Sunday 16 July 2017

विंदा करंदीकरांच्या कवितेतील वैशिष्ट्ये

नमस्कार,

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या जुलै महिन्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्ही मैत्रिणींनी मला दिलीत याबद्दल सुरुवातीला सर्वांचे आभार मानते. ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पद्मा गोळे या आपल्या मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. त्यांच्यासारख्या एका श्रेष्ठ कवयित्रीचे स्मरण जागवताना दुसर्‍या श्रेष्ठ कवीच्या जन्मशताब्दीचे औचित्य आयोजकांनी साधले हे कौतुकास्पद वाटते आहे.

आजच्या कार्यक्रमात विंदा करंदीकरांच्या बालकविता सादर होणार आहेत. त्यापूर्वी विंदांच्या एकूण कवितांविषयी मला बोलायचं आहे. विंदा हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठीतले श्रेष्ठ कवी. अर्थातच त्यांचं काव्यकर्तृत्व आणि इतर साहित्यिक योगदान खूपच मोठं आहे. वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या व्यक्तित्वाच्या विविध पैलूंचा परिचय मराठी रसिकांना झालेला आहे.

आज त्यांच्या कवितांविषयी बोलण्यासाठी ‘विंदांच्या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये’ असा विषय मी ठरवला आहे. यासाठी मी मंगेश पाडगावकर यांच्या ‘संहिता’ या विंदा करंदीकरांच्या निवडक कवितांचं संपादन असलेलं पुस्तक आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांचा एक लेख यांचा आधार घेतलेला आहे.

विंदा करंदीकरांच्या कवितेतील प्रयोगशीलता हे वैशिष्ट्य प्रथम विचारात घ्यावं लागेल कारण एखादा कवी तेव्हाच श्रेष्ठ ठरतो जेव्हा तो प्रस्थापित झालेल्या, स्थिरावलेल्या, कृतक, निर्जीव होऊ लागलेल्या कवितेला ओलांडून पुढे जातो. त्याला ताजं, अर्थपूर्ण, कालोचित असं परिमाण देतो. असं नवं वळण देण्यासाठी कवीला भाषा, शैली, आशय हे सगळंच नव्यानं सादर करावं लागतं. अर्थात हे ठरवून होत नाही. कवीच्या आतली जगाकडं नव्यानं पाहणारी दृष्टी, आतून जाणवलेलं नवं आकलन नव्या शैलीत व्यक्त करण्याचं सामर्थ्य आणि त्यासाठीची अनावर ओढ यातूनच अशी निर्मिती होऊ शकते.

तरल मूड व्यक्त करणारी हीच शुद्ध कविता या समजुतीतून चमत्कृतीपूर्ण शब्दांचे खेळ करणारी, काहीही न सांगणारी कविता, किंवा सामाजिक जाणिवांच्या वक्तृत्वपूर्ण घोषणा करणारी, ठराविक वर्तुळात फिरणारी कविता निर्माण होऊ लागली की जीवनातले असंख्य अनुभव दुर्लक्षित राहतात. आधुनिक मराठी कवितेत हा धोका निर्माण झाल्याची चिन्हं स्पष्टपणे जाणवत असताना विंदा करंदीकरांची दमदार कविता नव्या रूपात रसिकांसमोर आली. 

विंदा स्वभावतःच बंडखोर वृत्तीचे होते. त्यांच्यातील काहीसं मिस्किल, सळसळतं रांगडं चैतन्य, स्पष्टवक्तेपण त्यांच्या कवितेतून आणि काव्यवाचनातूनही व्यक्त होत असे. जीवनाला मनःपूर्वकतेनं सामोरं जाताना आलेल्या अनुभवांना शब्दरूप देताना हे अनुभव अस्सल रूपात थेट व्यक्त व्हावेत म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. भाषा-वापराच्या जुन्या मळलेल्या वाटा त्यांनी टाळल्या. व्यक्त होण्याचे पारंपरिक शिष्टमान्य संकेत झुगारून दिले. विचारांचे, शैलीचे, अनुभव घेण्याचे असे कोणतेच रूढ साचे त्यांनी मानले नाहीत. त्यासाठी आवश्यक अशी भाषेची, रूपबंधाची आव्हाने त्यांची कविता निडरपणे स्वीकारत राहिली. त्यांच्या कोणत्याही कवितेत ही विंदाशैली स्पष्टपणे जाणवते.

कवितेच्या आकृतीबंधातून ही बंडखोर प्रयोगशीलता अधिक स्पष्ट होते. त्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेले आततायी अभंग, सूक्ते, मुक्त सुनीते, तालचित्रे, बालगीते, विरूपिका... या कविता बघण्यासारख्या आहेत.

अशा प्रयोगशीलतेतून साध्य झालेलं दुसरं वैशिष्ट्य आहे अनुभव आणि कलात्मकता यांचं संतुलन :

जीवनाच्या जिवंत कुतुहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. जगण्याला सामोरं जाताना येणारे अनुभव समरसून घेतल्यावर, ते आंतरिकीकरणाच्या मुशीतून बाहेर पडल्यावर मग कवितेची निर्मिती होते. या प्रक्रियेत करंदीकर जाणीवनिष्ठा सर्वात महत्त्वाची मानतात. कलात्मकतेच्या रूढ साच्यात ते अडकत नाहीत. आतून जाणवलेला भावाशय स्वतःचा स्वतंत्र आकार घेऊन त्यांच्या कवितेत व्यक्त होतो. म्हणून त्यांची कविता अनुभवांनी रसरसलेली राहिली आहे. कवितेचे कलात्मक मूल्य ते नाकारत नाहीत. पण ते अनुभवाच्या हातात हात घालून आलेले असावे. रचना सौंदर्यातून अनुभव सुंदर व्हावा. वेगळेपणानं वाचकांच्या मनाला भिडावा. अनुभवाचं सामर्थ्य आणि कलात्मक सौंदर्य यांच्या संतुलनातून खरी कविता निर्माण होते ही जाणीव त्यांच्या ‘खडक फोडितो आपुले डोळे’ या प्रतिकात्मक कवितेत व्यक्त झाली आहे. या कवितेत खडक हे अनुभवाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि खडकाला पैलू पाडणार्‍या लाटा हे सौंदर्याचं प्रतीक आहे. हे संतुलन करंदीकरांच्या सर्वच कवितांमध्ये साधलेलं दिसतं.

तिसरं वैशिष्ट्य चिंतनशीलता

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हणतात ते करंदीकरांसारख्या चिंतनशील वृत्ती असलेल्या कवीच्या बाबतीत अगदी खरं आहे. जीवनातील सामान्य अनुभवांकडेही करंदीकर वेगळ्या कोनातून बघतात. अनुभवांचे दृश्य स्तर खोदून आत शिरतात. जे दिसलं त्याचा अर्थ लावतात. आणि मग जाणवलेलं वेगळं काही, खोलात दिसलेल्या प्रतीकांच्या माध्यमातून स्वतःच्या स्वतंत्र शैलीत मांडतात. पार्थिव जगण्यात बुडालेली भोवतीची सामान्य माणसं, सामाजिक स्थित्यंतरं, त्यातल्या धार्मिक-अध्यात्मिक प्रेरणा, विज्ञान, राजकीय विचारप्रणाली... या सर्व घटकांविषयीचे प्रगल्भ चिंतन त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. ‘त्यातून तुकारामापासून कन्फ्यूशिअसपर्यंत, अश्वघोषापासून मार्क्सपर्यंत, दामाजीच्या आख्यानापासून क्वांटम सिद्धांतापर्यंत अनेक प्रकारच्या वैचारिक दर्शनांचे संस्कार डोकावतात.’

पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य- सत्याचा शोध

     सत्याचा शोध घेण्याची अनिवार ओढ ही करंदीकरांच्या प्रतिभेची प्रकृती आहे. त्यांची जीवन विषयक जाणीव त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांनी मर्यादित होत नाही. ते अनुभवांना थेट भिडतात. आणि त्यातून उमगलेल्या नव्या सत्याच्या संदर्भात जुन्या निष्ठा तपासून बघतात. स्वतःच्या विचारांशीही विरोध पत्करतात. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भातील आवेशपूर्ण कवितेत अटळ हिंसेचे समर्थन दिसत असले तरी काही कवितांमधून युद्धातील संहाराविषयीची घृणाही तीव्रतेनं व्यक्त झाली आहे. युद्धाचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाही. शांतीच्या कबुतराचे आकर्षण ते टाळू शकले नाहीत. माणूस हेच त्यांच्या चिंतनशीलतेचे केंद्र होते. या संदर्भात ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगावर’ ही कविता पाहण्यासारखी आहे.

     ‘वाटाड्या’ या कवितेत राजकीय वाटांचा शोध घेतांना सगळ्याच वाटांमधल्या फोलपणाची जाणीव व्यक्त झाली आहे. करंदीकर कुठल्याही एका विचारसरणीच्या आहारी गेले नाहीत. त्यांची बांधिलकी सत्याच्या शोधाला होती. सत्याचा शोध घेत असताना त्यांना विसंगतींचे तीव्रपणे दर्शन होते. इतके तीव्र की सत्याचा शोध ही एक पोकळीच असावी अशी व्यर्थतेची जाणीव निर्माण व्हावी..! पण ते या विसंगतींचाही खोलात शिरून अर्थ लावतात. या संदर्भात ‘क्षेत्रज्ञ’ आणि ‘तीन माणसे कुजबुजत गेली’ या कविता पाहण्यासारख्या आहेत.

     भोवतीचं सामान्य माणसाचं जगणं आणि सामाजिक-राजकीय घडामोडी, इंद्रियानुभव आणि अतींद्रिय अनुभव.. आत्मसाक्षात्कार, माणूसपण.. प्रेम.. स्त्रीत्व, तत्त्वज्ञान आणि विज्ञान.. अशा सर्व पातळीवर त्यांची कविता सत्य शोधार्थ विहार करताना दिसते.

या नंतर- त्यांच्या कवितेतील स्वाभाविक देशीयता

अलिकडेच चंद्रकांत बांदिवडेकर यांचा करंदीकरांवर लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “करंदीकरांनी आपला शंभर टक्के देशीपणा आपल्या काव्यात अनुभवापासून त्याच्या भाषिक संप्रेषणापर्यंत कायम राखला. त्यांची ही देशीयता आंतरिक, उत्स्फूर्त आणि सहज आविष्कृत होणारी आहे. त्यांच्या काव्यातील शब्द संचयनाचा अभ्यास केला तर इतका देशी कवी मराठीत अन्य नाही हे मान्य करावे लागेल... विंदाच्या कवितेत कोकण आहे. तिथल्या निसर्गाचा संपूर्ण तपशील आहे, तिथल्या दंतकथा, भूतांच्या कथा.. आहेत, तिथली अडाणी व बेरकी माणसे, त्यांचे धंदे आहेत. यामुळे विंदाच्या कवितेचा अंतर्बाह्य देशी थाट जोमदारपणे उभा राहतो. त्यातला मातीचा वास कुठेही लपत नाही. ‘चिवचिवणारी वाट असावी’सारखी विलक्षण दर्जेदार कविता या अशा द्रव्यातूनच साकार होते. प्रत्येक शब्दाच्या ध्वनीचा आणि अर्थाचा पुरेपूर कसून उपयोग करून घेणे ही विंदाची एक मोठी ताकद आहे. यातूनच विलक्षण अर्थगर्भ मितव्ययता निर्माण होते आणि पुढे पुढे ‘जातक’ संग्रहातील कवितांमध्ये दुर्बोधताही येते”


शेवटचा मुद्दा - इहवादी भूमिका

     विंदांचा इहवाद अतिशय व्यापक आहे. इंद्रियनिष्ठ अनुभव हे या भूमिकेचे केंद्र असले तरी त्यांची कविता तिथेच अडकलेली नाही. इंद्रियनिष्ठ संवेदांनांच्या घाटातून त्यांनी अपार्थिवाची ओढ व्यक्त केली आहे. लैंगिक सुखाचा उत्कट अनुभवही करंदीकरांना आध्यात्मिक अनुभवाकडे घेऊन जातो. या संदर्भात त्यांची रक्तसमाधी ही कविता महत्वाची आहे.

     त्यांच्या प्रेमकवितेला या संदर्भात विशेष स्थान द्यावे लागते. कारण या कवितेतील प्रेमानुभव एकूण जीवनाच्या संदर्भातला एक अनुभव असतो. प्रेमाच्या विविध छटाचे भावसौंदर्य न्याहाळीत असताना करंदीकर स्त्रीच्या व्यक्तित्वाचाही शोध घेत असतात. त्या दृष्टीनं त्यांची झपताल आणि ‘संहिता’ या कविता वाचण्यासारख्या आहेत. पैकी ‘झपताल’ कविता इथे वाचून दाखवते-

     ‘ओचे बांधून पहाट उठते...तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस.
...कुरकुरणार्‍या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात;
आणि मग इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर
बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेर्‍याने
म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर
उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवू लागतो;
म्हणून तो तुला हवा असतो! मधूनमधून तुझ्या पायांमध्ये
माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात; त्यांची मान
चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण
चिऊकाऊच्या मंमंमधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस; लहानमोठ्या वस्तूंमध्ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात... स्वागतासाठी ‘सुहासिनी’ असतेस;
वाढताना ‘यक्षिणी’ असतेस; भरविताना ‘पक्षिणी’ असतेस
साठविताना ‘संहिता’ असतेस; भविष्याकरता ‘स्वप्नसती’ असतेस.
...संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.’
मुंबई,
३०-०८-१९५७

     अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त विंदांची कविता अतिशय आदरणीय आहे. पण ती अनुकरणीय मात्र नाही. विंदांनी कवितालेखनासाठी पाळलेलं महत्त्वाचं पथ्य म्हणजे जाणीवनिष्ठा. जे, जसं आतून जाणवलं तेच त्यांनी लिहिलं. तोपर्यंतच लिहिलं. उसनं अवसान आणून किंवा मागणीनुसार लिहिण्यासाठी त्यांनी आपली प्रतिभा राबवली नाही. अत्यंतिक संवेदनशीलतेनं लिहितांना त्यांनी प्रचलित साचे अनुसरले नाहीत तसे स्वतःचेही साचे बनवले नाहीत. त्यामुळं अनुभवांच्या मुळाशी पोचलेल्या त्यांच्या आशयसंपन्न कवितेचं अनुकरण करता येणं शक्य नाही. आपण त्यांचे प्रतिभा-सामर्थ्य घेऊ शकत नाही. त्यांच्या शैलीचे अनुकरण करू शकत नाही. पण त्यांच्या कवितेतली सच्ची जाणीवनिष्ठा समजून घेऊ शकतो, ती अनुसरू शकतो.

एवढं बोलून मी थांबते. समारोप म्हणून शेवटी विंदाची एक लोकप्रिय कविता ‘तुकोबाच्या भेटीस शेक्सपीयर आला’ त्यांच्याच आवाजात ऐकवायचा प्रयत्न करते.

     धन्यवाद.

आसावरी काकडे
१९.७.२०१७     



No comments:

Post a Comment