Friday 5 May 2017

एकांतवेल

      कविता येते कुठून? लिहिता लिहिता नेमके शब्द कसे येतात अचानक समोर? आशय आधीच स्पष्ट असतो मनात की लिहिताना उलगडत जातो स्वतःलाही? लय कशी सापडते शब्दांना? कोणती वेळ असते कवितेची? एकांताची की अस्वस्थ गुंत्याची? कोणतं ठिकाण असतं प्रिय तिला?... कवितेच्या निर्मितीसंदर्भात असे अनेक प्रश्न रसिक वाचकालाच नाही तर खुद्द कविलाही पडत असतात...!    
‘एकांतवेल’ हा सुनीती लिमये यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. संग्रहाचं शीर्षक कवितानिर्मिती विषयक असे प्रश्न मनात निर्माण करणारं, कवितेच्या मुळारंभाशी नेणारं आहे. सुनीती बरेच दिवस कविता लिहिते आहे. ती कवितानिर्मितीच्या बाबतीत पुरेशी सजग आणि गंभीर आहे, कृतीशील आणि उत्साही आहे. पण पुस्तकरूपात सर्वांसमोर येण्याची तिला घाई नाही. कवितेत मुरलेलं असण्याच्या दृष्टीनं हे योग्यच आहे. पण कुठला तरी क्षण मुरलेला ठरवावा लागतो...
सुनीती जगण्याशी आणि स्वतःच्या भावनांशी अतिशय प्रामाणिक आहे. जे जसं वाटतं ते तसं व्यक्त करण्याइतकी धीटही आहे. उत्कटता हा तिच्या कवितेचा स्थायीभाव आहे. आयुष्यानं शिकवलेलं टिपता टिपता ते तिच्या कवितेच्याही वाट्यालाही येत गेलं.. ती सतत शिकण्याच्या भूमिकेत असते. जगणं आणि कविता दोन्हीच्या परिष्करणावर तिची श्रद्धा आहे. अधिक खरेपणानं अधिक चांगल्याकडे तिचा प्रवास चालू आहे. मला आवडलेल्या तिच्या एक दोन कविता-


“झाड पसरते आहे आत...
मी बाहेरून पहाते...
त्याचे माझ्या शरीरातून नि:शंकपणे वाढणे...
हद्दपार होते आहे मीच माझ्या देहातून...

एकाच वेळी हवेसे आणि नकोसे असणारे झाड...
करते आहे मला निर्मळ, शुद्ध.... पारदर्शक काच...

झाडाचे गारूड.. आता अंत:स्थित...
मला वेगळे करून...माझ्या आतून..”


******


“आर्त काही आता। येऊ नये ओठी
पीळ त्याच्यासाठी। पडू नये

नको नको वाटे। चक्रात चालणे
केव्हा, कसे होणे?। स्थलांतर?

देह झगमगे। केवळ बाहेर
आत दूरवर। काळोखच

मौनाचा दगड। बसला वरती
काहिली आत ती। शमेचना

कानात चौघडा। अस्वस्थाचा वाजे
आणि बेचैनीचे। पडघम

तिथे उजाडेना । इथे अंधारले
कुंपणावरले । देह आम्ही”
******
कविता लिहिणं म्हणजे स्वतःला शोधत स्वतःच्या आत शिरायचं आणि हाती आलेलं शब्दांना देऊन टाकून स्वतःपासून मोकळं व्हायचं..! एका अदृश्य स्तरावरच्या लपाछपीचाच हा खेळ..! या खेळात धावताना अंतर्बाह्य थकवणारी ही प्रक्रिया कवीला घडवणारी असते. माणूस म्हणून अधिक उन्नत करणारी असते. कवितेसोबतचा हा प्रवास सुनीतीला मनोवांछितापर्यंत घेऊन जावो हीच सदिच्छा.
आसावरी काकडे

३ मे २०१७ 

No comments:

Post a Comment