Sunday 16 July 2017

ओवी आणि अभंग

कविता हा साहित्यनिर्मितीचा पहिला श्वास आहे. भाषेला लिपी नव्हती तेव्हा लौकिक, पारलौकिक सर्व ज्ञान मौखिक रूपात जतन करून ठेवलं जायचं. कविता अल्पाक्षरी, गेय असल्यामुळे पाठ होऊन म्हणायाला सोपी जाई. त्यामुळं सामान्य जनतेत लोकसहित्याच्या स्वरूपात काव्य-निर्मिती झाली. व्यवहारी ज्ञान गोवलेले  उखाणे, कोडी, ओव्या.. हे प्रकार रोजच्या जीवनाचा भाग झाले होते. पहाटे उठून स्त्रिया दळण कांडण अशी कामं करताना उत्स्फूर्त ओव्या रचायच्या. देवाचं स्मरण करता करता त्यातून त्या मनोगत व्यक्त करायच्या. मन मोकळं करायच्या. अशा ओव्या या काव्यात्म तर असायच्याच शिवाय त्यात त्या काळाचं चित्रण नकळत उमटायचं. डॉ. सरोजिनी बाबर यांनी अशा ओव्यांच्या संकलनाचं महत्त्वाचं काम केलेलं आहे.

गाऊन म्हणता येणे हाच निकष महत्त्वाचा असल्यामुळे अशा ओव्यांमधे यमक आवश्यक असायचे. मात्र बाकी आकृतिबंध बराच शिथिल असायचा. अक्षर, मात्रा यांचे बंधन नव्हते. एक उदाहरण-

पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला विठ्ठल देवाला
    
मराठी संस्कृतीमध्ये रुळलेल्या या मराठी अक्षर-छंदातच संतांनीही आपले तत्त्व-विचार मांडले. त्यात भारुड, गौळणी.. अशा वेगवेगळ्या रचना असल्या तरी प्रामुख्याने ओवी, अभंग हेच छंद संतसाहित्यात अधिक वापरलेले दिसतात. मराठी साहित्याच्या इतिहासात संतसाहित्य हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे निर्माण होत राहिलेल्या साहित्यावर आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी संतसाहित्याचा प्रभाव पडत राहिलेला आहे.

ओवी, अभंग हे मराठमोळे अक्षर-छंद आशयप्रधान आहेत. त्यांना लय-तालाचे चांगलेच भान आहे पण ते रचना-तंत्रात जखडलेले नाहीत. त्यांचा उगम लोकवाङयात दिसतो. काही संशोधकांच्या मते ओवी आणि अभंगाचे मूळ संस्कृत अनुष्टुभ छंदात आहे. त्यातली प्रासादिकता, माधुर्य आणि भक्ति-परायणता ही वैशिष्ट्ये ओवी, अभंग या छंदामध्ये पुरेपूर भरलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय मांडण्यासाठी ओवीचा अतिशय प्रगल्भ, काव्यात्म वापर केला आणि ओवी छंद धन्य झाला. संतांनी वापरलेल्या ओवीमध्ये साडेतीन चरण असतात. त्यात अक्षर संख्येचे बंधन नाही पण पहिल्या तीन चरणात यमक असावे लागते. चौथा चरण लहान आणि आशयपूर्ती करणारा असतो. उदाहरणार्थ – ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी- ओम नामोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||’ संत एकनाथांनीही ओवी छंदात विपुल रचना केल्या. मराठी कवितेत मात्र अभंगासारखा हा छंद रुळलेला दिसत नाही.

संतसाहित्यात ओवीच्या बरोबरीनेच अभंग छंदात रचना केलेल्या दिसतात. पण प्रतिज्ञापूर्वक आणि विपुल प्रमाणात अभंग रचना प्रथम संत नामदेवांनी आणि नंतर संत तुकारामांनी केली. ‘शतकोटी तुझे करीन अभंग’ असा महासंकल्प नामदेवांनी केला. त्या विचारात असताना त्यांना एक स्वप्नवत अनुभूती आली. या अनुभूतीला त्यांनी दिलेले शब्दरूप असे-

अभंगाची कळा नाही मी नेणत |
त्वरा केली प्रीत केशीराजे ||||
अक्षरांची संख्या बोलिलो उदंड |
मेरू सुप्रचंड शर आदि ||||
सहा साडेतीन चरण जाणावे |
अक्षरे मोजावी चौकचारी ||||
पहिल्यापासोनि तिसर्‍यापर्यंत |
अठरा गणित मोज आलें ||||
चौकचारी आधी बोलिलो मातृका |
बाविसावी संख्या शेवटील ||||
दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर |
मुमुक्षु विचार बोध केला ||||
नामा म्हणे मज स्वप्न दिले हरी |
प्रीतीने खेचरी आज्ञा केली ||||
(संत नामदेव : विहंग दर्शन- नि. ना. रेळेकर, या पुस्तकातून. पृष्ठ ८५)

या रचनेत अभंग-रचनेचे व्याकरणच नामदेवांनी सांगितले आहे. ते थोडक्यात असे- सहा अक्षरांचा एक याप्रमाणे तीन पूर्ण चरण आणि शेवटचा चार अक्षरांचा अर्धा चरण असावा. चार चरणांचा एक चौक (कडव्याच्या स्वरूपात) करावा. पहिल्या तीन चरणांची अक्षरसंख्या अठरा होते. शेवटचा चार अक्षरांचा अर्धा चरण मिळून एका कडव्यात बावीस अक्षरे येतात. साधारण सहा कडव्यांचा एक अभंग असतो.

प्राचार्य नि. ना. रेळेकर यांनी आपल्या ‘संत नामदेव : विहंग दर्शन’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘स्वतः संत नामदेवांनीच आपल्याला स्फुरलेल्या या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण काव्यरचनेला प्रथमतः ‘अभंग’ या नावाने संबोधले आणि मराठी संतसाहित्यात ‘अभंग’ ही संज्ञा रूढ झाली’, ‘या अभंग-काव्याला संत नामदेवांनी आणखी एका लक्षणीय परिमाणाची जोड देऊन संत आणि त्यांचे अतूट नाते निर्माण केले. आपल्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ‘नामा म्हणे’ अशी स्वतःची नाममुद्रा उमटवून त्या अभंगाला आपली एक खास अशी ‘निजखूण’च त्यांनी प्राप्त करून दिली. (पृष्ठ ९३, ९५)
या शिवाय संत नामदेवांनी समचरणी अष्टाक्षरी अभंग-छंदाविषयीही त्याच छंदात लिहून त्याचे उदाहरण दिले आहे. संत नामदेव, संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग गेय स्वरूपात मौखिक रूपातच प्रकट झाले. आज आपण वाचतो त्या छापिल गाथा वर्षानुवर्षांच्या अनेकांच्या कष्टातून प्रकाशित झालेल्या आहेत. एकूण अभंगरचना पाहिल्या की लक्षात येते की अभंग छंदाचे अनेक वेगवेगळे प्रयोग संतांनी केलेले आहेत. पण साडेतीन चरणांच्या षडक्षरी छंदातच अधिक अभंग रचना झाली आहे. विशेष म्हणजे मराठी कवितेतही अभंग म्हणून हाच छंद रूढ झाला आहे. अभंग वाचतांना रचनेच्या अंगाने पाहिले असता लक्षात येते की प्रत्येक कडव्यातील दुसर्‍या व तिसर्‍या चरणात यमक जुळवलेले असते. आशयाला प्राधान्य दिलेले असल्यामुळे हे नियम बरेच शिथिलपणे वापरलेले अढळतात. असं असलं तरी भजन कीर्तनामध्ये अभंग गाऊनच म्हटले जात असल्यामुळे अभंग-रचनेला लय-तालाचे चांगले भान असते. पहिले कडवे ध्रुपदासारखे परत परत म्हटले जाते. अनेक अभंग थोर संगीतकारांच्या संगीतावर श्रेष्ठ गायकांनीही गायलेले आहेत. उदाहरणार्थ भीमसेनजींनी गायलेला संत नामदेवांचा ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...’ हा अभंग किंवा संत तुकारामांचा ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा..’ हा अभंग... असे कितीतरी अभंग मराठी मनांमध्ये खोलवर रुजलेले आहेत..

मराठी कवितेतील अभंग-दर्शन


मराठी कवितेत अभंग-छंदाचा विपुल प्रमाणात वापर झालेला आहे. मर्ढेकर, विंदा करंदीकर यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींपासून ते आता आता लिहू लागलेल्या कवींपर्यंत अनेकांनी हा छंद आपलासा केला आहे. काही उदाहरणं पाहू-

बा. सी. मर्ढेकर यांची एक प्रसिद्ध कविता या छंदात आहे.-

तुझ्यासाठी देवा काय म्या झुरावे |
झुरळाने कैसे पतंगावे ? |
साधू संत जेथे बैसले तिष्ठत |
मना कष्टवीत अहोरात्र |
काय तेथे माझी लांडी धडपड |
किरटी पकड भावनेची |
काय बोलू आता उघड नाचक्की |
अंतरात पक्की बोळवण ।”

विंदा करंदीकरांच्या आततायी अभंगातील एका अभंगाच्या काही ओळी-

“संस्कृतीला झाला । नफ्याचा उदर
प्रकाशाचे पोर । कुजे गर्भी
स्वातंत्र्याला झाला । स्वार्थाचा हा क्षय
नागड्याना न्याय । मिळेचना
मानवाचे सारे । माकडांच्या हाती
कुलुपेच खाती । अन्नधान्य
नागड्यांनो उठा । उगवा रे सूड
देहाचीच चूड । पेटवोनी ॥”

आरती प्रभुंच्या ‘दिवेलागण’ या कवितासंग्रहातील ‘काखेत काळोख’ या कवितेतल्या काही ओळी-

“का रे बापा पुच्छ । तोडोन घेतले
खात न त्यामुळे । कंदमुळे
कुठे गुहेमाजी । असेलही चित्र
तिला आज वस्त्र । देतो घेतो
विजेहून लख्ख । मानवी ओळख
काखेत काळोख । गुहेतला”

ना. घ. देशपांडे- ‘शीळ’ या कवितासंग्रहातील ‘माझी गाणी’ कवितेच्या काही ओळी-

“माझा योग-याग आळवावा राग
डोलवावा नाग नादरंगी ॥
मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक ॥
तन्मात्रांचे पाच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ ॥”

कुसुमाग्रज- ‘मुक्तायन’ या कवितासंग्रहातील ‘तूच आता’ या कवितेतील काही ओळी-

“मोह हा जळेना लाघवी लतांचा
मंजुळ गीतांचा राईतल्या ॥
अंतरीचे असे आसक्तीचे दंगे
विरक्तीच्या संगे अहोरात्र ॥
तूच फेक आता भगवे कफन
माझे तन मन ध्वंसणारे ॥

बा.भ. बोरकर- ‘बोरकरांची समग्र कविता’- खंड : २ पृष्ठ ३२६ ‘संतर्पणें’ या कवितेतील काही ओळी-

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी ॥
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची ॥
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे ॥

अरुणा ढेरे- ‘मंत्राक्षर या कवितासंग्रहातील ‘विश्वासाचा शब्द’ या कवितेतील ओळी-

“विश्वासाचा शब्द दिलास असा की
माझ्या हृदयाशी मेघ आले ॥
वर्षताना स्नेह तुला ना कळाले
माझे वाहू गेले काय काय ॥
वळचणीपाशी उभी मी हताश
आता घरापास दिवा लाव ॥”

किशोर पाठक- ‘सम्भवा’ या कवितासंग्रहातील ‘लाघव’ या कवितेतील काही ओळी-

“बांधले शरीर चिरेबंद भिंती
तडे गुंतागुंती शतकांची ॥
भोगली भोगली नजरांनी मौत
छातीमध्ये औत ओढगस्ती ॥
तुझ्या इंद्रियांचा भोग कर्मोत्सव
नेत्रांचे लाघव आंधळावे ॥”

प्रज्ञा लोखंडे- ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ या कवितासंग्रहातील ‘काळोखले मन’ या कवितेतील काही ओळी-

“काळोखले मन जिण्याचे सरण
रिते रितेपण वस्तीतून ॥
घरात काहूर रक्तात विखार
राख थंडगार विझलेली ॥
आता उरे फक्त आकांत अपार
दुःखाचेच सल काळजाशी ॥”

सुनीति लिमये- ‘एकांतवेल’ या कवितासंग्रहातील ‘तिथे उजाडेना..’ या कवितेतील काही ओळी-

“आर्त काही आता येऊ नये ओठी
पीळ त्याच्यासाठी पडू नये ॥
कानात चौघडा अस्वस्थाचा वाजे
आणि बेचैनीचे पडघम ॥
तिथे उजाडेना इथे अंधारले
कुंपाणावरले देह आम्ही ॥”

     कविता, रूपांतर यासाठी अभंग छंदाचा मीही बराच वापर केला आहे. या छंदात लिहितांना मला सतत जाणवत राहिलं की या छंदाला स्वतःचा स्वभाव आहे, स्वतःचा आवेग आहे. मनात खोलवर अव्यक्त राहिलेलं संचित उन्मळून शब्दांमध्ये व्यक्त होतं या छंदात लिहिताना. अभंग छंदातली कविता स्वतःला उमगलेलं बारीकसं तत्त्व सहज सांगून जाते. साडेतीन चरणाचं एक कडवं म्हणजे एक विधान असतं. गझलेतील प्रत्येक शेर म्हणजे एक स्वयंपूर्ण कविता असते. तसंच अभंगाचं प्रत्येक कडवं कवितेचा आशय पुढे नेणारं असलं तरी अर्थाच्या दृष्टीनं पूर्ण असतं. एक कडवं एक पूर्ण कविता होऊ शकते. या छंदात लिहिताना यमक आशयाला बिलगुनच येतं. कधी कधी तर यमकासाठी धावून आलेला शब्द हव्या असलेल्या शब्दापेक्षा अधिक समर्पक ठरतो. रूपबंधाच्या दृष्टीनं काहीसा शिथिल तरी भावार्थानं बांधून ठेवणारा अभंग छंद म्हणूनच कविमनाला भुरळ घालत राहिला आहे.

संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली मराठी कविता आशयसमृद्ध तर आहेच. पण अकृतीबंधाच्या दृष्टीनंही ती श्रीमंत आहे. हायकू, रुबाई, गझलसारखे दुसर्‍या भाषेतले काव्यप्रकार तिनं आत्मसात केले तसे अभंगासारखे देशी अक्षरछंदही त्यांच्या वैशिष्ट्यासह तिनं आपल्या विस्तारात सहज सामावून घेतले आहेत. हा छंद इतका कवीप्रिय झालेला आहे की पावसावर कींवा आईवर कविता लिहिली नाही असा कवी नसेल तसा अभंग छंदात कविता न लिहिलेला कवीही दुर्मिळ असेल.

आसावरी काकडे
५ जुलै २०१७

‘साहित्यदीप’ दिवाळी अंक २०१७ साठी


1 comment:

  1. खूप सुंदर आणि अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. आपल्या भाषेचे सौंदर्य हे मर्यादित शब्द संभारातून किती अमर्याद आनंद देतं याचा प्रत्यय आला. मी श्रीपाद कोतवाल, नाशिक.
    9371854789 माझा संपर्क. आपलाही संपर्क मिळाल्यास आमच्या पुढील अंकात आपला लेख नक्कीच असेल. मी निवेदन सूत्र संचालन आणि बररेच काही करत असतो. आपल्याशी संवाद साधता आल्यास आनंद होईल.
    धन्यवाद...

    ReplyDelete