक्षी आहोत. हे सर्व जाणीवपूर्वक समजून घेत या बाबतीत आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो याचा विचार आपण करूया. जे करू शकतो ते कितीही छोटं असलं तरी,  मी एकट्यानं करून काय उपयोग असा विचार न करता ते करायला सुरुवात करूया. आपला समाज, देश.. सर्वांच्या हितासाठी दुसर्‍या कुणीतरी नाही तर आपण प्रत्येकानंच कृतीशील होणं गरजेचं आहे याचं भान आपल्याला असायला हवं. समाजातील विचार करू शकणारे आपण सर्व आज इथे एकत्र जमलो आहोत. शेकोटीची ऊब घेत वैचारिक उत्सव साजरा करताना नव्या वर्षासाठी आपण एक सजग आणि जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया. अखिल भारतीय स्तरावरील मोठ्या साहित्यसंमेलनात काही ठराव संमत केले जात असतात. आपल्या या छोट्या संमेलनात आपण आपली साहित्यिक जबाबदारी निभावण्याचा संकल्प करूया.

इथे येण्यापूर्वी..

या संमेलनाचं निमंत्रणपत्र आलं तेव्हा संमती कळवताना थोडं दडपण आलं होतं. पण नववर्षाच्या सुरुवातीलाच गोव्याला येण्याची आणि इथल्या साहित्यिकांशी संवाद साधण्याची, आपली मतं मांडण्याची संधी मिळते आहे याचा आनंदही होता. या संमेलनाच्या निमंत्रणाबरोबर श्री आर्लेकर यांनी पाठवलेल्यागोमंत वैखरी’ या अंकामधे या संमेलनाचं स्वरूप वाचल्यावर या उबदार वातावरणात यायलाच हवं असं वाटलं. मला इथे येण्याची, सर्व कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद देते.

 ‘गोमंत वैखरीया अंकातील माहितीवरून यापूर्वीच्या शेकोटी संमेलनांसाठी आतापर्यंत कवी इंद्रजित भालेराव, प्रा. फ. मु. शिन्दे,  दासू वैद्य,  विलास कुवळेकर,  विट्ठल वाघ,  ह.मो.मराठे असे नामवंत साहित्यिक येऊन गेल्याचं समजलं. त्यांनी या संमेलनाच्या व्यासपीठावर आपापले विचार मांडले असतील. अशा व्यासपीठावर या वर्षी मला आपले विचार मांडण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंद आहे तशी जबाबदारीही वाटते आहे. या वर्षी या संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठीतील महत्त्वाचे कवी श्री हेमंत जोगळेकर आलेले आहेत. या संमेलनाचे आयोजक आणि आपण सर्व रसिक यांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आम्ही पुर्‍या करण्याचा प्रयत्न नक्की करू.

साहित्यसंमेलनांच्या आवश्यकतेविषयी बर्‍याच वेळा बोललं जातं. तसं अंतर्मुख होऊन बोलायलाही हवं. कारण हा केवळ उत्सव नसतो. त्यामागे एक विशिष्ठ भूमिका असते,  काही उद्देश असतात.. ते साध्य होतायत ना याचं भान ठेवावंच लागतं. अशा संमेलनांमुळे साहित्य-निर्मितीला पोषक वातावरण निर्माण होतं. वैचारिक अभिसरणातून नवे विचार, नवे दृष्टिकोन कळतात. वेगवेगळ्या भागातले साहित्यिक एकत्र येऊन संवाद साधला जातो. साहित्यरसिकांना एका व्यासपीठावरून नव्या जुन्या साहित्याचा परिचय होतो. त्यांना त्यांच्या आवडत्या साहित्यिकांना प्रत्यक्ष ऐकता-भेटता येतं... या वेळी अध्यक्ष या भूमिकेतून मी या संमेलनाकडे पाहते आहे. अशा वातावरणातून मिळणार्‍या ऊर्जेचा लाभ मलाही होतो आहे... खरंतर मलाच अधिक होतो आहे. कारण एखाद्या व्यासपिठावरून आपण काही सांगत असतो तेव्हा ते आपल्यालाही सांगणं असतं. त्याच्याशी आपली अधिक बांधिलकी असते...

माधवी देसाई यांनी अंतर्मुख केलं

गोव्यातील ज्येष्ठ लेखिका आणि अनेकांचं प्रेरणास्थान असलेल्या श्रीमती माधवी देसाई यांचं गोमंत वैखरीमधलं, २०१० मधे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या प्रसंगी केलेलं भाषण वाचलं. त्यातला एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा आणि अंतर्मुख करणारा वाटला. त्यांनी भाषणात म्हटलंय.. ‘वेगवेगळ्या निमित्तानं आमच्या निमंत्रणावरून साहित्यिक इथे येतात. त्यांचे विचार आम्ही ऐकतो, समजून घेतो. तशी आमचीही रास्त अपेक्षा असते की त्यांनी गोवा, इथली संस्कृती, इथल्या सामान्य माणसांचं जगणं समजून घ्यावं. आपली नाळ फक्त आपल्या भाषणापुरती मर्यादित न राहता ती इथल्या जगण्याशी जोडली जावी...

मीही आतापर्यंत बर्‍याचदा इथे आले आहे. पण जाणीवपूर्वक गोवा समजून घ्यावा असा विचार कधी मनात आला नव्हता. प्रत्येक येण्यातून गोव्याचे नवे पैलू सहजी समजत गेले तेवढंच. माधवीताईंचं भाषण वाचल्यावर कार्यक्रमापुरता विचार करणं पुरेसं नाही हे लक्षात आलं. केवळ साहित्याविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी सैद्धांतिक पातळीवर बोलणं अधांतरी होईल. इथे येऊन बोलायचं तर इथल्या साहित्यिक पर्यावरणाची ओळख असायला हवी हे जाणवलं. विशेष म्हणजे गोमंत वैखरीया अंकातच इथल्या नामवंत लेखकांनी लिहिलेले, गोव्याचा साहित्यिक आणि सांस्कृतिक परिचय करून देणारे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळाले. यात गोवामुक्तीपूर्वकालातील आणि स्वातंत्र्योत्तर कालातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य या साहित्यप्रकारांविषयी लिहिलेले आहे. इथले साहित्य आणि संस्कृती किती आणि कशी श्रेष्ठ आहे यापेक्षा ती ज्या पार्श्वभूमीवर टिकून आहे,  वाढते आहे ते मला फार महत्त्वाचं वाटलं.

या शिवाय गोव्यातील प्रसिद्ध लेखक श्री विश्राम गुप्ते यांनी गोव्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमधे वाचलेला ‘Identity, Exile and Literature in Goa’  या विषयावरील पेपर त्यांनी मला ई-मेलने पाठवल्यामुळे वाचायला मिळाला. त्यात त्यांनी गोव्याच्या इतिहासाचे, आक्रमणकर्त्यांच्या कारकिर्दिचे आणि त्यावेळच्या जनतेच्या मानसिकतेचे चिकित्सक विवेचन केले आहे. आणि या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाषिकवादाचा पेच स्पष्ट करून कोंकणी, मराठी आणि इंग्रजी साहित्याची समीक्षा केली आहे. अशा आशयाचा श्री यशवंत कर्णिक यांचा आणखी एक लेख- गोवामुक्तीचं अर्धशतक : एक दृष्टिक्षेप’ ‘अंतर्नाददिवाळी अंकात वाचायला मिळाला.. गोवामुक्तीला पन्नास वर्षे पुरी झाली त्या निमित्तानं लिहिलेल्या या लेखात श्री कर्णिक यांनी गोव्याचा दोन हजार वर्षांहून आधिक काळाचा इतिहास आणि वर्तमान याचं चित्र उभं केलं आहे. ब्रिटिश सत्तेचा भारतातील इतर भागातला जुलुम आणि पोर्तुगीज सत्तेचा गोव्यातील जुलुम यातील फरक या लेखामुळे लक्षात आला. त्यापूर्वीच्या मोघल आक्रमणांचं स्वरूप,  नंतर आलेल्या पोर्तुगीजांच्या आक्रमणाचं आणि क्रूर कारकिर्दीचं स्वरूप, त्यामुळे झालेला सामान्य गोवेकरांचा अनन्वीत छळ आणि सर्वात भयंकर म्हणजे गोव्याची सांस्कृतिक ओळखच हळू हळू नष्ट होत जाणं... हा अस्वस्थ करणारा इतिहास श्री कर्णिक यांच्या लेखात वाचायला मिळाला... आतापर्यंत वेगवेगळ्या निमित्तानं गोव्याला येणं झालं. एक पर्यटन स्थळ या पलिकडली गोव्याची ओळख हळू हळू होत गेली. वर म्हटल्याप्रमाणे विविध पातळ्यांवरच्या साहित्यसंमेलनांच्या निमित्तानं इथल्या साहित्यिक वातावरणाची ओळख होत होती त्याबरोबरच इथल्या भाषिकवादाचं स्वरूपही थोडं थोडं समजत होतं... हा लेख वाचल्यावर आपली मूळ ओळख पुसलेल्या आणि आता नवी ओळख निर्माण होत असलेल्या गोव्याची खरी ओळख झाली असं वाटलं...

या सर्व वाचनानं मला गोव्याविषयीची जाण वाढवणारा दृष्टिकोन दिला. तरी इथे राहून, इथल्या लोकात मिसळून होणारी ओळख आणखी वेगळी असेल. बर्‍याच वर्षांपासून इथे काही दिवस राहायला यायचा विचार चालू आहे. केव्हा योग येतो पाहू...

माधवीताईंच्या भाषणातील आणखी एक मुद्दा विचार करायला लावणारा आहे. त्यांनी म्हटलंय ‘... आमच्या विचारवंतांना,  कवी-लेखकांना महाराष्ट्रात आजही व्यासपीठ का मिळू नये?’..  प्रश्न रास्त आहे. यावर गांभिर्यानं विचार व्हायला हवा. तुम्ही सर्व जाणताच की आयोजकांच्या भूमिकेनुसार कार्यक्रमांचं स्वरूप ठरत असतं. कुणाला बोलवावं असा प्रश्न माझ्यापर्यंत येतो तेव्हा मी इथल्या साहित्यिकांची नावं सुचवत असते. काही कामानिमित्त इथले साहित्यिक, कवी पुण्यात येतात तेव्हा वैयक्तिक पातळीवर आम्ही घरीच छोटेसे संमेलन घेतो. पुण्यातील साहित्यिकांशी त्यांचा परिचय करून देतो... बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. पण  जे आपल्याला जमते तेवढे आपण करावे असे मला वाटते. महाराष्ट्रातही असे कितीतरी लेखक, कवी आहेत की ज्यांना महाराष्ट्रातल्या मोठ्या संमेलनांत बोलावले जात नाही. एका चर्चेच्या वेळी मी असा विचार मांडला होता की तीन वर्षे ज्यांना निमंत्रित कवी म्हणून बोलावले गेले असेल त्यांनाच पुन्हा पुन्हा न बोलावता नव्या कवींना बोलवावे. असे केले तर जास्तीत जास्त कवींना रसिकांपर्यंत पोचण्याची संधी मिळेल... यावरचा आणखी एक उपाय पुण्यात योजला जातोय तो म्हणजे विभागीय संमेलनं भरवणं... मुळात, लिहिणार्‍या प्रत्येकाला दुसर्‍यांपर्यंत पोचायची संधी मिळावी याची जाणीव असेल तर उपाय शोधता येतात. या बाबतीत आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. माधवीताईंनी त्याचाही उल्लेख आपल्या भाषणात केला आहे. त्यांनी म्हटलंय- नव्या पिढीच्या लेखकांनी आपल्या भोवताली डोळसपणे पाहावे. मनात पक्के रुजू द्यावे. नंतर लिहावे. काल पाहिले. आज लिहिले. उद्या प्रकाशित झाले. ही घाई कशासाठी?’  कवी-लेखक म्हणून आधी रुजायला हवं... बाकी गोष्टी अनुषंगिक आहेत. त्यावर न विसंबता आपली साहित्य-साधना चालू ठेवावी.

साहित्य-साधनेविषयी थोडसं-

लेखन आणि वाचन ही साहित्यसाधनेची महत्त्वाची अंगं आहेत. जीवनातील अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं स्पष्ट करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ‘कवितान्तरण’ या अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी- ‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

लेखन कोणत्याही प्रकारचं असो त्यातून आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. खरंतर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही तेच व्यक्त होत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’ 

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि साहित्यसाधना या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी लेखन-वाचन प्रक्रिया  समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी मीपासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना,  विचार करून पाहा,  आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... आपण जे लिहितो ते आशय-रूपात आधी मनात उमटतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, स्वरूप उमगणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. पण त्याचवेळी ते त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. हे सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही... कुसुमावती देशपांडे यांनी पासंगया आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’...  लेखन-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

अशाप्रकारे लेखन हे स्व-आकलनाचं, स्व-शोधाचं साधन बनून आपला विकास घडवत असतं. गांभिर्यानं केलेलं वाचनही स्व-विकासाचं साधन बनू शकतं. कारण वाचन ही प्रक्रिया लेखन-प्रक्रियेशी जोडलेली असते. लेखन म्हणजे encoding तर वाचन म्हणजे decoding!  आणि असं म्हटलं गेलंय की every decoding is another encoding!  चांगल्या, प्रामाणिक लेखनातून किंवा वाचनातून आनंद मिळतो तो त्या प्रक्रियेत कणभर का होईना विकसित झाल्याचा आनंद असतो. म्हणून लेखन-वाचनाकडे केवळ छंद,  हौस यापेक्षा अधिक गांभिर्यानं पाहायला हवं. साहित्यसंमेलनं याचं भान देण्यासाठी असतात. असावीत.

भाषेचं स्वरूप

लेखन-वाचन या दोन महत्त्वाच्या कृतींचं माध्यम भाषा असते. श्वासाइतकी जवळ आणि तितकीच जीवनावश्यक! तिचंही स्वरूप समजून घेणं अनेक दृष्टिंनी महत्त्वाचं ठरेल...

भाषा ही एक चिन्ह-व्यवस्था आहे... बोलीभाषेचं द्रव्य ध्वनी तर लिखित भाषेचं द्रव्य आकार हे असतं. आपल्याला माहिती आहे की ध्वनी घर्षणातून निर्माण होतो. ओठ आणि जीभ यांच्या हालचालींमुळे श्वासाबरोबर आत-बाहेर होणारी हवा घासली जाते आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. या ध्वनी-रचनेतून शब्द तयार होतो. विशिष्ट ध्वनी-रचनेचा अमुक एक अर्थ असं काही संकेतांनी ठरत गेलं. पण हा अर्थ एका समूहापुरता मर्यादित राहिला. दुसर्‍या समूहाने तशाच ध्वनी-रचनेचा वेगळा अर्थ ठरवला. त्यामुळे प्रत्येक समूहाची भाषा वेगळी झाली. म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं नातं केवळ सांकेतिक आहे. काळ आणि भौगोलिक सीमांनुसार बदलणारं... शब्दांना स्वतःचा स्वयंभू अर्थ नसतो. ते रिकामे असतात. ध्वनी-रचना हे केवळ एक चिन्ह आहे. म्हणूनच बहुधा मर्ढेकरांनी म्हटलं आहे- शब्द बापुडे केवळ वारा..’  आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे जे पाच विषय आहेत त्यातला एक विषय शब्द म्हणजे ध्वनी हा आहे आणि त्याची सांगड आकाशतत्त्वाशी म्हणजे एकप्रकारे निराकाराशी घातलेली आहे. भाषेचं हे मूळ सूक्ष्म स्वरूप समजून घेतलं तर कुठल्याही भाषावादातील पोकळपणा लक्षात येऊ शकेल...

लिखित भाषेत प्रत्येक ध्वनीरचनेला एकेक आकार ठरवला गेला. अमुक आकार म्हणजे अमुक ध्वनी हेही संकेतांनी ठरलं. त्यामुळे प्रत्येक समूहाची लिपीही वेगळी झाली. ध्वनी-रचना या एका स्तरावरील चिन्हांसाठी ठरलेले आकार ही लिखित भाषेतली चिन्ह-व्यवस्था. लिपी. लेखन म्हणजे encoding आणि वाचन म्हणजे decoding  असं वर म्हटलंय त्याचा अर्थ भाषेचं हे मूळ स्वरूप समजून घेतल्यावर अधिक चांगला कळू शकेल...

भाषेच्या स्वरूपाविषयीचं आकलन लेखन-वाचनासाठी आवश्यक आहे. शब्दांच्या अर्थांचे तीन स्तर आहेत- १) अभिधा- म्हणजे ठरलेला, कोशातला अर्थ, वाच्यार्थ. २) लक्षणा- म्हणजे वाच्यार्थ पुसला जाऊन संदर्भावरून ठरणारा अर्थ आणि ३) व्यंजना- म्हणजे सूचित होणारा, किंवा सूचित केलेला अर्थ. कवितेतली शब्दयोजना बर्‍याचदा या स्तरावरील अर्थाने होते. तिथे शब्दाचा वाच्यार्थ लक्षात घेतला तर तो हास्यास्पद ठरतो. वाचताना लिखित संहितेचा खोल सूक्ष्म अर्थ समजण्यासाठी आणि लिहिताना नेमकी, संपृक्त शब्दयोजना करता यावी यासाठी शब्दांच्या या त्रिविध सामर्थ्याची जाण असावी लागते.

इतर साहित्य-प्रकारांच्या मानानं कवितेसाठी शब्दयोजना करताना भाषेच्या स्वरूपाचं भान असणं विशेष गरजेचं आहे. चांगली, उत्स्फूर्त कविता स्वतःचे शब्द घेऊनच व्यक्त होते. हे खरं असलं तरी व्यक्तीच्या कमावलेल्या पूर्वसंचितातूनच ते उगवत असतात. हे संचित आपण करत असलेल्या साधनेमुळे समृद्ध होत असतं. अभ्यास, साधना, किंवा जन्मजात प्रतिभेचं देणं नसेल तर उत्स्फूर्ततेच्या नावाखाली सहज हाताशी असलेले शब्द आपण वापरून टाकतो. कविता लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना वापरलेल्या शब्दांवर त्रयस्थपणे विचार केला तर ते तितकेसे समर्पक नाहीत असं लक्षात येऊ शकेल. शब्दयोजना कशी असावी?... या संदर्भातली माझी एक कविता आहे.- ‘किती सहज वापरतो आपण शब्द / आपल्या भाषेतले / झोपेतही प्रतिक्षिप्तपणे घेतला जावा श्वास / तितक्या सहज ! तहानेनं व्याकुळ होऊन / बुडी मारत नाही / जगण्याच्या तळ्यात / शब्द वेचण्यासाठी / जिवाच्या आकांतानं उत्खनन करत नाही / अस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं / शब्द शोधण्यासाठी / किंवा तपश्चर्या करून / जिंकून घेत नाही हवे ते शब्द / आकाशतत्त्वाकडून / तयार भाषेतून शब्द अलगद पडतात ओंजळीत / गळणार्‍या पानांसारखे / वाळलेले.. निस्तेज.. / किती सहज वापरतो आपण / असे आयते, स्वतः न कमावलेले / पिढ्यान्‍पिढ्यांचे उष्टे शब्द / आपले म्हणून..!!

कवितेसाठी आयते, स्वतः न कमावलेले शब्द न स्वीकारता इतक्या परोपरीनं, स्वतःचाच आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा शब्द शोधणं ही स्वतःच्या अनावरणाचीच प्रक्रिया असते. कारण असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःला नेमकं काय अभिप्रेत आहे ते शोधणं असतं..!
भाषेचं स्वरूप समजून घेतल्यावर कोणत्याही भाषिकवादात मूलतः काही अर्थ नाही हे समजण्यासारखं आहे. या वादातील सामाजिक, राजकीय कारणं, वेगवेगळ्या भूमिका, त्यांचं महत्त्व.. हे सर्व समजून घ्यावं. भोवतीच्या साहित्यिक पर्यावरणाचं भान असू द्यावं पण आपल्या लेखन-साधनेत त्याचा व्यत्यय येऊ देऊ नये. उलट दोन भाषांचा जवळून, आतून परिचय असण्याच्या श्रीमंतीचा अभिमान बाळगावा. आपल्या लेखनानं दोन्ही भाषांमधे देवाण-घेवाण घडवून दोन्ही भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक भाषा ही एका संपन्न संस्कृतीची वाहक असते. तिच्या पूर्ण संचितासह तिचा परिचय असणं हे लेखक म्हणून मोठं भाग्य आहे.

अनुवादाचं महत्त्व

साहित्यात, लेखन-प्रक्रियेत आणि भाषिक व्यवहारात अनुवादाला फार महत्त्वाचं स्थान आहे. अनुवादांमुळे दोन भाषांमधे संबंध प्रस्थापित होतो. एका भाषेतील अभिजात साहित्य दुसर्‍या भाषेतील वाचकांपर्यंत पोचतं. अनुवादप्रक्रियेत साहित्यकृतींबरोबर शब्द, वाक्‍प्रचार, म्हणी, लेखनशैली.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या भाषेच्या संस्कृतीची ओळख.. अशा गोष्टीही आपल्या भाषेत संक्रमित होत असतात. भाषासमृद्धीच्या दृष्टीनं तर हे महत्त्वाचं आहेच पण अनुवाद करण्यातून अनुवादक स्वतःसुद्धा समृद्ध होत असतो. कारण ही प्रक्रिया संगिताच्या रियाजासारखी असते. अनुवाद करताना आपण साहित्यकृतीच्या, भाषिक संरचनेच्या गाभ्यापर्यंत जायचा प्रयत्न करत असतो. कारण अनुवाद करताना संहितेचं केवळ अमूर्त आकलन पुरसं नसतं. ते आकलन पुन्हा भाषेत व्यक्त करायचं असतं. नुसतं वाचताना साहित्यकृतीच्या इतक्या आत आपण जाऊ शकत नाही. कितीही वेळा ती वाचली तरीही. अनुवादासंदर्भात मला आवडलेलं एक विधान असं आहे- ‘ Translation is an intense way of reading!...  गोवा, बेळगाव सारख्या ठिकाणी अनेक वर्षे राहणार्‍यांना दोन मातृभाषा लाभतात. भोवतीच्या विचारांनी प्रभावित होऊन दुसर्‍या भाषेचा व्देष करण्यापेक्षा तिचा आदर करून, लेखन-वाचनासाठी लाभ करून घेणं हिताचं आहे असं मला वाटतं.

समारोप करण्यापूर्वी...

समारोप करण्यापूर्वी साहित्याच्या व्यासंगाबद्दल थोडं बोलणं उचित होईल. लेखन-वाचन या प्रक्रियेबद्दल, आपल्या व्यक्तित्वघडणीबद्दल मी बोलले. हे करत असताना सजग मनात प्रश्न निर्माण होतात. व्हायला हवेत. हे प्रश्न तुम्हाला उत्तराच्या दिशेनं चालत जाणं भाग पाडतात. उदा. एखाद्या परिसंवादात तुम्ही मराठी कवितेची किंवा कथेची परखड समीक्षा काळजीपूर्वक ऐकलीत. तर त्या भाषणातील विचार तुम्हाला अंतर्मुख करतील. तुम्ही अस्वस्थ व्हाल. वक्त्यानं म्हटल्याप्रमाणे कविता / कथा अमुक अशी नसावी तर मग ती कशी असावी? चांगल्या कवितेचे / कथेचे निकष कोणते? कुणाची कविता / कथा अधिक चांगली? का?... अधिक खोलात जाऊन विचार केलात तर समीक्षा म्हणजे काय? असे प्रश्न तुम्हाला पडू लागतील. मग तुम्ही आपापसात चर्चा कराल किंवा वक्त्याशी संवाद साधाल. त्यातून तुम्हाला काय वाचायला हवं त्याचं मार्गदर्शन मिळेल. मनातल्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यातून मार्ग सापडत जातो. अशा प्रश्नांच्या तगाद्यातून मला स्वतःला मराठी विषयात एम.ए. करण्याची प्रेरणा मिळाली. त्या दोन वर्षात अभ्यासाच्या निमित्तानं बरंच वाचन झालं. आवड म्हणून नुसतं वाचण्याला अभ्यासाची जोड मिळाली. त्याचा उपयोग पुढे प्रत्येक स्तरावर झाला...

कवितेच्या व्यासंगासाठी तुम्ही अमुक अमुक संग्रह वाचा असं मी सांगणार नाही. खुलेपणानं तुम्ही सर्व प्रकारची, वेगवेगळ्या भाषांमधली कविता वाचा. समजून घ्या. समजून घेताना प्रश्न पडूदेत. अस्वस्थ व्हा. भोवतीच्या वास्तवानंही तुमची झोप उडूदे. तुमची संवेदनशीलता जिवंत राहूदे... व्याकुळ झाल्यावर तुम्हाला आतून काहीतरी म्हणावसं वाटेल जे अस्सल असेल, जे तुमचं स्वतःचं असेल. तेव्हाच लिहा. कोणताही विषय, घटना, किंवा एखादं पुस्तक... प्रत्येक गोष्ट मुळातून समजून घेण्याची जिज्ञासा आणि अस्वस्थता यातून व्यासंगाला दिशा मिळत जाते... उद्या दुपारपर्यंत आपण एकत्र असणार आहोत. संवाद साधायला वेळ मिळू शकेल. तेव्हा समोरासमोर आणखी काही सांगता येईल. आता इथे थांबते.

माझे काही विचार सातव्या शेकोटी साहित्यसंमेलनाची अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या समोर ठेवले आहेत. मला वाटतं साहित्यक्षेत्रात नव्यानं लिहू लागलेल्यांना यातून काही मार्गदर्शन मिळू शकेल... इथे आल्यापासून सर्वांचं आगत्य मी अनुभवते आहे. आयोजकांनी शेकोटीच्या उबेमधे सर्वाना सृजनाची नवी ऊर्जा मिळेल असं वातावरण निर्माण केलं आहे. या वातावरणात इथल्या मान्यवर साहित्यिकांचा सहवास घडतो आहे. इथे येऊन काही विचार मांडण्याची संधी आयोजकांनी मला दिली, आपण ते ऐकून घेतलेत याबद्दलचं समाधान व्यक्त करते आणि आपणा सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद देऊन थांबते.

आसावरी काकडे
                                   
  
 9421678480   

No comments:

Post a Comment