Friday 5 May 2017

नि:शब्द शब्द

नि:शब्द शब्दांसाठी चार शब्द-
कवितेसाठी हवा तो शब्द शोधणं म्हणजे सतत स्वतःचं अनावरण करत राहाणं... याची काहीशी जाण असलेली पुष्पांजली कर्वे माझी फेसबुक फ्रेंड आहे. अशा मैत्रीत वयाचं किंवा भौगोलिक अंतर आड येत नाही. कविता हा आम्हाला जोडणारा दुवा. कवितेतूनच आम्ही भेटत राहिलो. तिच्या प्रतिसादात नेहमी एक अंत्यंतिक भारलेपण असतं. कवीमनाचंच हे एक लक्षण. तिच्या कवितेतही ते जाणवतं...
फेसबुक ही लगेच दाद देण्याची जागा आहे. विश्लेषण, समीक्षा.. या गोष्टी तिथं सहज शक्य होत नाहीत. छान छान अशी दाद मिळत जाते. पण कोणतीही पोस्ट तिथं फार काळ टिकत नाही. लगेच नजरेआड होते. स्मरणात ठरत नाही... पुष्पांजलीच्या कविताही अशा नजरेआड होत राहिल्या..
एकदा अचानक तिचा फोन आला संग्रह करतेय म्हणून. मी शुभेच्छा दिल्या. मग मधे काही दिवस गेले. काही दिवसांनी परत फोन. प्रस्तावना हवीय. म्हटलं, बघते, कविता पाठव... पुन्हा काही दिवस गेले... करता करता एकदम डीटीपी केलेल्या संग्रहपूर्व रूपातच कविता हातात आल्या..! वाचताना लक्षात आलं की यात बर्‍याच ठिकाणी परिष्करणाची गरज आहे. मग लक्षात येतील तशा सूचना करत राहिले....
कवितेवर प्रेम असणार्‍या व्यक्तीला जर विचारलं की आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता तर ती नक्कीच असं सांगेल- ‘मनातली कविता शब्दात उतरते तो क्षण सर्वात आनंदाचा..!’ या नंतरची पायरी म्हणजे वाचकांचा प्रतिसाद मिळणं. तो मिळाला की कविता खर्‍या अर्थानं पूर्ण होते... अशा कविता नजरेआड न होता एकत्रित, सतत वाचकांच्या समोर जाण्याच्या शक्यतेत असाव्यात असं वाटत असेल तर अजूनही पुस्तकाला पर्याय नाही. कविता लिहू लागल्यानंतरचा हा टप्पा कवीच्या आयुष्यातला सार्थकाचा टप्पा असतो. एकाच वेळी समाधान आणि हुरहुर दोन्ही भावना असतात मनात. काही साधलंय पण बरंच साधायचंय हे आत जाणवत असतं प्रामाणिक मनाला...
पुष्पांजलीची ही सुरुवात आहे. तिनं संग्रहाला छान सविस्तर मनोगत लिहिलंय. त्यातून तिची कवितेविषयक भूमिका स्पष्ट होते. मनोगताच्या सुरुवातीलाच तिनं म्हटलंय-
‘खरं प्रेम आपल्या आयुष्यात जाणता अजाणता अगदी नकळत येतं. माझी कविता सुद्धा अशीच नकळत माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्यच होऊन राहिली ! खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात कविता असते ! कारण कविता म्हणजे सारं भोवतालचं सोसणं असतं. कविता म्हणजे आपणच आपल्याला उसवणं असतं, कविता म्हणजे एक टाका असतो आपण आपल्याला घातलेला, कविता म्हणजे प्राण असतो जगण्यामधे ओतलेला !’
संग्रहातील कवितांविषयीच्या अपेक्षा उंचावणारं असं हे मनोगत आहे. एकूण १०१ लहान मोठ्या कविता या संग्रहात आहेत. त्यात बर्‍याच प्रेमकविता आहेत, काही स्त्रीविषयक जाणिवेच्या, सामाजिक आशयाच्या कविता आणि काही कणिका आहेत. या कवितांत उत्कटता आणि प्रांजलपणा जाणवतो. त्या फेसबुकवर वावरत असल्या तरी इतर प्रभावांच्या आहारी गेलेल्या वाटत नाहीत. अनुभव, अभिव्यक्ती दोन्ही पातळ्यांवरील नवखेपणासह त्या तिच्या स्वतःच्या आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
काही कवितांची उदाहरणं पाहिली तरी हे लक्षात येईल-
‘तुझ्या श्वासांची ऊब
मला इथे जगवते
अन्‍...
माझ्या आसवांची गाज
तुला तिथे कळते...’
*

‘उगवावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझ्या सहनशीलतेचा देठ भिडेल..’
*

अपरिहार्यपणे सहज अंगवळणी पडलेली इंटरनेटची भाषा कवितेत कशी डोकावते बघा-
‘हं...
कित्ती कित्ती तुला मी सर्च केलं
पण... कुठे नाही भेटलास...’
*

‘प्रिय...
तुझ्या इनबॉक्सच्या गेटवर
माझे काही शब्द ताटकळत उभे आहेत..’
*

अत्तर-क्षण, सावळमेघ, अंतरगाभार्‍यात असे काही शब्द आणि ‘अगदी निरंतर’, ‘तुला दिलेले शब्द’, ‘ऐक ना..’, या कविता उल्लेखनीय वाटल्या


स्त्रीविषयक जाणिवेच्या कवितांना नकळत धार आलेली आहे. त्यातील काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत-

‘इतकं सोप्पं नसतं गं .....
एकाच मनात
मनाची शकलं करून
जगणं .....
आणि प्रत्येक जगण्यात
स्वत:चा शोध
घेत राहणं......’
*

‘आणि घराचा उंबरठाही तुला पाय घालून
पाडतो
......

तुझा राग भांड्यावर काढतेस....
काय असते ते....
तुझा दबलेला आवाज
तुझा व्यवस्थेविरुद्धचा टाहो
की, समाजपुरूषाविरुद्धच्या
बंदाची नांदी...
की, शरणागती तुझ्यातल्या अस्मितेची....?
*

‘भरजरी नातं’, ‘जिथे घराच्या भिंतीत’, ‘पैंजण’, ‘मनुष्य मनुष्य’ या काही कविताही उल्लेखनीय आहेत. शेवटी आलेल्या काही छोट्या कविताही लक्ष वेधून घेतात.

पुष्पांजलीचं हे पहिलं पाऊल दमदार पडलं आहे. कविता हा उत्स्फूर्त साहित्यप्रकार असला तरी त्यासाठी व्यासंगाचा रियाज आवश्यक असतो. कवितेविषयीच्या प्रेमातून तो सहजपणे घडतो... पुष्पांजलीनं मनोगतात म्हटलंय, ‘कविता माझ्या खर्‍या अस्तित्वाची ओळख करून देते.’ हे अगदी खरं आहे. त्यासाठी स्वतः एक व्यक्ती म्हणून विकसित होत राहाणं हाही आंतरिक ‘व्यासंगा’चाच एक भाग ठरतो. पुष्पांजली असा रियाज करत राहील आणि तिच्या हातून उत्तमोत्तम कविता लिहिल्या जातील अशी आशा करते.

पुष्पांजलीला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com
२६ फेब्रुवारी २०१७


  





No comments:

Post a Comment