Friday 5 May 2017

अंतःस्वर

कविता स्वतःला शोधत स्वतःतून मोकळं होण्याचं एक जिवलग साधन असते. कवितेसाठी हवा तोच अंतःस्थ शब्द मिळवण्यासाठी सतत स्वतःचं अनावरण करत राहावं लागतं... ‘अंतःस्वर’ या नावानं कविता क्षीरसागर यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. हे शीर्षकच कवयित्रीची कवितेविषयीची ही खोल समज सूचित करणारं आहे.
कवितेच्या अशा जाणीवनिष्ठ निर्मिती-प्रक्रियेतील देवाण-घेवाण ऐलपैल समृद्ध करणारी असते. इथे ऐल असतो आपण आणि पैल उभी असते कविता..! मधला अथांग पैस एकसारखा धुमसत असतो. अनाकलनीय रूपात साद घालत असतो. पण गंमत अशी की ती केव्हा कशी ऐकू येईल सांगता येत नाही. कविता वाट पाहायला लावते. सतत असमाधान देते. तडफडत ठेवते. म्हणूनच ती अवतरण्याचा शकुनक्षण मनस्वी आनंद देणारा असतो. पण शब्दात उतरलेली कविता बर्‍याचदा मृगजळासारखी निराश करते. तिला अंतःस्वर सापडलेलाच नसतो. पैल उभ्या कवितेपर्यंत पोचवणारी दीर्घ आंतरिक यात्रा खडतर असते. तिला आदि असतो. पण अंत नाही...
याची पुरेशी जाण असलेली कविता क्षीरसागर गेली अनेक वर्षे कविता लिहिते आहे. मधली काही वर्षे तशीच सुनी गेली. ऐल सुटत नव्हता... जखडलेपण संपलं आणि मोकळ्या झालेल्या मनाला कवितेची साद ऐकू येऊ लागली. नव्या दमानं कवितेचा अंतःस्वर शोधत आता ती निघाली आहे. तिला घाई नाही प्रकाशात येण्याची.

‘फक्त एका ठिणगीची वाट पहात...’ धुमसतं आयुष्य जगताना ती आतून अनुभवतेय आयुष्याचा गुंता झालेला. जगण्याला लगडलेली सुख-दुःखं संयतपणे मांडतेय शब्दांतून. आधुनिक जीवनाच्या भाषेत व्हायरसने पोखरलेलं आयुष्य शब्दबद्ध करतेय...

मला आवडलेली तिची एक कविता-

“एखाद्या सुंदर, हव्याहव्याशा
स्वप्नातून अचानक जाग येते...

तेव्हा सामोऱ्या येणाऱ्या
वास्तवाचा हात हातात घ्यायला
आपण बिलकुल तयार नसतो

मग अंगावर येणारे हे सत्य नाकारुन
आपण ओढून घेतो पुन्हा
त्या हव्याहव्याशा स्वप्नांची
उबदार चादर...

या अशाच
स्वप्नं आणि वास्तवाच्या मध्यसीमेवर
अडकून पडलेय आयुष्य...

मी कवटाळू पहातेय स्वप्नांना
आणि वास्तव मला...!!”

‘अंतःस्वर’ या कवितासंग्रहात कविता क्षीरसागरने कवितेचे वेगवेगळे फॉर्मस् सफाईदारपणे हाताळले आहेत. कोणत्याही आकृतीबंधात कवितेचं कवितापण तिनं जपलेलं आहे हे जाणवतं. कवितेविषयीची ही निष्ठाच तिला अंतःस्वर सापडायला मदत करेल..! आयुष्यातील अनुभवांसोबत सजगपणे जगताना कवितेच्या साथीनं तिचा ऐलपैल समृद्ध होत राहावा ही हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे
२९.४.२०१७

1 comment:

  1. या मनःपूत शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद आसावरीताई

    ReplyDelete