Saturday 29 July 2017

कवितेतून व्यक्त होताना


कवितेतून व्यक्त होणं काय असतं?.. खरंच, काय असतं व्यक्त होणं म्हणजे..? व्यक्त होण्यात आधी ते अव्यक्त रूपात असणं गृहीत आहे. कुठं असतं ते? मनात.. बुद्धीत.. पेशी-पेशींमध्ये.. डी एन ए मध्ये..? की पंचेंद्रियांनी आपल्याशी जोडलेल्या चराचरात? काय घडतं व्यक्त होतांना?... कोणत्याही निर्मितीप्रक्रियेचा विचार करतांना असे मूलभूत प्रश्न पडतात. व्यक्त होण्यासाठी वापरलेल्या माध्यमानुसार कलाकृतीचं रूप बदलतं फक्त...! 

कवितेसाठी भाषा.. शब्द हे माध्यम आहे. इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक जिवलग.. जन्मासोबत आलेलं. सर्वव्यापी, सर्वांचं असलेलं. श्वासासारखं सतत आत-बाहेर करणारं. आपल्या आधी आणि नंतरही असणारं.. इतकी सतत सर्वत्र सगळ्यांची असते भाषा. तरी, अशा भाषेत लिहिलेली प्रत्येक कविता वेगळी असते. श्रेष्ठ.. सुमार कशीही असली तरी तिच्यासारखी तीच असते. एकमेव. कारण ती एका ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. आणि अब्जावधी माणसांमधली प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र, एकमेव असते. तिचा ‘स्व’ वेगळा असतो..! 

कवितेतून व्यक्त होणं म्हणजे या ‘स्व’चं अनावरण..! झाकलेलं, दडलेलं, निराकार असलेलं उलगडून शब्दांमध्ये साकार करणं. ‘स्व’रूपाचाच शोध असतो तो. कविता लिहिताना शब्द टिपून घेतात आशय कुठे कुठे रुजलेला. किंवा असंही म्हणता येईल.. आशय भावरूप होऊन उसळतो आणि व्यक्त होण्यासाठी तो वेचून घेतो शब्द.... ‘स्व’ची जाणीव कुठे, किती खोल जाईल, मन.. बुद्धी.. पेशी.. डीएनए.. पैकी कुठे पोहोचेल तितका खोलातला अव्यक्त आशय ती शब्दांना देऊ शकेल. पंचेंद्रियांनी आपल्याशी जोडलेल्या चराचरात किती दूरवर पोहोचेल तेवढा व्यापक आशय तिला गवसेल. हा ‘आशय’ म्हणजे ‘स्व’चीच विविध रूपं असतात. कविता-लेखनाच्या आतापर्यंतच्या अनुभवातून मला जाणवलंय की आपली प्रत्येक कविता आपलं एखादं रूप आपल्याला उलगडून दाखवत असते. 

व्यक्त होऊ पाहणारा आशय मनात पूर्णतः आधीच स्पष्ट असतो असं दरवेळी होत नाही. एखादा विचार, कल्पना चमकते मनात. तिचं टोक पकडून लिहिता लिहिता आशय उलगडत जातो... बर्‍याचदा असं घडतं की जे लिहावं असं मनात असतं ते शब्दांमध्ये पूर्णतः उतरतच नाही. मग मनात राहिलेलं अस्पर्श असं ‘ते’ खुणावत राहातं सतत. अस्वस्थ करतं. त्याला स्पर्श करण्याच्या तहानेनं व्याकूळ होऊन जोपर्यंत आपण बुडी मारत नाही जगण्याच्या तळ्यात शब्द वेचण्यासाठी, जिवाच्या आकांतानं उत्खनन करत नाही आस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं शब्द शोधण्यासाठी किंवा तपश्चर्या करून जिंकून घेत नाही हवे ते शब्द आकाशतत्त्वाकडून तोपर्यंत ते तसंच अस्पर्श राहातं आणि परत परत साद घालत राहातं शब्दांना...

प्रत्येक वेळी शब्दांसाठी अशी तपश्चर्या केली जात नाही. तयार भाषेतून शब्द अलगद पडतात ओंजळीत गळणार्‍या पानांसारखे वाळलेले.. निस्तेज... आणि आपण न कळताच सहज वापरून टाकतो असे आयते, स्वतः न कमावलेले पिढ्यान् पिढ्यांचे उष्टे शब्द आपले म्हणून..! अशा कवितेतून व्यक्त होणारा आशय वरवरचा असतो. अस्पर्श स्वचे अनावरण होतच नाही..! पण अपूर्णतेची ही अवस्थाच पुन्हा पुन्हा लिहिण्याची प्रेरणा देत राहते...

असं सतत कवितेतून व्यक्त होणं हे आपल्याला घडवणारंही असतं. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप उमगत जातं. अपुरेपणाच्या जाणीवेतून झालेल्या चिंतनातून, रियाजातून आपली कविता विकसत जाते. कवितेच्या या विकासाबरोबर आपलाही विकास होत असतो. कारण ती दरवेळी आपल्या बदललेल्या, विकसित झालेल्या, नवं काही सांगू पाहणार्‍या ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. कवितेतून व्यक्त होणं हे असं एकमेकाला घडवणारं असतं

ही प्रक्रिया सजगपणे अनुभवण्यासारखी आहे... लेखन कोणत्याही प्रकारचं असो त्यातून आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. खरंतर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही तेच व्यक्त होत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’ 

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि साहित्यसाधना या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी लेखन-वाचन प्रक्रिया समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी मीपासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना, विचार करून पाहा, आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... आपण जे लिहितो ते आशय-रूपात आधी मनात उमटतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, स्वरूप उमगणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. पण त्याचवेळी ते त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. हे सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही... कुसुमावती देशपांडे यांनी पासंगया आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’... कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

स्व-शोध आणि ‘स्व’ची घडण या दोन गोष्टी मला सतत म्हत्त्वाच्या वाटत आल्या आहेत. माझा वैचारिक प्रवास त्याच दिशेनं चालू राहिला आहे. त्या साध्य करण्याचं माध्यम असलेल्या शब्दांचं, भाषेचं, कवितेचं...एकूण लेखन-प्रक्रियेचं  स्वरूप आणि सामर्थ्य ती प्रक्रिया आतून अनुभवताना मला हळूहळू उमगत गेलं. ही समज येण्याच्या आधीचा प्रवास बराच मोठा आहे. कविता हाच प्रकार व्यक्त होण्यासाठी जवळचा का वाटतो? या प्रश्नामुळे माझ्या वैचारिक प्रवासाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण ताजी झाली...

सुरुवातीला व्यक्त होण्यासाठी डायरी-लेखन हे मला सापडलेलं साधन होतं. सतत पडणारे प्रश्न, त्यातून येणारी अस्वस्थता, एखादी सुचलेली कल्पना, रुखरुख, पश्चात्ताप, आनंद, मनात स्फुरलेला विचार, क्वचित कुठे काही वाचलं असेल त्याला प्रतिसाद... असं जे काही मनात पिंगा घालत राहील ते डायरीत उतरवायचं आणि त्यातूनं बाहेर पाडायचं.. ही माझी फार पूर्वीपासूनची सवय. हे लेखन अर्थात अगदी स्वतःपुरतं. पण शब्दात व्यक्त होऊन स्वतःला समोर पाहाता येण्यातली गंमत अनुभवता यायची. सूख वाटायचं. मनातले कल्लोळ शब्दात उतरवून मोकळं होण्याची ही सोय इतकी सवयीची झाली की कॉलेजातला माझा अभ्यास म्हणजे वाचन कमी नोट्स काढणं अधिक असं असायचं...! 

या स्वांतःसुखाय लेखनात एकदाच एक कविता लिहिली गेली. कुठेतरी वाचलेल्या कवितेला प्रतिसाद अशा रूपात होती ती. मूळ कविता कुठे वाचली, ती कुणाची होती ते आता आठवत नाही पण तिचा भावाशय असा होता- विरहार्त राधेला कृष्ण समजावून सांगतोय की, ‘अगं जरा बघ अवती-भवती.. हे आकाश.. वृक्ष.. फुलं.. ही सगळी आपल्या मीलनाचीच रूपं आहेत. आपण एकमेकांपासून दूर नाहीच..’ हे ऐकून राधेला काय वाटलं असेल ते मी लिहिलं डायरीत माझ्यापुरतं.. ते असं-

“पंचमहाभूतांच्या जाळ्यात अडकलेली मी
नेणीवेतून जाणिवेत येऊ कशी?
जाणिवेत असलेल्या तुला
चर्मचक्षूंनी पाहू कशी?
नाही रे अजून सुटत कोडं
प्रत्यक्ष येऊन समजाव ना थोडं
देहधारी ‘मी’ला देहधारी ‘तू’झीच
चांगली ओळख पटेल
मग लवकरच कोडं सुटेल” 
***
   
१९६७-६८च्या सुमारास लिहिलेली ही माझी पहिली कविता. त्या नंतर परत कविता लिहिली गेली नाही. मी कविता लिहू शकते हा शोध बर्‍याच उशीरा, १९८५-८६च्या आसपास मला लागला. कविता या माध्यमाची ओळख झाल्यावर, लिहायला जमतंय काहीतरी हे लक्षात आल्यावर मात्र मी सतत कविताच लिहित राहिले. डायर्‍यांमधे स्वगतांच्या जागी कविता लिहिल्या जाऊ लागल्या.. कवितेनं मला नादावून टाकलं. आवेग इतका होता की थांबताच येत नाही अशी अवस्था झाली...

आता विचार करताना जाणवतंय की किती स्वाभाविक होतं हे... डायरी-लेखनाला कविता हाच पर्याय असू शकतो. जे डायरी-लेखानात उतरू शकलं नव्हतं तेही कवितेतून व्यक्त करता येऊ लागलं. डायरी-लेखन स्वतःत मिटलेलं, काहीसं बंदिस्त, केवळ माझ्यापुरतं होतं. पण कवितेनं मला ‘मी’च्या छोट्या परिघातून बाहेर काढलं... कवितेचं सर्वात मोठं, प्रथम जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे ती आत्मनिष्ठ राहूनही सार्वत्रिक होऊ शकते. डायरीलेखन काचेसारखं पारदर्शी असतं तर कविता लिहिताना वैयक्तिक तपशील पार्‍यासारखा काचेच्या मागे राहतो आणि कविता आरसा बनून जाते..!  माझ्या पहिल्या कवितासंग्रहाचं शीर्षकच ‘आरसा’ असं आहे. या संग्रहाच्या अर्पण-पत्रिकेच्या जागी मी लिहिलंय- ‘मी तुला माझा, अगदी माझाच असलेला आरसा दिला तरी त्यात तुला तुझंच रूप दिसेल..’

डायरीपेक्षा कवितेचं हे रूप मला व्यक्त होण्यासाठी अधिक प्रभावी वाटू लागलं. पूर्वी डायरीतल्या स्वगतांमध्ये एकच कविता होती. हळूहळू कविता अधिक आणि ‘स्वगतं’ क्वचित असं होऊ लागलं. कवितेतून व्यक्त होण्यातल्या आनंदाच्या नाना परी मी अनुभवू लागले. माझी एक हिंदी कविता आहे-

‘न जाने कैसे / जान जाता है मन / कई अनकही बातें / जिन्हें बेपर्दा देखना ठीक नहीं होता! / तभी तो शब्दों के / कई रंगीन परदे / हमेशा पास रखे जाते हैं / और समय-समय पर / लगाए जाते हैं / जिनमें से / बातें खुलती भी हैं / और नहीं भी..!’ (‘मौन क्षणों का अनुवाद’ या संग्रहातून)

‘बातें खुलती भी हैं / और नहीं भी..!’ यातली गंमत वेगळा आनंद देणारी आहे...
मनातला संघर्ष, वेदना, संताप, गोंधळलेपण, थकलेपण.. यांना समोर बसवून त्यांचं शब्दचित्र रेखता आलं तर अशा अवस्थांमधूनही बाहेर पडता येतं. त्यांच्या जखडलेपणातून सुटता येतं. यातून शांत करणारा आनंद मिळतो... असा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे.

कवितेशी सख्य जडलं तेव्हा असंही अनुभवलं, की ती टिपून, शोषून घेते आपल्याला आणि व्यक्त झाल्यावर नामानिराळी होऊन शब्दांच्या गराड्यातून निसटून जाते. कुणी रसिक वाचक जेव्हा डोकावेल त्या शब्दांमध्ये तेव्हा प्रकटते पुन्हा नव्या रूपात.. त्या क्षणापुरती..! कायमची अडकून राहात नाही शब्दबंधात. आपल्यालाही ठेवते अस्पर्श आणि स्वतःही मुक्त होते. कविता व्दिज असते... एकदा जन्मते कवीच्या मनात- निर्मिती-प्रक्रियेत आणि दुसर्‍यांदा रसिकाच्या मनात- आस्वाद-प्रक्रियेत..! दोन्ही प्रकारे ती सदैव सर्वांची असते. मात्र ती एका कुणाची कधीच होत नाही...

कवितेशी कितीही जवळचं नातं जुळलेलं असलं तरी प्रत्येक वेळी तिला नव्यानं जिंकावं लागतं... तिच्यासाठी व्याकूळ व्हावं लागतं... ‘अस्वस्थतेचं अग्नीकुंड एकसारखं पेटतं ठेवावं तेव्हा कुठे अग्नीशलाकेसारखी कविता प्रकट होते.. पण तिच्या हातातला तृप्तीचा कलश मात्र आपल्याला हाती धरवत नाही...!’ (माझ्या आकाश या कवितासंग्रहातून) मग अतृप्ती पुन्हा अस्वस्थ करते.. अतृप्त ठेवून कविता आपल्याला खर्‍या अर्थानं जिवंत ठेवत असते..!! ती एक सळसळतं चैतन्य असते. हाती न लागून तिनं कितीही छळलं तरी एकदा लागलेला तिचा नाद सोडवत नाही..

कवितेचं हे स्वरूप तिला तिचं माध्यम असलेल्या भाषेमुळं प्राप्त होतं. मानवी भाषेत विलक्षण सामर्थ्य आहे. भाषा-शास्त्रात शब्दाच्या अभिधा (वाच्यार्थ..शब्दशः अर्थ), लक्षणा (लक्षणांवरून समजून घ्यावा असा अर्थ.. म्हणी, वाक्‍प्रचारांमध्ये याचा वापर केलेला असतो) आणि व्यंजना (सूचित केलेला अर्थ. कवितांमधल्या प्रतिमांमध्ये ही सूचकता, अनेकार्थता असते) अशा तीन शक्ती सांगितल्या आहेत. कविता हा असा साहित्यप्रकार आहे ज्यात शब्दांच्या या तिन्ही शक्तींचा वापर केला जातो. त्यामुळेच कविता हाच कोणत्याही भाषेतला आद्य असा साहित्यप्रकार आहे. व्यक्त होण्याचं ते एका अर्थी स्वाभाविक माध्यम आहे.

कवितेत वैयक्तिक भावनांपासून ते तत्त्वचिंतनापर्यंत काहीही सामावू शकतं..! कविता घुसमटीतून बाहेर काढते तशी प्रबोधनही करते. दुःख, संताप.. व्यक्त करते तसं प्रेमही व्यक्त करते.. ती प्रतिमांच्या भाषेत बोलते तशी थेटही बोलते. शब्दांमधून बोलते तशी ओळींच्या मधल्या रिक्ततेतून, विरामचिन्हांमधूनही बोलते... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही ‘बोलत’ असली तरी प्रत्येक वेळी शब्दांत उमटलेली प्रतिबिंबं ज्याची त्याला देऊन टाकून स्वतः आरशासारखी कोरी राहते. नवनिर्मितीच्या अनंत शक्यता तिच्यात ओतप्रोत भरलेल्या असतात... ‘इसीलिए शायद’ या माझ्या कवितासंग्रहातल्या ‘शब्द’ या कवितेतल्या सुरुवातीच्या काही ओळी-

‘कितने अद्‍भुत होते हैं
शब्द..!
कई तरह
कई बार
सत्य को
उजागर करते हैं
और फिर
ढक लेते हैं उसे
अपने ही
प्रकाश से
इसीलिए शायद....’
***

कवितेतून व्यक्त होता होता असं बरंच काही उमगत गेलं. जेवढ्या कविता लिहिल्या तेवढी तिच्यात उमटलेली ‘स्व’ची प्रतिबिंब दिसली. ‘स्व’रूपाचं उद्‍घाटन  करणारी कविता मात्र अस्पर्शच राहिलीय अजून..! असूदे. पण क्षितिजासारखी अप्राप्य राहून ती अशीच साद घालत राहूदे आजन्म..!!
    
आसावरी काकडे
२९.७.२०१७

asavarikakade@gmail.com


 समदा दिवाळीअंकासाठी २०१७


No comments:

Post a Comment