Friday 5 May 2017

दूर दूर श्वासापल्याड..

प्रिय दया,

तुझ्या कविता वाचल्या. ‘मी कोण?’ ही पहिलीच कविता वाचताना तुझं कवितेशी असलेलं मनस्वी नातंजाणवलं. स्वगत बोलावं, स्मृतीत रमावं तशा तुझ्या कविता आत वळलेल्या आहेत.. ‘मनातल्या काळोखाचे थेंब’ कागदावर कविता कोरत जातात आणि मनातून कागदावर उतरलेल्या कवितासखी बनून जगण्याला सोबत करत राहतात. जगण्यातले सगळे भावगर्भ क्षण कवितेत फुलतात आणि आयुष्य सुगंधी करतात... हे नितांत तुझं वाटणं तुझ्या कवितांमधून माझ्यापर्यंत पोचलं.
एकदा का कवितेची अशी जिवलग सोबत मिळाली की मग व्याकुळ प्रतीक्षा असो की गतस्मृतींना ओंजळीत घेऊन कुरवाळणं असो, ‘हो नाही’चे संभ्रम असोत की ‘ऊन-पाऊस-वारा... चंद्र-चांदणं-तारा..’ यातून भुलवणारे भास असोत सगळं सुसह्य होतं. केवळ सुसह्य होतं असं नाही तर सृजनाच्या मुशीतून बाहेर पडल्यावर ते सारं सुंदर होऊन जातं..!
तुझ्या अंतर्मुख कवितांमधे जगण्याच्या परीघावरचे वेगवेगळे जीवनाशय आपापल्या उत्कटतेनिशी सामिल झाले आहेत. ‘पदराखालची पोर’ सारख्या कवितांमधून नात्यांचे बंध उलगडत गेलेत आणि पावसाची विविध रूपं चितारण्याच्या निमित्तानं माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं शब्दबद्ध झालंय.पुस्तकांचा सहवास हा तुझ्या नोकरीतील जगण्याचा अविभाज्य भाग. त्यांच्याशी तुझी अशी सलगी की बाहेरच्या कोलाहलातही तुझ्या कवितेला पुस्तकांच्या हृदयाची धडधड ऐकू येते, त्यांच्या श्वासातलं संगीत कळतं..!
कणिका स्वरूप छोट्या कविता हा तुझ्या कवितांमधला एक महत्त्वाचा भाग.व्यक्त व्हावं की नको अशा संभ्रमात असल्यासारख्या काही भावनाशब्दात उतरताना स्वतःला आक्रसून घेतात. मग शब्दही संयम ठेवतात आणि कणिकांचा जन्म होतो. किंवा बर्‍याचदा स्वतःलाही न उमगलेली वेदना अवघडून अल्पाक्षरांतून डोकावते. मलाआवडलेली तुझी छोटी कविता-
“फुलपाखरांच्या पंखावरचे
रंगीत ठिपके
अश्रूसारखे ओघळत गेले
फुलांनी माझी कहाणी
त्यांनाही सांगितली का?”
संग्रहरूपात तुझ्या या कविता सर्वांपर्यंत पोचतील तेव्हा त्या फक्त तुझ्या राहणार नाहीत. रसिकांच्या होऊन जातील आणि तू नव्यानं नव्या कवितांच्या शोधात स्वतःत परतशील..‘मी कोण?’ हा प्रश्न घेऊन, ‘स्वतःला शोधावं, शोधत जावं / दूर दूर श्वासापल्याड..’ हा भाव मनात जागता ठेवून..!
शब्दांसोबतच्या तुझ्या या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा-

आसावरी काकडे

१६ जानेवारी २०१६

No comments:

Post a Comment