Friday 5 May 2017

गांधार-पंचम


एखाद्या कसलेल्या ज्येष्ठ गायिकेने नृत्याचे पदन्यास टाकले किंवा एखाद्या नर्तिकेने चित्र रेखाटले किंवा चित्रकाराने गझल गायली तर वेगळ्या क्षेत्रातल्या या मुशाफिरीचा त्या कलाकार व्यक्तीला वेगळाच कैफ चढतो.. विशेष म्हणजे रसिकालाही याचं अप्रुप वाटतं..!
निष्ठावान उद्योजक आणि संवेदनशील सतारवादक म्हणून ओळख असलेल्या विदुर महाजन यांची काव्यक्षेत्रातली मुशाफिरी त्यांना स्वतःला आणि त्यांच्या चाहत्यांना अशीच अपूर्वाईची वाटते आहे. ‘गांधार-पंचम’ या त्यांच्या बर्‍याच अंगांनी वेगळ्या असलेल्या कवितासंग्रहाचा परिचय म्हणजे या अपूर्वाईचा परिचय आहे...
या संग्रहाचे वेगळेपण पुस्तकाच्या दृश्यरूपापासूनच जाणवायला सुरुवात होते. हे पुस्तक छोटेखानी अल्बमसारखे आडव्या आकाराचे आहे. आणि त्यात कवितेबरोबर कृष्णधवल छायाचित्रेही आहेत. कुणा मान्यवर कवीच्या प्रस्तावनेऐवजी  यात कवी विदुर महाजन आणि छायाचित्रकार चैतन्य विकास यांची छोटीशी  मनोगतं आहेत. आणखी एक वेगळेपण म्हणजे डायरीत नोंदवलेल्या यातील कवितांच्या ‘बॅक-स्टोरीज’ही कवितेसोबत वाचकांसमोर ठेवल्या आहेत. या छोट्या छोट्या नोंदी, छायाचित्र आणि कविता हे सर्वच एखाद्या खुल्या स्वगतासारखं आहे. या कवितांखाली तारखा आहेत पण कवितेला शीर्षकं नाहीत...
हे सर्व सलगपणे वाचताना प्रकर्षानं जाणवतं ते कवीचं सतत अंतर्मुख होत  जगणं आणि अनुभवत असलेलं उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या माध्यमांमधून इतरांबरोबर शेअर करणं.. ही जिंदादिली त्यांच्या सहज साध्या अभिव्यक्तीतून डोकावत राहाते. काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत...
कोणत्याही कलाकाराच्या कला-प्रवासात कधी कधी मधेच थांबलेपण येतं. या अवस्थेचं वर्णन एका कवितेत अगदी नेमकेपणानं केलेलं आहे-
‘सतत वाहणार्‍या पाण्याचा
मधेच होतो जेव्हा डोह
होत असेल का पुनः त्याला
वाहत राहण्याचा मोह?’
स्वतःत दंग असणार्‍या डोहाची प्रतिमा कला-ओघाच्या थांबलेपणाला अगदी चपखल वाटते.
इथे जगण्याचा, असण्या-नसण्याचा हेतू काय?, अर्थ काय? याचा शोध घेणं हे या कवितांचं आशयसूत्र आहे असं अनेक कवितांमधून जाणवतं. आपण जगत ‘असतो’ ते केवळ मृत्युच्या- ‘नसण्या’च्या भीतीपोटी.! एका कवितेत म्हटलंय,
‘तसं तर कुणाचंच
आपल्यावाचून नसतं अडत
आपण असलो काय, नसलो काय
कुणालाच नसतो फरक पडत
पण आपल्यालाच असायचं असतं
नसण्याच्या भीती पोटी..!

डायरीतल्या नोंदी आणि कविता या स्वगतरूप अभिव्यक्तीतले काही उद्‍गार थांबून विचार करायला लावणारे आहेत. उदा.-
‘भवताल बाहेर असतो की मनात..?’,
‘सतार ऐकायला समोर कुणी नसतं.. या ‘समोर कुणी’ला हाकलायला हवं, स्वतःलाच समोर बसवायला हवं’,
‘खरं तर सतत माध्यमांच्या मर्यादांचंच येत राहातं भान.’,
‘आहेस जिथे, तोही आहेच पैलतीर’

वर म्हटल्याप्रमाणे सतत जीवनाच्या अर्थ शोधायचा प्रयत्न करणार्‍या या कवीनं एका कवितेत जगण्याविषयी म्हटलंय-
‘मी फक्त जिवंत नव्हतो
मी नकळत जगत होतो
आयुष्य नावाच्या अनपेक्षिताला
नकळत प्रतिसाद देत होतो..’

आयुष्य ही अनपेक्षितपणे मिळालेली गोष्ट आहे. असं आयुष्य जगणं म्हणजे फक्त त्याला प्रतिसाद देणं.. हे आकलन महत्त्वाचं आहे.! पण जगताना अनेक अनुभव येतात. सजगपणे जगणार्‍या व्यक्तीला त्यांची संगती लावताना सतत विसंगतींचाच प्रत्यय येतो. या विसंगतींचा मेळ लावण्यासाठीच विदुर महाजन यांनी हा ‘शब्दांचा खेळ’ मांडला आहे..!
संवेदनशीलतेनं जगणार्‍या मनाला रोजचा नवा दिवस एक नवं आव्हान घेऊन येतो असं वाटतं. त्याच्यासाठी ‘एखादा कोरा कागद / असावा समोर / तसा दिवस उगवतो’
वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त होत उमेदीनं जीवनार्थ शोधत राहिलं तरी खर्‍या अर्थानं तो हाती लागतच नाही. श्री महाजन यांनी शेवटच्या कवितेत म्हटलंय,
‘आभासी जगात
निदान आभास तरी असतात
पण इथे
कुणालाच, कुणाचंच, काहीच
कळत नाही.. अन्‍
कुणालाच, कुणाचंच, काहीच
ऐकायचं नसतं..
त्यामुळे
असणार्‍याचं असणं हाही  
असतो निव्वळ भ्रम !

श्री विदुर महाजन यांची ‘माझी कथा, माझ्या वेदना.../ माझे विचार, माझ्या भावना...’ घेऊन केलेली कवितेतील ही मुशाफिरी त्यांच्याबरोबर वाचकांनाही अंतर्मुख होण्यातला आनंद देईल.

 आसावरी काकडे

गांधार-पंचम
विदुर महाजन
प्रकाशक- उन्मेष प्रकाशन, पुणे
पाने: ४८, किंमत: १५० रु.



No comments:

Post a Comment