Wednesday 15 November 2017

उन्हाचे घुमट खांद्यावर


     अनुजा जोशी यांचा ‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘उत्सव’ या संग्रहानंतरचा हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह. ‘लोकवाङमय गृहा’सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनानं हा कवितासंग्रह प्रकाशित केलेला असून राजन गवस यांनी मलपृष्ठावर संग्रहातील मर्मस्थानांचा थोडक्यात निर्देश केलेला आहे. मुखपृष्ठ आणि संग्रहाची निर्मिती आतल्या कवितांना साजेशी आहे. या कविता वाचताना प्रकर्शानं जाणवतं की अनुजाचं हे दुसरं पाऊल बरंच पुढं पडलंय.

अनुजा कविता लिहायला लागली तीच मुळी स्वतःच्या शैलीत. सजग राहून, जाणकारांचं मार्गदर्शन घेत ती घडत राहिली. कशी, किती ते तिच्या ‘खांद्यावरचे उन्हाचे घुमट’ सांगतात. प्रचंड आवेग ओसंडत असतो तिच्या कवितांमधून. तरी आत-बाहेरच्या संघर्षांचे अनुभव शब्दांकित करताना तिची कविता वैयक्तिकतेच्या परिघात अडकत नाही. त्या अनुभवांमधलं मर्म शोषून संपृक्त झालेल्या प्रतिमा तिच्या कवितांमधे सहज वावरतात. ती अवलोकन करते भोवतालाचं, पिऊन घेते निसर्गसान्निध्य आणि त्यात समरसून आतले उमाळे पेरत जाते प्रतिमांमधे... खास अनुजा-स्पर्श असलेल्या या प्रतिमा हे या संग्रहातल्या कवितांचं बलस्थान आहे.

या संग्रहातल्या कवितांमधे येणारी ‘चित्र काढणारा मुलगा’, ‘एकमेकांवर कुरघोडी करणारी मुलं’, ‘स्पेशल’ मुलगा, ‘शाळेत जाणार्‍या मुली’, ‘पेशंट बाया..., ‘आयो’ ही केवळ शब्दचित्र नाहीत ती उत्कट भावचित्रही आहेत. गोव्यातली देशीयता हा या संग्रहातील कवितांचा अलंकारच झालाय... उदा. ‘चळवळ’ या कवितेतल्या या ओळी-  ‘आता रुजेल टायकिळा जळीमळी / रुजेल तेरडा निर्भय /... आणि रानभर सुरू होईल आता / एक हिरवीक्रांत चळवळ...! परराज्यात राहून तिथल्या निसर्गाशी, लोकसंस्कृतीशी इतकं तादात्म्य पावून स्वतःला, आपल्या कवितेला आणि पर्यायानं मराठी भाषेला समृद्ध करणं हे कौतुकास्पद आहे.

या अर्थपूर्ण निसर्गप्रतिमा आणि आत्मकेंद्रीपणाचं बोट सोडलेले अनुभव यामुळं वाचकाला खिळवून ठेवणार्‍या कवितांमधल्या काही ओळी- ‘पिऊन घे हा आयुष्याचा नीरस..’ (६३), ‘अख्खा कोलाहल चौकोनी सावलीच्या बाहेर ठेवून..’ (६१), ‘अर्धी खिडकी उघडी म्हणजे उजेड अर्धा’ (६६), ‘हा तुडुंब अंधार अर्थपूर्ण’ (९२), ‘इतके पेलले आहेत उन्हाचे घुमट खांद्यावर.. तसं आणखी थोडं..’ (९८).. अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील...

खोलवर हलवून टाकणारी ‘तिळा तिळा दार उघड म्हणून ठोठावतंय कुणीतरी’ (४०) ही कविता पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहे. दार ठोठावणारं कोण असेल? एक तीळ वाटून घेणारे ते सात, ते पाच की शंभर, की परवलीचा शब्द माहीत असलेला अलिबाबा.. की ते चाळीस?... असा विचार करणारी कवितेतली मी म्हणतेय, ‘तूर्तास मी लावली आहे गच्च / भव्य दिसणारी कर्तव्यकठोर शिळा / अवघ्या भयाच्या तोंडावर...’

अशा अनेक अस्सल कविता असलेला हा कवितासंग्रह एकदा वाचून ठेवून देता येत नाही.. तो वाचताना कवयित्री समोर असल्यासारखी वाटते. पण ती मधे बोलून व्यत्यय आणत नाही. निवांत ऐकू देते शब्दांमधली गाणी-गार्‍हाणी..!

या दर्जेदार कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद करून पूर्ण झाला आहे. बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्य असलेल्या वर्षा हळबे यांनी तो केलेला आहे. लवकरच तो प्रकाशित व्हावा आणि या निमित्तानं आजची मराठी कविता मराठीचा परीघ ओलांडून अनेक वाचकांपर्यंत पोचावी ही सदीच्छा.

आसावरी काकडे
१४.११.२०१७

‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ कवितासंग्रह
अनुजा जोशी
लोकवाङ्मय गृह प्रकाशन
पृष्ठे १०४, किंमत- १६० रु.
सकाळ, सप्तरंग पुरवणी- २६ ११ २०१७

तू देतेस अर्थ म्हणून मी शब्द नवे शोधतो...

नितीन कदम यांचा ‘तू माझी सावली’ हा छान सजवलेला कवितासंग्रह प्रकाशनापूर्वी आभिप्रायार्थ माझ्या समोर आला आहे. मुखपृष्ठावर पाठमोर्‍या मुलाचा फोटो आहे. आणि त्याची सावली एका मुलीची असावी अशी आहे. आतही प्रत्येक पानावर असंच चित्र आहे. ही कलात्मक मांडणी संग्रहाचं शीर्षक आणि कविता यांना साजेशी आहे.

या काविता वाचताना जाणवत राहिलं की कवीमन प्रेमभावनेत आकंठ बुडालेलं आहे..! प्रेम करणारं मन सदैव वर्तमानात जगत असतं. त्याला भूतकाळ स्मरत नाही की भविष्यकाळ भेडसावत नाही. आपल्या मनोवस्थांविषयी भरभरून लिहिताना ते कवितेच्याही प्रेमात पडतं. नितीन कदम यांची या कविता लिहिताना अशीच अवस्था झाली असावी. ते म्हणतात, ‘तू देतेस अर्थ म्हणून मी शब्द नवे शोधतो...!’

     या संग्रहात प्रेम हा एकच विषय आहे आणि एका आवेगात लिहिलेली एकच कविता वाटावी अशा ‘चारोळी’ एकामागोमाग एक आलेल्या आहेत. उत्कट भाव व्यक्त करणार्‍या त्यातल्या काही ओळी अशा- ‘समोरच्या प्रत्येक चेहर्‍यात / मी तुलाच आता पाहतो’, ‘तुझ्याविना हे जीवन / नुसतंच माणसांचं रान’, ‘कस्तुरीचा गंध जसा / तशी तू माझ्या सोबती’, ‘तूही त्या क्षितिजासारखीच / सत्यही आणि भासही’, ‘तुझं जीवनात येणं / जसा पाऊस उन्हातला’.... प्रेमात बुडालेल्या या कविमनाला ऋतू कळेनासे झालेत. त्याला न किनारा गाठता येतोय न तळ..! हे प्रेम निभावणं म्हणजे ‘स्वतःलाच पुन्हा शोधण्याचा / अवघड अशक्य प्रयास आहे’ असं या मनाला वाटतं आहे. या सर्व भावना एका ‘तू’भोवती घोटाळणार्‍या आहेत.

माझ्या समोर असलेल्या या कवितांमधे व्यक्त होण्याचा प्रामाणिक आवेग आहे. त्यातल्या काही ओळींमधे काव्यगूणही आहेत. पण कविता म्हणून त्यांच्यावर आणखी थोडे संस्कार होणं गरजेचं आहे. कविता ही व्यक्त होण्याचं जिवलग आणि सशक्त माध्यम आहे. पण त्यासाठी व्यासंग आणि प्रामाणिक रियाज व्हावा. एक अधिक उन्नत माणूस होण्यासाठीही ही काव्य-साधना मार्गदर्शक ठरेल. या संग्रहाच्या निमित्तानं नितीन कदम यांना मी कविता-लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा देते.

आसावरी काकडे
१२.११.२०१७ 





Friday 3 November 2017

रक्तचंदन : दंश करणारी प्रतिमा

आश्लेषा महाजन यांचा ‘रक्तचंदन’ हा नवा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. आश्लेषा पुण्यातली प्रस्थापित कवयित्री. तिची साहित्यिक वाटचाल अगदी नेटकेपणानं चालू आहे. तिचा अभ्यास, व्यासंग आणि शब्दप्रभुत्व तिच्या लेखनातून, ती करत असलेल्या कार्यक्रमांतून जाणवतं. सतत लिहितं राहिल्यामुळं तिच्या अभिव्यक्तित सफाई आणि विचारात स्पष्टता आलेली आहे.

‘रक्तचंदन’ हा आश्लेषाचा ताजा कवितासंग्रह हातात पडताच वाचायला घेतला. हा संग्रह ‘पुनर्नवा होणार्‍या स्त्री चैतन्यास’ अर्पण करण्यातली आश्लेषाची संवेदनशीलता लक्ष वेधून घेणारी वाटली. बाईला पुरुषांपासून वेगळं करणारं, तिला पुनर्नवा करणारं हे स्त्री-चैतन्य ज्यामुळे बाईला प्राप्त होतं ते निखळ शारीर वास्तव या कवितासंग्रहातील ‘रक्तचंदन’(पृ.४०), ‘तीन प्रवाह’(पृ.४२) या कवितांमधून स्पष्ट, तरी घरंदाज भाषेत चित्रित झालेलं आहे. मासिक पाळी हा सहसा उच्चारला न जाणारा पण बाईच्या पूर्ण जगण्याला व्यापून राहिलेला विषय या कवितांमध्ये आश्लेषानं सूक्ष्म बारकाव्यांसह मांडलेला आहे. त्यात मासिक पाळीच्या अनुषंगानं बाईच्या आयुष्यात होणारे मानसिक, शारीरिक बदल आणि त्यामुळे भोवती उमटणार्‍या सामाजिक प्रतिक्रिया हे सारं उत्कटतेनं आलेलं आहे.

या संग्रहातील बर्‍याच कविता वेगवेगळ्या पातळीवरून बाईपणाचा वेध घेणार्‍या आहेत. ‘सुपरवुमन..’ ही कविता, बाईला सरस ठरायचंय ते नेमकं कुणापेक्षा? असा प्रश्न विचारत स्वतःत खोल उतरून आत्मपरिक्षण करते. ‘किती लवकर’ या कवितेत अल्लड बालिका ते आई/बाई अशा बाईपणाच्या प्रवासाचं वर्णन केलंय आणि शेवटी म्हटलंय, ‘किती थोड्या त्यातल्या माणूस होतात बाया... पुसू पाहतात सटवाईच्या रेषा.’ वेगवेगळ्या संदर्भातला असा ‘प्रवास’ चित्रित करणं हे आश्लेषाच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. ‘प्रश्नांच्या तळ्यात मळ्यात’ या कवितेत तर ती ‘तहान होऊन’ उत्खनन करत बाईपणाच्या भूत-भविष्याचा पटच उलगडू पाहाते... पूर्वजा नि वंशजांना एका मंचावर उभं करते. ही कविता काहिशी गद्य वाटली तरी पूर्ण वाचल्यावर शेवटी ‘वा..!’ अशी दाद दिल्याशिवाय राहावत नाही.

बाईपणाच्या या कविता बारकाईनं वाचल्यावर ‘रक्तचंदन’ ही शीर्षक-प्रतिमा उमगत जाते... मनाला खोलवर दंश करते..! त्यानंतर पुस्तक मिटून संग्रहाच्या मुखपृष्ठावरची रक्तचंदनाची रेखिव बाहुली नीट पाहिली की या प्रतिमेचे अनेक पदर मनात उलगडत जातात.. शारीर-वेदनेवर उगाळून लावल्यावर मनाचं शांतवन करणार्‍या लाकडाला बाईच्या आकाराची बाहुली बनवून औषध म्हणून विक्रीसाठी ठेवलं जातं...! स्वतः झिजून शारीर वेदनेवर लेप बनून राहायचं आणि वेदना शमवून नाहीसं व्हायचं... रक्तचंदनाच्या या गुणधर्माला बाईच्या रूपात प्रथम पेश करणार्‍याला बाईचे हे गुणधर्म जाणवले असतील की फक्त आकर्षक रूप? माहीत नाही. पण यातून- बाईला बाहुली करता येणं, तिच्या आकर्षकतेचा वापर होणं, विक्रीला ठेवता येणं, गरजेपुरतं वापरून बाजूला ठेवून देणं, तिच्यात ‘हे गुणधर्म’ असतातच हे गृहीत धरणं....अशा समाजमनात रुजलेल्या बर्‍याच गृहीत गोष्टी व्यक्त होतात..! कवितासंग्रहाचं ‘रक्तचंदन’ हे शीर्षक आणि मुखपृष्ठावर, आत जागोजागी दिसणारी रक्तचंदनाची बाहुली यातून इतकं सगळं सूचित होतं.. पण त्यासाठी आतील कविता मनात मुरवून घेत वाचायला हव्यात..!

असं असलं तरी या संग्रहातील कविता फक्त बाईपणाभोवती फिरत नाहीत. यातल्या बाईचं मन माणूसपणानं समाजाकडं पाहातं आहे. उदाहरण म्हणून ‘शनैः शनैः’(पृ.७९), ‘संस्कृतीच्या गोपुरामध्ये’(पृ.१००), ‘हौसाबाई आणि बदल’(पृ.१०२), अशा काही कवितांचा उल्लेख करता येईल. ‘शनैः शनैः’ या कवितेत म्हटलं आहे, ‘गर्भातून जिच्या जन्म घेई काळ । त्याचाच विटाळ वाटे कैसा..?/ आंधळ्या दिशेने चालला प्रवास । भोवंडतो आस कक्षेचा हा../ मूढतेचे खूळ विज्ञानाला तडे । आवळते कडे शनैः शनैः..’

भोवतीच्या वास्तवाकडं सजगतेनं पाहणारं हे बाईमन स्व-रूपावरही लक्ष ठेवून आहे. या अंतर्मुख मनाला प्रश्न पडतात, ‘कोण मी? आले कुठे? हे प्रश्न मज लावी पिसे / मूळ उगमाच्या दिशेने धावते मन हे असे..’ (‘ईश्वरा, ह्या जीवनाचे...’ पृष्ठ ११३). रोजच्या जगण्याच्या धावपळीतही या संवेदनशील मनाला वाटतं, ‘बाई जगणे जगणे / जणू धावणे धावणे / भुईवर पाय आणि / आभाळाला ओलांडणे.... / एक दिन असा यावा / ‘इथे’,‘तिथे’ व्हावे लुप्त / पूल निखळावा, व्हावे / सारे एकसंध, तृप्त...!’ (‘बाई जगणे...’ पृष्ठ १९).

अंतर्मुख विचार देणार्‍या अशा कवितांमध्ये ‘मी पुन्हःपुन्हा जन्म देते- भयाला!’ अशी सुरुवात असलेली ‘जीवंतिका’ (पृष्ठ ७३) ही पूर्ण कविता पुन्हा पुन्हा वाचून मनन करावी अशी आहे. याशिवाय ‘हे घर मला पुरत नाही’(पृ.९४), ‘अल्झायमर’ (पृ.५७), ‘फट’ (पृ.१६), ‘जन्म झाला आहे जुना’ (पृ.११४), या कावितांमधूनही हे आत्मनिरीक्षण व्यक्त झालं आहे. काही ठिकाणी हे आत्मचिंतन तत्त्वज्ञानाच्या पातळीवर गेलेलं आहे.

कवितेचं माध्यम असलेली भाषा, शब्द हेही कविता-विषय झाल्याचं काही कवितांमधून जाणवतं. उदा. ‘सोपं नाही’ (पृ.१४) या कवितेत शेवटी म्हटलं आहे, ‘खरंच! अवघडच आहे / स्वतःला अनावृत.. पारदर्शी.. आरपार पाहणं / स्वतःला भेदत, छेदत, वेधत राहणं / स्वतःला स्वतःपासून वेगळं करत तपासत राहणं.. वगैरे / खरंच! अवघडच आहे / असं दुभंगलेलं व्यक्तिमत्व पांघरून / देहातलं विदेहीपण बेमालूम झाकून / पुन्हा ते प्रतिभेतून.. कवितेतून.. शब्दांतून मांडणं... वगैरे’

‘जगाला कळतच नाही’ (पृ.४९) या कवितेत व्यवहारी जगात जगताना आतल्या हाकांकडे दुर्लक्ष करावं लागण्यातली संवेदनशील कविमनाची जीवघेणी तगमग फार आर्ततेनं व्यक्त झालीय. कवितेत शेवटी म्हटलंय, ‘इकडे, क्षणाक्षणाला नवनवे बीज / उमलतच राहते मनाच्या खोल गर्भात.../ आणि जगताना कळत सुद्धा नाहीत- मी स्वेच्छेने, सोय म्हणून, अथवा / परिस्थितीशरण होत केलेल्या / माझ्याच संवेदनांच्या गुप्त भ्रूणहत्या.. / खरंच जगाला कळतच नाही..! कवितेविषयक कवितांमधली ‘केयॉस’ (पृ.८८) ही कविता वेगळा विचार देणारी आहे. सगळं ठीक चाललेलं असताना कविमनाला ‘सौंदर्याऐवजी विस्कटलेला विरूप केयॉस भोगायला हवा..’ असं वाटतं आहे.

कवितेतील छंदांवर आश्लेषाची चांगली पकड आहे. शब्दांना फक्त अर्थ नाही एक नादही असतो. छंदांमुळे कवितेतील शब्दांचा नाद सक्रीय होतो. त्यामुळे कवितेचा आशय सुंदरही होतो. स्वैर मुक्तछंदाच्या आजच्या काळात छंदोबद्धता काहिशी दुर्मिळ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘रक्तचंदन’ या संग्रहातील आशयसंपन्न छंदोबद्ध रचना लक्षवेधक ठरतात. ‘मन-मुक्तके’, ‘पावा’, ‘विरूपा’, ‘काजवे’, ‘अगा लाडके, वेदने तू निराळी’ या मला विशेष आवडलेल्या कविता...

‘रक्तचंदन’ ही अर्थवाही प्रतिमा हेच शीर्षक असलेला, बाईपणाचा परोपरीनं वेध घेत असूनही रूढ अर्थानं स्त्रीवादी नसलेला हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे..!
आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com

३१.१०.२०१७