Saturday 13 April 2019

‘स्व’च्या शोधात र


जगणं म्हणजे एक न संपणारी शोधयात्रा असते. प्रत्येकाचा शोध-विषय वेगवेगळा असतो. तसे शोधाचे माध्यमही वेगवेगळे असते. एखाद्या उत्कट अंतर्मुख क्षणी बाकी सगळं बाजूला सारून आपल्या असण्याचाच अर्थ काय? हा मूलभूत प्रश्न उसळून वर येतो आणि त्याचं बोट धरून चालू लागलं की तो आपल्याला ‘स्व’शोधाच्या वाटेवर नेऊन सोडतो. ‘स्व’शोध हा मूलतः तत्त्वज्ञानाचा विषय असला तरी संवेदनशील विचारी माणसाला त्याचे आकर्षण स्वस्थ राहू देत नाही. तो वेगवेगळ्या माध्यमातून या शोधाच्या मागे जात राहतो.

निष्ठावान यशस्वी उद्योजक आणि संवेदनशील सतारवादक म्हणून ओळख असलेल्या विदुर महाजन यांची काव्यक्षेत्रातली मुशाफिरी या जातकुळीची आहे. सतार-साधनेत ‘स्व’शोधाचं माध्यम म्हणून आधाराला घेतलेला ‘स्वर’च आता त्यांच्या शोधयात्रेत सामिल झाला आहे. कारण ‘र’ला ‘स्व’चा शोध लागल्याशिवाय स्वरांचं स्वत्व प्रकटत नाही..! ‘गांधार-पंचम’ या कवितासंग्रहानंतर आता प्रकाशित होत असलेल्या त्यांच्या कवितासंग्रहाचे शीर्षकच ‘स्व’च्या शोधात र’ असं आहे. यातल्या एका कवितेत म्हटलं आहे,

‘‘स्वतःला गोळा करतोय
शब्द इतस्ततः टाकून कागदावर
नाहीच जमलं तर सोडून देणार
तेही प्रयत्न
तरी
काहीतरी करावंच लागेल
मग वाजवीन सतार
सहसा दगा न देणारी माझी सखी
बोटात एकदा घातली नखी
अन् लावल्या सुरात तारा
तरी
तेवढ्यानं नाही भागत
सोसते तीही आघात
स्वतःला सावरते
इतस्ततः पसरलेल्या
मला, आवरते..!”
**

शब्द आणि स्वर यांच्या माध्यमातून जगण्याला अर्थ देण्याच्या प्रयत्नात हा मनस्वी माणूस सतत कशाचा तरी वेध घेतो आहे. कागदावर विखुरून टाकलेले हे शब्दसमूह म्हणजे त्याने एकांतात स्वतःशी केलेला मुक्त संवाद आहे. तो एका पातळीवर स्वतःला प्रश्न विचारतोय, स्वतःची निर्मिती तपासतोय आणि त्याच वेळी या सार्‍यात गुरफटलेलं स्वतःचं असणं अनुभवतोय. भोवतीचा निसर्ग, नात्यांचा वावर अनुभवतोय. शब्द.. स्वरांचे देणे.. घेणे अनुभवतोय. आणि या अनुभवातून आयुष्याचा.. जन्म- मृत्युचा अर्थ लावतोय... गवसलेलं परत वाटून टाकतोय शब्दांनाच..!

डिसेंबर २०१६ ला लिहिलेली ‘मृत्यु’ ही कविता म्हणजे एक स्वैर चिंतन आहे. या कवितेतली, ‘कागदाची जाणीव जायला शब्द बरे पडतात’ अशी काही विधानं जागीच थांबून विचार करायला लावणारी आहेत. या संग्रहात इतरत्रही अशा थांबायला लावणार्‍या जागा आहेत. उदा. १- ‘कविता असो नाहीतर सतार, ऐकवावी वाटण्याच्या प्रेरणेचं करायचं काय?’, २- ‘यमनातून मी व्यक्त होतो / की माझ्यातून यमन? / पण या दोन्हीत ‘मी’ आहे / त्यातून जर झालो मी मुक्त / तरच उरेल, यमन फक्त..!

अलंकार, प्रतिमा, आकृतीबंध या कशातच ही अभिव्यक्ती अडकलेली नाही. कागदांवर छापून वाचकांच्या समोर सादर केलेल्या या कविता नाहीत. हे केवळ व्यक्त होणं आहे. व्यक्त होऊन स्वतःला शब्दांत दिसत राहाणं आहे. शब्द आणि स्वरांच्या सोबतीनं सतत काहीतरी शोधण्याचा ध्यास या अभिव्यक्तीला आहे. एके ठिकाणी म्हटलं आहे,

‘‘अस्तित्व माझे जणू
मातीची एक पणती
ह्या पणतीत इंधन
मी सदा घालत राही
त्यात शरीर माझे
जणू एक वात,
अभिव्यक्तीची ज्योत
पेटलेली राही..’’

श्री विदुर महाजन यांच्या अभिव्यक्तीची ज्योत अखंड तेवती राहो, ‘स्व’च्या शोधात निघालेल्या ‘र’ला स्वत्वाचा शोध लागो आणि विखुरलेल्या शब्दांना कवितेच्या आकृतीबंधाचे मंदिर सापडो ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
१७.१.२०१९

No comments:

Post a Comment