Saturday 13 April 2019

गात्र गात्र रात्र झाली..



‘गात्र गात्र रात्र’ हा नीतीन मोरे यांचा कवितासंग्रह सुखायन, पुणे या प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. संग्रहाचं वेगळं शीर्षक उत्सुकता वाढवून विचार करायला लावणारं आहे. अजित चितळे यांनी तयार केलेलं मुखपृष्ठ आणि शशांक श्रीवास्तव यांची ‘ओघळचित्रे’ असलेली आतली मांडणीही वेगळेपणानं लक्ष वेधून घेते. हे नेपथ्य काय सुचवतेय हे कळण्यासाठी संग्रहातील कवितांच्या भोवतीच्या आणि मधल्यामधल्या जागांमधून डोळसपणे डोळे मिटून आशयाचा जोगवा मागत फिरायला हवं. कारण इथे कवीला ‘दिसलेल्या’ रात्रीच्या कवितांशी संवाद साधायचा आहे. कवितासंग्रहाचं मनोगत हेही एक कविताच वाटावी इतकं काव्यात्म झालं आहे. त्यातील ‘रात्री रातकिड्यांचा तानपुरा झंकारत राहतो. पाली चुकताल वाजवत राहतात. पानांची खर्ज सळसळ दरवळत राहते...’ अशा ओळींतून कवी रात्रीशी किती आणि कसा समरस झाला आहे ते उमगतं. या मनोगतातून कवितासंग्रहाचं आशयसूत्र समजतं. त्याचं बोट धरून कवितांच्या प्रदेशात फिरताना ‘तमतीर्थ’, ‘आत्मशुभ्र’, ‘क्षितिजाचा मायामृग’, ‘डंखसज्ज’, ‘जहरजोर’, ‘तेजटिंब’... अशा जागा थांबवून ठेवतात. त्यावर मनन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

माणसाला दृश्य विश्वाचीच एवढी सवय झालेली असते की न दिसणारं काही त्याच्या जाणिवेच्या परिघातही येईनासं होतं. त्यामुळे तमस्वामिनी असलेली रात्र त्याला गूढ, अनाकलनीय वाटते. सामान्य माणूस तर रात्र जाणून घ्यायच्या वाटेलाच जात नाही. नीतीन मोरे यांनी मात्र रात्रीला जाणिवेच्या कॅलिडोस्कोपमधे घालून निरखलंय. त्यातून त्यांना दिसलेल्या रात्रीची वेगवेगळी रूपं म्हणजे या संग्रहातील कविता..! या कवितांमधून रात्र समजून घेण्यासाठी झालेली कवीची अंतस्थ झटापट प्रत्ययाला येते. पण या कविता सहज, एका दमात वाचता येत नाहीत.  ‘काळोख’, ‘वाढदिवस’, ‘मी-तू पण’, ‘रात्रप्रज्ञा’, ‘व्रत’ अशा कितीतरी कविता वाचताना खोलातलं काहीतरी उमगतंय असं जाणवत राहातं. रात्रीविषयी असं लिहिता येण्यासाठी कवीनं तम-प्रकाशाच्या सीमेवर दीर्घकाळ मनस्वीपणानं गस्त घातली असणार..!

म्हणूनच ‘अंधार उजेडाचे शिलालेख डोक्यावर’ वाहणार्‍या या कवीला ‘रात्रीच्या डोळ्यांतलं काळंभोर आमंत्रण’ सतत व्याकुळ करत राहातं. रात्र समजून घेण्याची मनस्वी ओढ लागते... या ओढीतून रात्रीविषयी लिहिताना कवीने आपले सारे शब्दलाघव पणाला लावले आहे. तमोत्सव साजरा करणार्‍या या कविता खोलात शिरून आस्वादण्यासारख्या आहेत.

आसावरी काकडे

गात्र गात्र रात्र- कवितासंग्रह
कवी- नीतीन मोरे
सुखायन प्रकाशन, पुणे
पृष्ठे ९४, किंमत २०० रु.

लोकमतसाठी


No comments:

Post a Comment